Trump vs Pope Leo : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत:चा येशू ख्रिस्तांच्या रूपातील एक एआय जनरेटेड फोटो ट्रुथ सोशलवर पोस्ट केला होता. ट्रम्प यांच्या फोटोवर ख्रिश्चन समाजातून तसेच धार्मिक नेत्यांकडून टीकेची झोड उठली. त्यानंतर काही तासांतच ट्रम्प यांनी फोटो डिलिट केला ट्रम्प यांच्या फोटोमुळे त्यांच्या समर्थकांच्याही भावना दुखावल्या आहेत. डोनाल्ड ट्रम्प व चौदावे पोप लिओ यांच्यात सुरू असलेल्या मतभेदांच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी फोटो पोस्ट केला. फोटोबद्दल गैरसमज पसरला असून स्वत:ला डॉक्टर दाखवण्यासाठी तो फोटो पोस्ट केला होता, असे ट्रम्प यांनी रेटून सांगितले. दरम्यान, ट्रम्प यांच्या पोस्टमुळे अमेरिकेतील ख्रिश्चन मतदारांच्या भावना दुखावल्या आहेत.

ट्रम्प यांनी पोस्ट केलेल्या फोटोत नेमके काय होते?

१२ एप्रिल (रविवारी) रोजी ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर फोटो पोस्ट केला होता. तो एआय जनरेटेड फोटो होता. ट्रम्प यांनी पांढरा गाऊन परिधान केल्याचे त्या फोटोत दिसून आले. रूग्णालयातील पलंगावर झोपलेल्या रूग्णाच्या कपाळावर ट्रम्प यांनी मागे उभे राहून हात ठेवल्याचे फोटोत दिसते. रूग्ण बेशुद्धावस्थेत आहे. ट्रम्प यांचा एक हात त्या व्यक्तीच्या कपाळावर तर दुसऱ्या हातात तेजस्वी प्रकाशमान गोल दिसत आहे. ट्रम्प यांच्या मागे स्टॅच्यु ऑफ लिबेर्टी, अमेरिकेचा राष्ट्रध्वज, लढाऊ विमाने आणि गरूड पक्षी दिसत आहेत. तसेच ट्रम्प यांच्या आजूबाजूला गणवेशातील सैनिक, नर्स आणि प्रार्थना करणाऱ्या महिला दिसत आहेत. ट्रम्प यांचा फोटो येशू ख्रिस्तांच्या फोटोशी मिळताजुळता आहे.

चौदावे पोप लिओ यांच्यावर टीका केल्यानंतर अर्ध्या तासातच ट्रम्प यांनी एआय जनरेटेड फोटो पोस्ट केला. पोप लिओ हे गुन्हेगारांच्या बाबतीत सौम्य असल्याचे तसेच त्यांचे परराष्ट्र धोरण भयंकर असल्याची टीका ट्रम्प यांनी केली होती. दरम्यान, फोटो येशू ख्रिस्तांच्या फोटोशी मिळताजुळता असल्याचे ट्रम्प यांनी नाकारले आहे. फोटो डिलिट केल्यानंतर सोमवारी त्यांनी प्रतिक्रिया दिली. “मला लोकांना बरे करणारा डॉक्टरच्या स्वरूपात दाखवण्यात आले होते, आणि मी लोकांना खरंच बरे करतो”, असे ट्रम्प म्हणाले.

ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर पोस्ट केलेला एआय फोटो

फोटोतून मानवतावादी प्रतिमा दाखवण्यात आली होती. त्या फोटोचा संबंध रेड क्रॉस (मानवतावादी संस्था) संस्थेशी असल्याचे ट्रम्प म्हणाले. परंतु, फोटोचा आणि संस्थेचा कोणताही संबंध नसल्याचे निरीक्षकांनी म्हटले आहे. सीबीएस न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी फोटो डिलिट करण्याचे कारण सांगितले. ते म्हणाले, “मला कोणालाही गोंधळात टाकायचे नव्हते. लोक गोंधळले आहेत.”

ट्रम्प यांच्यावर “ईशनिंदे”च्या आरोपांसह टीकेची झोड

डोनाल्ड ट्रम्प यांनी येशू ख्रिस्ताच्या रूपातील फोटो पोस्ट केल्यानंतर तात्काळ त्यावर टीका होण्यास सुरूवात झाली. अमेरिकेतील विरोधी पक्ष तसेच ट्रम्प यांच्या काही समर्थकांनी ट्रम्प यांच्यावर टीका केली. ख्रिश्चन कार्यकर्त्या सीन फेच्त यांनी सर्वप्रथम ट्रम्प यांच्या फोटोवर प्रतिक्रिया दिली. “हे तात्काळ डिलिट झाले पाहिजे. हे कोणत्याही परिस्थितीत स्वीकारले जाणार नाही”, असे त्या म्हणाल्या.

कन्सर्व्हेटिव्ह कमेंटेटर ब्रिलिन होलिहँड म्हणाले, “ही एक प्रकारे ईशनिंदा आहे. श्रद्धेबाबत तुम्ही खोटा प्रचार करू शकत नाही. तुमचे कार्य तुमच्याबद्दल सगळं काही सांगत आहे. त्यामुळे तुम्ही स्वत:ला रक्षणकर्ते असल्याचे दाखवण्याची काही गरज नाही.”

महाविद्यालयीन जलतरणपटु व प्रमुख पुराणमतवादी असलेल्या रिली गेन्स म्हणाल्या, “ट्रम्प खरंच असा विचार करतात का? जर हे खरं असेल तर दोन गोष्टी सत्य आहेत. त्यांच्यात थोडी विनम्रता आल्यास त्यांचे कल्याण होईल व त्यांनी ईश्वराची थट्टा करायला नको.” यूएस कॉन्फरन्स ऑफ कॅथलिक बिशपचे अध्यक्ष आर्कबिशप पॉल कॉकली म्हणाले, ट्रम्प यांनी पोप यांच्याबद्दल मांडलेल्या मतामुळे माझ्या भावना दुखावल्या आहेत.

ट्रम्प आणि पोप लिओ वाद

अमेरिका व इस्रायलने इराणबरोबर सुरू केलेल्या संघर्षावर पोप लिओ यांनी सातत्याने टीका केली आहे. पोप लिओ यांनी पश्चिम आशियात सुरू असलेल्या हिंसेचा निषेध केला तसेच संघर्ष रोखण्याचे आवाहन केले. पोल लिओ यांनी युद्धात सुरू असलेला हिंसाचार अमानवीय असल्याचे म्हटले होते. संघर्ष आणखी चिघळण्याआधी इतर पर्यायांचा शोध घ्यावा, असे आवाहन त्यांनी जागतिक नेत्यांना केले होते.

पोप लिओ यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कोणती टीका केली?

पोप लिओ यांनी अल्जिअर्समध्ये दिलेल्या भाषणात आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शक्तींवर टीका केली होती. त्यांचा रोख प्रामुख्याने अमेरिका आणि पाश्चिमात्य राष्ट्रांकडे होता, असे मानले जात आहे. ट्रम्प यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना पोप म्हणाले की, ट्रम्प यांना प्रशासनाची कोणतीही भीती नाही. ते त्यांच्या धार्मिक श्रद्धांनुसार मत मांडणे सुरूच ठेवतील. दरम्यान, ट्रम्प यांनी पोप लिओ यांच्याबद्दलची त्यांची भूमिका मवाळ करण्याचे कोणतेही संकेत दिले नाहीत. पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले, “पोप लिओ यांची विधाने चुकीची आहेत. इराणकडे अण्वस्त्रे असू शकत नाहीत. युद्धाच्या अंतिम निकालाने पोप लिओ आनंदी होणार नाहीत. पोप लिओ यांची माफी मागावी असे काहीही केले नाही”, असे ट्रम्प म्हणाले.

ट्रम्प यांचा पोप रूपातील फोटो अन् ओबामांच्या ‘एप’ व्हिडिओने वाद

डोनाल्ड ट्रम्प यांनी याआधीही एआय जनरेटेड फोटो पोस्ट केले होते. त्यावर भरपूर टीका झाली. पोप फ्रान्सिस यांच्या निधनानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत: पोप असल्याचे दाखवणारा एआय फोटो पोस्ट केला होता. त्यानंतर कॅथलिक नेत्यांनी ट्रम्प यांच्यावर कडाडून टीका केली होती.

पोप फ्रान्सिस यांच्या निधनानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत: पोप असल्याचे दाखवणारा एआय फोटो पोस्ट केला होता.

तसेच या वर्षाच्या सुरूवातीला ट्रम्प यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांचा ‘एप’ (माकड, वानर, चिंपांझी या श्रेणीतील प्राणी) रूपातील एआय व्हिडिओ पोस्ट केला होता. तो नंतर डिलिट करण्यात आला. व्हाइट हाउस मधील एका कर्मचाऱ्याकडून चुकून तो व्हिडीओ पोस्ट झाल्याचे नंतर सांगण्यात आले होते.