Latest updates on US Iran Ceasefire as Trump secures a 2-week truce and diplomatic victory: अमेरिका व इराण या दोन्ही देशांनी दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी प्रस्ताव मान्य केला आहे. त्यामुळे ३९ दिवसांपासून सुरू असलेल्या या युद्धापासून आता जगाला दिलासा मिळणार आहे. शस्त्रसंधीच्या कालावधीत होर्मुझ सामुद्रधुनी खुली असणार आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतील जहाजांची वाहतूक इराणने रोखली होती. होर्मुझ सामुद्रधुनी खुली न केल्यास इराण मधील उर्जेशी संबंधित पायाभूत सुविधा तसेच इराणची संपूर्ण सभ्यताच नष्ट करण्याचा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला होता. त्यासाठी इराणला मुदत देण्यात आली होती. मुदतीचा कालावधी संपण्याच्या दीड तास आधी ट्रम्प यांनी सोशल मीडियावरून इराणबरोबर शस्त्रसंधी प्रस्ताव झाल्याची घोषणा केली. हा शस्त्रसंधी करार फक्त दोन आठवड्यांसाठी असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर ४० मिनिटांनी इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी ट्रम्प यांच्या पोस्टला दुजोरा दिला. दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी दोन्ही देशांना तणाव कमी करण्याची “विनंती” केली होती. त्यानंतर शस्त्रसंधीची घोषणा झाली आहे. ट्रम्प यांना शस्त्रसंधी का करावी लागली? दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यात पाकिस्तानची भूमिका काय? नेमके काय घडतंय याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या गंभीर इशाऱ्यानंतर इराण शस्त्रसंधीसाठी तयार?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेले गंभीर इशारे संपूर्ण जगासमोर होते. २८ फेब्रुवारी रोजी ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांच्याबरोबर मिळून इराणवर हल्ले केले होते. तिथूनच पश्चिम आशियात युद्धाला सुरूवात झाली होती. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी २३ मार्चनंतर इराणला सातत्याने मोठ्या हल्ल्याची धमकी दिली होती. त्यामुळे पश्चिम आशियातील युद्ध भयंकर वळणावर जात असल्याची चिंता जगातील अनेक देशांनी व्यक्त केली होती. ट्रम्प यांनी इराणच्या ऊर्जा संबंधित पायाभूत सुविधांवर पाच दिवस हल्ले केले जाणार नाहीत, अशी घोषणा त्यावेळी केली होती. ही मुदत त्यांनी नंतर आणखी दहा दिवसांसाठी वाढवली होती. त्यानंतर ट्रम्प यांनी इराणला ७ एप्रिल संध्याकाळी ८ पर्यंतची ‘डेडलाइन’ देत इराणची सभ्यताच नष्ट करण्याचा इशारा दिला होता.
होर्मुझ सामुद्रधुनी दोन आठवड्यांसाठी खुली होणार?
“इराणवर होत असलेले हल्ले पुढील दोन आठवड्यांसाठी थांबवले जात आहेत. होर्मुझ सामुद्रधुनी पूर्णपणे, तात्काळ आणि सुरक्षितरित्या खुली करण्यास इराण तयार आहे”, अशी घोषणा ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर केली. बंदुकीच्या टोकावर ट्रम्प इराणबरोबर वाटाघाटी करत होते. अखेर होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यात ट्रम्प यांना यश मिळाले. हा अमेरिकेसाठी एक प्रकारे विजय मानला जात आहे. अमेरिकेच्या युरोपमधील मित्रदेशांनी होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यासाठी लष्कराचा वापर करणार नसल्याची भूमिका घेतली होती. युकेचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी एक बैठक बोलावली होती. त्यात होर्मुझ सामुद्रधुनी समुद्राशी संबंधित नियमांनुसार तात्काळ खुली करण्याबाबत एकमत झाले होते, परंतु, इराण विरोधात लष्करी कारवाईचा पर्याय त्यांनी नाकारला होता.
“…तर इराण पुन्हा लढण्यासाठी संकोच करणार नाही”
“अमेरिकन नागरिकांना भूगोल शिकण्यासाठी युद्ध हा ईश्वराने सांगितलेला मार्ग आहे”, असे एक वाक्य अमेरिकेत प्रसिद्ध आहे. हे वाक्याचे जनक मार्क ट्वेन आहेत. तर कॉमेडियन जॉन स्टेवार्ट यांनी हे वाक्य अमेरिकेत प्रसिद्ध केले आहे. इराणने साडे पाच आठवडे चाललेल्या युद्धात अमेरिकेशी वाटाघाटी करण्यासाठी होर्मुझ सामुद्रधुनीचा मार्ग स्वीकारला. होर्मुझ सामुद्रधुनी बंद केल्याने तसेच ती उघडण्यासाठी अमेरिकेचे प्रयत्न हाणून पाडल्याने इराणचे वाटाघाटी दरम्यान महत्व वाढले. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला मोजतबा खामेनी (अयातुल्ला अली खामेनींचे पूत्र) यांच्या पर्यवेक्षणात आणि मंजूरीनंतरच अमेरिकेशी आगामी बोलणी सुरू होईल, असे इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने जारी केलेल्या निवेदनातून सांगण्यात आले आहे. या बोलणीसाठी सर्व राजकीय घटकांनी व इराणी नागरिकांनी पाठिंबा द्यावा असे आवाहन करण्यात आले. तसेच अमेरिकेशी बोलणी अपयशी झाल्यास इराण पुन्हा लढण्यासाठी संकोच करणार नाही, असे निवेदनातून स्पष्ट करण्यात आले आहे.
ट्रम्प यांनी शस्त्रसंधीची घोषणा केल्यानंतर इराणने काय म्हटले?
इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची यांनी शस्त्रसंधी झाल्यानंतर एक पोस्ट शेअर केली. पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ यांच्या “विनंती”नुसार इराण शस्त्रसंधीसाठी तयार झाला असल्याचे अराघची म्हणाले. अमेरिकेने मांडलेल्या १५ कलमी प्रस्तावावर चर्चा करण्यास इराण तयार असल्याचे सांगण्यात आले. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टला पाहिल्यानंतर इराणने शस्त्रसंधीसाठी तयारी दर्शवल्याचे अराघची म्हणाले. इराणने अमेरिकेसमोर ठेवलेला १० कलमी कार्यक्रम अमेरिकेने मान्य केल्याचे समजून इराण शस्त्रसंधीसाठी तयार झाल्याचेही अराघची यांनी नमूद केले आहे. इराणवर होणारे हल्ले थांबवले, तर आमची शक्तिशाली सशस्त्र सेना देखील संरक्षणासाठी केले जात असलेले ऑपरेशन्स थांबवेल. दोन आठवड्यांसाठी होर्मुझ सामुद्रधुनी खुली केली जाईल. इराणी सैन्याशी ताळमेळ साधत होर्मुझ सामुद्रधुनीतून जहाजांना सुरक्षितरित्या जाऊ दिले जाईल, असे अराघची यांनी ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. इराणने केलेल्या मागण्यांचा प्रस्ताव अमेरिकेने मान्य केल्यामुळे इराण होर्मुझ सामुद्रधुनी खुली करत आहे, असे अराघची यांनी म्हटले आहे.
होर्मुझ सामुद्रधुनीतून जगातील एकूण २० ते २५ टक्के कच्च्या तेलाची तसेच नैसर्गिक वायूची जहाजांमार्फत वाहतूक केली जाते. इराणने अमेरिकेशी दोन हात करण्यासाठी होर्मुझ सामुद्रधुनीमधील जहाजांची वाहतूक रोखून धरली होती. त्यामुळे जगातील अनेक देशांमध्ये इंधन टंचाई निर्माण झाली होती. दरम्यान, इराण फक्त त्याच्या मित्रदेशांना तसेच तटस्थ भूमिका घेणाऱ्या देशांनाच होर्मुझ सामुद्रधुनीतून जहाज वाहतूक करू देत होता. इराणने जहाजांना टोल आकारण्यासही सुरूवात केली होती.
इराणचा दहा कलमी कार्यक्रम
इराणने अमेरिकेसमोर दहा मागण्या (दहा कलमी कार्यक्रम) ठेवल्या होत्या. त्या मागण्या अमेरिकेने मंजूर केल्याचे इराणने म्हटले आहे. तर डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या मागण्यांवर चर्चा करून तोडगा काढण्यासाठी तयार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे अमेरिका व इराण दोन आठवड्यांच्या शस्त्रसंधीसाठी तयार झाले आहेत.
इराणच्या दहा मागण्या कोणत्या?
१) इराण विरोधात आक्रमक भूमिका न घेणे
२) होर्मुझ सामुद्रधुनीवर इराणचे नियंत्रण
३) इराणला युरेनियमचा साठा करू देणे
४) इराणवरील सर्व प्राथमिक निर्बंध हटवणे
५) इराणवरील सर्व दुय्यम निर्बंध हटवणे
६) संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत इराण विरोधातील ठराव रद्द करणे
७) इराण विरोधातील सर्व ‘बोर्ड ऑफ गव्हर्नर’ ठराव रद्द करणे
८) इराणला नुकसान भरपाई देणे
९) आखातातून अमेरिकेचे कॉम्बॅट दल माघारी घेणे
१०) सगळीकडे सुरू असलेले युद्ध थांबवणे, लेबनॉनमध्येही युद्ध थांबवणे
दरम्यान, इराण या मागण्यांवर ठाम आहे.
पाकिस्तानची प्रतिमा उंचावली?
अमेरिका व इराण या दोन्ही देशांनी शस्त्रसंधी होण्यात पाकिस्तानचे योगदान असल्याचे उत्स्फूर्तपणे सांगितले आहे. “पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ व फिल्ड मार्शल असीम मुनीर यांच्या विनंतीचा मान राखत मी आज रात्री इराणमध्ये विनाशकारी सैन्याला पाठवण्याचा निर्णय मागे घेत आहे”, असे ट्रम्प शस्त्रसंधीची घोषणा करणाऱ्या पोस्टमध्ये म्हणाले होते. तर “पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ व फिल्ड मार्शल मुनीर यांनी युद्ध थांबवण्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नांसाठी मी इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणच्या वतीने आभार मानतो”, असे इराणचे परराष्ट्रमंत्री अराघची म्हणाले. दरम्यान, पाकिस्तानने अमेरिका व इराणच्या शिष्टमंडळाला १० एप्रिल रोजी इस्लामाबादमध्ये चर्चेसाठी निमंत्रण दिले आहे. दोन्ही देशांनी एकत्र बसून सगळ्या प्रश्नांवर तोडगा काढावा, असे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ म्हणाले. पाकिस्तानने दोन्ही देशांत शांतता प्रस्थापित करण्यात महत्वाची भूमिका बजावली.
