अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे. २०१६ साली राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पॉर्नस्टार स्टॉर्मी डॅनियलला तोंड बंद ठेवण्यासाठी त्यांनी पैसे दिले, असा आरोप त्यांच्यावर करण्यात येत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच्या ट्रूथ सोशल या साईटवर एक पोस्ट टाकून स्वतःच याची माहिती दिली. ट्विटरवरील खाते बंद करण्यात आल्यानंतर ट्रम्प यांनी या सोशल मीडिया साईटची सुरुवात केली होती. या साईटवर एक पोस्ट टाकून ट्रम्प यांनी त्यांना मंगळवार, दि. २१ मार्च २०२३ रोजी अटक होणार असल्याचे लिहिले आहे. तसेच आपल्या समर्थकांनी आंदोलनासाठी एकत्र यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०२४ च्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत तीन रिपब्लिकन उमेदवारांनी आपली नावे पुढे केली आहे, त्यांपैकी डोनाल्ड ट्रम्प हेदेखील एक आहेत.

ट्रम्प यांच्याविरोधातील आरोप काय आहेत?

राॅयटर्स (Reuters) या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, मॅनहॅटन जिल्ह्याचे वकील अलविन ब्रॅग यांनी न्यू यॉर्क ग्रँड ज्युरी न्यायालयात पुरावा सादर करताना निदर्शनास आणून दिले की, ट्रम्प यांच्यासोबतच्या प्रेमप्रकरणाची कुठेही वाच्यता करू नये, यासाठी स्टॉर्मी डॅनियलला १ लाख ३० हजार डॉलर एवढी रक्कम देण्यात आली. स्टॉर्मीचे खरे नाव स्टेफनी क्लिफॉर्ड आहे. ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रचार करत असताना ही रक्कम देण्यात आली, असा आरोप करण्यात आला आहे.

ट्रम्प यांचे वकील मायकल कोहेन यांनी हे पैसे क्लिफॉर्डला दिले आणि त्यानंतर ट्रम्प यांनी मायकल कोहेन यांना या पैशांची भरपाई करून दिली. बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार, कोहेन यांना दिलेल्या रकमेची नोंद ही कायदेशीर शुल्काच्या स्वरूपात करण्यात आली आहे. ट्रम्प यांची ही व्यापार नोंद असल्याकडे वकिलांनी लक्ष वेधले.

हे वाचा >> ट्रम्प यांचे प्रकरण लपविण्यासाठी पोर्न अभिनेत्रीला सव्वालाख डॉलर

ट्रम्प यांनी मात्र प्रेमप्रकरणाचे आरोप फेटाळून लावले आहेत. मेलेनिया ट्रम्प यांच्याशी लग्न आणि त्यांचा मुलगा बॅरोन याच्या जन्मानंतर सदर प्रेमप्रकरण घडल्याचा आरोप केला जात आहे. ट्रम्प यांच्या वकिलांनी क्लिफॉर्डवर खंडणी उकळण्याचा आरोप केला आहे.

स्टॉर्मी डॅनियल कोण आहे? हे प्रकरण बाहेर कसे आले?

‘न्यू यॉर्क टाइम्स’ने दिलेल्या बातमीनुसार, स्टॉर्मी डॅनियल २००६ पासून तिच्या या प्रेमप्रकरणाची गोष्ट विकण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानंतर तिने दावा केला की, डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ‘द अँप्रेटिस’ (The Apprentice) या रिॲलिटी शोमध्ये काम देण्याचा बहाणा करून तिच्याशी जवळीक साधली आणि तिच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित केले. ट्रम्प यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहे. दरम्यान २००६ साली या दोघांचाही एकमेकांसोबतचा एक फोटो प्रसिद्ध झालेला आहे.

स्टॉर्मीचा हा किस्सा प्रसिद्ध करण्याच्या बदल्यात तिला पैसे देण्यास माध्यम संस्थांनी नकार दिला. यानंतर २०१६ साल उजाडले. ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक गांभीर्याने घेतली होती. या वेळी पुन्हा एकदा ट्रम्प यांच्यावर अशाच प्रकारचा आरोप झाला आणि स्टॉर्मीला पुन्हा एकदा संधी मिळाली. ट्रम्प यांनी काम केलेल्या एका टीव्ही मालिकेचे पडद्यावर न गेलेले चित्रीकरण बाहेर काढले गेले, ज्यामध्ये ट्रम्प एका अभिनेत्रीकडे रोखून पाहत असल्याचे दिसत होते. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी ट्रम्प यांच्यावर टीका केली होती.

आणखी वाचा >> ट्रम्प यांच्यावर आरोप करणारी पॉर्नस्टार अटकेत

‘द टाइम्स’ने दिलेल्या बातमीनुसार, या व्हिडीओ प्रकरणानंतर ट्रम्प यांचा प्रचार करणाऱ्या यंत्रणेला स्टॉर्मीचा किस्सा हा धोक्याची घंटा असल्याचे जाणवले. जर हा किस्सा बाहेर आला तर प्रचाराला मोठा फटका बसून वाद निर्माण होऊ शकतो. यासाठी तिला पैसे देण्याचा निर्णय घेण्यात आला.

पुढे काय झाले?

ट्रम्प यांच्यावर नेमका कोणता गुन्हा दाखल झाला, हे अद्याप समजू शकलेले नाही. पण समोर येणाऱ्या बातम्यांनुसार त्यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे, ज्याला किरकोळ गुन्हा म्हणू शकतो. मात्र तरीही, राज्यांच्या निवडणूक कायद्याप्रमाणे, निवडणूक प्रचारासाठीचा निधी चुकीच्या कामासाठी खर्च केल्याचा आरोप केला जाण्याची शक्यता आहे. बीबीसीने याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, जेव्हा चौकशी पूर्ण होईल, तेव्हा ग्रँड ज्युरी फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत मतदान करू शकतात. पण मॅनहॅटनचे जिल्हा वकील ठरवतील की, आरोप नक्की करायचे आहेत की नाही? आणि करायचे असतील तर ते कोणते?

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Donald trump expects to be arrested tuesday what porn star stormy daniels has alleged against him kvg
First published on: 20-03-2023 at 17:53 IST