तीन आठवड्यांच्या युद्धविरामानंतर अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा संघर्षाचा वणवा पेटला. इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या व्यापारी जहाजांना लक्ष्य करणे सुरूच ठेवल्यामुळे अमेरिकेनेही आक्रमक पवित्रा घेतला. या घडामोडीमुळे पश्चिम आशियात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने जगभरात घबराट पसरली. शनिवारी आखातातील अमेरिकेच्या लष्करी तळावर इराणकडून क्षेपणास्त्राचा मारा करण्यात आला. या भीषण हल्ल्यात अमेरिकन सैन्याचे तीन जवान शहीद झाल्याचे वृत्त समोर आले. त्यांच्या बलिदानाची आठवण करून देताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. ही अत्यंत दुःखद घटना आहे. आपल्या देशाची सेवा करणाऱ्या या सैनिकांच्या बलिदानाला आम्ही कधीही विसरणार नाही. ते शेवटच्या श्वासापर्यंत लढतील; पण हार मानणार नाही. इराणला आम्ही कधीही अणुअस्त्र बनवू देणार नाही, असे ट्रम्प यांनी ठामपणे सांगितले.
‘फिफा विश्वचषक’ स्पर्धेचा अंतिम सामना बघितल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस येथे माध्यमांशी संवाद साधला. आज रात्री आम्ही त्यांच्यावर (इराणवर) अत्यंत भीषण हल्ला केला आहे. हा हल्ला आपल्या तीन महान देशभक्त सैनिकांच्या सन्मानार्थ करण्यात आला आहे, असे ट्रम्प म्हणाले. गेल्या आठवड्याच्या अखेरीस झालेल्या झालेल्या ताज्या जीवितहानीमुळे या युद्धात जीव गमावलेल्या अमेरिकन सैनिकांची संख्या आता १७ वर पोहोचली आहे. त्यामुळे आधुनिक युद्धामध्ये सैनिक प्रत्यक्ष रणांगणावर नसले तरी ड्रोन, क्षेपणास्त्रे आणि हवाई हल्ल्यांमुळे त्यांना गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे. या वाढत्या जीवितहानीमुळे ट्रम्प प्रशासनावरही देशांतर्गत दबाव प्रचंड वाढला आहे. इराणबरोबरचे हे युद्ध आणखी किती काळ चालणार आणि त्यात किती अमेरिकन सैनिकांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागणार, असा संतप्त प्रश्न अमेरिकेतून विचारला जाऊ लागला आहे.
अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर इराकमध्ये १८ जुलै रोजी पाडण्यात आलेल्या इराणी आत्मघाती ड्रोनमधील स्फोटके निकामी करताना स्फोट होऊन एका अमेरिकी सैनिकाचा मृत्यू झाला. अमेरिक लष्कराने ‘एक्स’वरील निवेदनात सांगितले की, या घटनेत आणखी एक सैनिक किरकोळ जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. इराकमधील घटनेपूर्वी १७ जुलै रोजी जॉर्डनमध्ये इराणी बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ल्यांपासून संरक्षण करताना दोन अमेरिकी सैनिकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यात तिसरा अमेरिकन सैनिक अद्याप बेपत्ता असल्याचे सांगितले जाते. रविवारी जॉर्डनमधील हल्ल्याच्या ठिकाणी काही मानवी अवशेष सापडल्याचे अमेरिकी लष्कराने सांगितले. हे अवशेष बेपत्ता सैनिकाचे आहेत का, याची तपासणी सुरू आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या आणखी चार अमेरिकी सैनिकांना उपचारासाठी जॉर्डनमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून, किरकोळ जखमी झालेले इतर सैनिक पुन्हा सेवेत रुजू झाल्याचे अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने स्पष्ट केले आहे.
इराणच्या ताज्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या अमेरिकन सैनिकांची ओळख अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही. अमेरिकेचे संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांनी सैनिकांना श्रद्धांजली वाहताना ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. त्यांच्या बलिदानामुळे आमचा निर्धार आणखी मजबूत झाला आहे, असे आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये नमूद केले, तर परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांनी शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांप्रती आमच्या संवेदना आहेत. देशासाठी सर्वोच्च बलिदान देणारे हे खरे नायक आहेत, अशी भावना व्यक्त केली. २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या संयुक्त हल्ल्यात इराणचे तत्कालीन सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने आखातातील अमेरिका व इस्रायलच्या मित्रराष्ट्रांवर हल्ले करण्यास सुरुवात केली होती. या हल्ल्यांत अमेरिकेच्या आखातातील लष्करी तळांचे मोठे नुकसान झाल्याचे विविध अहवालांतून समोर आले.
पश्चिम आशियात युद्धाचा भडका उडाल्यानंतर इराणबरोबर लढताना अमेरिकेचे आतापर्यंत १७ जवान शहीद झाल्याचे वृत्त आहे. युद्धाच्या सुरुवातीलाच अमेरिकेच्या कुवेतमधील शुआइबा या नागरी बंदरावर इराणी ड्रोन हल्ला झाला होता. त्या हल्ल्यात आयोवा राज्यातील पुरवठा आणि रसद विभागातील सहा अमेरिकी सैनिकांचा मृत्यू झाला. हे सैनिक कंटेनरप्रमाणे तयार केलेल्या इमारतीत कार्यरत होते. सार्जंट डेक्लन कोडी (वय २०), सार्जंट फर्स्ट क्लास निकोल अमोर (वय ३९), कॅप्टन कोडी खॉर्क (वय ३५), सार्जंट फर्स्ट क्लास नोआ टिटजेन्स (वय ४२), चीफ वॉरंट ऑफिसर रॉबर्ट मार्झन (वय ५४) आणि मेजर जेफ्री ओ’ब्रायन (वय ४५) अशी शहीद झालेल्या सैनिकांची नावे होती. यानंतर १ मार्च रोजी सौदी अरेबियातील प्रिन्स सुलतान एअर बेसवरील हल्ल्यात जखमी झालेल्या आणखी एका अमेरिकी सैनिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मार्च महिन्यात युद्ध अधिक तीव्र झाल्यानंतर इराकमध्ये इराणविरोधी मोहिमेसाठी वापरले जाणारे KC-135 इंधनपुरवठा विमान कोसळल्याने सहा अमेरिकी सैनिकांचा मृत्यू झाला होता. अमेरिकी लष्कराच्या म्हणण्यानुसार, विमान अपघातात शत्रूचा किंवा मित्र सैन्याच्या गोळीबाराचा कोणताही संबंध नव्हता. हे विमान पश्चिम इराकमध्ये युद्ध मोहिमेदरम्यान कोसळले होते. या मोहिमेत सहभागी दुसरे KC-135 विमान सुरक्षितपणे उतरले होते. मात्र, इराणसमर्थक ‘इस्लामिक रेझिस्टन्स ऑफ इराक’ या संघटनेने हे विमान आपणच पाडल्याचा दावा केला. तसेच दुसऱ्या KC-135 विमानालाही लक्ष्य केल्यामुळे त्याला आपत्कालीन लँडिंग करावी लागल्याचा दावा करण्यात आला. मात्र, हा दावा करताना त्यांनी कोणताही पुरावा सादर केलेला नव्हता. याशिवाय, अमेरिकन नौदलाच्या एका वैमानिकाचाही अरबी समुद्रातील हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. नौदलाने सुरुवातीला ही घटना आपत्कालीन लँडिंगदरम्यान घडल्याचे सांगितले असून, या अपघातामागे शत्रूच्या कारवाईचा कोणताही पुरावा नसल्याचे स्पष्ट केले होते.
अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत असून, दोन्ही देशांकडून सुरू असलेल्या हल्ल्यांमुळे पश्चिम आशियातील परिस्थिती आणखीनच चिंताजनक बनली आहे. अमेरिकी लष्कराने रविवारी मध्यरात्रीपासून सोमवारी पहाटेपर्यंत इराणमधील विविध लष्करी लक्ष्यांवर हवाई हल्ले केल्याची माहिती दिली. या हल्ल्यांदरम्यान ओमानच्या आखात आणि पर्शियन आखात किनारपट्टीवरील अनेक बंदर शहरांमध्ये तसेच उत्तर-पश्चिमेकडील तब्रिझ शहरातही स्फोट झाल्याचे इराणच्या सरकारी माध्यमांनी वृत्त दिले. गेल्या नऊ दिवसांतील तब्रिझमधील ही पहिली मोठी हल्ल्याची घटना असल्याचे सांगण्यात आले. या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणने सोमवारी शत्रूंच्या लक्ष्यांवर क्षेपणास्त्रांचा मारा सुरू केल्याचे जाहीर केले. वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर बहरीनमधील अमेरिकी दूतावासाने तेथील अमेरिकी नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. इराणचे वर्तन बदलल्याशिवाय आमच्या भूमिकेत बदल होणार नाही, असे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांनी स्पष्ट केले आहे.
