India tariffs on American products : अमेरिकन वस्तूंवर भारताकडून वाढीव आयात शुल्क आकारलं जातं, असा आरोप राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. यानंतर व्हाईट हाऊसच्या माध्यम सचिव कॅरोलिन लेविट यांनीही याच मुद्द्यावरून भारताला लक्ष्य केलं आहे. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी अमेरिकेचा दौरा केला होता. या दौऱ्यापूर्वी भारतानं अमेरिकेच्या बर्बन व्हिस्कीवरील आयात शुल्क कमी केलं होतं. त्यानंतरही अमेरिकन मद्यावरील आयात शुल्कावरून भारताला वारंवार लक्ष्य केलं जात आहे. दरम्यान, भारतीयांनी अमेरिकेत तयार होणारं मद्य प्यावं, असं ट्रम्प यांना का वाटतं? याबाबत जाणून घेऊ.
अमेरिकेच्या माध्यम सचिव काय म्हणाल्या?
जगभरातील देशांनी अमेरिकन आयातीवर लादलेल्या शुल्काबाबत माहिती देण्यासाठी व्हाईट हाऊसने मंगळवारी (तारीख ११ मार्च) पत्रकार परिषद आयोजित केली होती, ज्यामध्ये कॅरोलिन लेविट यांनी पुन्हा एकदा भारताचा उल्लेख केला. “भारताने अमेरिकन मद्यावर १५० टक्के आयातशुल्क लादलं आहे. एवढा कर लादला तर आपण अमेरिकेचं मद्य भारतात निर्यात करू शकू असं मला वाटत नाही. तसेच अमेरिकेच्या कृषी उत्पादनांवर भारतानं १०० टक्के आयातशुल्क लादलं आहे, तर जपानही आपल्यावर ७०० टक्के कर लादतो”, असे कॅरोलिन लेविट यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
आणखी वाचा : Artificial Heart : कृत्रिम हृदय नेमकं कसं असतं? ते शरीरात कसं धडधडतं? त्यामुळे रुग्णांचा जीव वाचतो का?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प काय म्हणाले होते?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही ७ मार्च रोजी भारताच्या आयात शुल्कावर टीका केली होती. “अमेरिकेतून आयात केलेल्या वस्तूंवर भारत प्रचंड कर वसूल करतो, त्यामुळे तुम्ही त्या देशात काहीही विकू शकत नाही. पण, आता ही गोष्ट मान्य करत भारतानं करात मोठी कपात करण्याची तयारी दाखविली आहे”, असा दावा ट्रम्प यांनी केला होता. त्यांची (भारताची) कुणीतरी कानउघाडणी केली आहे. भारतामुळे अमेरिकेचं मोठं नुकसान झालं आहे, असंही ते म्हणाले होते. दुसरीकडे ट्रम्प यांच्या दाव्याचं भारताकडून खंडन करण्यात आलं होतं.
भारत अमेरिकेतून किती मद्य आयात करतो?
अमेरिका हा भारतात बर्बन व्हिस्कीचा आघाडीचा निर्यातदार आहे. भारतात आयात होणाऱ्या सर्व मद्यांपैकी जवळजवळ एक चतुर्थांश मद्य अमेरिकेतून येतं. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या एकूण तीन ट्रिलियन डॉलर्सच्या मद्य निर्यातीपैकी भारताचा वाटा २.२ अब्ज डॉलर्स आहे. खरं तर, युरोप हा अमेरिकन अल्कोहोलचा मोठा खरेदीदार आहे. तरीदेखील मद्यावरील आयातशुल्कावरून अमेरिकेकडून भारताला लक्ष्य का केलं जातं आहे, असा प्रश्न काहींच्या मनात आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या संतापाचं कारण काय?
अमेरिकेतील केंटकी आणि टेनेसी या दोन राज्यांमध्ये बर्बनचं सर्वाधिक उत्पादन घेतलं जातं. एनडीटीव्हीनुसार, भारतातील एकूण मद्य निर्यातीपैकी एक चतुर्थांश मद्य अमेरिकन बर्बनपासून तयार केलं जातं, त्यामुळे भारताने आमच्या उत्पादनावरील आयातशुल्क कमी करावं आणि बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी, असं येथील उत्पादकांना वाटतं. २०१६, २०२० आणि २०२४ मध्ये याच मुद्द्यावरून येथील मतदारांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या पारड्यात भरभरून मतं टाकली होती. २०२३-२४ मध्ये भारताने अमेरिकेकडून २.५ दशलक्ष डॉलर्स किमतीचं बर्बन आयात केलं होतं.
अमेरिकेचे कोणकोणते ब्रॅण्ड्स भारतात लोकप्रिय?
जॅक डॅनियल, जिम बीम, वुडफोर्ड रिझर्व्ह, मेकर्स मार्क, जेंटलमन जॅक आणि ओल्ड फॉरेस्टर हे व्हिस्की ब्रॅण्ड्स भारतात लोकप्रिय आहेत. हिंदुस्तान टाईम्सने ब्रुअर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे महासंचालक विनोद गिरी यांच्या हवाल्यानं दिलेल्या वृत्तात म्हटलंय की, भारताने बर्बनवरील केलेली करकपात ही बहुतांशी धोरणात्मक होती. दुचाकीवरील करांप्रमाणेच बर्बनवरील करदेखील उच्च ऑप्टिक्स मूल्याचे असतात, असे गिरी म्हणाले. दरम्यान, भारतानं बर्बनवरील कर कमी करावा या ट्रम्प यांच्या आग्रही भूमिकेचं केंटकी येथील रिपब्लिकन पार्टीच्या खासदारांनी स्वागत केलं आहे.
“केंटकीच्या सिग्नेचर बर्बन उद्योगासाठी मोठा विजय! राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या नेतृत्वामुळे भारत बर्बनवरील शुल्क ५०% ने कमी करत आहे, ज्यामुळे आमच्या डिस्टिलरसाठी जागतिक बाजारपेठेचा विस्तार होत आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात अमेरिकेच्या सिग्नेचर स्पिरिटला न्याय्य वागणूक मिळेल याची खात्री करण्यासाठी मी ट्रेझरी सेक्रेटरी बेसेंट आणि येणारे वाणिज्य सेक्रेटरी लुटनिक यांची भेट घेतली आहे,” असे राज्याचे रिपब्लिकन काँग्रेसमन अँडी बेशियर यांनी द टाईम्स ऑफ इंडियाला सांगितलं. २०२३ मध्ये अँडी बेशियर यांनी केंटकीमधून ट्रम्प यांचे समर्थित रिपब्लिकन राज्याचे ॲटर्नी जनरल डॅनियल कॅमेरॉन यांचा पराभव केला.
हेही वाचा : हृदयविकाराचा धोका टाळता येणार? या देशाने तयार केली लस; शास्त्रज्ञांचा दावा काय?
कॅरोलिन लेविट यांची कॅनडावरही टीका
दरम्यान, व्हाईट हाऊसच्या माध्यम सचिव कॅरोलिन लेविट यांनी मद्यावरील आयातशुल्कावरून कॅनडावरही टीका केली. त्या म्हणाल्या, “कॅनडा गेल्या अनेक दशकांपासून युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि अमेरिकन नागरिकांची फसवणूक करत आला आहे. कॅनडानं अमेरिकेच्या उत्पादनांवर आणि आमच्या लोकांवर व कर्मचाऱ्यांवर जे आयातशुल्क लादलं आहे, ते इतरांपेक्षा जास्त आहे. माझ्या हातात एक चार्ट आहे, ज्यामध्ये कॅनडानं आपल्यावर लावलेल्या आयातशुल्काची माहिती स्पष्ट दिसत आहे. अमेरिकन चीज आणि बटरवर कॅनडानं जवळपास ३०० टक्के आयातशुल्क लादलं आहे.”
भारत आयात शुल्कात आणखी कपात करणार?
कॅरोलिन यांनी दाखवलेल्या चार्टमध्ये भारत, कॅनडा आणि जपान यांनी लादलेल्या आयातशुल्काची माहिती दिली. चार्टवर तिरंगी रंगाच्या दोन वर्तुळांनी भारताने लादलेल्या शुल्कांवर प्रकाश टाकण्यात आला होता. पत्रकार परिषदेत कॅरोलिन म्हणाल्या, “राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे परस्पर व्यापारी संबंधावर भर देत आहेत. गेल्या अनेक वर्षांत आपल्याला असा अध्यक्ष मिळाला आहे, जो अमेरिकन व्यापारी आणि कर्मचाऱ्यांच्या हितासाठी काम करत आहे. तसेच ते इतर देशांनाही निष्पक्ष आणि संतुलित व्यापाराचे आवाहन करत आहेत. मात्र, दुर्दैवाने कॅनडा गेल्या काही दशकांपासून आपल्याशी चांगला वागलेला नाही.” दरम्यान, बर्बनवरील आयातशुल्काच्या मुद्द्यावरून अमेरिका भारताला वारंवार लक्ष्य करीत आहे, त्यामुळे भारत आगामी काळात बर्बनवरील आयातशुल्क आणखी कमी करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.