Donald Trump Extends Iran ceasefire Mediation By Pakistan : इराणबरोबरचा युद्धविराम संपायला अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तो अनिश्चित काळासाठी वाढवण्याची घोषणा केली. इराणच्या विखुरलेल्या नेतृत्वाला एकत्रित प्रस्ताव घेऊन येण्यासाठी वेळ मिळावा, या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी समाजमाध्यमावर केलेल्या पोस्टमध्ये सांगितले. पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या विनंतीवरून हा युद्धविराम वाढवण्यात आला, असेही त्यांनी नमूद केले. या मध्यस्थीमुळे पाकिस्तानला नेमका काय फायदा होऊ शकतो? या घडामोडींचा भारतावर काय परिणाम होऊ शकतो? त्याविषयीचा हा आढावा…

डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेच्या काही तास आधी इराण व अमेरिकेतील वाटाघाटीच्या चर्चेबाबत प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. सुरुवातीला ट्रम्प यांनी त्यांचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स हे इराणशी चर्चा करण्यासाठी पाकिस्तानमध्ये जाणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, अचानक त्यांचा नियोजित दौरा रद्द करण्यात आला. यादरम्यान अमेरिकेने एका इराणी जहाजाला ताब्यात घेतले. त्याचवेळी इराणनेही धमक्यांच्या छायेखाली चर्चा करण्यास स्पष्ट नकार दिला, त्यामुळे अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धविराम टिकणार की नाही, याबाबत प्रचंड अनिश्चितता निर्माण झाली होती. तज्ज्ञांच्या मते, जर पाकिस्तानने खरोखरच डोनाल्ड ट्रम्प यांना इराणवरील हल्ला थांबवण्यासाठी राजी केले असेल तर आंतरराष्ट्रीय पातळीवरील त्यांची प्रतिमा अधिकच बळकट होऊ शकते. यापूर्वी इराणनेही शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख असीम मुनीर यांचे आभार मानले आहेत.

मध्यस्थीसाठी पाकिस्तानची धडपड का?

पाकिस्तानसाठी हा संघर्ष थांबवणे ही त्यांच्या अस्तित्वाची लढाई मानली जात आहे, कारण त्यांची अर्थव्यवस्था होर्मुझ सामुद्रधुनीतून येणाऱ्या खनिज तेलावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. सध्याच्या संकटामुळे पाकिस्तानमध्ये इंधनाचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे, त्यामुळे शाहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखालील सरकारला अनेक सरकारी कार्यालये आणि शाळांमध्ये ‘वर्क फ्रॉम होम’ (घरातूनच काम) यांसारख्या उपाययोजना लागू कराव्या लागल्या आहेत. पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले आहे. या अटीनुसार त्यांना परकीय चलनाचे साठे एका विशिष्ट पातळीवर राखणे बंधनकारक आहे. तेलाच्या वाढत्या किमतींमुळे हा साठा वेगाने कमी होत असून देशाची अर्थव्यवस्था डबघाईला येण्याची भीती तेथील सरकारला आहे.

आणखी वाचा : ऑपरेशन सिंदूरने घेतला बदला, पण काश्मीरवर अजूनही पहलगामची छाया

पाकिस्तानला नेमकी कशाची भीती?

शाहबाज शरीफ सरकारसमोर अनेक आघाड्यांवर संतुलन राखण्याचे मोठे आव्हान आहे. पाकिस्तानची इराणसोबत ९०० किमीची सीमा असून या मुस्लीम राष्ट्राशी त्यांचे खोलवर संबंध आहेत. पाकिस्तानचा मुख्य आधार असलेल्या सौदी अरेबियाशी इराणचे वैर आहे. पाकिस्तानचा दुसरा मोठा मित्र देश चीनलाही या युद्धामुळे आर्थिक फटका बसत आहे. इराण पूर्णपणे कमकुवत झाल्यास पाकिस्तानच्या सीमेजवळ अस्थिरता वाढू शकते, त्यामुळे या सर्व संबंधांवर ताण येण्याआधीच युद्ध थांबावे, अशी पाकिस्तानची इच्छा आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धविराम वाढवण्यात पाकिस्तानने बजावलेली भूमिका ही केवळ मुत्सद्देगिरी नसून तो पाकिस्तानचा अस्तित्वाचा लढा असल्याचे संरक्षण तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पाकिस्तानचे संरक्षण तज्ज्ञ अली चिश्ती यांच्या मते, पाकिस्तानच्या चिंता दोन भागांत विभागलेल्या आहेत. इराणमध्ये इस्रायलचा प्रभाव असलेले कोणतेही सरकार आल्यास ते पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी घातक ठरू शकते. त्याशिवाय आखाती देशांवरील हल्ले थांबणेही त्यांच्या सुरक्षा व आर्थिक हितासाठी आवश्यक आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतील ठप्प झालेली तेलवाहू जहाजांची वाहतूक पूर्णपणे खुली व्हावी अशी पाकिस्तानची इच्छा आहे.

पाकिस्तानसाठी संभाव्य फायदे आणि धोके

चार वर्षांपूर्वी (ऑक्टोबर २०२२) अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पाकिस्तानला अत्यंत धोकादायक देशांपैकी एक असे संबोधले होते. त्या काळात पाकिस्तानची प्रतिमा दहशतवादाला पाठिंबा देणारा देश अशी होती. त्या पार्श्वभूमीवर आज जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का देणारे युद्ध थांबवण्यात प्रमुख भूमिका बजावणारा देश म्हणून पाकिस्तानची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. दोन आठवड्यांपूर्वी युद्धविराम जाहीर झाल्यानंतर युरोपियन युनियन आणि आखाती देशातील परिषदांनीही पाकिस्तानच्या भूमिकेचे कौतुक केले होते. या घडामोडींमुळे पाकिस्तानला जागतिक स्तरावर महत्त्वाचे स्थान आणि रखडलेली परकीय गुंतवणूक मिळण्याची आशा आहे. पाकिस्तान सरकारसाठी देशांतर्गत पातळीवर हा मुद्दा एक मोठे यश ठरू शकतो. मात्र, या प्रक्रियेत काही मोठे धोकेही आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांचा लहरी स्वभाव पाहता, चर्चा कधीही फिस्कटू शकते. अशा वेळी त्याचे खापर पाकिस्तानवर फुटण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. आधीच पाकिस्तान अमेरिकेच्या हितासाठी काम करत असल्याचा आरोप होत आहे, त्यातच जर अमेरिकेने पुन्हा इराणच्या अटी अमान्य केल्यास पाकिस्तानची स्थिती अत्यंत कठीण होऊ शकते.

हेही वाचा : अमेरिकेसाठी धोक्याची घंटा? डझनभर शास्त्रज्ञ बेपत्ता कसे झाले? त्यांना नक्की काय माहिती होतं?

भारतासाठी दिलासा की भविष्यातील डोकेदुखी?

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध थांबणे हे भारतासाठी नक्कीच फायदेशीर आहे. मात्र, दीर्घकालीन परिस्थितीचा विचार केल्यास पाकिस्तानचा बदललेला अवतार भारतासाठी काही गंभीर प्रश्न निर्माण करणारा ठरू शकतो, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. आतापर्यंत पाकिस्तानला जागतिक स्तरावर मुत्सद्देगिरीच्या पातळीवर एकाकी पाडण्यात भारताला यश आले होते. आता मात्र पाकिस्तान ‘शांततादूत’ म्हणून समोर येत असल्याने हे चित्र बदलण्याची शक्यता आहे. पाकिस्तानमधील नागरी सरकार आणि लष्कर यांच्यातील युती यशस्वी होताना दिसत आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ आखाती देशांशी संवाद साधत असून फिल्ड मार्शल असीम मुनीर यांनी थेट अमेरिकेशी ताळमेळ बसवला आहे. पाकिस्तानच्या लष्कराची ताकद वाढणे हे केवळ तिथल्या लोकशाहीसाठीच नाही, तर भारतासाठीही चिंतेचे कारण आहे. पाकिस्तानचे नागरी नेतृत्व जेव्हा शक्तिशाली असते, तेव्हाच भारतासोबत शांततेच्या चर्चांना गती मिळते. याउलट तिथल्या लष्कराचा दृष्टिकोन भारताबाबत नेहमीच आक्रमक आणि शत्रुत्वाचा राहिला आहे. एकंदरीत इराणमधील युद्ध थांबल्याने भारताला तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी असीम मुनीर यांच्या नेतृत्वाखालील शक्तिशाली होत असलेल्या पाकिस्तानी लष्करावर भारताला आता अधिक तीक्ष्ण नजर ठेवावी लागणार आहे.