अमेरिका-इस्रायल व इराण यांच्यात युद्धाचा वणवा पेटला असतानाच अमेरिकेच्या दहशतवादविरोधी विभागाचे संचालक जोसेफ केंट यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. मध्यपूर्वेतील या युद्धाला आपण सद्सद्विवेकबुद्धीने पाठिंबा देऊ शकत नसल्याचे केंट यांनी आपल्या राजीनामा पत्रात नमूद केले. त्यांच्या राजीनाम्यामुळे ट्रम्प प्रशासनातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आल्याचे दिसून येत आहे. इराणबरोबरच्या युद्ध समाप्तीसाठी आधीच अमेरिकन सरकारवरील दबाव वाढत आहे. त्यातच युद्धविरोधी भूमिका घेणाऱ्यांच्या गटात आता केंट यांचाही समावेश झाल्याने ट्रम्प यांना बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे.
कोण आहेत जोसेफ केंट?
डोनाल्ड ट्रम्प यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे जोसेफ केंट यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने अमेरिकेत मोठी खळबळ उडाली आहे. ४५ वर्षीय केंट हे अमेरिकन आर्मी स्पेशल फोर्सेसचे माजी सैनिक आहेत. त्यांनी तब्बल ११ लढाऊ मोहिमांमध्ये सहभाग घेतला असून, इराकमधील अमेरिकेच्या नेतृत्वाखालील युद्धादरम्यानही सेवा बजावली आहे. २०१८ मध्ये सेवानिवृत्त होताना त्यांच्या नावावर सहा ‘ब्राँझ स्टार्स’ होते आणि त्यांनी वॉरंट ऑफिसर पदापर्यंत मजल मारली होती. केंट यांच्या आयुष्यात एक मोठी शोकांतिकाही घडली आहे. २०१९ मध्ये सीरियातील एका आत्मघाती बॉम्बस्फोटात त्यांची पहिली पत्नी शॅनन केंट यांचा मृत्यू झाला होता. शॅनन या अमेरिकन नौदलात ‘क्रिप्टोलॉजिक टेक्निशियन’ म्हणून कार्यरत होत्या, त्यांच्या पश्चात दोन मुले आहेत.
लष्करी अधिकारी ते ट्रम्प यांचे सल्लागार
लष्करी सेवेतून निवृत्त झाल्यानंतर केंट यांनी ‘सीआयए’ या निमलष्करी दलात अधिकारी म्हणून काम केले. त्यानंतर २०२० मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचार मोहिमेत त्यांनी दहशतवादविरोधी सल्लागार म्हणून जबाबदारी सांभाळली. २०२२ आणि २०२४ मध्ये केंट यांनी अमेरिकन काँग्रेससाठी निवडणूक लढवली; पण या निवडणुकीत त्यांना दोन्ही वेळा पराभवाचा सामना करावा लागला. राजकारणात केंट यांचे नाव काही कट्टरपंथीयांशी जोडले गेले आहे. २०२२ मध्ये त्यांनी उजव्या विचारसरणीचे राष्ट्रवादी नेते निक फुएन्टेस यांच्याशी चर्चा केल्याचे समोर आले होते. त्यांनी पुढील २० वर्षांसाठी सर्व कायदेशीर स्थलांतर थांबवण्याची मागणी केली होती. २०१९ मध्ये जगभरात धुमाकूळ घालणारा करोना हा चीननेच तयार केल्याचा दावा त्यांनी केला होता. अलीकडच्या काळात त्यांनी काही उजव्या विचारसरणीशी संबंधित गटांपासून स्वतःला दूर केले होते. वंशवाद आणि द्वेषाला माझा पूर्णतः विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
आणखी वाचा : RSS आणि RAW वरील बंदीच्या मागणीने खळबळ का उडाली? अमेरिकन आयोगाच्या अहवालात नेमके आहे तरी काय?
“इराणपासून अमेरिकेला कोणताही धोका नव्हता”
दहशतवादविरोधी विभागाचे प्रमुख म्हणून नियुक्ती झाल्यानंतर अवघ्या आठ महिन्यातच केंट यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. अमेरिका व इस्रायलने इराणविरोधात पुकारलेल्या युद्धाच्या निषेधार्थ त्यांनी हा निर्णय घेतला. इराणकडून अमेरिकेला कोणताही धोका नसताना केवळ इस्रायलच्या दबावाखाली येऊन अमेरिकेने हे युद्ध पुकारल्याचा गंभीर आरोप केंट यांनी केला. आपल्या राजीनामा पत्रातून त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांच्याच एका जुन्या आश्वासनाची आठवण करून दिली. तुम्ही अमेरिकेला कधीही न संपणाऱ्या युद्धांपासून दूर ठेवण्याचे वचन दिले होते. जून २०२५ पर्यंत तुम्हाला याची पूर्ण कल्पना होती की, मध्य पूर्वेतील युद्धे म्हणजे एक प्रकारचा सापळा आहे. या युद्धांमुळे अमेरिकेच्या सैनिकांचा विनाकारण बळी जातो आणि आपल्या देशाची अफाट संपत्ती वाया जाते.
जोसेफ केंट यांचा नेमका आरोप काय?
अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या पहिल्या कार्यकाळात तुम्ही (डोनाल्ड ट्रम्प) कासिम सुलेमानीचा खात्मा केला आणि आयसीसला हरवले; पण देशाला कधीही न संपणाऱ्या युद्धात ओढले नाही, असे केंट यांनी पत्रात नमूद केले. इराणबरोबरचे युद्ध हे एका नियोजित चुकीची माहिती पसरवण्याच्या मोहिमेचा भाग असल्याचा केंट यांनी आरोप केला. इस्रायली अधिकारी आणि अमेरिकन मीडियातील काही घटकांनी डोनाल्ड ट्रम्प यांची दिशाभूल केली. जसे आपल्याला इराक युद्धाच्या संकटात ओढले गेले होते, त्याच रणनीतीचा वापर करून आता इराणविरोधात युद्ध लादले गेले, असा दावाही त्यांनी केला. इस्रायलने लादलेल्या एका युद्धात माझ्या प्रिय पत्नीचा मृत्यू झाला होता, त्यामुळे अमेरिकन जनतेला फायदा न होणाऱ्या युद्धात पुढच्या पिढीला मरायला पाठवण्याचे मी समर्थन करू शकत नाही, अशा शब्दांत केंट यांनी संताप व्यक्त केला.
हेही वाचा : तिशीतील तरुणांमध्ये का वाढतोय हार्ट अटॅकचा धोका? नव्या संशोधनात खळबळजनक दावा; तज्ज्ञांचा इशारा काय?
केंट यांच्या राजीनाम्यावर ट्रम्प काय म्हणाले?
जोसेफ केंट यांच्या राजीनाम्यावर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली. केंटने राजीनामा देला ही चांगलीच गोष्ट आहे. सुरक्षेच्या बाबतीत तो अत्यंत कमकुवत होता. ज्यांना इराण हा धोका वाटत नाही, त्यांची आम्हाला प्रशासनात गरज नाही. ते लोक हुशार किंवा चतूर नाहीत, असे ट्रम्प यांनी ओव्हल ऑफिसमधील पत्रकार परिषदेत सांगितले. व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या कॅरोलिन लेविट यांनीही केंट यांचे दावे हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे. इराण अमेरिकेवर हल्ला करणार असल्याचे पुरावे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याकडे होते, त्यामुळे अमेरिकन नागरिकांचे रक्षण करण्यासाठी युद्धाचा निर्णय घेण्यात आला असे त्यांनी स्पष्ट केले. यादरम्यान ट्रम्प प्रशासनातील इतर अधिकाऱ्यांनीही जोसेफ केंट यांच्या आरोपांचे खंडन केले.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनात मतभेद?
केंट यांचा राजीनामा हा केवळ एका अधिकाऱ्याचा राजीनामा नसून, ट्रम्प यांच्या प्रशासनातील अंतर्गत वादाचा पुरावा मानला जात आहे. इराणविरुद्धच्या युद्धानंतर उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनीही काही प्रमाणात साशंक भूमिका घेतल्याचे वृत्त आहे. स्वतः ट्रम्प यांनीही व्हान्स यांची भूमिका थोडी वेगळी असल्याचे मान्य केले. त्याशिवाय अमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजन्सच्या संचालक तुलसी गॅबार्ड यांनीही सावध भूमिका घेतली. त्यांनी आपल्या निवेदनात राष्ट्राध्यक्षांना अंतिम निर्णयाचा अधिकार असल्याचे नमूद केले; मात्र इराणकडून तातडीचा धोका असल्याचे स्पष्टपणे सांगितले नाही. यादरम्यान केंट यांच्या राजीनाम्याचा इराणविरुद्ध सुरू असलेल्या अमेरिकेच्या कारवाईवर कितपत परिणाम होणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र, हा राजीनामा ट्रम्प यांच्यावर युद्धविरामाचा दबाव वाढवणारा ठरू शकतो, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
