अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या एकूणच धोरणांना अमेरिकन मतदारांनी मंगळवारी जोरदार चपराक दिली. टेक्सासपासून ते साउथ कॅरोलिना आणि कॅन्ससपासून ते ओहायो राज्यांतील बहुतांश नागरिकांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या झोळीत भरभरून मते टाकली. अमेरिकेतील नेतृत्व बदलाचे संकेत देणाऱ्या या निकालामुळे सत्ताधारी रिपब्लिकन पक्षाची चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे, २०२४ मध्ये झालेल्या अध्यक्षपदाचा निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्या राज्यांमध्ये सहज विजय मिळवला होता, त्याच ठिकाणी डेमोक्रॅटिक पक्षाला मोठे यश मिळाले आहे. या निकालामुळे ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळातील शेवटची दोन वर्षे अत्यंत आव्हानात्मक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर डेमोक्रॅटिक पक्षाच्या या जोरदार पुनरागमनामागची नेमकी कारणे कोणती? अमेरिकन मतदारांनी ट्रम्प यांच्यासह सत्ताधारी पक्षाला का नाकारले? त्याविषयीचा हा आढावा…
२०२४ मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे जोरदार पुनरागमन
अमेरिकेच्या सत्तेची सूत्रे हाती घेतल्यापासून ट्रम्प यांनी अनेक वादग्रस्त आणि परिणामकारक निर्णय घेतले. त्यांच्या बहुतांश निर्णयांचा जागतिक अर्थव्यवस्थेसह जगभरातील सर्वसामान्य कुटुंबांच्या घरखर्चावरही मोठा परिणाम झाल्याचे दिसून आले. त्यामुळे या निकालाचे परिणाम केवळ अमेरिकेपुरते मर्यादित न राहता जगभरात उमटण्याची शक्यता आहे. पुढील दोन वर्षे अमेरिकेतील प्रतिनिधीगृह आणि सिनेट या दोन्ही सभागृहांवर डेमोक्रॅटिक पक्षाचेच नियंत्रण राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अमेरिकेत २०२४ मध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार आणि तत्कालीन उपाध्यक्ष कमला हॅरिस यांचा पराभव केला होता. या विजयासह त्यांनी अमेरिकेच्या राजकारणात जोरदार पुनरागमन केले. ट्रम्प यांचा यापूर्वीचा राजकीय प्रवास अनेक वादांनी भरलेला होता.
अमेरिकेच्या इतिहासात दोन वेळा महाभियोगाला सामोरे जाणारे ते पहिले अध्यक्ष ठरले होते. तसेच गुन्हेगारी प्रकरणात दोषी ठरलेले ते पहिले माजी अध्यक्ष आणि पदावर असताना दोषी ठरलेले पहिले विद्यमान अध्यक्षही होते. असे असतानाही दोन प्रमुख मुद्द्यांवर दिलेल्या आश्वासनांमुळे ट्रम्प यांना २०२४ च्या निवडणुकीत मोठा विजय मिळाला. अमेरिकेच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी बेकायदा स्थलांतरावर नियंत्रण आणणे आणि स्थलांतरविषयक धोरण अधिक कठोर करणे हे त्यांचे पहिले आश्वासन होते, तर वाढती महागाई आणि जीवनावश्यक वस्तूंच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांवर पडणारा आर्थिक भार कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते.
मध्यावधी निवडणुकीवर कोणकोणत्या मुद्द्यांचा प्रभाव?
अमेरिकेतील मतदारांनी मतदान करताना अर्थव्यवस्थेला सर्वाधिक महत्त्व दिल्याचे दिसून आले. निवडणुकीच्या निकालांवर प्रभाव टाकणाऱ्या प्रमुख मुद्द्यांमध्ये अर्थव्यवस्थेचा समावेश होता. राजकीय विश्लेषकांच्या मते, डोनाल्ड ट्रम्प यांनी महागाईवर नियंत्रण मिळवण्याचे आणि नागरिकांचे राहणीमान सुधारण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, वस्तूंच्या किमती सातत्याने वाढत राहणे, परदेशातून आयात होणाऱ्या वस्तूंवर लादलेले शुल्क आणि इराणसोबतच्या युद्धाचे आर्थिक परिणाम यांमुळे ट्रम्प यांचे हे आश्वासन अपयशी ठरल्याचे दिसून आले. अमेरिकेतील विविध प्रसारमाध्यमांच्या समूहासाठी ‘SSRS’ या संस्थेने केलेल्या मतदानोत्तर सर्वेक्षणानुसार, जवळपास १० पैकी नऊ मतदारांनी जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमती हा मतदानाचा निर्णायक मुद्दा असल्याचे सांगितले. जवळपास दोनतृतीयांश मतदारांनी वस्तूंच्या वाढत्या किमतींसाठी डोनाल्ड ट्रम्प यांना जबाबदार धरले, तर सुमारे १० पैकी सहा मतदारांनी अमेरिकेची अर्थव्यवस्था अधिकच बिघडण्यास ट्रम्प हेच कारणीभूत असल्याचा आरोप केला.
अमेरिकन मतदारांमधील नाराजी केवळ घरगुती खर्चापुरती मर्यादित नव्हती. देशाची सध्याची वाटचाल पाहता सुमारे चारपैकी तीन मतदारांनी असमाधान व्यक्त केले. याशिवाय, सरकारी यंत्रणेतील भ्रष्टाचार आणि ट्रम्प यांचे वर्तन यांबाबतही मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी होती. अर्थव्यवस्थेवरील दबाव वाढत असतानाच इराणसोबतच्या युद्धामुळे मतदारांच्या नाराजीत आणखी भर पडली. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प प्रशासनाच्या प्राधान्यक्रमांवर मतदारांकडून प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले. डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवारांना कट्टरपंथी किंवा धोकादायक ठरवून निवडणुकीचा मुद्दा बदलण्याचा ट्रम्प यांनी प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या या प्रयत्नांना यश आले नाही. कारण, बहुतांश अमेरिकन मतदारांसाठी दैनंदिन जीवनातील अत्यावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमती हाच सर्वात महत्त्वाचा मुद्दा ठरला.
निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाचीही कसोटी
ही निवडणूक केवळ डेमोक्रॅट्स आणि रिपब्लिकन यांच्यातील लढत न राहता स्वतः डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाचीही कसोटी ठरली. मध्यावधी निवडणुकांकडे आपल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कामगिरीवरील कौल म्हणून पाहण्याचे आवाहन ट्रम्प यांनी मतदारांना वारंवार केले होते. मात्र, त्यांच्या याच भूमिकेमुळे रिपब्लिकन पक्षासमोरील निवडणुकीचे आव्हान अधिक कठीण झाले. सीएनएनने केलेल्या मतदार सर्वेक्षणानुसार, १० पैकी सहापेक्षा अधिक मतदारांनी ट्रम्प यांच्या कामगिरीबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यापैकी बहुसंख्य मतदारांनी तीव्र नाराजी असल्याचे सांगितले. असोसिएटेड प्रेसच्या (AP) मतदार सर्वेक्षणातही सुमारे १० पैकी सहा मतदारांनी ट्रम्प हे देशाच्या हितापेक्षा स्वतःच्या वैयक्तिक हिताला अधिक प्राधान्य देत असल्याचे मत व्यक्त केले. तसेच, सुमारे ७० टक्के मतदारांना राष्ट्राध्यक्षांच्या अधिकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी काँग्रेसने अधिक प्रभावी भूमिका बजावावी, असे वाटत होते. राज्यस्तरीय निवडणुकांमध्ये ट्रम्प यांनी केलेले हस्तक्षेपही रिपब्लिकन पक्षाच्या कामी आले नाहीत. टेक्सासमधील केन पॅक्स्टन आणि दक्षिण कॅरोलिनातील डार्लिन ग्रॅहम यांच्यासह ट्रम्प यांनी पाठिंबा दिलेल्या उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. ज्या राज्यांमध्ये ट्रम्प यांनी स्वतः वारंवार प्रचारसभा घेतल्या होत्या, तिथेही रिपब्लिकन पक्षाची पीछेहाट झाली.
टेक्सासपासून दक्षिण कॅरोलिनापर्यंत डेमोक्रॅट्सची मुसंडी
डेमोक्रॅटिक पक्षाला मिळालेले यश केवळ पारंपरिक अटीतटीच्या लढती होणाऱ्या राज्यांपुरते मर्यादित राहिले नाही. रिपब्लिकन पक्षाचे बालेकिल्ले मानल्या जाणाऱ्या राज्यांमध्येही डेमोक्रॅट्सने विजय मिळवला. यावरून अमेरिकेच्या राजकारणात मोठे बदल होत असल्याचे स्पष्ट झाले. टेक्सासमध्ये जेम्स टॅलारिको यांच्या विजयाची ऐतिहासिक नोंद झाली. तब्बल ३८ वर्षांनंतर या राज्यात डेमोक्रॅटिक पक्षाला सिनेटची जागा जिंकता आली. दक्षिण कॅरोलिनामध्येही अॅनी अँड्र्यूज यांनी ट्रम्प यांच्या पसंतीच्या उमेदवार डार्लिन ग्रॅहम यांचा पराभव केला. २०२४ मध्ये झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांनी या राज्यात १८ टक्के मतांच्या फरकाने विजय मिळवला होता. दुसरीकडे ओहायोमध्येही डेमोक्रॅटिक पक्षाने मोठी मुसंडी मारली. शेरॉड ब्राउन यांनी रिपब्लिकन पक्षाच्या ताब्यात असलेली सिनेटची जागा पुन्हा जिंकली. याशिवाय, राज्याच्या गव्हर्नरपदाच्या निवडणुकीतही डेमोक्रॅटिक पक्षाने विजय मिळवला.
कॅन्ससमध्ये अॅडम हॅमिल्टन यांनी विद्यमान रिपब्लिकन सिनेटर रॉजर मार्शल यांचा पराभव केला. या विजयामुळे १९३२ पासून या राज्यात सिनेटची जागा जिंकण्यात अपयशी ठरलेल्या डेमोक्रॅटिक पक्षाचा प्रदीर्घ दुष्काळ संपुष्टात आला. या निवडणूक निकालांमधून काही ऐतिहासिक विक्रमही नोंदवले गेले. जॉर्जिया राज्यात कीशा लान्स बॉटम्स अमेरिकेच्या इतिहासातील गव्हर्नरपदी निवडून आलेल्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला ठरल्या. न्यू मेक्सिकोच्या डेब हॅलँड यांनी गव्हर्नरपदाची निवडणूक जिंकत अमेरिकेतील स्थानिक आदिवासी समुदायातील पहिल्या महिला गव्हर्नर होण्याचा मान मिळवला. तर न्यू हॅम्पशायरचे ख्रिस पॅपस हे अमेरिकेच्या सिनेटवर निवडून गेलेले पहिले उघडपणे समलैंगिक असल्याचे जाहीर केलेले पुरुष ठरले.
दोन्ही सभागृहांवर नियंत्रण मिळूनही डेमोक्रॅट्ससमोर मर्यादा
मध्यावधी निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाने विजय मिळवला असला तरी त्यांच्यासमोर आव्हाने अद्याप कायम आहेत. प्रतिनिधीगृह आणि सिनेट या दोन्ही सभागृहांवर नियंत्रण मिळवूनही पक्षाला आपले महत्त्वाकांक्षी कायदे मंजूर करून घेणे सोपे जाणार नाही. त्यामागचे प्रमुख कारण म्हणजे- अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडेविधेयकांना नकाराधिकार (व्हेटो) वापरण्याचा अधिकार आहे. तसेच, सिनेटमध्ये बहुतांश विधेयके मंजूर करण्यासाठी किमान ६० मतांची आवश्यकता असते. त्यामुळे काँग्रेसच्या दोन्ही सभागृहांवर नियंत्रण मिळूनही डेमोक्रॅटिक पक्षाला आपले सर्व राजकीय निर्णय आणि आश्वासने प्रत्यक्षात आणताना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. दरम्यान मध्यावधी निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला मोठा फटका बसल्यानंतर ट्रम्प यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिली. एका बाजूला त्यांनी डेमोक्रॅट्सचे अभिनंदन केले, तर दुसरीकडे त्यांनी पराभवाचे खापर स्वतः निवडणुकीच्या रिंगणात नसल्यावर फोडले. ‘मी निवडणूक लढवली असती तर मोठ्या फरकाने जिंकलो असतो’ असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. त्यांच्या विधानानंतर समाजमाध्यमांवर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
