Donald Trump Assassination Plot Iran : अमेरिका-इस्रायल व इराण यांच्यात गेल्या चार आठवड्यांपासून युद्धाचा वणवा पेटला आहे. पश्चिम आशियातील या संघर्षामुळे जागतिक बाजारपेठेत खनिज तेलाचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी जगभरातील अनेक देशांना इंधन टंचाईचा सामना करावा लागत आहे. एकीकडे अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविरामाची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येसाठी इराण सरकारने गेल्या पाच वर्षांत अनेक टोळ्या सक्रिय केल्याचा धक्कादायक दावा करण्यात आला आहे. या मोहिमेसाठी चक्क इराणी लोकांकडून वर्गणी गोळा केली जात असल्याची माहितीही समोर आली आहे. त्याविषयीचा हा आढावा…

इराणमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट?

इराणमधील अनेक लोकांच्या मोबाईलवर सध्या मोठ्या प्रमाणात ‘Kill Trump’ असा मजकूर असलेले संदेश येत असल्याचे वृत्त आहे. या संदेशांमध्ये एका वेबसाईटची लिंक दिली जात असून त्याद्वारे नागरिकांना या मोहिमेला पाठिंबा देण्याचे आवाहन केले जात आहे. तसेच, एसएमएसद्वारे एक विशिष्ट क्रमांक पाठवून सहभागाची पुष्टी करण्यास सांगितले जात आहे. ‘इराण इंटरनॅशनल’ या वृत्तवाहिनीने या संदेशांचे स्क्रीनशॉट्स शेअर करीत त्याबाबतची माहिती दिली आहे. इराणमधील स्थानिक ‘रुबिका’या ॲपवर या मोहिमेची सविस्तर माहिती दिली जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. या संदेशांमध्ये दिलेली लिंक तेहरानबाहरे उघडता येत नसल्याचेही सांगितले जात आहे. यापूर्वी २०२४ मध्येही इराण सरकारने डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करण्यासाठी अनेक टोळ्या नियुक्त केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावेळी अमेरिकन तपास यंत्रणांनी फरहाद शकेरी या कुख्यात गुन्हेगाराला अटकही केली होती.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येसाठी किती बक्षीस?

तेहरानमधील ‘दिदबान इराण’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येसाठी राबवल्या जाणाऱ्या कथित मोहिमेला सुमारे दोन लाख ९० हजार इराणी लोकांनी पाठिंबा दिला आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत सुमारे २५ दशलक्ष डॉलर्स (भारतीय चलनानुसार २०८ ते २३५ कोटी रुपये) इतका निधी झाला आहे. २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका व इस्रायलने केलेल्या संयुक्त हल्ल्यात इराणचे तत्कालीन सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी ही कथित मोहीम सुरू करण्यात आल्याचा दावा समाजमाध्यमांवरील संदेशांमध्ये केला जात आहे. मोहिमेत जमा झालेली रक्कम डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणाऱ्या व्यक्तीला किंवा त्यांच्या कुटुंबियांना बक्षीस म्हणून दिली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. यादरम्यान ही मोहीम अचानक सुरू झाली नसून त्यासाठी वापरण्यात आलेली पहिली वेबसाइट २१ फेब्रुवारी २०२६ रोजी नोंदणीकृत करण्यात आली होती. त्यानंतर १६ दिवसांनी दुसरी एक वेबसाइटही याच मोहिमेसाठी सक्रिय करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या वर्षीही ट्रम्प यांच्या हत्येचा फतवा?

डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येसाठी इराणमधील कट्टरपंथीयांनी तब्बल ४० दशलक्ष डॉलर्स (सुमारे ३३५ कोटी रुपये) इतका निधी गोळा केल्याचा दावा ‘जेरुसलेम पोस्ट’च्या अहवालातून करण्यात आला आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये अमेरिकेने इराणच्या तीन आण्विक तळांवर हवाई हल्ले केले होते. त्यानंतर इराणमधील धार्मिक नेत्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना’अल्लाचा शत्रू’ घोषित करून त्यांच्या विरोधात हत्येचा फतवा काढला होता. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे शीर कापून आणणाऱ्या व्यक्तीला १०० अब्ज तोमान (सुमारे ९.६ कोटी रुपये) दिले जातील, अशी घोषणा इराणमधील कट्टरपंथीयांनी केल्याचे वृत्त लंडनस्थित माध्यमांनी दिले होते. मात्र, इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियन यांनी एका मुलाखतीतून या वृत्ताचे खंडण केले होते. माझ्या माहितीनुसार डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात इराणमध्ये कोणताही फतवा जारी करण्यात आलेला नाही. जर कुणी तसे विधान केले असले तर त्याचा आमचे सरकार किंवा सर्वोच्च नेत्यांशी अजिबात संबंध नाही, असे त्यांनी स्पष्ट केले होते.

२०२४ मध्येही रचला होता हत्येचा कट?

इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सने डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येसाठी थेट अमेरिकेत राहणाऱ्या गुन्हेगारांची मदत घेतल्याचा दावा अमेरिकन तपास यंत्रणांनी याआधी केला होता. २०२४ मध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान इराणचा हेर फरहाद शाकेरी याने ट्रम्प यांच्या हत्येचा कट आखला होता. यासाठी त्याने न्यूयॉर्कमधील कार्लिस रिवेरा आणि जोनाथन लोडहोल्ट या दोन सराईत गुन्हेगारांना तयार केले होते; परंतु अमेरिकन तपास यंत्रणांनी हा कट उधळून लावत दोन्ही गुन्हेगारांना अटक केली होती. यादरम्यान २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका व इस्रायलने इराणवर केलेल्या संयुक्त हल्ल्यात डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचणारा मास्टरमाइंड मारला गेल्याचे अमेरिकन तपास यंत्रणांनी म्हटले आहे. हा मास्टरमाइंड फरहाद शाकेरी याला मदत करणारा इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सचा प्रमुख रहमान मोकादम होता, असा दावाही त्यांनी केला आहे.

अमेरिकन सुरक्षा यंत्रणा सतर्क

इराणमध्ये पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याच्या वृत्ताने अमेरिकेत मोठी खळबळ उडाली आहे. सध्या अमेरिकन तपास यंत्रणा या सर्व घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. पश्चिम आशियातील संघर्ष थांबवण्यासाठी अमेरिकेने इराणसमोर १५ मुद्द्यांचा शांततेचा प्रस्ताव ठेवला आहे. दुसरीकडे इराणनेही हा प्रस्ताव फेटाळून लावला असून त्याउलट अमेरिकेसमोरच काही अटी ठेवल्या आहेत. यादरम्यान ट्रम्प यांनी इराणच्या नेत्यांना खूप उशीर होण्यापूर्वी चर्चेच्या टेबलावर येण्याचे आवाहन केले. त्यामुळे अमेरिका-इस्रायल व इराण यांच्यातील संघर्ष थांबणार की यापुढेही सुरूच राहणार, याकडे सगळ्या जगाचे लक्ष लागून आहे.