Donald Trump Strait of Hormuz Announcement : पश्चिम आशियात युद्धाचा वणवा पेटला असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठी घोषणा करून जगभरात खळबळ उडवून दिली. जागतिक पातळीवर अत्यंत महत्त्वाच्या सागरी मार्गांपैकी एक असलेली ‘हॉर्मुझची सामुद्रधुनी’ आपण चीनसाठी कायमस्वरूपी खुली करत दावा त्यांनी समाजमाध्यमांवर केला. इंधन पुरवठ्यासाठी अत्यंत कळीचा ठरलेल्या या जलमार्गाबाबत ट्रम्प यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे जागतिक ऊर्जा बाजारपेठेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चीन हा जगातील सर्वात मोठ्या ऊर्जा आयातदारांपैकी एक असून त्यांच्याकडून या मार्गावरून मोठ्या प्रमाणावर खनिज तेलाची आयात केली जाते.

डोनाल्ड ट्रम्प नेमके काय म्हणाले?

बुधवारी समाजमाध्यमांवर केलेल्या पोस्टमध्ये ट्रम्प म्हणाले की, अमेरिकेने होर्मुझची सामुद्रधुनी कायमस्वरुपी खुली करण्याचा निर्णय घेतल्यामुळे चीन अत्यंत आनंदी आहे. आम्ही हा निर्णय चीन आणि जगासाठी घेतला आहे. इराणला शस्त्रांचा पुरवठा न करण्याचे चीनने थेटपणे मान्य केले आहे. काही आठवड्यानंतर मी चीनचा दौरा करणार असून तिथे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची गळाभेट घेईन. आम्ही अतिशय शहाणपणाने आणि उत्तम पद्धतीने एकत्र काम करत आहोत. युद्ध टाळून सहकार्यावर भर देत असल्याचे सांगतानाच ट्रम्प यांनी अमेरिकेच्या लष्करी ताकदीचीही आठवण करून दिली. एकमेकांशी लढण्यापेक्षा सहकार्य अधिक चांगले नाही का? पण लक्षात ठेवा, गरज पडल्यास आम्ही लढायलाही तयार असून आणि त्यात इतरांपेक्षा खूपच पुढे आहोत.

ट्रम्प यांची चीनविषयीची भूमिका काय?

डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘फॉक्स बिझनेस नेटवर्क’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला की, त्यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना इराणला लष्करी मदत न करण्याबाबत पत्र लिहिले होते आणि जिनपिंग यांनीही त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यापूर्वी अमेरिकेने इराणला शस्त्रे पुरवणाऱ्या देशांवर ५० टक्क्यांपर्यंत आयात शुल्क लावण्याची धमकी दिली होती. पश्चिम आशियातील संघर्षामुळे जागतिक तेल बाजारावर होणाऱ्या परिणामांना ट्रम्प यांनी फारसे महत्व दिले नाही. चीनला तेलाची गरज असून आम्हाला नाही. त्यामुळे या विषयाचा आमच्या भेटीवर फारसा परिणाम होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, चीनने इराणला खांद्यावरून डागल्या जाणाऱ्या क्षेपणास्त्रांचा पुरवठा केल्याचे आरोप यापूर्वीच फेटाळून लावले आहेत.

आणखी वाचा : इस्रायलसाठी धोक्याची घंटा? इटलीने रद्द केला संरक्षण करार; युरोप-इस्रायल संबंधांवर काय होणार परिणाम?

होर्मुझ सामुद्रधुनीतील प्रत्यक्ष स्थिती काय?

डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझ सामुद्रधुनी चीनसह जगासाठी खुली केल्याचा दावा केला असला तरीही प्रत्यक्षात या जलमार्गावरील वाहतूक सुरळीत झालेली नाही. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सनी हा मार्ग अमेरिका-इस्रायल आणि त्यांच्या मित्रराष्ट्रांच्या जहाजांसाठी बंद केला आहे. युद्धापूर्वी या मार्गावरून दररोज १३० जहाजे ये-जा करीत होते आणि आता ती संख्या निम्म्याहून कमी झाली आहे. अमेरिका आणि इराणमध्ये ८ एप्रिलपासून दोन आठवड्यांचा युद्धविराम लागू असला तरी, पुरवठा साखळीतील अनिश्चितता कायम आहे. एकीकडे ट्रम्प होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्याचा दावा करीत असले तरी, इराणने या जलमार्गावर नाकेबंदी केल्याचे समोर आले आहे. दुसरीकडे, अमेरिकन लष्करानेही हा जलमार्ग आपल्या ताब्यात आल्याचा दावा केला असून इराणशी संबंधित व्यापार पूर्णपणे रोखल्याचे म्हटले आहे.

इराणचा अमेरिकेला गंभीर इशारा

अमेरिका आणि इराण यांच्यात पाकिस्तानच्या मध्यस्थीने सुरू असलेल्या शांतता चर्चेत अद्याप कोणताही मोठा तोडगा निघालेला नाही. त्या पार्श्वभूमीवर इराणचे ज्येष्ठ लष्करी कमांडर अली अब्दुल्लाही यांनी अमेरिकेला गंभीर इशारा दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर दबाव टाकणे सुरूच ठेवल्यास आम्ही पर्शियन आखात, ओमानचा समुद्र आणि लाल समुद्रातील सर्व व्यापारी जहाजांची वाहतूक पूर्णपणे थांबवू शकतो, असे त्यांनी म्हटले आहे. दुसरीकडे, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनीही कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी इस्रायल सज्ज असल्याचे सांगितले आहे. अमेरिकेने एकीकडे राजनैतिक तोडगा काढण्याची तयारी दर्शवली असली तरी, गरज पडल्यास लष्करी कारवाईसाठीही सज्ज असल्याचे संकेत दिले आहेत. आम्ही एका तासात इराणमधील सर्व पुलांचा आणि वीज प्रकल्पांचा नाश करू शकतो; पण आम्हाला तसे करायचे नाही… पुढे काय होते ते पाहू, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

चीनला कसा होऊ शकतो फायदा?

इराणच्या तेल निर्यातीवर अमेरिकेने केलेल्या कडक नाकेबंदीचा थेट फटका चीनला बसण्याची शक्यता वर्तवली जात होती. अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेन्ट यांनी इराणच्या तेल व्यापाराला पूर्णपणे खीळ घालण्याचे संकेत दिले होते. इराणच्या एकूण कच्च्या तेल निर्यातीपैकी ८० टक्क्यांहून अधिक वाटा एकटा चीन खरेदी करतो. एका बाजूला पश्चिम आशियातून तेल पुरवठा कमी झाल्यास चीनच्या ऊर्जा सुरक्षेवर ताण येऊ शकतो. मात्र, दुसऱ्या बाजूला यामुळे ऊर्जा स्रोतांचे विविधीकरण आणि आंतरराष्ट्रीय व्यापारात युआनचा वापर वाढवण्यास चालना मिळू शकते. इराण आधीच चीनसोबत मोठ्या प्रमाणावर ‘युआन’मध्ये तेल व्यवहार करत आहे, ज्यामुळे पेट्रोयुआन ही संकल्पना हळूहळू पुढे येत आहे. याशिवाय, तेलटंचाई वाढल्यास इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला चालना मिळू शकते, ज्याचा फायदा चीनमधील मोठ्या कंपन्यांना होऊ शकतो.

हेही वाचा : ४९ लाखांची तिकीटे काढूनही विमानात प्रवेश नाकारला; पेरूला निघालेल्या भारतीय कुटुंबासोबत काय घडले?

चीनची सध्याची भूमिका काय?

जगातील सर्वात मोठ्या ऊर्जा ग्राहकांपैकी एक असलेल्या चीनला पश्चिम आशियातून स्थिर ऊर्जा पुरवठा राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याचवेळी, चीन आपल्या आर्थिक हितसंबंधांबरोबरच भूराजकीय उद्दिष्टांचा समतोल साधण्याचा प्रयत्न करत आहे. अमेरिकेने चिनी बँकांना इराणशी संबंधित आर्थिक व्यवहार न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यादरम्यान चिनी प्रशासन इराणला अप्रत्यक्ष लष्करी मदत करत असल्याचा अमेरिकेला संशय आहे. मात्र, अमेरिकेने आतापर्यंत केलेले सर्व दावे चीनने फेटाळून लावले आहेत. काही आठवड्यांत डोनाल्ड ट्रम्प आणि शी जिनपिंग यांची बीजिंगमध्ये भेट होणार आहे. या भेटीपूर्वी अमेरिकेने होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्याचा दावा करून चीनला खूश करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे चीनची पुढील भूमिका काय असणार, याकडे सगळ्या जगाचे लक्ष लागून आहे.