अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या वर्षभरात एकापाठोपाठ एक कठोर निर्णय घेतले. काही दिवसांपूर्वी त्यांनी अमेरिकेच्या इमिग्रेशन धोरणात बदल करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या या निर्णयामुळे तिथे काम करणाऱ्या भारतीयांना मोठा त्रास सहन करावा लागला. यादरम्यान ट्रम्प प्रशासनाने आणखी एक कठोर कायदा करण्याची तयारी केली आहे. मंगळवारी ‘स्टेट ऑफ द युनियन’ कार्यक्रमातील भाषणादरम्यान ट्रम्प यांनी अमेरिकन संसदेला ‘डालिला कायदा’ मंजूर करण्याची विनंती केली. हा कायदा मंजूर झाल्यास त्याचा भारतीय वंशाच्या कामगारांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, त्याविषयीचा हा आढावा…
नेमका काय आहे डालिला कायदा?
अमेरिकेत बेकायदा राहणाऱ्या स्थलांतरितांना व्यावसायिक वाहनचालक परवाना दिला जाऊ नये यासाठी डालिला कायदा आणला जात आहे. सध्या अमेरिकेतील काही राज्यांमध्ये वाहन परवाना देण्याचे वेगवेगळे नियम आहेत. त्याच संधीचा फायदा घेऊन बेकायदा स्थलांतरित वाहनचालक परवाना मिळवत असल्याचे ट्रम्प प्रशासनाने म्हणणे आहे. कायदेशीर दर्जा नसलेल्या अनेक वाहनचालकांना स्थानिक भाषेचे ज्ञान नसल्यामुळे त्यांचे अवजड वाहन चालवणे धोक्याचे ठरते. अवैध स्थलांतरितांपैकी अनेकांना इंग्रजी भाषेचे ज्ञान नाही, त्यामुळे रस्त्यांच्या कडेला असलेल्या फलकांवरचे नियम त्यांना समजत नाहीत. त्याशिवाय अपघात प्रवण क्षेत्रातील धोकादायक चिन्हेही त्यांना ओळखता येत नाहीत. परिणामी, त्यांच्या वाहन चालवण्याचा पद्धतीमुळे अमेरिकन नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण होतो, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.
कायद्याला ‘डालिला’ हेच नाव का?
या कायद्याचे नाव डालिला कोलमन या पाच वर्षांच्या चिमुकलीवरून ठेवण्यात आले आहे. जून २०२४ मध्ये दक्षिण कॅलिफोर्नियात एका १८ चाकी ट्रकने अनेक वाहनांना धडक दिली होती. या भीषण अपघातात चिमुकलीला गंभीर दुखापत झाल्याने आयुष्यभरासाठी अपंगत्व आले. अपघातग्रस्त ट्रक प्रताप सिंह नावाचा भारतीय चालक चालवत होता, जो २०२२ पासून अमेरिकेत बेकायदा राहत होता. तरीदेखील त्याच्याकडे कॅलिफोर्नियात व्यावसायिक वाहन चालवण्याचा कायदेशीर परवाना होता. या अपघातानंतर पोलिसांनी प्रताप सिंह याला अटक करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली. सध्या तो कॅलिफोर्नियाच्या तुरुंगात असून लवकरच त्याला अमेरिकेतून हद्दपार केले जाणार आहे.
आणखी वाचा : भारतात दर दोन मिनिटाला कॅन्सरने तिघांचा मृत्यू; आकडेवारी कोणता इशारा देतेय?
अमेरिकेत रस्ते अपघातांची मालिका
ऑगस्ट २०२५ मध्ये अमेरिकेतील फ्लोरिडा शहरात अशाच प्रकारचा अपघात झाला होता. २०१८ मध्ये बेकायदा मार्गाने अमेरिकेत प्रवेश करणाऱ्या हरजिंदर सिंग हा भारतीय वंशाचा ट्रकचालक या अपघातासाठी जबाबदार होता. त्याने चुकीच्या पद्धतीने ‘यू-टर्न’ घेतल्यामुळे झालेल्या अपघातात तीन लोकांचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर हरजिंदरने घटनास्थळावरून पळ काढला; पण पोलिसांनी त्याला कॅलिफोर्नियातून अटक केली होती. इंग्रजी भाषा येत नसतानाही त्याला कॅलिफोर्नियात वाहन चालवण्याचा परवाना मिळाल्याचे तपासातून समोर आले होते. सध्या हरजिंदर हा तुरुंगात असून त्याच्यावर कायदेशीर खटला सुरू आहे. त्यात दोषी आढळल्यास त्याला किमान ४५ वर्षांची शिक्षा होऊ शकते, असे कॅलिफोर्नियातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
भारतीय ट्रकचालकांवर काय परिणाम?
डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रस्तावित केलेला ‘डालिला कायदा’ मंजूर झाल्यास त्याचा सर्वात मोठा फटका भारतीय वंशाच्या ट्रकचालकांना बसण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील ट्रक वाहतूक क्षेत्रात भारतीय समुदायाचा विशेषतः पंजाब आणि हरियाणातील नागरिकांचा मोठा वाटा आहे. एका आकडेवारीनुसार, अमेरिकेत सध्या दीड लाखांहून अधिक भारतीय वंशाचे ट्रकचालक आहेत. देशातील एकूण ट्रकचालकांपैकी सुमारे २० टक्के (पाच पैकी एक) चालक भारतीय आहेत. अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टी भागात भारतीय ट्रकचालकांचे प्रमाण तब्बल ५० टक्के इतके आहे. कॅलिफोर्निया आणि टेक्सास यांसारख्या राज्यांमध्ये शीख समुदायातील ट्रकचालक मोठ्या संख्येने कार्यरत आहेत.
हजारो ट्रकचालकांच्या नोकऱ्या धोक्यात
अमेरिकेने वाहनचालक परवाना देण्याचे नियम आधीच कडक केल्याने त्याचे परिणाम आतापासूनच दिसू लागले आहेत. २०२५ मध्ये झालेल्या तपासणीत ७,००० हून अधिक व्यावसायिक चालकांना कामावरून हटवण्यात आले होते, त्यामध्ये बहुसंख्य चालक भारतीय वंशाचे असल्याचे समोर आले आहे. कॅलिफोर्निया सरकारने परदेशी नागरिकांना दिलेले १७,००० व्यावसायिक परवाने रद्द करण्याची घोषणा केली आहे. ‘दलिला कायदा’ आणि इंग्रजी भाषेच्या कडक चाचण्यांमुळे भारतीय चालकांसमोरील अडचणी अधिक वाढणार आहेत. अनेक चालक वाहन चालवण्यात तरबेज असूनही केवळ भाषेच्या निकषामुळे त्यांचे परवाने रद्द होण्याची शक्यता आहे. आधीच अमेरिकेत वाहनचालकांची मोठी कमतरता आहे, त्यातच हजारो भारतीय चालकांना कामावरून हटवल्यास अमेरिकेची पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा : आईच्या मालमत्तेवर मुलगा हक्क सांगू शकतो का? कायदा काय सांगतो? उच्च न्यायालयाचा निर्णय काय?
वाहनचालक परवान्याचे नियम कडक
अमेरिकेच्या वाहतूक विभागाने अमलात आणलेल्या अद्ययावत नियमानुसार व्यावसायिक वाहनचालक प्रश्नांची आणि निर्देशांची इंग्रजीत उत्तरे देऊ शकतात का ते पाहिले जाणार आहे. त्यांना महामार्गावरील वाहतूक चिन्हे आणि इलेक्ट्रॉनिक संदेश फलक समजतात का हेही तपासले जाणार आहे. जे ट्रकचालक इंग्रजी ही द्वितीय भाषा म्हणून शिकले आहेत, त्यांच्यासाठी हे आव्हानात्मक असू शकते. प्रश्नांची उत्तरे देताना त्यांनी चुका केल्या किंवा त्यांचे उच्चार जड असतील तर त्यांना अयोग्य ठरवले जाण्याची भीती आहे. चालकांना वाहतुकीची कागदपत्रे, प्रवासाचे मूळ आणि गंतव्यस्थान याबद्दल आणि ते किती काळ कामावर आहेत याबद्दलच्या प्रश्नांची उत्तरे देणे आवश्यक असणार आहे. अमेरिकेत यापूर्वी २०१६ मधील राष्ट्रीय पातळीवरील नियमांप्रमाणे, व्यावसायिक चालकांना वाहतूक चिन्हे वाचण्यापुरते इंग्रजी समजणे आवश्यक होते. इंग्रजी येत नसेल तर त्यांना तसे प्रमाणपत्र दिले जात होते. आता नव्या नियमांनुसार, चालकांना इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवणे आवश्यक आहे. अर्थातच, जुन्या नियमापेक्षा नवा नियम कठीण असल्याने भारतीय वंशाच्या हजारो ट्रकचालकांच्या नोकऱ्या धोक्यात आहेत.

