Donald Trump Foreign Policy : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबरोबर दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी झाल्याची घोषणा मंगळवारी (७ एप्रिल) केली होती. या घोषणेनंतर ट्रम्प यांनी “इराणची संपूर्ण सभ्यता नष्ट करणार” या धमकीपासून माघार घेतली आहे. दरम्यान, इराणने ट्रम्प यांच्या धमकीला जुमानले नव्हते. शस्त्रसंधीची घोषणा झाल्यानंतर इस्रायलने लेबनॉनवर व इराणने आखाती देशांच्या तेलाशी संबंधित पायाभूत सुविधांवर हल्ले केले. त्यातच डोनाल्ड ट्रम्प हे सातत्याने संभ्रम निर्माण करणारी विधाने करत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे ‘मॅडमॅन थिअरी’चा प्रयोग करत आहेत, अशी चर्चा सध्या रंगली आहे. पश्चिम आशियातील युद्धात ट्रम्प ‘मॅडमॅन थिअरी’चा वापर करत आहेत का? त्यामुळे अमेरिकेला फायदा की तोटा? जाणून घेऊयात.

‘मॅडमॅन थिअरी’ ही शितयुद्धाच्या कालावधीत समोर आलेली संज्ञा आहे. एका देशाच्या राष्ट्राध्यक्षाकडून आपण काहीही करू शकतो, कोणत्याही थराला जाऊ शकतो, अशी भीती समोरील देशाला दाखवली जाते. ही भीती दाखवल्याने समोरील देश हल्ला करण्याची किंवा कारवाई करण्याची शक्यता खूपच कमी होते. तसेच त्या देशात संघर्ष वाढण्याबाबत एक प्रकारची भीती नागरिकांमध्ये निर्माण होते. समोरील देशाकडून जास्तीत जास्त फायदा करून घेण्यासाठी या थिअरीचा वापर केला जातो. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या दुसऱ्या कार्यकाळात ‘मॅडमॅन थिअरी’चा वापर कसा केला, त्यामुळे अमेरिकेकडे कसे पाहिले जात आहे, याबाबत पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातील सामाज शास्त्र आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या प्राध्यापक रोझेन मॅकमेनस यांनी माहिती दिली आहे. ‘मॅडमॅन थिअरी’ त्यांनी समजावून सांगितली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची इराणबद्दलची विधाने आणि ‘मॅडमॅन थिअरी’ सध्या चर्चेत आहे. शत्रू राष्ट्राला धाकात ठेवण्यासाठी स्वतःची प्रतिमा ‘काहीही करू शकणारा अनपेक्षित नेता’ अशी निर्माण करणे, म्हणजे मॅडमॅन थिअरी होय.

डोनाल्ड ट्रम्प यांची विधाने आणि त्यांनी केलेल्या कृतींना तुम्ही ‘मॅडमॅन थिअरी’त कसे पाहता?

रोझेन मॅकमेनस – ‘मॅडमॅन’ (वेडा माणूस) चा अर्थ स्पष्टपणे नेहमी सांगता येईलच असे नाही. माझ्या संशोधनानुसार, ‘मॅडनेस’ (वेडेपणा) दोन प्रकारे नेत्यांच्या धमक्यांची विश्वासार्हता वाढवतो. नेता स्वत:ची काहीही करू शकतो अशी प्रतिमा तयार करतो. तसेच टोकाच्या भूमिका घेतो. युद्धाच्या परिणामांचा त्याच्यावर कोणताही परिणाम होत नाही, तसेच जीवितहानीचीही त्याला पर्वा नाही, असे तो दाखवतो.

युद्धादरम्यान ट्रम्प यांची विधाने व कृती यांनी ट्रम्प यांच्यात वरील दोन्ही प्रकारचा ‘मॅडनेस’ (वेडेपणा) असल्याचे दाखवून दिले. युद्धात त्यांना काय साध्य करायचे आहे, याबाबत त्यांनी अनेकदा वेगवेगळी विधाने केली. तसेच इशारेही दिले. त्यामुळे त्यांच्याबद्दल एक प्रकारची संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे. नियम मोडण्याची तयारी, अमेरिका व जगावर काय परिणाम होतील याचा विचार न करता इशारा देणे, संपूर्ण सभ्यताच नष्ट करण्याची धमकी देणे या गोष्टींमुळे ते परिणामांची चिंता करत नाही, अशी त्यांची प्रतिमा तयार होते.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन, जॉर्ज डब्लू बुश, नॉर्थ कोरियाचे किम जोंग उन आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्यापेक्षा ट्रम्प यांचा दृष्टीकोन वेगळा कसा ठरतो?

रोझेन मॅकमेनस – मला वाटते, जगातील इतर कोणत्याही नेत्यापेक्षा जास्त डोनाल्ड ट्रम्प यांचीच प्रतिमा’मॅडमॅन’ अशी तयार झाली आहे. खासगी नोंदींनुसार, रिचर्ड निक्सन यांनी त्यांची प्रतिमा ‘मॅडमॅन’ म्हणून तयार करण्याचे प्रयत्न केले होते. परंतु, त्यांना ते जमले नाही. सोव्हिएत यूनियनला निक्सन यांच्याबरोबर काम करण्यात अधिक रस असायचा.

जॉर्ज डब्लू बुश यांना त्यांचे काही टीकाकार ‘मॅडमॅन’ म्हणायचे. परंतु, ट्रम्प यांच्यात दिसणारा वेडेपणा बुश यांच्यात नव्हता. बुश हे संघर्षासाठी कायम उत्सुक असतात, अशी त्यांची प्रतिमा होती. परंतु, त्यांच्या विधानांवरून किंवा कृतींवरून संभ्रम निर्माण होत नव्हता. त्यांच्याबाबत अनिश्चितता नव्हती.

व्लादिमिर पुतीन यांनी युक्रेनवर हल्ला केल्यानंतर त्यांची प्रतिमा ‘मॅडमॅन’ अशी तयार झाली. त्यांनी पश्चिमेकडील देशांना अण्वस्त्र वापरण्यासाठी ते असंवेदनशील असल्याचे पटवून दिले. त्यांनी युक्रेन विरोधात आतापर्यंत अणुबॉम्ब वापरण्याचा निर्णय न घेतल्याने त्यांची ‘मॅडमॅन’ प्रतिमा पुसली गेली

किम जोंग उन यांची प्रतिमा ‘मॅडमॅन’ म्हणून तयार झाली आहे. टोकाच्या धमक्या व कृती केल्याने, जसे की स्वत:च्या काकांना व भावाला मृत्यूदंड देणे, या गोष्टींमुळे किम जोंग उन यांच्याबद्दल अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्यांची प्रतिमा ट्रम्प यांच्याशी मिळतीजुळती आहे.

भूतकाळात माहितीची कमतरता आणि माहितीवर ठेवले जाणारे नियंत्रण यांमुळे ‘मॅडमॅन थिअरी’ अनेकदा यशस्वी होत असे. आता प्रत्येक विधानाची नोंद होऊन त्याचा अभ्यास केला जातो, तेव्हा ‘मॅडमॅन थिअरी’वर आज कोणत्या मर्यादा आहेत?

रोझेन मॅकमेनस – ‘मॅडमॅन थिअरी’चा वापर करण्यात (वेडेपणाची प्रतिमा निर्माण करण्यात) आज अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यासाठी सातत्याने वेडेपणाची प्रतिमा तयार होईल अशी विधाने किंवा कृती कराव्या लागतात. निक्सन यांना त्यासाठी प्रयत्न करावा लागला. परंतु, आजच्या काळात माहितीचे स्रोत मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने ‘मॅडमॅन थिअरी’चा वापर करणे कठीण झाले आहे. एखाद्या नेत्याची ‘मॅडमॅन’ म्हणून प्रतिमा तयार झाली की तो देत असलेल्या धमक्यांची विश्वासार्हता वाढू शकते. त्या नेत्याने शांततेचा प्रस्ताव ठेवल्यास त्यावर इतरांना विश्वास नसतो. त्यामुळे युद्ध किंवा संघर्ष टाळणे अशक्य होते. कदाचित त्यामुळेच इराणने अमेरिकेबरोबर वाटाघाटी करण्याची आता तयारी दर्शवली असावी.

ट्रम्प यांच्या भूमिकेचा अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणावर सध्या आणि भविष्यात काय परिणाम होईल?

रोझेन मॅकमेनस – ‘मॅडमॅन थिअरी’ ही संकटकाळात वाटाघाटी करण्यासाठी वापरली जाणारी एक रणनीती ठरते. परंतु, तिचा काही परिस्थितींमध्ये तोटा देखील होतो. ट्रम्प यांच्या भूमिकेमुळे अमेरिकेसारख्या देशाला सहकार्यासाठी एक कमी विश्वासार्ह भागीदार म्हणून पाहिले जाईल. यामुळे अमेरिकेची जबाबदारी आणि सक्षमतेची प्रतिमा देखील मलिन होते. म्हणूनच, अखेरीस यामुळे जागतिक व्यवस्थेतील अमेरिकेचे स्थान किंवा प्रतिष्ठा कमी होईल, अशी माझी अपेक्षा आहे.