Dr Shriram Nene Diabetes Diet Tips : भात, चपाती आणि डाळ हे बहुतांश भारतीयांच्या आहारातील महत्त्वाचे पदार्थ मानले जातात. मात्र, देशात मधुमेहाचे रुग्ण झपाट्याने वाढत असताना आणि त्यासाठी अनेकदा कर्बोदकांना जबाबदार धरले जात असताना, भारतीयांना आपल्या आहाराबाबत फेरविचार करण्याची गरज आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याबाबत प्रख्यात हृदय व छातीरोग शल्यचिकित्सक, तसेच ‘पाथफाइंडर हेल्थ सायन्सेस’ या संस्थेचे संस्थापक डॉ. श्रीराम नेने यांनी स्पष्ट मत मांडले आहे. त्यांच्या मते, पारंपरिक भारतीय खाद्यपदार्थ खाणे बंद करण्यापेक्षा ते कशा पद्धतीने खाल्ले जातात हे समजून घेण्यातच याचे उत्तर दडलेले आहे.

भारतात मधुमेहाचे वाढते प्रमाण

इंडिया टुडेच्या हेल्थवेल्थ समिटमध्ये ‘२१ डेज टू गुड हेल्थ’ या विशेष सत्रात बोलताना डॉ. श्रीराम नेने यांनी भारतीयांना आपले आवडते पदार्थ खाणे बंद न करता, अधिक आरोग्यदायी आहाराच्या सवयी कशा लावता येतील, याबाबत मार्गदर्शन केले. भारतात सध्या मधुमेहाचे संकट अत्यंत गंभीर स्वरूप धारण करीत आहे. देशभरात अंदाजे १० कोटी लोक मधुमेहाने ग्रस्त असून १३ कोटींहून अधिक प्रीडायबेटिसच्या उंबरठ्यावर असल्याचे एका आकडेवारीतून समोर आले आहे. या स्थितीमुळे त्यांना टाईप २ चा मधुमेह होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. मद्रास डायबिटीज रिसर्च फाउंडेशन (MDRF) आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (ICMR) ICMR-INDIAB) अभ्यासातूनही भारतीयांच्या आहारातील कर्बोदकांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. या अभ्यासानुसार, भारतीयांच्या दैनंदिन उर्जेच्या एकूण गरजेपैकी तब्बल ६२.३ टक्के ऊर्जा ही कमी दर्जाच्या कर्बोदकांमधून मिळते. त्यामध्ये प्रक्रिया केलेली धान्य आणि साखरेचा समावेश आहे.

मधुमेहाचा धोका केवळ भात-पोळीमुळे नाही

डॉ. श्रीराम नेने यांच्या मते, भारतीयांचे राहणीमान आणि कामाची पद्धत मोठ्या प्रमाणात बदलली असली तरी त्या तुलनेत आपल्या आहाराच्या सवयींमध्ये आवश्यक तो बदल झालेला नाही. त्यामुळे केवळ भात किंवा पोळी खाणे ही मुख्य समस्या नसून, त्यामागे जीवनशैलीही कारणीभूत आहे. दक्षिण आशियातील लोकांना हृदयविकार आणि मधुमेह यांसारख्या काही आजारांचा धोका असतो. भारताची वाटचाल शेतीप्रधान समाजव्यवस्थेकडून अशा व्यवस्थेकडे झाली आहे, जिथे शारीरिक श्रमांची जागा हळूहळू बैठ्या कामाने घेतली आहे. सध्या आपण अशा औद्योगिक युगात आहोत, जिथे अधिकाधिक लोक आयटी कंपन्या, बीपीओ आणि इतर कार्यालयांमध्ये काम करतात. अशा ठिकाणी शारीरिक श्रमांपेक्षा बौद्धिक कामाला अधिक महत्त्व असते. त्यातच जास्त ऊर्जा देणारे पदार्थ सहज आणि वेगाने मागवता येतात. या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम आरोग्यावर होतो, असेही डॉ. नेने यांनी स्पष्ट केले.

प्रत्येकाच्या गरजेनुसार आहार ठरवण्याचा सल्ला

थोडक्यात सांगायचे तर, चिंता केवळ कर्बोदके खाण्याची नाही, तर आपण ते किती प्रमाणात खातो, त्या कर्बोदकांचा दर्जा काय आहे आणि दिवसभरात आपण किती उर्जा खर्च करतो, ही खरी समस्या आहे. या पार्श्वभूमीवर, पारंपरिक भारतीय अन्न योग्य प्रमाणात खाण्याचा आणि प्रत्येकाच्या वैयक्तिक गरजांनुसार आहारात बदल करण्याचा सल्ला डॉ. श्रीराम नेने देतात. एखाद्या व्यक्तीसाठी कोणता आहार योग्य आहे हे ठरवताना कौटुंबिक इतिहास, आनुवंशिकता, सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमी आणि शारीरिक हालचालींची पातळी या सर्व बाबी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. उदाहरणार्थ- नियमित व्यायाम करणाऱ्या एखाद्या खेळाडूला दिवसभर खुर्चीवर बसून काम करणाऱ्या व्यक्तीपेक्षा जास्त प्रमाणात कर्बोदकांची आवश्यकता भासू शकते.

मधुमेहासाठी संतुलित ताट कसे असावे?

अतिशय कडक आणि बंधने लादणाऱ्या आहारपद्धतींचा अवलंब करण्याऐवजी डॉ. श्रीराम नेने यांनी ताटाच्या प्रमाणावर आधारित एक सोपी पद्धत सुचवली आहे. त्यांच्या पुस्तकात मांडलेल्या या पद्धतीनुसार, ताटाचा अर्धा भाग तंतूयुक्त भाज्यांनी भरलेला असावा, एक-चतुर्थांश भागात प्रथिनयुक्त पदार्थ असावेत, तर उर्वरित ताटात कमी प्रक्रिया केलेल्या संपूर्ण धान्यांमधून मिळणाऱ्या संमिश्र कर्बोदकांचा समावेश असायला हवा. प्रत्येक जेवणात केवळ पांढरा भात किंवा कर्बोदकांचे प्रमाण जास्त असलेल्या पदार्थांनाच महत्त्व न देता विविध प्रकारच्या पोषक अन्नघटकांना समावेश करणे, असा या पद्धतीमागचा मुख्य उद्देश आहे. त्याचाच अर्थ प्रत्येक भारतीयाने पोळी किंवा भातासोबत भरपूर पालेभाज्या आणि प्रथिनांचा स्रोत असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा. त्याचबरोबर जेवणाचे प्रमाण नियंत्रित ठेवावे आणि शक्य असेल तिथे कमी प्रक्रिया केलेल्या कर्बोदकयुक्त पदार्थांची निवड करावी. मात्र, ही आहारपद्धती प्रत्येकाच्या गरजेनुसार ठरवणे आवश्यक आहे. सर्वांना सारखाच फायदा होईल, असा एकच आहार नसतो. मधुमेह किंवा प्री-डायबिटीज असलेल्या व्यक्तींनी आपल्या गरजांनुसार आहार ठरविण्यासाठी आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

वडापाव खाणे सोडण्याची गरज आहे का?

तंदुरुस्त राहण्यासाठी आवडते भारतीय खाद्यपदार्थ किंवा सणासुदीचे गोडधोड पदार्थ कायमचे सोडून देणे, असा तुमचा समज असेल, तर डॉ. श्रीराम नेने यांचा दृष्टिकोन पूर्णपणे वेगळा आहे. एखादा पदार्थ खाणे पूर्णपणे बंद करण्याऐवजी त्यातील घटकांमध्ये बदल करण्याचा विचार करायला हवा, असे त्यांचे मत आहे. या संदर्भात त्यांनी ‘धिस व्हर्सेस दॅट’ (This Versus That) या मालिकेतील एका प्रयोगाचा दाखला दिला आहे. त्यामध्ये मुंबईकरांच्या गळ्यातील ताईत असलेल्या वडापावला त्यांनी एक नवा आणि आरोग्यदायी पर्याय दिला. वडापावमध्ये कर्बोदकांचे प्रमाण एकावर एक वाढत जाते, असे सांगत त्यांनी या पदार्थाच्या पारंपरिक स्वरूपाविषयी भाष्य केले. पूर्वी शारीरिक श्रम करणाऱ्या लोकांसाठी वडापाव हा स्वस्त, पोट भरणारा आणि भरपूर ऊर्जा देणारा पदार्थ होता, असे त्यांनी स्पष्ट केले.

चहा-कॉफीतील साखर कशी कमी करावी?

वडापाव पूर्णपणे आहारातून काढून टाकण्याऐवजी डॉ श्रीराम नेने यांच्या टीमने त्यात बटाट्याच्या मिश्रणाऐवजी ‘रताळ्याचा’ वापर केला. रताळ्यामध्ये भरपूर फायबर असते आणि त्याचा ग्लायसेमिक इंडेक्सही कमी असतो. त्याशिवाय नेहमीच्या पावऐवजी भरड धान्यापासून तयार केलेला पाव वापरण्यात आला, तसेच वडे नेहमीप्रमाणे तेलात तळण्याऐवजी एअर-फ्राय आणि बेक करून पाहिले गेले. या प्रयोगात रताळ्यापासून तयार केलेला हा वडापाव चवीला अत्यंत उत्तम ठरला. डॉ. नेने यांचा मुद्दा अगदी सरळ आहे. आरोग्यदायी पर्याय कंटाळवाणे असण्याची गरज नाही. तसेच, आपल्या नेहमीच्या आवडीचे पदार्थ आहारातून पूर्णपणे वगळण्याचीही आवश्यकता नाही. मात्र, एखाद्या पारंपरिक पदार्थातील एक घटक बदलल्याने तो आपोआप आरोग्यदायी होतो, असे नाही. त्या पदार्थाचे प्रमाण, त्यातील एकूण पोषक घटक आणि तो किती वेळा खाल्ला जातो, या गोष्टीही महत्त्वाच्या आहेत.

साखरमुक्त पदार्थांबाबतही महत्त्वाचा सल्ला

डॉ. श्रीराम नेने यांच्या मते, साखरेचे सेवन कमी करण्यासाठीही छोटे आणि सातत्यपूर्ण बदल उपयुक्त ठरू शकतात. त्याकरिता त्यांनी एक सोपा उपाय सुचवला. सुरुवातीला एक आठवडा चहा किंवा कॉफीमध्ये साखर घालणे बंद करावे. त्यानंतर हा प्रयोग १४ दिवसांपर्यंत आणि पुढे २१ दिवसांपर्यंत वाढवून पाहावा. गोड खाण्याची तीव्र इच्छा झाल्यावर प्रत्येक वेळी मनावर ताबा मिळविण्यापेक्षा अतिरिक्त गोड चवीची सवयच हळूहळू कमी करणे हा यामागचा मूळ उद्देश आहे. मात्र, साखरेऐवजी गोडवा देणाऱ्या पदार्थांचा वापर केला म्हणजे संपूर्ण आहार आरोग्यदायी झाला, असे समजू नये, असा इशारा डॉ. नेने यांनी दिला. उदाहरणार्थ- साखर नसलेले पेय निवडूनही त्यासोबत मोठ्या प्रमाणात आणि जास्त कॅलरीज असलेले जेवण घेतले, तर त्याचा फारसा फायदा होणार नाही, असे त्यांनी सांगितले. शुगर-फ्री पदार्थांना इतर आहाराच्या बाबतीत मोकळीक देणारा पर्याय समजण्याऐवजी संपूर्ण आहार संतुलित ठेवण्यावर भर द्यायला हवा, हा त्यांचा मुख्य संदेश आहे. दुसरीकडे, संपूर्ण फळांमध्ये नैसर्गिकरीत्या आढळणाऱ्या साखरेसोबत तंतुमय घटक आणि इतर पोषकद्रव्येही मिळतात. त्यामुळे संतुलित आहारात संपूर्ण फळांचा समावेश करता येतो. मात्र, वारंवार साखरयुक्त पेये आणि गोड पदार्थ खाण्याची सवय टाळणे महत्त्वाचे आहे.

मुलांना लहानपणापासूनच आरोग्यदायी आहाराची सवय लावा

डॉ. श्रीराम नेने यांच्या मते, आरोग्यदायी आहाराच्या सवयी लहानपणापासूनच लावायला हव्यात. एखाद्या आजाराचे निदान झाल्यानंतर किंवा वजन वाढल्यानंतरच आहाराकडे गांभीर्याने लक्ष देण्याऐवजी, सुरुवातीपासूनच योग्य आहार घेण्याची सवय लावणे महत्त्वाचे आहे. लहान मुलांना बक्षीस म्हणून बिस्किटे किंवा साखरेचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ देणे टाळावे, असे त्यांनी सांगितले. त्याऐवजी फळे आणि इतर पौष्टिक पदार्थही मुलांना आवडतील अशा पद्धतीने देण्याचा प्रयत्न करावा, असे त्यांनी सुचवले. तसेच, मुलांना स्वयंपाक करायला शिकवावे आणि त्यांच्या शारीरिक हालचालींचे प्रमाण व पोषणाच्या गरजा यांचा आहाराशी कसा संबंध आहे, हे समजावून सांगावे, असेही त्यांनी नमूद केले. आरोग्यदायी जीवनशैलीसाठी संपूर्ण आयुष्य एका रात्रीत बदलण्याची अजिबात गरज नसते. काही दिवस आहार पद्धतीत चुका होऊ शकतात. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे दीर्घकाळ टिकतील अशा शाश्वत सवयी अंगी बाळगणे आणि आपल्या आहारात केलेले बदल शरीरासाठी किती महत्त्वाचे आहेत हे मनापासून समजून घेणे गरजेचे आहे, असेही डॉ. श्रीराम नेने यांनी स्पष्ट केले.