UK Effort to Reopen Strait of Hormuz: अमेरिका, इस्रायल व इराण यांच्यात पश्चिम आशियात युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे जगासमोर गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतून होणाऱ्या तेलाची वाहतूक रोखली आहे. त्यामुळे तेल व नैसर्गिक वायूची टंचाई होण्याची शक्यता आहे. जगात पुरवले जाणारे २० ते २५ टक्के कच्चे तेल व नैसर्गिक वायू होर्मुझ सामुद्रधुनीतून जहाजांमार्फत वाहून नेले जाते. जहाजांच्या वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याने युरोपसह अनेक देश त्रस्त झाले आहेत.

या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराणला सोशल मीडियाच्या माध्यमातून वारंवार हल्ला करण्याची धमकी देत आहेत. तसेच त्यांनी होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यासाठी लष्करी कारवाई करा, असे आवाहन युरोपीय देशांना केले आहे. होर्मुझ सामुद्रधुनीत लष्करी कारवाई करून ती खुली करा व आवश्यक असलेले तेल घेऊन जा, असे आवाहन ट्रम्प यांनी नाटोचे सदस्य देश तसेच इतर मित्र देशांना केले होते. दरम्यान, इराणमधील युद्ध थांबावे म्हणून पाकिस्तान मध्यस्थी करत असल्याच्या चर्चा देखील समोर आल्या होत्या.

ट्रम्प यांनी युरोपीय देशांना कोणते आवाहन केले?

होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यासाठी अमेरिकेला नाटोकडून समर्थन मिळत नसल्याने ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली होती. इराणवर हल्ले करून इराणला अश्मयुगात पाठवणार असल्याचा दावा देखील ट्रम्प यांनी केला होता. ज्या देशांचा तेल पुरवठा विस्कळीत झाला आहे, त्या देशांनी उशीर झाला असला तरी आता हिंमत दाखवावी, असे आवाहन ट्रम्प यांनी केले होते.

डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर एक पोस्ट शेअर केली होती. त्यात ते म्हणाले, “होर्मुझ सामुद्रधुनी बंद असल्याने युनायटेड किंग्डम सारख्या काही देशांना विमानासाठी आवश्यक असलेले इंधन मिळत नाहीये. त्या देशांना देण्यासाठी माझ्याकडे दोन सल्ले आहेत. १. यूएसकडून इंधन विकत घ्या. आमच्याकडे भरपूर आहे. २. उशीरा का होईना, थोडं साहस करा. होर्मुझ सामुद्रधुनीकडे जा आणि तेल घ्या. स्वत:साठी कसं लढायचं ते तुम्ही शिकलं पाहिजे, आता यूएस तुम्हाला मदत करणार नाही. कारण तुम्ही आमच्या मदतीला आले नाही. इराणवर भरपूर हल्ले केले आहेत. युद्धातला कठीण अध्याय आता संपला आहे. जा आणि तेल घ्या”, अशी पोस्ट ट्रम्प यांनी केली होती.

युनायटेड किंग्डमने बोलावलेल्या बैठकीत कोणते देश सहभागी?

युनायटेड किंग्डम व युरोपातील देशांनी लष्करी कारवाई करण्यात रस दाखवलेला नाही. त्यांनी पारंपरिक पद्धतीने हा प्रश्न सोडवण्यावर भर दिला आहे. मुत्सद्देगिरी व इराणवर आंतरराष्ट्रीय दबाव आणून हा प्रश्न सोडवण्यासाठी युनायटेड किंग्डमने प्रयत्न सुरू केले आहेत. पश्चिम आशियातील युद्ध आणखी वाढू नये, त्यात इतर देश सहभागी होऊ नये म्हणून असे प्रयत्न होणे अत्यावश्यक असते, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यासाठी युनायटेड किंग्डमच्या अध्यक्षतेत दुरदृश्यप्रणालीद्वारे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात भारत, युरोप, पश्चिम आशिया आणि जगाच्या इतर भागातील ४० हून अधिक देशांनी सहभाग घेतला होता. तसेच इंटरनॅशनल मरिटाइम ऑर्गनायझेशन आणि युरोपियन यूनियन या आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रतिनिधींनी देखील सहभाग नोंदवला होता.

बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली ?

युनायटेड किंग्डमच्या परराष्ट्र सचिव इव्हेट कूपर यांच्या अध्यक्षतेत ही बैठक पार पडली. होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यासाठी काय पाऊलं उचलायला हवी यावर बैठकीत चर्चा करण्यात आली. इराणवर संयुक्त राष्ट्रसंघाच्या माध्यमातून राजनैतिक दबाव आणण्याबाबत विचार करण्यात आला. इराणवर सामूहिकरित्या निर्बंध लादून त्याला होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यासाठी भाग पाडावे, त्यासाठी आवश्यक आर्थिक आणि राजकीय पर्याय कोणते, याबाबतही विचार झाला. जहाजांशी संबंधित कंपन्यांमध्ये ताळमेळ असावा यासाठी काय उपाययोजना करता येतील याबाबतही बैठकीत चर्चा झाली. होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यासाठी काही देशांनी नौदल पाठवण्याची तयारी दर्शवली आहे. परंतु, पश्चिम आशियात युद्ध सुरू असताना तसे करणे योग्य ठरणार नाही. युद्धात सहभागी देशांमधील शत्रूत्व संपल्यावरच नौदल पाठवावे, असा सल्ला इव्हेट कूपर यांनी बैठकीत दिला.

होर्मुझ सामुद्रधुनी लष्करी कारवाई करून खुली केली जाणार का?

युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान किर स्टार्मर मागील आठवड्यात म्हणाले होते की, “लष्कराचा वापर करून सामुद्रधुनी खुली करणे सोपे नाही. हे आपले युद्ध नाही. आपल्याला या संघर्षात पडायचे नाही.” तर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन म्हणाले होते की, “लष्करी कारवाई करून होर्मुझ सामुद्रधुनी उघडणे वास्तविकपणे शक्य होणार नाही. तसे केल्यास होर्मुझ सामुद्रधुनी जवळून जाणाऱ्या जहाजांना इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्सचा धोका निर्माण होईल. त्यांच्याकडे हल्ला करण्यासाठी भरपूर साधने आहेत. बॅलेस्टिक मिसाइल्स आहेत.”

इराणचे होर्मुझ सामुद्रधुनीवर नियंत्रण कसे आहे?

इराणने होर्मुझ सामुद्रधुनीवर नियंत्रण ठेवले आहे. होर्मुझ सामुद्रधुनीवर नियंत्रण ठेवून सार्वभौमत्व सिद्ध करत असल्याचे इराणने म्हटले आहे. इराण व ओमान या दोन देशांमध्ये होर्मुझ सामुद्रधुनी आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतील तेल जहाजांची वाहतूक विस्कळीत झाली आहे. इराणची सध्या ज्या देशांबरोबर बोलणी सुरू आहे, त्याच देशांच्या जहाजांना होर्मुझ सामुद्रधुनी ओलांडता येत आहे. काही जहाजांना इराण दशलक्ष डॉलर टोल आकारून होर्मुझ सामुद्रधुनीतून तेल नेण्याची मुभा देत आहे.

होर्मुझ सामुद्रधुनीवर नियंत्रण मिळवल्याने इराणला वाटाघाटी करणे सोयीचे होते. अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी राजनैतिक पातळीवर प्रयत्न करत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, युनायटेड किंग्डमने बोलावलेल्या बैठकीत सहभागी देशांनी जे प्रयत्न सुरू केले आहेत, त्या प्रयत्नांमध्ये त्यांना अमेरिका व इस्रायलची साथ मिळणे आवश्यक आहे. होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यासाठी इराणवर सामूहिकपणे निर्बंध लावले जाणार असतील, तर काही निर्बंध अमेरिका व इस्रायलवरही लावणे आवश्यक आहे.

युनायटेड किंग्डम व युरोपीय देशांची खरी अडचणी नेमकी काय?

तेल व नैसर्गिक वायूसाठी युरोप होर्मुझ सामुद्रधुनीवर अवलंबून नाही. ६ ते ७ टक्के कच्चे तेल व ७ ते ९ टक्के नैसर्गिक वायू होर्मुझ सामुद्रधुनीतून युरोपला पुरवला जातो. होर्मुझ सामुद्रधुनी बंद झाल्याने युनायटेड किंग्डम व युरोपच्या डिझेल व जेट फ्युएल (विमानांना लागणारे इंधन) वर परिणाम झाला आहे. युके व युरोपला लागणारे २० टक्के डिझेल होर्मुझ सामुद्रधुनीतून वाहून नेले जाते. तसेच निम्म्याहून अधिक जेट फ्युएल होर्मुझ सामुद्रधुनीतून वाहून नेले जाते. त्यामुळे डिझेल व जेट फ्युएलची टंचाई युके व युरोपीय देशांमध्ये निर्माण झाली आहे. युके व युरोपीय देशांमध्ये ऊर्जा महाग झाली आहे. त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होत आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतून सर्वाधिक कच्चे तेल व नैसर्गिक वायू आशियातील भारत, चीन, जपान, दक्षिण कोरिया या देशांना पुरवले जाते.