Elon Musk Donald Trump Feud : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांच्यातील मैत्री नेमकी किती काळ टिकणार, याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. दोघांमधील ताळमेळ फारतर यावर्षी ऑक्टोबरपर्यंतच राहणार, असा अंदाज काहींनी वर्तविला होता. मात्र हे नाते अपेक्षेपेक्षा आधीच आणि नाट्यमयरित्या तुटले आहे. डोनाल्ड ट्रम्प व एलॉन मस्क यांच्यात अखेर दुरावा निर्माण झाला आहे. सध्या दोघेही एकमेकांवर टीका करताना दिसून येत आहेत. दरम्यान, ट्रम्प व मस्क यांच्यातील संघर्षाचा अमेरिकेसह जगावर काय परिणाम होणार? ते जाणून घेऊ…
खरं तर ट्रम्प आणि मस्क हे दोन्हीही अमेरिकेतील प्रचंड प्रभावशाली व्यक्तिमत्त्वं आहेत. दोघांनीही आपआपल्या क्षेत्रात यशाची शिखरे गाठलेली आहे. ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राजकारणात ऐतिहासिक पुनरागमन केलंय, तर एलॉन मस्क यांनी ४२० अब्ज नेटवर्थसह तंत्रज्ञान, अवकाश, सोशल मीडिया आणि इलेक्ट्रिक वाहन अशा अनेक उद्योगांमध्ये आपले वर्चस्व निर्माण केलं आहे. विशेष म्हणजे या दोघांकडेही स्वत:च्या मालकीचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे ‘ट्रुथ सोशल’ आहे, तर इलॉन मस्क यांचे जगभरात ‘एक्स’चे (पूर्वीचे ट्विटर) जाळे आहे. मात्र, दोघेही आपापल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून एकमेकांवर कोरडे आसूड ओढत आहेत.
आणखी वाचा : ईद साजरी करण्यावर बंदी; पाकिस्तानचा ‘या’ मुस्लिमांविरोधात फतवा, प्रकरण काय?
ट्रम्प-मस्क यांच्यातील संघर्ष कसा सुरू झाला?
डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क यांच्यातील दुरावा हा गेल्या आठवड्यापासूनच सुरू झाला. अमेरिकेच्या व्हाइट हाऊसमधील ओव्हल ऑफिसमधून ट्रम्प व मस्क यांच्यातील मैत्रिपूर्ण संबंध ताणायला सुरुवात झाली. खरंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी इलेक्ट्रिक वाहन कर सवलतीविषयी एक विधेयक आणलं होतं. या विधेयकावर मस्क यांनी नाराजी व्यक्त करीत त्यावर जाहीरपणे टीका केली. त्यांच्या या टीकेनंतर ट्रम्प प्रचंड चिडले आणि त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मस्क यांना चांगलंच सुनावलं. मी एलॉन मस्क यांच्यावर खूपच नाराज आहे, असे ट्रम्प यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

त्यावेळी जर्मन चान्सलर फ्रेडरिक मर्झ अमेरिकेला भेट देत होते. या सगळ्यामुळे ते एका विचित्र शांततेत अस्वस्थ बसलेले दिसत होते. गुरुवारी ट्रम्प व मस्क यांच्यातील दुराव्याचे रुपांतर शाब्दिक युद्धात झाले आणि दोघांमधील संघर्ष एकदमच वरच्या टप्प्यावर पोहोचला. मी नसतो तर डोनाल्ड ट्रम्प हे २०२४ ची निवडणूक हरले असते, अशी पोस्ट मस्क यांनी गुरुवारी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून केली. त्यांच्या या पोस्टवर एका वापरकर्त्याने ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग आणून त्यांना पदावरून हटवावे अशी प्रतिक्रिया दिली. या प्रतिक्रियेचंही मस्क यांनी समर्थन केलं. दरम्यान, एलॉन मस्क आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील मैत्रिपूर्ण संबंध ताणले गेल्यानंतर भविष्यात अमेरिकेच्या धोरणांवर आणि जागतिक घडामोडींवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
ट्रम्प- मस्क यांच्यातील संघर्षामुळे काय होणार परिणाम?
- डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थक व अमेरिकेतील उजव्या विचारसरणीचे लोक हे एलॉन मस्क यांच्या एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करणे थांबवू शकतात, ज्यामुळे
- ट्रम्प यांच्या रोषामुळे मस्क यांना कोट्यवधी रुपयांचं नुकसान सहन करावं लागू शकतं. एक्सशी निगडीत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात.
- सध्या या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उजव्या विचारसरणीचे वर्चस्व आहे. ट्रम्प यांचा पाठिंबा कमी झाल्यास, हे व्यासपीठ नियंत्रणाखाली आणण्यासाठी अमेरिकन प्रशासन नव्या कायद्यांची अंमलबजावणी करू शकते.
- एलॉन मस्क यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेला “Government Efficiency (DOGE)” प्रकल्प हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या पाठिंब्यामुळे होता. आता दोघांमध्ये असलेल्या मैत्रीत दुरावा निर्माण झाल्याने हा प्रकल्प बंद होऊ शकतो किंवा त्यात मोठा बदल होऊ शकतो.
- जर ट्रम्प हे मस्क यांच्या पूर्णपणे विरोधात गेले, तर SpaceX ला मिळणारे NASA व अमेरिकन संरक्षण मंत्रालयाचे करार रद्द होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.
- एलॉन मस्क यांनी ट्रम्प यांच्यावर टीका करणे सुरूच ठेवले तर त्यांच्या समर्थकांमध्ये नकारात्मक भावना वाढू शकते, ज्याचा परिणाम टेस्ला, एक्स आणि मस्क यांच्याशी निगडीत अन्य व्यवसायांवर होऊ शकतो.
हेही वाचा : बांगलादेशच्या नवीन नोटांवर हिंदू मंदिराचे चित्र; कारण काय? मंदिर इतके चर्चेत का?
चीन-अमेरिका यांच्यात संघर्ष वाढणार?
मस्क यांनी चीनमध्ये टेस्लाचा मोठा विस्तार केला आहे. दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी चिनी उत्पादकांवर मोठं आयाशुल्क लादलं आहे. आता मस्क यांना फटका देण्यासाठी ट्रम्प चीनविरोधात अधिकच कठोर भूमिका घेऊ शकतात, ज्यामुळे चीन-अमेरिका यांच्यातील टेक क्षेत्रातील तणाव अधिकच तीव्र होऊ शकतो. दुसरीकडे दोघांमधील संघर्षाला भारताला मोठा फायदा होऊ शकतो. ट्रम्प यांच्याबरोबरच्या दुराव्यामुळे मस्क हे भारताशी जवळीक वाढून गुंतवणुकीसाठी नवीन भागीदार शोधू शकतात.
इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात अस्थिरता येणार?
ट्रम्प आणि मस्क यांच्यातील वादाचा इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रावरही मोठा परिणाम होऊ शकतो. गेल्या काही वर्षांपासून एलॉन मस्क यांनी इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात आघाडी घेतली आहे. त्यातच ट्रम्प हे इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी करण्यासाठी देण्यात येणाऱ्या सवलतींचा विरोध करीत आहेत. यामुळे वाहनांचा खप कमी होऊ शकतो. परिणामी ग्लोबल ईव्ही मार्केटमध्ये अनिश्चितता वाढू शकते. भारतासारख्या विकसनशील देशांचेही यामध्ये मोठे नुकसान होऊ शकते. दरम्यान, ट्रम्प आणि मस्क यांच्यातील मैत्री तुटल्याचा प्रभाव केवळ अमेरिकेच्या राजकारणापुरता मर्यादित राहणार नाही, तर जागतिक तंत्रज्ञान, सामाजिक विकास, व्यापार धोरणांवरही यांचा परिणाम होऊ शकतो. दोन व्यक्तींमधील सुरू असलेला हा संघर्ष भविष्यात मोठी उलथापालथ घडवून आणू शकतो.