‘व्हाईट हाऊसमध्ये गेल्यानंतर २४ तासांत युक्रेन युद्ध थांबवेन’ अशी वल्गना निवडणूक प्रचारात करणारे अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियावर दबाव वाढविण्यास सुरुवात केली आहे. रशियावर आणखी कडक निर्बंध लादतानाच त्या देशाशी व्यापार करणाऱ्या अन्य देशांवरही कठोर कारवाईचा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी ही धमकी पुरेशी आहे का? रशियाचे अध्यक्ष या इशाऱ्याला घाबरून युद्धसमाप्ती करण्याची शक्यता किती? ट्रम्प यांच्या धमकीचा भारतासाठी नेमका अर्थ काय?…

ट्रम्प यांचा पुतिनना इशारा काय?

आपल्या मालकीच्या ‘ट्रुथ सोशल’ या समाजमाध्यमावर ट्रम्प यांनी निवडून आल्यानंतर प्रथमच युक्रेन युद्धावर सविस्तर संदेश लिहिला. अर्थव्यवस्था डबघाईला आलेल्या रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी हे ‘हास्यास्पद युद्ध’ थांबवून शांतता प्रस्थापित करावी, असा सल्ला ट्रम्प यांनी दिला. ‘या युद्धावर त्वरित तोडगा निघाला नाही, तर रशियाकडून अमेरिकेत किंवा इतर सहभागी देशांमध्ये विकल्या जाणाऱ्या कोणत्याही वस्तूंवर भरमसाट कर, शुल्क आणि निर्बंध अधिक कठोर करण्याशिवाय पर्याय उरणार नाही, अशी पुष्टीही ट्रम्प यांनी जोडली. आपण राष्ट्राध्यक्ष असतो, तर हे युद्ध सुरूच झाले नसते असा दावा करताना युद्ध थांबविण्याचे ‘सोपा’ आणि ‘अवघड’ असे दोन मार्ग असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मात्र सोपा मार्ग हा नेहमीच चांगला, अशी पुष्टीही ट्रम्प यांनी जोडली आहे.

article written by tarkatirtha on future of marxism topic
तर्कतीर्थ-विचार : मार्क्सवादाचे भवितव्य
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
US will take over Gaza Strip,
गाझा पट्टी ताब्यात घेऊ!ट्रम्प यांची धक्कादायक घोषणा; अमेरिकेच्या मित्रांकडूनही विरोध
Trump targeting USAID agency
ट्रम्प यांनी ‘USAID’वर बंदी घातल्याचा जगावर काय परिणाम होणार? त्यांची भारतातील भूमिका काय?
Nitin Kamath On Donald Trump Tariff Wars
Nitin Kamath : “असं वाटतंय की आपण सगळे अमेरिका साम्राज्याचे भाग आहोत”, नितीन कामथ यांची ट्रम्प यांच्या ‘टेरिफ’ धोरणांवर टीका
Donald Trump
ट्रम्प यांच्या ‘टेरिफ वॉर’मुळे अमेरिकेची अर्थव्यवस्था कोलमडण्याची भिती? समर्थक मात्र अंधारातच
President donald Trump Imposes tariffs hike on china canada and mexico
व्यापारयुद्धाचे रणशिंग; चीन, कॅनडा, मेक्सिकोवर ट्रम्प प्रशासनाचा वाढीव कर; शेजारी देशांचे अमेरिकेला जशास तसे उत्तर
Donald Trump warns BRICS countries again reiterates threat of 100 percent trade tariffs
ट्रम्प यांचा ‘ब्रिक्स’ देशांना पुन्हा इशारा; १०० टक्के व्यापार शुल्क लादण्याचा पुनरुच्चार

आणखी वाचा-पाकिस्तानला मोठा धक्का; सिंधू जल कराराबाबत तज्ज्ञांची भारताला साथ, नेमके प्रकरण काय?

केवळ इशाऱ्याचा परिणाम किती?

पुतिन यांनी युक्रेनमध्ये सैन्य घुसविल्यापासून अमेरिका आणि युरोपने रशियावर अनेक निर्बंध लादले. सुरुवातीला याचा परिणाम दिसला आणि रशियाचे चलन रुबलची किंमत घसरली. परिणामी परकीय गुंतवणूकदारांनी रशियातून काढता पाय घेतला. रशिया मोठा ऊर्जा निर्यातदार आहे. अमेरिकेच्या निर्बंधांमुळे या क्षेत्राला फटका बसत आहे. शिवाय सेमीकंडक्टर आणि सॉफ्टवेअर क्षेत्रातील रशियन कंपन्यांनाही निर्बंधांची धग जाणवत आहे. वित्तीय बाजार अद्याप अस्थिर आहेत. अर्थव्यवस्था पुन्हा उभी करण्यासाठी रशियाने प्रयत्न सुरू केले. चीन, भारताबरोबर व्यापार वाढविणे, स्वदेशी उत्पादनात भर, नव्या बाजारपेठा शोधणे असे अनेक उपाय पुतिन यांनी केले. मात्र पुतिन यांच्या अपेक्षेपेक्षा हे युद्ध कितीतरी अधिक लांबले आहे. त्यामुळे रशियाच्या अर्थव्यवस्थेचे भवितव्य अनिश्चित असून निर्बंध अधिक वाढले तर त्याचा दीर्घकालीन परिणाम रशियाच्या जनतेला भोगावा लागू शकतो. बंदुकीच्या धाकावर जनता किती काळ शांत राहील, हे कुणालाच माहिती नसल्याने पुतिन यांच्यावर राजकीय दबाव वाढला आहे. त्यामुळेच ट्रम्प यांनी हात पुढे केला तर पुतिन त्यांना टाळी देऊ शकतील, असे मानले जात आहे.

यावर रशियाची प्रतिक्रिया काय?

अमेरिकेतील सत्तांतराच्या निमित्ताने युद्ध थांबविण्याची संधी पुतिन साधू शकतात. अलिकडच्या काळात रशियाने ट्रम्प यांच्या विविध प्रस्तावांबाबत घेतलेली सकारात्मक भूमिका हे त्याचेच द्योतक मानले जात आहे. रशियाशी पुन्हा एकदा थेट संवाद सुरू करण्याच्या ट्रम्प यांच्या तयारीचे क्रेमलिनने स्वागत केले. अमेरिकेच्या अध्यक्षांशी पुनित यांचा थेट संवाद सुरू झाला तर त्यातून आंतरराष्ट्रीय स्थैर्य टिकवणे शक्य होईल, असे पुतिन यांनी या निवेदनात म्हटले आहे. मात्र ट्रम्प यांनी दिलेल्या धमकीवर अद्याप रशिया किंवा युक्रेनकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. अर्थातच वाटाघाटींमध्ये आपल्या पदरात अधिकाधिक लाभ पाडून घेण्याचा प्रयत्न पुतिन आणि युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की करतील, यात शंका नाही. ट्रम्प यांची आजवरची मते पाहता झेलेन्स्कीदेखील सावध झाले आहेत. मात्र दोन्ही देश किमान चर्चेला तयार झाले तर तकलादू का होईना, पण शस्त्रसंधी अस्तित्वात येऊ शकेल आणि पहिल्या १०० दिवसांत युद्ध थांबविण्याचा ट्रम्प यांचा पण काही अंशी पूर्ण होऊ शकेल.

आणखी वाचा-विश्लेषण : ट्रम्प यांचा ‘बर्थराइट सिटिझनशिप’ संपवणारा आदेश काय आहे? यामुळे भारतीयांमध्ये खळबळ का? 

रशियावर निर्बंधांचा भारतावर परिणाम?

भारत आणि रशिया यांचे पूर्वापार घनिष्ठ संबंध आहेत. अमेरिका-युरोपच्या निर्बंधांनंतर भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल स्वस्तात आयात करीत आहे. संरक्षण क्षेत्रातही दोन्ही देशांदरम्यान अनेक करार असून रशियाची शस्त्रास्त्रे ही भारतीय युद्धप्रणालीचा मोठा भाग आहेत. ट्रम्प यांनी रशियावरील निर्बंध अधिक कडक केले, तर त्याचा परिणाम भारताबरोबरच्या व्यापारावरही होऊ शकतो. सध्या तरी ट्रम्प यांनी वाढीव कर हे अमेरिका आणि सहयोगी देशांमध्ये (पर्यायाने बहुतांश युरोपीय देश, ऑस्ट्रेलिया, कॅनडा) रशियातून होणाऱ्या आयातीवर असतील, असा इशारा दिला आहे. मात्र त्यांचा काही नेम नाही, हेदेखील खरेच. गेल्या अनेक दशकांपासून भारताचे परराष्ट्र धोरण हे ‘सर्वसमावेशक’ राहिले आहे. तरी आगामी काळात अमेरिका किंवा रशिया यापैकी एकाच्या बाजूने उभे राहण्यासाठी भारतावर दबाव वाढू शकतो. ट्रम्प यांच्या इशाऱ्याचा परिणाम झाला नाही, तर उलट तणाव वाढून जागतिक अर्थव्यवस्थेला त्याचा फटका बसेल आणि त्याचा भारतावरही परिणाम होईल. सध्या तरी ‘थांबा आणि वाट पाहा’ हेच धोरण भारतासाठी उपयोगाचे आहे. येत्या काही महिन्यांत चर्चेचा आणि वाटाघाटींचा कल कोणत्या दिशेने जात आहे, हे बघून अत्यंत सावधपणे भारताला आपले धोरण आखावे लागेल.

amol.paranjpe@expressindia.com

Story img Loader