अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. पर्शियन आखाताला ओमानच्या आखाताशी जोडणारा हा चिंचोळा जलमार्ग सध्या जागतिक चिंतेचा विषय ठरत आहे. जगभरातील अनेक देशांना खनिज तेलाचा पुरवठा करणाऱ्या या मार्गावरील वाहतूक मध्यपूर्वेतील तणावामुळे पूर्णपणे कोलमडण्याच्या स्थितीत आहे. इराणच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे आंतरराष्ट्रीय तेल टँकर्स आणि मालवाहू जहाजांना या मार्गावरून प्रवास करणे कठीण झाले आहे. यादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला अत्यंत कडक शब्दात इशारा दिला आहे. यादरम्यान त्यांनी केलेल्या विधानामुळे होर्मुझची सामुद्रधुनी ताब्यात घेण्याचा अमेरिकाचा प्रयत्न आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याविषयीचा हा आढावा…
होर्मुझ सामुद्रधुनी ही आंतरराष्ट्रीय व्यापारी नौवाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. जगभरातील कच्च्या तेलाच्या वाहतुकीपैकी सुमारे २० टक्के तेल या सामुद्रधुनीतून जात असते. त्यामुळे ही सामुद्रधुनी बंद केल्यास जागतिक बाजारात खनिज तेलाचा मोठा तुटवडा निर्माण होऊ शकतो. इराणने ही सामुद्रधुनी बंद करण्याची धमकी यापूर्वी अनेकदा दिलेली आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये इस्रायलबरोबर तणाव निर्माण झाल्यानंतर इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा इशारा दिला होता. इराणने ही सामुद्रधुनी बंद केल्यास त्याचे जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठे परिणाम होण्याची शक्यता आहे. भारतासह जगभरातील अनेक देश या परिस्थितीकडे बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
अमेरिका होर्मुझची सामुद्रधुनी ताब्यात घेणार?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला गंभीर इशारा दिला आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केल्यास इराणला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे त्यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून इराणला इशारा देणारी पोस्ट शेअर केली आहे. जागतिक अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या इंधन पुरवठ्यावर इराणला मनमानी करू दिली जाणार नाही. चर्चेनंतरही हा प्रश्न न सुटल्यास अमेरिका लष्करी बळाचा वापर करून या मोक्याच्या जलमार्गावर स्वतःचे नियंत्रण प्रस्थापित करण्यास मागेपुढे पाहणार नाही. इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारा तेलाची वाहतूक रोखण्यासाठी काहीही कृत्य केले, तर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका त्यांच्यावर आतापर्यंत झालेल्या हल्ल्यांच्या तुलनेत वीस पटीने अधिक जोरदार हल्ला करेल, अशी धमकीच ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमधून दिली आहे. होर्मुझ सामुद्रधुनीमधून खनिज तेलाचा पुरवठा सुरळीत राहिल्यास त्यावर अवलंबून असलेल्या देशांना अडचणींचा सामना करावा लागणार नाही, असेही ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.
आणखी वाचा : उत्कृष्ट कामगिरी करूनही सॅमसन-बुमराहला रोख बक्षीस का मिळाले नाही? आयसीसीचा नियम काय सांगतो?
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर कुणाचा ताबा?
होर्मुझ सामुद्रधुनीच्या उत्तरेला इराण आणि दक्षिणेला ओमान व संयुक्त अरब अमिराती हे देश आहेत. ही सामुद्रधुनी उत्तरेकडील पर्शियन आखाताला दक्षिणेकडील ओमानच्या आखाताशी जोडते आणि त्यानंतर ती अरबी समुद्रात विलीन होते. या सामुद्रधुनीची लांबी सुमारे १६१ किलोमीटर आणि रुंदी सर्वात अरुंद भागात फक्त ३३ किलोमीटर आहे. कोणत्याही वेळेस या मार्गावरून डझनभर तेलवाहू जहाजे ये-जा करीत असतात. संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय समुद्र कायद्यानुसार, प्रत्येक देशाला त्याच्या किनारपट्टीपासून १२ नॉटिकल मैल (सुमारे १३.८ मैल) पर्यंतचा भाग नियंत्रित करण्याचा अधिकार आहे. याचा अर्थ असा की, होर्मुझ सामुद्रधुनीचा सर्वात अरुंद भाग संपूर्णपणे इराण आणि ओमानच्या क्षेत्रामध्ये येतो. त्यामुळे या सामुद्रधुनीवरील नियंत्रण आणि प्रवेशाबाबत इराण आणि ओमान यांच्याकडे मोठा अधिकार आहेत. याच गोष्टीमुळे इराणकडून वेळोवेळी या मार्गावरील वाहतूक थांबवण्याची धमकी दिली जाते. या सामुद्रधुनीअंतर्गत इराण त्यांच्या अखत्यारित येणाऱ्या भागात कारवाई करू शकतो; पण परदेशी जहाजांचा प्रवासाचा हक्क हिरावून घेऊ शकत नाही, असे विश्लेषकांनी सांगितले आहे.
होर्मुझच्या सामुद्रधुनीचे महत्त्व काय?
होर्मुझ सामुद्रधुनीतून दररोज सुमारे २० ते २१ दशलक्ष बॅरल कच्चे तेल आणि उत्पादनांची वाहतूक केली जाते. अमेरिकेच्या ऊर्जा माहिती प्रशासनाच्या माहितीनुसार, २०२२ मध्ये या मार्गावरून दररोज सरासरी २१ दशलक्ष बॅरल तेल वाहून नेले गेले, जे जगातील एकूण कच्च्या तेलाच्या व्यापाराच्या सुमारे २१ टक्के आहे. OPEC (ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्स्पोर्टिंग कंट्रीज) सदस्य असलेल्या सौदी अरेबिया, इराण, संयुक्त अरब अमिराती, कुवैत आणि इराक हे देश बहुतांश याच सामुद्रधुनीतून आशियाकडे कच्च्या तेलाची निर्यात करतात. याशिवाय, जगभरात पुरवला जाणारा एकतृतीयांश द्रवित नैसर्गिक वायूचीदेखील याच जलमार्गातून निर्यात होते. म्हणूनच होर्मुझ सामुद्रधुनीला ‘जगाचे तेलवाहतुकीचे हृदय’ असे म्हटले जाते.
होर्मुझ सामुद्रधुनीबाबत तज्ज्ञांचे मत काय?
होर्मुझ सामुद्रधुनीतील किरकोळ अडथळाही आंतरराष्ट्रीय इंधन दरांमध्ये मोठी वाढ घडवू शकतो. त्यामुळे वाहतूक खर्च वाढून जागतिक पुरवठा साखळी खंडित होऊ शकते, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. या जलमार्गावर नाकाबंदी किंवा मोठा अडथळा निर्माण झाल्यास आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रतिबॅरेल १०० डॉलर्सच्या पुढे जाऊ शकतात. त्यामुळेच या सामुद्रधुनीचा जागतिक अर्थव्यवस्थेतील भूराजकीय व आर्थिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा विचार केला जातो. कदाचित याच कारणामुळे अनेक देश इराणच्या या क्षेत्रातील स्थिरतेसाठी विशेष लक्ष केंद्रित करीत आहेत. यादरम्यान इराणकडून होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याच्या धमक्या ऐकायला मिळत असल्या तरी प्रत्यक्षात तसे करण्याची शक्यता सध्या तरी कमी आहे. इराणच्या आर्थिक हितसंबंधांना, विशेषतः चीनसारख्या व्यापारी भागीदारांच्या दृष्टीने ही कृती हानिकारक ठरू शकते. तरीसुद्धा परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यास हा पर्याय टाळता येणार नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
