US investment in Pakistan gold mining project आज जगातील सर्वच देश आपल्या सोन्याच्या साठ्यात वाढ करत असल्याचे चित्र आहे. अर्थात, अमेरिकाही त्यात मागे नाही, अमेरिकेने पाकिस्तानमधील संवेदनशील बलुचिस्तानमध्ये सोन्याच्या खाण प्रकल्पासाठी मोठी गुंतवणूक केली आहे. जगातील महासत्ता म्हणून मिरवणारे देश आता सोन्याचा साठा वाढवण्याच्या स्पर्धेत उतरले आहेत. जगातील सर्वांत मोठ्या अविकसित खनिज साठ्यांपैकी एक असलेल्या या क्षेत्रात अमेरिकेकडून ‘रेको डिक’ प्रकल्पासाठी तब्बल १.३ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्यात आली आहे. पाकिस्तानसाठी आणि जगासाठी या गुंतवणुकीचा अर्थ काय? रेको डिकचे महत्त्व काय? पाकिस्तानची नेमकी रणनीती काय? सविस्तर जाणून घेऊयात…

अमेरिकेकडून अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक

दक्षिण आशियाई देश असलेल्या पाकिस्तानमधील संवेदनशील बलुचिस्तान प्रांतात तांबे आणि सोन्याच्या खाण प्रकल्पासाठी अमेरिकेकडून १.३ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्यात आली आहे. जगातील सर्वांत मोठ्या अविकसित खनिज साठ्यांपैकी एक असलेल्या या क्षेत्रात झालेली ही एक मोठी परकीय गुंतवणूक मानली जात आहे. ‘रेको डिक’ नावाचा हा प्रकल्प पाकिस्तान-इराण सीमेजवळ आहे. या दुर्गम आणि बंडखोरीग्रस्त भागातील हा प्रकल्प एकूण सात अब्ज डॉलर्सचा प्रकल्प आहे. २०२८ च्या अखेरीस या प्रकल्पातून उत्पादन सुरू होण्याची अपेक्षा आहे.

‘बॅरिक मायनिंग कॉर्पोरेशन’ ही कॅनेडियन खाण कंपनी पाकिस्तानी प्रशासनाच्या भागीदारीत हा प्रकल्प विकसित करत आहे. अमेरिकेची ही गुंतवणूक ‘एक्स्पोर्ट-इंपोर्ट बँक ऑफ युनायटेड स्टेट्स’ (EXIM)च्या माध्यमातून केली जाणार आहे. महत्त्वाच्या खनिजांची पुरवठा साखळी सुरक्षित करणे आणि पाकिस्तानशी आर्थिक संबंध दृढ करण्याच्या अमेरिकेच्या व्यापक धोरणाचा हा एक भाग आहे. ‘बॅरिक’ कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पात त्यांचा ५० टक्के वाटा आहे आणि उर्वरित २५ टक्के वाटा तीन केंद्रीय सरकारी उपक्रमांच्या मालकीचा आहे; तर २५ टक्के वाटा बलुचिस्तान सरकारकडे आहे.

सुरक्षेची चिंता आणि गुंतवणूक

बलुचिस्तानमध्ये फुटीरतावादी आणि जिहादी गटांकडून वारंवार हल्ले होत असतात. त्यामुळे या प्रकल्पासाठी सुरक्षा ही एक मोठी चिंता आहे. त्याबरोबरच तांब्याच्या अशुद्ध मिश्रण प्रक्रियेसाठी परदेशात पाठविण्याकरिता कराचीपर्यंत रेल्वेमार्गाचे नूतनीकरण करणे, हेदेखील या प्रकल्पासाठी आवश्यक आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन (आयएफएस) आणि एशियन डेव्हलपमेंट बँक (एडीबी) यांसारख्या कर्जदात्या संस्था २.६ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त रकमेचे कर्ज पॅकेज तयार करत आहेत. रेको डिक प्रकल्पाने २०२४ मध्ये बॅरिकच्या सोन्याच्या साठ्यात १.३ कोटी औंसची भर घातली आहे. पहिल्या टप्प्यात दरवर्षी २,००,००० मेट्रिक टन तांबे उत्पादन होण्याची अपेक्षा आहे आणि विस्तारांनंतर हे प्रमाण दुप्पट होईल. पुढील ३७ वर्षांत यातून ७० अब्ज डॉलर्सहून अधिक रोख नफा मिळण्याचा अंदाज आहे.

पाकिस्तानची खनिज धोरण रणनीती

पाकिस्तानसाठी रेको डिक प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. इस्लामाबाद आपल्या खनिज धोरणासाठी या खाणीला मुख्य आधार मानत आहे. दुसरीकडे बॅरिक कंपनी आपल्या सर्वांत मोठ्या प्रकल्पांपैकी एक म्हणून या प्रकल्पाकडे पाहत आहे. शहबाज शरीफ सरकारने अमेरिकेच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. या प्रकल्पामुळे त्यांच्या संपूर्ण कार्यकाळात अब्जावधी डॉलर्सचा महसूल मिळेल आणि आर्थिक संकटात सापडलेल्या देशाच्या विकासात मोठे योगदान मिळेल, अशी आशा पाकिस्तानला आहे. या गुंतवणुकीला भू-राजकीय महत्त्वदेखील आहे. महत्त्वाच्या खनिजांसाठी जागतिक स्तरावर वाढलेली स्पर्धा आणि चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी अमेरिकेने अनेक प्रयत्न सुरू केले आहेत. याच प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर ही गुंतवणूक महत्त्वाची मानली जात आहे.

रेको डिक प्रकल्प इतका महत्त्वाचा का?

बलुचिस्तान हा नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध असला तरी तो एक अशांत प्रांत आहे. रेको डिक हे जगातील तांबे आणि सोन्याच्या सर्वांत मोठ्या साठ्यांपैकी एक मानले जाते. ‘बॅरिक’ या खाण क्षेत्रातील कंपनीने या छोट्या शहराचे वर्णन जगातील सर्वांत मोठा अविकसित तांबे धातूचा साठा असलेले ठिकाण, असे केले आहे. अंदाजानुसार, येथे सुमारे ५.९ अब्ज टन धातुक असून, त्यात ०.४१ टक्का तांबे आणि सुमारे ४.१५ कोटी औंस सोन्याचा साठा आहे.

ही गुंतवणूक डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘प्रोजेक्ट व्हॉल्ट’शी संबंधित आहे. महत्त्वाची खनिजे साठवण्यासाठी हा सार्वजनिक आणि खासगी भागीदारीतील पहिलाच उपक्रम आहे. या उपक्रमांतर्गत, ‘एक्स्पोर्ट-इम्पोर्ट बँक ऑफ युनायटेड स्टेट्स’ बँक १० अब्ज डॉलर्सपर्यंतचे कर्ज देईल, तर खासगी भांडवलातून अतिरिक्त दोन अब्ज डॉलर्स मिळण्याची शक्यता आहे. या बँकेच्या इतिहासातील हा एक मोठा कर्जपुरवठा असेल.

“आम्ही केवळ काही विशिष्ट खनिजे किंवा दुर्मीळ खनिजांवर लक्ष केंद्रित करत नसून, सर्व क्षेत्रांत काम करत आहोत,” असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ‘प्रोजेक्ट व्हॉल्ट’ हे जागतिक धोरण आहे; मात्र रेको डिकवरील लक्ष बलुचिस्तानमधील अमेरिकेचे वाढते धोरणात्मक हित दर्शवते. गेली अनेक दशके, बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) राजकीय स्वायत्तता आणि आर्थिक विकासासाठी बंडखोरी करत आहे.

बीएलए नैसर्गिक संसाधनांशी संबंधित सरकारी मालमत्ता आणि पायाभूत सुविधांना लक्ष्य करत आहे. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या ‘चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर’ (CPEC) प्रकल्पावर काम करणाऱ्या चिनी कामगारांनाही वारंवार बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या हल्ल्यांना सामोरे जावे लागत आहे. या सुरक्षा आव्हानांनंतरही अमेरिकेची ही गुंतवणूक चर्चेचा विषय ठरत आहे.

कायदेशीर वाद

रेको डिकचा विकास एका मोठ्या कायदेशीर लढाईमुळे दशकाहून अधिक काळ रखडला होता. २०११ मध्ये पाकिस्तान सरकार आणि ‘तेथ्यान कॉपर कंपनी’ (टीसीसी- चिलीची Antofagasta व कॅनडाची Barrick Gold यांची संयुक्त कंपनी) यांच्यात वाद निर्माण झाला होता. टीसीसीने असा आरोप केला होता की, पाकिस्तानने ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान द्विपक्षीय गुंतवणूक कराराचे उल्लंघन केले असून, खाणकाम हक्क नाकारले आहेत.

धोरणात्मक महत्त्व आणि जागतिक परिणाम

अमेरिकेची ही गुंतवणूक आपल्या सीमांच्या पलीकडे महत्त्वाच्या खनिज संसाधनांना सुरक्षित करण्याच्या बदलाचे संकेत देते. प्रगत तंत्रज्ञान, अक्षय ऊर्जा पायाभूत सुविधा आणि संरक्षण उपकरणांसाठी आवश्यक असलेल्या धातूंना अमेरिकेने लक्ष्य केले आहे. ‘प्रोजेक्ट व्हॉल्ट’च्या माध्यमातून रेको डिकमधील गुंतवणुकीने जागतिक तांबे आणि सोने पुरवठा साखळीत विविधता आणून इतर उत्पादक देशांवरील अवलंबित्व कमी करण्याची अमेरिकेची योजना आहे. ही गुंतवणूक पाकिस्तानसाठी मोठी आर्थिक संधी आहे आणि याद्वारे मोठ्या प्रमाणावर निर्यातीची क्षमता असलेला एक महत्त्वाचा खाण प्रकल्प उभारला जाणार आहे.