Can US President Be Removed for Iran Threat : पश्चिम आशियात युद्धाचा वणवा पेटला असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पदावरून हटवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. अमेरिकेच्या २५ व्या घटनादुरुस्तीद्वारे ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्ष पदावरून तातडीने हकालपट्टी करण्याची मागणी तेथील राजकीय नेत्यांकडून केली जात आहे. त्यातच अमेरिकन सट्टेबाजारातही ट्रम्प यांच्या हकालपट्टीवर मोठ्या पैजा लावल्या जात असल्याने या विषयाने सगळ्या जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक महाशक्ती असलेल्या अमेरिकेच्या घटनादुरुस्तीत नेमके काय आहे? त्याचा वापर करून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना पदावरून कसे हटवले जाऊ शकते? त्याविषयीचा हा आढावा…

अमेरिकेच्या २५ व्या घटनादुरुस्तीत नेमके काय?

डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात २५ वी घटनादुरुस्ती लागू करण्याची मागणी होत असतानाच या तरतूदीचा इतिहास जाणून घेणे गरजेचे आहे. १९६३ मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांच्या हत्येनंतर अमेरिकन संसदेने २५ व्या घटनादुरुस्तीचा मसुदा तयार केला होता. राष्ट्राध्यक्षपद कधीही रिक्त राहू नये आणि कोणत्याही आणीबाणीच्या परिस्थितीत राष्ट्राध्यक्षांच्या अधिकारांचे हस्तांतरण लोकशाही मार्गाने व्हावे, असा त्यामागचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले जाते. या घटनादुरुस्तीमध्ये वेगवेगळ्या परिस्थितींसाठी विविध कलमांची तरतूद करण्यात आली आहे. त्यातील कलम १ नुसार, अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या मृत्यू झाल्यास, त्यांनी स्वत:हून राजीनामा दिल्यास किंवा त्यांना पदावरून हटवण्यात आल्यास राष्ट्राध्यक्षपदाची सर्व सूत्रे उपराष्ट्राध्यक्षांकडे दिली जातात. कलम २ आणि ३ अंतर्गत विशिष्ट परिस्थितीत राष्ट्राध्यक्ष स्वतःहून आपले अधिकार उपराष्ट्राध्यक्षांकडे देऊ शकतात. कलम ४ ही अमेरिकन घटनादुरुस्तीतील सर्वात महत्त्वाची तरतूद मानली जाते. त्यानुसार, उपराष्ट्राध्यक्ष आणि मंत्रिमंडळातील बहुसंख्य सदस्य एकमताने ठराव घेऊन राष्ट्राध्यक्षांची पदावरून हकालपट्टी करू शकतात. सध्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून हेच कलम लागू करण्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे.

आणखी वाचा :  लादेनचा खात्मा करणारी अमेरिकेची ‘सील टीम’ इराणमध्ये; वैमानिकाला मृत्यूच्या जबड्यातून कसे वाचवले?

डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला शिवराळ भाषेत धमकी

ईस्टर संडेच्या दिवशी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणविरोधात केलेल्या एका अत्यंत वादग्रस्त पोस्टमुळे अमेरिकेच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. इराणविषयी अत्यंत शिवराळ भाषेचा वापर केल्याने ट्रम्प यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाल्याचा मुद्दा त्यांच्या विरोधकांनी उपस्थित केला. याच पार्श्वभूमीवर ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्ष पदावरून हटवण्यासाठी ‘२५ वी घटनादुरुस्ती’ लागू करण्याची मागणी जोर धरू लागली. ७९ वर्षीय ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हणाले की, मूर्खांनो, होर्मुझची सामुद्रधुनी खुली करा, अन्यथा तुम्हाला नरकात पाठवेन. मंगळवारी इराणमध्ये पॉवर प्लांट डे आणि ब्रिज डे असेल. इराणमधील पूल, ऊर्जा प्रकल्पांना नष्ट केले जाईल. याच पोस्टमध्ये ट्रम्प यांनी इराणला शिव्याही दिल्या. एखाद्या देशाला उद्देशून शिवराळ भाषा वापरण्याची अमेरिकन राष्ट्राध्यक्षांची ही पहिलीच वेळ आहे. ट्रम्प यांची पोस्ट वाचून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यांच्या या विधानावर टीकेची झोड उठवत डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

ट्रम्प यांच्याविरोधात विरोधकांचा आक्रमक पवित्रा

डोनाल्ड ट्रम्प हे युद्धगुन्ह्याची धमकी देत असून आपल्याच मित्रराष्ट्रांना संकटाच्या खाईत ढकलत आहेत. त्यांनी घेतलेली ही भूमिका अमेरिकेतील नागरिकांना अजिबात मान्य नाही. आपला देश यापेक्षा चांगल्या नेतृत्वासाठी पात्र आहे, अशी पोस्ट डेमोक्रॅटिक पक्षाचे अल्पसंख्याक समुदायाचे नेते चक शुमर यांनी केली. अमेरिकन खासदार ख्रिस मर्फी यांनीही ट्रम्प यांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला. मी ट्रम्प यांच्या मंत्रिमंडळात असतो, तर ईस्टर संडेच्या दिवशीच २५व्या घटनादुरुस्तीबाबत घटनातज्ज्ञांशी चर्चा केली असती, असा संताप त्यांनी व्यक्त केला. डेमोक्रॅटिक पक्षाचे आणखी एक नेते यास्मिन अन्सारी यांनीही ट्रम्प यांच्याविरोधात २५ वी घटनादुरुस्ती लागू करण्याच्या मुद्द्याचे समर्थन केले. तसेच, युद्ध थांबवण्यासाठी सत्ताधारी पक्षाने तातडीने पुढाकार घ्यावा, अशी मागणीही अन्सारी यांनी केली.

ट्रम्प यांच्या हकालपट्टीची मागणी आणखीनच तीव्र

डोनाल्ड ट्रम्प यांची राष्ट्राध्यक्ष पदावरून हकालपट्टीच्या मागणीने आणखीनच जोर पकडला आहे. केवळ डेमोक्रॅटिक पक्षाचे नेतेच नव्हे तर काही रिपब्लिकन नेते आणि नामवंत पत्रकारांनीही या मुद्द्याचे समर्थन केले आहे. डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे नेतृत्व करण्यासाठी मानसिकदृष्ट्या सक्षम नाहीत. त्यांना सत्तेवरून दूर करण्यासाठी २५ वी घटनादुरुस्ती तातडीने लागू केली पाहिजे, असे इलिनॉयचे गव्हर्नर जे.बी. प्रित्झकर यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांची भूमिका इतकी धोकादायक आहे की, उपराष्ट्राध्यक्ष आणि मंत्रिमंडळाने आता २५ वी घटनादुरुस्ती वापरण्यास मागेपुढे पाहू नये, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ पत्रकार मेहदी हसन यांनी दिली. विशेष म्हणजे, ट्रम्प यांच्या स्वतःच्या पक्षातील काही नेत्यांनीही त्यांच्यावर टीकेची झोठ उठवली आहे. रिपब्लिकन पक्षाचे माजी खासदार जो वॉल्श म्हणाले की, डोनाल्ड ट्रम्प हे या देशावर आणि जगावर लागलेला एक डाग आहेत. त्यांच्याविरोधात तातडीने २५ वी घटनादुरुस्ती लागू करायला हवी. अमेरिकेतील या राजकीय गोंधळाचा परिणाम आता आर्थिक बाजारावरही दिसत आहे. ‘काल्शी’सारख्या ऑनलाईन सट्टेबाजी प्लॅटफॉर्मवर ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या काळात २५ व्या घटनादुरुस्तीचा वापर केला जाईल का? या विषयावर लोकांनी मोठ्या प्रमाणावर पैजा लावण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा : डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर जगभरात खळबळ; भारताने कशासाठी तयार राहावे? तज्ज्ञांचे मत काय?

यापूर्वीही अनेकदा ट्रम्प यांच्या हकालपट्टीची मागणी

डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात २५ वी घटनादुरुस्ती लागू करण्याची मागणी होण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्यांच्या कार्यकाळात अनेकवेळा अशा प्रकारचा पेच निर्माण झाला आहे. याच वर्षाच्या सुरुवातीला ट्रम्प यांनी ग्रीनलँडला कोणत्याही परिस्थितीत अमेरिकेत सामील करण्याच्या जिद्दीमुळे मोठा वाद ओढवून घेतला होता. त्यांच्या या हट्टामुळे अमेरिकेच्या सुरक्षेला धोका निर्माण होत असल्याचे सांगत अनेकांनी त्यांच्या हकालपट्टीची मागणी केली होती. यापूर्वी २०२१ मध्ये अमेरिकन संसदेवर झालेल्या हल्ल्यानंतर ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्ष पदावरून हटवण्यात यावे, अशी मागणी डेमोक्रॅटिक पक्षासह काही रिपब्लिकन नेत्यांनीही केली होती. मात्र, त्यावेळी ट्रम्प यांनी या प्रक्रियेला फेटाळून लावत मला अशा प्रकारे पदावरून हटवले जाऊ शकत नाही, असे ठामपणे सांगितले होते. यादरम्यान अमेरिकेत २५ व्या घटनादुरुस्तीची चर्चा वारंवार होत असली तरीही प्रत्यक्षात ती लागू होण्याची शक्यता खूप कमी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. अमेरिकेची ही व्यवस्था प्रामुख्याने राष्ट्राध्यक्षांचे संरक्षण करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. निवडणुकांच्या मधल्या काळात एखाद्या राष्ट्राध्यक्षाला अशा प्रकारे पदावरून हटवणे अत्यंत कठीण असते, असे मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीमधील कायद्याचे प्राध्यापक आणि या विषयातील तज्ज्ञ ब्रायन काल्ट यांनी स्पष्ट केले आहे.