India impact West Asia conflict :पाच आठवड्यांपूर्वी अमेरिका व इस्रायलने केलेल्या संयुक्त हल्ल्यांत इराणचे तत्कालीन सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनेही आखातातील अमेरिका व इस्रायलच्या मित्रदेशांवर हल्ले करण्यास सुरुवात केली. २८ फेब्रुवारीपासून पश्चिम आशियात पेटलेल्या या युद्धाची धग अद्यापही धुमसत असल्याने त्याचा जागतिक बाजारपेठेवर परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी आपल्या राष्ट्राला उद्देशून १८ मिनिटांचे महत्त्वपूर्ण भाषण केले. त्यांच्या भाषणातून युद्धाबाबतचे काही महत्वाचे मुद्दे समोर आले असून, त्याचे भारतावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. त्याविषयीचा हा आढावा…
इराण युद्धाबाबत अद्यापही साशंकता
अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात युद्धाची ठिगणी पडल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी महत्त्वाचे विधान केले होते. इराणबरोबरचा आमचा संघर्ष चार ते पाच आठवडे सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. यादरम्यान युद्धाला पाच आठवडे पूर्ण होण्यास अवघ्या दोन दिवसांचा अवधी उरला आहे. या पार्श्वभूमीवर ट्रम्प म्हणाले की, अमेरिकेची लष्करी उद्दिष्टे लवकरच पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. पुढील दोन ते तीन आठवड्यांत अमेरिकेकडून इराणवर आणखीनच तीव्र हल्ले केले जातील. त्यांच्या या विधानामुळे पश्चिम आशियात भडकलेले युद्ध सुमारे आठ आठवड्यांपर्यंत चालू राहण्याची शक्यता आहे. याचाच अर्थ इराण आणि संपूर्ण जगाला एका दीर्घकालीन संघर्षासाठी तयार राहावे लागणार आहे. युद्धाची ठिणगी पडल्यानंतर हा संघर्ष दीर्घकाळ चालणार, अशी अपेक्षा कोणीही केली नव्हती. सध्याच्या युद्धाचा कालावधी किती कमी आहे हे पटवून देण्यासाठी ट्रम्प यांनी अमेरिकेने भूतकाळात लढलेल्या मोठ्या युद्धांचा दाखला दिला. त्यांनी पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या कालावधीची या युद्धाशी तुलना केली.
ट्रम्प यांनी टाळला वाटाघाटींचा उल्लेख
डोनाल्ड ट्रम्प आपल्या भाषणातून इराणबरोबर सुरू असलेल्या युद्धानंतरच्या घडामोडींबाबत बोलले; परंतु त्यामध्ये त्यांनी इराणबरोबर सुरू असलेल्या वाटाघाटींबाबतची कोणतीही ठोस माहिती दिली नाही. युद्धविरामाबाबत सध्या चर्चा सुरू आहे… इराणमध्ये सत्तापालट करणे हा आमचा कधीच उद्देश नव्हता आणि त्याबाबत आम्ही कधीच भाष्यही केले नाही; परंतु तिथल्या मूळच्या सर्व नेत्यांचा मृत्यू झाल्यामुळे इराणमध्ये आता नवीन सत्ता आली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. ट्रम्प यांचे हे विधान त्यांच्या आधीच्या भूमिकेपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. कारण- युद्ध सुरू झाल्यावर त्यांनी इराणी जनतेला बाहेर पडून सत्ता हाती घेण्याचे आवाहन केले होते. अलीकडील काही दिवसांत ट्रम्प यांनी आपण इराणमध्ये सत्तांतर घडवून आणले असल्याबाबत अनेकदा भाष्य केले आहे. ट्रम्प यांनी दावा केला की, २८ फेब्रुवारीपासून त्यांनी इराणच्या पहिल्या आणि दुसऱ्या फळीतील नेतृत्वाचा खातमा केला आहे. त्यात सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी, इराणच्या लष्कराचे उच्चपदस्थ अधिकारी व अली लारीजानी यांच्यासारख्या प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. सध्या इराणच्या सत्तेत असलेला नवीन गट तुलनेने कमी कट्टरपंथी असल्याचे ट्रम्प यांचे मत आहे. या परिस्थितीत दोन महत्त्वाचे निष्कर्ष समोर येतात. पहिला निष्कर्ष म्हणजे इराणमधील सरकार पूर्णपणे कोलमडलेले नाही आणि दुसरा निष्कर्ष हा की, भविष्यात अमेरिका व इराण यांच्यात चर्चेतून तोडगा निघण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा : एआयमुळे तब्बल १२,००० भारतीयांच्या नोकऱ्या गेल्या; ओरॅकलने कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात का केली? कारण काय?
ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा
डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या नव्या सत्ताधाऱ्यांना अत्यंत कडक शब्दांत इशाराही दिला. ठरावीक काळात कोणताही करार न झाल्यास अमेरिका इराणच्या संपूर्ण वीजनिर्मिती केंद्रांवर हल्ला करण्यास मागे-पुढे पाहणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तज्ज्ञांच्या मते, वीजनिर्मिती केंद्रांवर हल्ला करणे हा ‘युद्ध गुन्हा’ ठरू शकतो. कारण- याचा थेट फटका सामान्य नागरिकांना बसतो. वीजपुरवठा खंडित झाल्यास समुद्रातील पाण्याचे शुद्धीकरण करणारे इराणमधील अनेक प्रकल्प बंद पडू शकतात, ज्यामुळे देशावर पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट ओढवू शकते. यादरम्यान ट्रम्प यांनी अमेरिका आणि इस्रायलच्या लष्करी ताकदीवरही भर दिला. आम्ही अजून इराणच्या तेल उद्योगावर हल्ला केलेला नाही. तसे केल्यास त्यांना पुन्हा उभे राहण्याची संधीच मिळणार नाही. अमेरिकेच्या हल्ल्यात इराणची रडार यंत्रणा पूर्णपणे नष्ट झाल्याचे ट्रम्प म्हणाले.
इराणचे आण्विक तळ अमेरिकेचे लक्ष्य?
युद्धाला सुरुवात झाल्यानंतर इराणमधील आण्विक तळांची संपूर्ण जगभरात चर्चा रंगली होती. त्याबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. अमेरिकन लष्कराने हवाई हल्ले करून इराणमधील अणुकेंद्रे पूर्णपणे उद्ध्वस्त केली आहेत. त्यामुळे आण्विक तळांची पुन्हा उभारणी करण्यासाठी इराणला अनेक दिवस लागतील. आम्ही उपग्रहांच्या माध्यमातून या सर्व ठिकाणांवर अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून आहोत, असे ट्रम्प यांनी सांगितले. जर इराणने आण्विक तळांची पुन्हा उभारणी करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर पुन्हा भीषण क्षेपणास्त्र हल्ला केला जाईल. आता सर्व सूत्रे आमच्या हातात असून, इराणकडे कोणतेही पर्याय उरलेले नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला. ट्रम्प यांनी केलेला हा उल्लेख जून २०२५ मध्ये अमेरिकेने इराणमधील अणुस्थळांवर केलेल्या हल्ल्याशी संबंधित होता. त्या वेळीही ट्रम्प यांनी ही ठिकाणे पूर्णपणे नष्ट केल्याचा दावा केला होता; मात्र गुप्तचर यंत्रणांच्या अहवालांमध्ये वेगवेगळे निष्कर्ष समोर आले होते.
होर्मुझ सामुद्रधुनीबाबत ट्रम्प काय म्हणाले?
जागतिक बाजारपेठेत निर्माण झालेला खनिज तेलाचा पुरवठा लक्षात घेता, ट्रम्प यांनी आपल्या भाषणात होर्मुझ सामुद्रधुनीतील वाहतुकीचा उल्लेख केला. मात्र, या समस्येवर त्यांनी कोणतेही भाष्य करण्याऐवजी मित्रदेशांनाच पुढाकार घेण्याचे आवाहन केले. होर्मुझ सामुद्रधुनीतून तेलाची आयात करणाऱ्या देशांनी या महत्त्वाच्या जलमार्गातील सुरक्षेची काळजी घ्यायला हवी, असे ट्रम्प यांनी ठणकावून सांगितले. होर्मुझ सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या जहाजांचे संरक्षण करण्यात आम्हीही मदत करू, असे आश्वासन त्यांनी दिले. ट्रम्प यांचे हे विधान युरोपीय देशांना उद्देशून असल्याचे सांगितले जाते. कारण- होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यासाठी अमेरिकेने जाहीर केलेल्या नौदल मोहिमेत सहभागी होण्यास युरोपीय देशांनी नकार दिला होता. इराण जवळपास पूर्णपणे कमकुवत झाला आहे. हा संघर्ष संपल्यानंतर सामुद्रधुनी सहजपणे आपोआप खुली होईल, असेही त्यांनी नमूद केले.
भारतासमोरील आव्हाने आणखीनच वाढणार?
पश्चिम आशियातील हा संघर्ष आता लांबणीवर पडण्याचे स्पष्ट संकेत मिळत असल्याने भारताला याचे मोठे आर्थिक परिणाम सोसावे लागण्याची शक्यता आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रमक भूमिकेनंतर आता इराणनेही माघार घेण्यास नकार दिला आहे, ज्यामुळे भारताला या दीर्घकालीन संघर्षासाठी सज्ज राहावे लागणार आहे. ट्रम्प यांच्या भाषणाच्या अगोदरच इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी अमेरिकन जनतेला उद्देशून एक पत्र प्रसिद्ध केले. या पत्रातून त्यांनी इराणचा स्वाभिमान आणि लढवय्येपणा अधोरेखित केला. त्यांनी इराणच्या इतिहासाचा उल्लेख करत सांगितले की, हजारो वर्षांच्या इतिहासात इराणने अनेक आक्रमकांना तोंड दिले आहे. इराणवर आक्रमण करणाऱ्यांची नावे कलंकित झाली आहेत. तरीदेखील इराण आजही ठाम, सन्मानाने आणि अभिमानाने उभा आहे, असे राष्ट्राध्यक्ष मसूद यांनी आपल्या पत्रात नमूद केले. या घडामोडींमुळे भारताला जागतिक परिस्थितीतील बदल लक्षात घेऊन, आपले आर्थिक आणि धोरणात्मक निर्णय अधिकच सावधगिरीने घ्यावे लागणार आहेत.
