US Iran Hormuz Strait Blockade: पश्चिम आशियात पुन्हा एकदा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. अमेरिका व इराण दरम्यान पाकिस्तानमध्ये झालेली चर्चा अपयशी ठरली. अमेरिकेने आता इराणच्या आर्थिक नाड्या आवळायला सुरूवात केली आहे. इराणच्या बंदरांकडे जाणाऱ्या किंवा बंदरांहून येणाऱ्या जहाजांना रोखणार असल्याचा इशारा अमेरिकेने दिला आहे. सोमवारी (१३ एप्रिल) अमेरिकेच्या प्रमाण वेळेनुसार सकाळी १० वाजेपासून (भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री साडे आठपासून) ही नाकेबंदी सुरू होईल. दरम्यान, अमेरिकेच्या लष्कराकडून याबाबत नंतर स्पष्टीकरण देण्यात आले. होर्मुझ सामुद्रधुनीतून ये-जा करणाऱ्या इराण वगळून इतर देशांच्या जहाजांना अडवले जाणार नाही, असे अमेरिकेच्या लष्कराने स्पष्ट केले. अमेरिकेच्या या निर्णयाने जागतिक पातळीवरील अस्थिरता निर्माण होऊन कच्च्या तेलाचे दर १०० डॉलरहून अधिक वाढले आहेत.

इराणची नाकेबंदी केल्याने काय होईल?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी इस्लामाबादमधील चर्चा फिस्कटल्यानंतर ट्रुथ सोशलवर एक पोस्ट शेअर केली. “अमेरिकेचे नौदल होर्मुझ सामुद्रधुनीकडे जाणाऱ्या किंवा तिथून येणाऱ्या प्रत्येक जहाजाला रोखणार आहे”, अशी घोषणा ट्रम्प यांनी केली होती. त्यानंतर होर्मुझ सामुद्रधुनीजवळ युद्धनौका दिसली तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा इराणने अमेरिकेला दिला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘इस्लामाबाद टॉक्स २०२६’ अपयशी ठरल्यानंतर इराणभोवती संपूर्ण नाकेबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतून तेल वाहून नेणाऱ्या जहाजांना इराणकडून प्रति बॅरल १ डॉलर टोल आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच इराणने मित्रदेशांना होर्मुझ सामुद्रधुनीतून कच्चे तेल व नैसर्गिक वायूची वाहतूक करण्यास मुभा दिली होती. त्यामुळे इराणला युद्धात आर्थिक बळ मिळत होते. अमेरिकेने इराणची संपूर्ण नाकेबंदी केल्यास इराणची कच्च्या तेलाची निर्यात थांबेल. टोलही मिळणार नाही. इराणचा महत्वाचा आर्थिक स्त्रोत बंद होईल.

पुन्हा एकदा संघर्ष?

इराणची नाकेबंदी करण्याबाबत ट्रम्प यांनी अनेकदा इशारा दिला होता. अमेरिकेने नाकेबंदी करत इराणची होर्मुझ सामुद्रधुनीतून होणारी तेल निर्यात रोखण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर होर्मुझ सामुद्रधुनीतून जहाजांची वाहतूक पूर्णपणे रोखण्याचा निर्णय इराण घेऊ शकतो. तसे केल्यास पुन्हा एकदा जागतिक पातळीवर इंधन टंचाई होऊ शकते व पुन्हा एकदा संघर्ष सुरू होऊ शकतो. “पश्चिम आशियात सध्या असलेल्या परिस्थितीत ट्रम्प यांनी खर्ग बेट ताब्यात घेणे हे धोरणात्मकदृष्ट्या चुकीचे पाऊल ठरणार नाही. तसे केल्यास इराणच्या महसूलावर व अणुकार्यक्रमावरही परिणाम होईल. इराणला झुकवण्यासाठी ट्रम्प यांची स्थिती मजबूत होईल. परंतु, खर्ग बेट ताब्यात घेतले तरी होर्मुझ सामुद्रधुनीसाठी अमेरिकेला लष्करी कारवाई करावी लागेल. होर्मुझ सामुद्रधुनी ताब्यात घेण्यासाठी अमेरिका लष्कराचा वापर करत नसल्याचे मला आश्चर्य वाटते”, असे आखातातील एका शिपिंग तज्ज्ञाने ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले.

ट्रम्प यांनी अमेरिकेचे धोरण बदलले?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इराणबरोबर मिळून होर्मुझ सामुद्रधुनीवर नियंत्रण ठेवायचे होते. ट्रम्प यांची ही कल्पना अमेरिकेने आतापर्यंत पालन केलेल्या नौकानयन स्वातंत्र्याच्या अगदीच विरोधात आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अमेरिकेचा पहिला संघर्ष फ्रान्सबरोबर झाला होता. कॅरेबियन समुद्रात फ्रान्सच्या काही खासगी जहाज मालकांनी अमेरिकेची जहाजे जप्त केली होती. त्यानंतर अमेरिका व फ्रान्समध्ये कॅरेबियन समुद्रात संघर्ष झाला होता. अमेरिकेने पहिल्यांदाच अमेरिकेबाहेर स्वत:च्या जहाजांसाठी संघर्ष केला होता. तसेच कॅरेबियन समुद्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न केले होते. यूएस कन्स्ट्रक्शन म्युझियममधील नोंदींनुसार, कॅरेबियन समुद्रातील युद्धाची नोंद झाली नाही. फ्रान्सच्या खासगी जहाजांविरोधात अमेरिकेने युद्ध लढले. परंतु, कॅरेबियन समुद्रात फ्रान्सच्या युद्धनौका व अमेरिकेच्या युद्धनौका खूपच कमी वेळा एकमेकांशी लढल्या.

समुद्रात जहाजांना मुक्तपणे संचार करण्याचे स्वातंत्र्य आहे, सागरी मार्ग खुले राहायला हवेत, अशी भूमिका अमेरिकेची बऱ्याच कालावधीसाठी होती. त्यानंतर आधुनिक काळात अमेरिकेने मित्रदेशांबरोबर जगातील समुद्रांमध्ये गस्त घालणे सुरू केले होते. होर्मुझ सामुद्रधुनी ते मलाक्का सामुद्रधुनीपर्यंत जहाजांची वाहतूक सुरळीत राहील, याची खात्री अमेरिकेने केली होती. सीएनएनचे स्तंभलेखक फरीद झकेरिया यांच्या मते, समुद्रातील सुरक्षेकडे सार्वजनिक हित म्हणून न पाहता, त्याकडे एका व्यावसायिक उपक्रमाप्रमाणे ट्रम्प पाहत आहेत. ट्रम्प आंतरराष्ट्रीय संबंधांकडे सगळ्यांच्या हिताची व्यवस्था किंवा मूल्य जपण्याची व्यवस्था म्हणून पाहत नाहीत, तर ते त्याकडे केवळ व्यवहार म्हणून पाहत आहेत. ट्रम्प यांच्या धोरणानुसार ते प्रत्येक गोष्टीत वाटाघाटी करू इच्छित आहेत. तसेच अटी व शर्थी लादू इच्छित आहेत. सार्वजनिक हित असलेल्या गोष्टींकडे ते नफा कमावण्याच्या दृष्टीने पाहत आहेत, असे झकेरिया म्हणाले.

नेव्हल माइन्स काढणार?

इराणने होर्मुझ सामुद्रधुनीत लावलेले नेव्हल माइन्स काढण्याचे काम अमेरिकेचे नौदल करणार आहे. तसे आदेश डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन नौदलाला दिले आहेत. होर्मुझ सामुद्रधुनीत समुद्राच्या तळाशी इराणने नेव्हल माइन्स (जलसुरूंग) लावले आहेत. या नेव्हल माइन्सला जहाज धडकल्यास अथवा आदळल्यास मोठा स्फोट होतो. ट्रम्प यांनी अमेरिकन नौदलाला नेव्हल माइन्स काढण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अमेरिकन नौदलासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.