Donald Trump Iran oil seizure intent marks a major escalation in West Asia: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमधील तेल ताब्यात घेण्याची इच्छा रविवारी (२९ मार्च) व्यक्त केली. पश्चिम आशियात सुरू झालेल्या युद्धाला आता एक महिना पूर्ण झाला आहे. होर्मुझ सामुद्रधुनी खुली न केल्यास इराणमधील तेलाशी संबंधित पायाभूत सुविधा व तेलविहिरींना लक्ष्य केले जाईल, असा इशारा ट्रम्प यांनी सोमवारी (३० मार्च) दिला. इराणने मागील काही आठवड्यांपासून होर्मुझ सामुद्रधुनीवर नाकेबंदी केली आहे. इराण विरोधात युद्ध छेडण्याचा मुख्य उद्देश काय? हे ट्रम्प प्रशासनाकडून अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. जगातील तेल निर्यात करणाऱ्या सर्वात मोठ्या देशांपैकी एक इराण आहे. इराणवर अमेरिकेने मागील काही दशकांपासून निर्बंध लादलेले आहेत. डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले? इराणमधील तेलाचा ताबा ते घेऊ शकतात का? इराणकडे किती तेलाचा साठा आहे? सविस्तर जाणून घेऊया.

इराणच्या तेलाबाबत ट्रम्प काय म्हणाले?

इराणमधील तेलाचा ताबा घेण्यासाठी प्राधान्य दिले जाईल, इराणचे तेल निर्यातीचे ‘हब’ असलेल्या खर्ग बेटाला अमेरिकेचे सैन्य ताब्यात घेऊ शकते, असे ट्रम्प यांनी ‘फायनान्शियल टाइम्स’ या वृत्त संस्थेला सांगितले. इराणमधील बुशेहर प्रांतातील खर्ग बेटाचे क्षेत्रफळ २२ चौरस किलोमीटर आहे. हे बेट प्रवाळ खडकाने तयार झाले आहे. खर्ग बेटावर इराणची सशस्त्र सेना असलेल्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सच्या जवानांचा खडा पहारा असतो. अधिकृत परवानगी घेतल्याशिवाय या बेटावर कोणालाही सोडले जात नाही. इराणची ९० टक्के तेल निर्यात ही खर्ग बेटावरून होते. या बेटावरून १५ लाख तेलाचे बॅरल्स दररोज भरले जातात.

खर्ग बेट आणि होर्मुझ सामुद्रधुनी

अमेरिकेच्या वायू दलाने १४ मार्च रोजी खर्ग बेटावर हल्ला केल्याचे ट्रम्प यांनी सांगितले होते. “सभ्यतेच्या कारणास्तव मी बेटावरील तेलाच्या पायाभूत सुविधा नष्ट केल्या नाहीत. दरम्यान, इराण किंवा इतर कोणीही होर्मुझ सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे जहाजांच्या वाहतुकीला अडथळा निर्माण केला तर मी माझ्या निर्णयाचा पुनर्विचार करेन”, असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते.

व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना त्यांच्याच देशातून यशस्वीपणे अटक केल्यानंतर ट्रम्प प्रशासनाचा आत्मविश्वास वाढल्याचे टीकाकार सांगतात. व्हेनेझुएलातील तेलावर अमेरिकेचे नियंत्रण असल्याचे अमेरिकेने जाहीरपणे सांगितले आहे. मार्चच्या सुरूवातीला व्हेनेझुएलामधून तेलाचे १० कोटी बॅरेल्स अमेरिकेतील हुस्टन व टेक्सास येथील रिफायनरीमध्ये आणण्यात आल्याचे ट्रम्प यांनी सांगितले होते. तसेच तेलाचे आणखी १० कोटी बॅरेल्स अमेरिकेच्या दिशेने लवकरच पाठवले जातील, असे ट्रम्प म्हणाले होते.

व्हेनेझुएलात जगातील सर्वात मोठे तेलाचे साठे आहेत. व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष हुगो चेव्हज यांनी व्हेनेझुएलातील तेल क्षेत्राचे राष्ट्रीयीकरण केले होते. तेव्हापासून अमेरिका व व्हेनेझुएलात कटुता आली. २०१३ मध्ये चेव्हज यांच्यानंतर मादुरो सत्तेत आले. मादुरो यांच्या कार्यकाळात अमेरिकेचे व्हेनेझुएलाशी संबंध खूपच बिघडले. मादुरो यांना अमेरिकेने अटक केल्यानंतर डेल्सी रॉड्रिग्ज या व्हेनेझुएलाच्या अंतरिम सरकारच्या प्रमुख बनल्या. रॉड्रिग्ज यांनी व्हेनेझुएलाचे तेल क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुले केले.

इराणकडे किती तेल आहे?

इराण हा जगातील सर्वात मोठ्या तेल उत्पादक देशांपैकी एक आहे. यूएस एनर्जी इन्फोर्मेशन अॅडमिनिस्ट्रेशननुसार, नैसर्गिक वायू साठ्याच्या बाबतीत इराण जगात दुसऱ्या क्रमांकावर तर कच्च्या तेलाच्या साठ्याच्या बाबतीत इराण जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. इराणकडे जगातील एकूण १२ टक्के तेलाचा साठा आहे. तर १५७ अब्ज बॅरल्स (१५७०० कोटी बॅरल्स) इतकी इराणच्या एकूण तेल उत्पादनाची क्षमता आहे. तेल उत्पादन करण्यात इराणचा क्रमांक नववा आहे. इराणकडून दररोज ३३ लाख बॅरल्स कच्च्या तेलाचे उत्पादन केले जाते.

युद्ध सुरू होण्याआधी इराण दररोज २० लाख बॅरल्स कच्चे तेल निर्यात करत होता. २०१८ मध्ये ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात इराणवर निर्बंध लादले होते. त्याआधी देखील इराणवर अमेरिकेने निर्बंध लादलेले होते. २०१५ मध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी इराणच्या अणुकार्यक्रमावर मर्यादा आणण्यासाठी एक करार केला होता. त्या अंतर्गत इराणला निर्बंधांपासून थोडा दिलासा देण्यात आला होता. त्याचे नाव जॉइंट कॉम्प्रेहेन्सिव प्लान ऑफ अॅक्शन असे होते. अमेरिका व इराणचे संबंध १९७९ मध्ये खऱ्या अर्थाने बिघडले. इराणचे तत्कालीन शासनकर्ते शाह मोहम्मद रझा पहलवी यांची सत्ता एका विद्यार्थी आंदोलनाने उलथवून टाकली होती. पहलवी हे अमेरिकाधार्जिने असल्याचा आरोप इराणी नागरिकांनी केला होता.

अमेरिका इराणच्या तेलाचा ताबा घेऊ शकते का?

‘वॉशिंग्टन पोस्ट’ या वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, अमेरिका इराणचे खर्ग बेट ताब्यात घेण्यासाठी त्यावर छापा टाकण्याची तयारी करत आहे. तसेच होर्मुझ सामुद्रधुनी जवळ असलेला इराणचा किनारपट्टीचा भाग अमेरिका ताब्यात घेण्याचा विचार करत आहे. अमेरिकेकडून विशेष मोहीम हाती घेतली जाऊ शकते. पारंपारिक युद्धात पारंगत असलेल्या सैनिकांचा वापर अमेरिका करू शकते, असे नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, खर्ग बेटाचा ताबा घेतला तरी अमेरिकेला इराणच्या तेलाचा ताबा मिळेलच असे नाही. इराणच्या तेलाचा ताबा घ्यायचा असल्यास अमेरिकेला इराणच्या सगळ्याच रिफायनरी व तेल उत्पादन प्रकल्पांना ताब्यात घ्यावे लागेल. अर्थात अमेरिकेला इराणच्या भूमीचाच ताबा घ्यावा लागेल.

खर्ग बेट (Kharg Island)

इराणने २०२३ मध्ये तेल निर्यातीतून एकूण ५३ अब्ज डॉलर कमावले होते. अमेरिकेने इराणच्या तेलाचा ताबा घेतला तर बाजारात तेलाची आवक वाढेल. परिणामी तेलाचे भाव कमी होतील. दरम्यान, पश्चिम आशियात युद्ध सुरू होण्याआधी बेंचमार्क ब्रेंट कच्च्या तेलाच्या प्रति बॅरलचे दल ६५ डॉलर होते. ते आता प्रति बॅरल ११६ डॉलर झाले आहेत.

अमेरिकेने याआधी इराणच्या तेलात लुडबुड केली आहे का?

होय, इराणच्या तेलात अमेरिकेने रस दाखवण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी १९५३ मध्ये इराणमध्ये पहिल्यांदा लोकशाही पद्धतीने मोहम्मद मोसादेघ हे पंतप्रधान झाले होते. ब्रिटीशांच्या ताब्यात असलेल्या अँग्लो-इराणीयन ऑइल कंपनीचे मोसादेघ यांनी राष्ट्रीयीकरण केले होते. त्यानंतर अमेरिकेने इराणचे तेल सोव्हिएत युनियनच्या हाती जाऊ नये म्हणून गुप्तहेर संस्था सीआयएचा वापर करून मोसादेघ यांची सत्ता घालवली. त्यानंतर शाह यांची सत्ता आली. दरम्यान, इराणचा शेजारी असलेल्या इराकचे तेल मागील दोन दशकांपासून अमेरिकेच्याच ताब्यात आहे. इराकचा तेल महसूल अमेरिकेची सेंट्रल बँक असलेल्या फेडरल रिझर्व्ह बँकेत सर्वात आधी जमा केला जातो.