डिजिटल युगात नागरिकांच्या वैयक्तिक माहितीचे संरक्षण आवश्यक आहे. मात्र, या संरक्षणासाठी केलेल्या कायद्यामुळे सार्वजनिक हिताच्या बातम्या मिळवणे, सरकारी यंत्रणांना प्रश्न विचारणे किंवा सत्तेतील व्यक्तींचे उत्तरदायित्व निश्चित करणे कठीण होणार असेल, तर त्याची चर्चा केवळ गोपनीयतेच्या चौकटीत करता येणार नाही. केंद्र सरकारचा डिजिटल वैयक्तिक माहिती संरक्षण (डीपीडीपी) कायदा याच कारणामुळे माध्यमांच्या स्वातंत्र्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरतो.

डीपीडीपी कायदा काय आहे? त्यातील प्रमुख तरतुदी कोणत्या?

डिजिटल वैयक्तिक माहिती संरक्षण कायदा, २०२३ हा भारतातील नागरिकांच्या डिजिटल वैयक्तिक माहितीचे संकलन, वापर, साठवण आणि संरक्षण यांचे नियमन करणारा कायदा आहे. ११ ऑगस्ट २०२३ रोजी या कायद्याला राष्ट्रपतींची संमती मिळाली. त्याच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारने १४ नोव्हेंबर २०२५ रोजी संबंधित नियम अधिसूचित केले. कायद्याची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करण्याचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले. या कायद्यानुसार, वैयक्तिक माहिती गोळा करणाऱ्या संस्थांनी तिचा वापर कायदेशीर उद्देशासाठी करणे, लागू तरतुदींनुसार व्यक्तीची संमती घेणे, माहिती सुरक्षित ठेवणे आणि माहितीच्या गळतीसारख्या घटनांबाबत आवश्यक उपाययोजना करणे अपेक्षित आहे. नागरिकांना आपल्या माहितीच्या वापराबाबत जाणून घेणे, माहिती दुरुस्त करणे किंवा पुसून टाकण्याची मागणी करणे आणि तक्रार निवारणाचा मार्ग वापरणे असे अधिकार दिले आहेत. कायद्याचे उल्लंघन झाल्यास काही प्रकरणांत २५० कोटी रुपयांपर्यंत आर्थिक दंडाची तरतूद आहे. मात्र, या कायद्याचा परिणाम केवळ नागरिक आणि खासगी कंपन्यांपुरता मर्यादित नाही. माहिती अधिकार कायद्यात करण्यात आलेला बदल आणि पत्रकारितेसाठी स्वतंत्र, स्पष्ट अपवाद नसणे यांमुळे माध्यमांच्या स्वातंत्र्याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

कायद्याबाबत शंका कोणत्या?

डिजिटल वैयक्तिक माहिती संरक्षण (डीपीडीपी) या कायद्याचा उद्देश नागरिकांच्या डिजिटल वैयक्तिक माहितीचे संरक्षण करणे हा आहे. मात्र, माहिती अधिकार कायद्यातील बदल आणि पत्रकारितेसाठी स्वतंत्र अपवादाचा अभाव यांमुळे काही मूलभूत प्रश्न उपस्थित झाले आहेत. नागरिकांची गोपनीयता जपताना सार्वजनिक हिताची माहिती उघड करण्याचा माध्यमांचा अधिकार कसा सुरक्षित राहणार, सरकारी निर्णयांची चिकित्सा करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे मिळवणे अधिक कठीण होणार का, आणि माहितीवर नियंत्रण ठेवण्याची शक्ती सरकारकडे अधिक केंद्रित होणार का, असे प्रश्न विचारले जात आहेत.

या कायद्याचा माध्यमांच्या स्वातंत्र्याशी संबंध काय?

माध्यमांचे काम केवळ माहिती प्रसिद्ध करणे नसते, तर सार्वजनिक सत्तेच्या कारभारावर लक्ष ठेवणे आणि अनियमितता उघड करणे हेही असते. त्यासाठी पत्रकारांना सरकारी कागदपत्रे, आर्थिक व्यवहार, नियुक्त्या आणि निर्णयप्रक्रियेशी संबंधित माहिती मिळवावी लागते. अशा माहितीमध्ये काही व्यक्तींची वैयक्तिक माहितीही असू शकते. उदाहरणार्थ, एखाद्या सरकारी अधिकाऱ्याने पदाचा गैरवापर करून नातेवाइकांच्या कंपनीला कंत्राट मिळवून दिल्याचा संशय असेल, तर संबंधित व्यक्तींचे संबंध आणि आर्थिक व्यवहार तपासणे सार्वजनिक हितासाठी आवश्यक ठरू शकते. अशा वेळी वैयक्तिक माहितीच्या संरक्षणाचा मुद्दा पुढे करून माहिती नाकारली गेली, तर शोधपत्रकारितेच्या कामात अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे.

माहिती अधिकार कायद्यातील बदलामुळे काय परिणाम होऊ शकतो?

डीपीडीपी कायद्याच्या कलम ४४(३) नुसार माहिती अधिकार कायद्यातील कलम ८(१)(जे) मध्ये बदल करण्यात आला. पूर्वी वैयक्तिक माहिती उघड करण्यास नकार देताना सार्वजनिक हिताच्या दृष्टीने माहिती उघड करण्याचे औचित्य विचारात घेण्याची स्पष्ट तरतूद होती. नव्या तरतुदीत वैयक्तिक माहितीच्या प्रकटीकरणावर निर्बंध घालण्यात आले आहेत.या बदलामुळे सरकारी अधिकाऱ्यांची मालमत्ता, हितसंबंधांचा संघर्ष किंवा सार्वजनिक निधीच्या वापराशी संबंधित माहिती मिळवताना प्रश्न निर्माण होऊ शकतात. अर्थात, प्रत्येक प्रकरणात माहिती नाकारलीच जाईल असे नाही. मात्र, माहिती नाकारण्याच्या निर्णयात सार्वजनिक हिताला किती महत्त्व दिले जाणार, हा कळीचा मुद्दा आहे.

सरकारच्या मते हा कायदा आवश्यक का आहे?

नागरिकांची वैयक्तिक माहिती अनधिकृतपणे वापरली जाऊ नये, तिची गळती होऊ नये आणि व्यक्तीला स्वतःच्या माहितीवर काही प्रमाणात नियंत्रण मिळावे, हा कायद्यामागील प्रमुख उद्देश आहे. डिजिटल व्यवहारांच्या वाढत्या प्रमाणात अशा संरक्षणाची गरज नाकारता येत नाही. मात्र, गोपनीयतेचे संरक्षण आणि सार्वजनिक उत्तरदायित्व या दोन्ही गोष्टी लोकशाहीसाठी महत्त्वाच्या आहेत. खासगी आयुष्याचे संरक्षण करताना सार्वजनिक पदावरील व्यक्तींच्या निर्णयांची चौकशी करण्यासाठी आवश्यक माहिती उपलब्ध राहिली पाहिजे. त्यामुळे या दोन्ही अधिकारांमध्ये संतुलन राखण्याची जबाबदारी कायद्याच्या अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांवर आहे.

कायद्याविरोधात माध्यमे सर्वोच्च न्यायालयात का गेली?

डिजिटल न्यूज पब्लिशर्स असोसिएशनने (डीएनपीए) सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून कायद्यातील काही तरतुदींना आव्हान दिले. या संघटनेत २१ प्रमुख वृत्तसंस्थांचा समावेश आहे. पत्रकारितेसाठी स्वतंत्र सूट नसल्याने बातम्या गोळा करणे, शोधपत्रकारिता करणे आणि गोपनीय माहिती देणाऱ्या सूत्रांचे संरक्षण करणे कठीण होऊ शकते, असा याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद आहे. मुख्य आक्षेप असा की, पत्रकार एखाद्या व्यक्तीच्या गैरव्यवहाराची चौकशी करत असताना त्याच व्यक्तीची माहिती वापरण्यासाठी तिची संमती घेण्याची सक्ती निर्माण झाली, तर चौकशीचा उद्देशच निष्फळ ठरू शकतो. ज्याच्याविरोधात बातमी करायची आहे, त्याच व्यक्तीला आधी माहिती देणे किंवा तिच्या संमतीवर अवलंबून राहणे पत्रकारितेच्या मूलभूत कार्यात अडथळा ठरू शकते. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाला बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठाने २७ ऑक्टोबर रोजी केंद्र सरकारला नोटीस बजावली. मात्र, सरकारची बाजू ऐकून घेतल्याशिवाय आव्हान दिलेल्या तरतुदींना स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला. सुनावणीदरम्यान न्यायालयाने नागरिकांच्या गोपनीयतेचे संरक्षण आणि माध्यमांचे स्वातंत्र्य यांच्यात समतोल राखण्याची गरज अधोरेखित केली.

tushar.dharkar@expressindia.com