डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडनमधील निवासस्थानाचे जतन करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला. मुंबईतील इंदू मिलच्या जागेवरही त्यांचे स्मारक उभारण्याची प्रक्रिया पुढे नेण्यात आली. या पार्श्वभूमीवर श्याम हॉटेलच्या स्मारकाचा प्रश्न महत्त्वाचा ठरतो.

श्याम हॉटेलचे ऐतिहासिक महत्त्व काय?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपुरातील दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांच्या उपस्थितीत बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. मात्र, या ऐतिहासिक सोहळ्याच्या पूर्वतयारीशी संबंधित असलेली श्याम हॉटेल ही वास्तू अद्याप स्मारकाच्या प्रतीक्षेत आहे. बाबासाहेब नागपूरच्या दौर्यावर आल्यावर श्याम हॉटेलमध्ये मुक्काम करत. धम्मदीक्षेच्या ऐतिहासिक पर्वातही या वास्तूला महत्त्वाचे स्थान होते. ११ ऑक्टोबर रोजी बाबासाहेबांचा या हॉटेलच्या खोली क्रमांक ११६ मध्ये मुक्काम होता. १३ ऑक्टोबर रोजी त्यांनी याच हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेतली होती. धम्मदीक्षेनंतर ‘तरुण भारत’चे संपादक ग. त्र्यं. माडखोलकर यांनी येथेच बाबासाहेबांची भेट घेतली होती. श्याम हॉटेलचे महत्त्व केवळ मुक्कामाच्या वास्तूपुरते मर्यादित राहत नाही; ते धम्मक्रांतीच्या वैचारिक आणि ऐतिहासिक संदर्भांशीही जोडले जाते.

ठराव होऊनही शासन निर्णय का नाही?

श्याम हॉटेलला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळावा, यासाठी नागपूर महापालिकेने २०१२ मध्ये ठराव मंजूर केला. मात्र, १४ वर्षांहून अधिक काळ उलटूनही स्मारकाच्या दर्जाबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. महापालिकेचा ठराव हा या प्रक्रियेतील पहिला टप्पा होता. त्यानंतर जागेचा ताबा, स्मारकाचे स्वरूप, निधीची तरतूद आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यासंदर्भातील निर्णय अपेक्षित होते. मात्र, या बाबींमध्ये कोणती कार्यवाही प्रलंबित आहे, याबाबत स्पष्टता नसल्याने प्रस्तावाच्या सद्यस्थितीविषयी प्रश्न उपस्थित होत आहेत. ऐतिहासिक महत्त्व मान्य करून प्रस्ताव तयार करायचा, पण अंमलबजावणीला अंतिम मंजुरी द्यायची नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

७७.८८ कोटींच्या आराखड्यात काय आहे?

श्याम हॉटेलचे जतन आणि संवर्धन करून येथे ‘धम्मक्रांती स्मृती विहार’ उभारण्याची संकल्पना आहे. नागपूर सुधार प्रन्यासने त्यासाठी ७७.८८ कोटी रुपयांचा आराखडा तयार केला. प्रस्तावित आराखड्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ५६ फूट उंच पुतळा, ग्रंथालय, ई-ग्रंथालय, ध्यानसाधना सभागृह, कलादालन तसेच प्रकाश आणि ध्वनिव्यवस्थेचा समावेश आहे. या सुविधांमुळे श्याम हॉटेल केवळ स्मृतिस्थळ न राहता बाबासाहेबांच्या विचारांचा प्रसार करणारे केंद्र म्हणून विकसित होऊ शकते. ऐतिहासिक वास्तूचे जतन, अभ्यासकांसाठी संदर्भसाहित्य आणि नव्या पिढीला धम्मक्रांतीचा इतिहास समजून घेण्याची संधी, असे या प्रकल्पाचे संभाव्य स्वरूप आहे. मात्र, शासनाची मंजुरी आणि पुढील कार्यवाही यांबाबत ठोस निर्णय झाल्याशिवाय प्रस्तावित सुविधांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरणार नाही.

खासगी भाडेपट्ट्याचा पेच कसा सुटणार?

प्रस्तावित स्मारकासाठी आवश्यक असलेल्या सुमारे ७ हजार ५०० चौरस फूट जागेचा खासगी भाडेपट्टा हा महत्त्वाचा मुद्दा आहे. उपलब्ध माहितीनुसार, ही जागा एप्रिल २००४ मध्ये आस्वाद रेस्टॉरंट प्रा. लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक प्रमोद लक्ष्मीनारायण जयस्वाल यांना ३० वर्षांच्या भाडेपट्ट्याने देण्यात आली. या जागेवर मद्यविक्रीचे दुकानही आहे. स्मारकासाठी जागेचा ताबा मिळवणे आणि विद्यमान भाडेपट्ट्याबाबत निर्णय घेणे आवश्यक ठरणार आहे. भाडेपट्टा हा अडथळा असल्याचे सांगितले जात असले, तरी त्याच्या निराकरणासाठी कोणती कार्यवाही झाली आणि कोणत्या स्तरावर निर्णय प्रलंबित आहे, हे स्पष्ट होणे गरजेचे आहे. जागेच्या संपादनासाठी समाजकल्याण विभागाकडून निधी निश्चित करण्यात आला आहे. तरीही जागेचा प्रश्न सुटलेला नसेल, तर त्यामागील कारणे शासनाने स्पष्ट करणे अपेक्षित आहे.

स्मारकाच्या मागणीला शासनाकडून प्रतिसाद कधी?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडनमधील निवासस्थानाचे जतन करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला. मुंबईतील इंदू मिलच्या जागेवरही बाबासाहेबांचे स्मारक उभारण्याची प्रक्रिया पुढे नेण्यात आली. या पार्श्वभूमीवर नागपूरमधील श्याम हॉटेलच्या स्मारकाचा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. कारण, ही वास्तू बाबासाहेबांच्या धम्मदीक्षेच्या ऐतिहासिक पर्वाशी थेट जोडलेली आहे. महापालिकेचा ठराव, नागपूर सुधार प्रन्यासचा आराखडा आणि निधीबाबतची तयारी असे टप्पे पार पडल्याचे सांगितले जात असताना अंतिम निर्णयासाठी आणखी किती प्रतीक्षा करावी लागणार, हा प्रश्न आहे. स्मारकाचा दर्जा देण्याची मागणी प्रतीकात्मक नसून ऐतिहासिक वारशाचे जतन आणि धम्मक्रांतीच्या स्मृती पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याशी संबंधित आहे. या स्मारकाबाबत शासनाची भूमिका स्पष्ट होणे, भाडेपट्ट्याच्या प्रश्नावर कायदेशीर मार्ग काढणे आणि आराखड्याला मंजुरी देण्याची कालमर्यादा निश्चित करणे आवश्यक आहे. अन्यथा, प्रत्येक अशोक विजयादशमीला धम्मक्रांतीच्या स्मृतींना अभिवादन केले जाईल; पण त्या इतिहासाशी निगडित वास्तूच्या जतनाचा प्रश्न मात्र अनुत्तरितच राहील.

nilesh.doye@expressindia.com