डीआरडीओ आणि भारतीय नौदलाने हेलिकॉप्टरमधून कमी पल्ल्याच्या जहाज विरोधी क्षेपणास्त्राच्या मालिकेत (एनएएसएम-एसआर) एकापाठोपाठ एक पद्धतीने (साल्वो) लक्ष्यवेध करणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. स्वदेशी अत्याधुनिक जहाजविरोधी क्षेपणास्त्र प्रणालीची ही पहिली यशस्वी चाचणी ठरली. या माध्यमातून प्रत्यक्ष युद्धात संहारकता आणि टिकून राहण्याच्या क्षमता विस्तारणार आहे.

चाचणीचे स्वरूप काय?

अलीकडेच संरक्षण संशोधन व विकास संस्था (डीआरडीओ) आणि भारतीय नौदलाने ओडिशाच्या किनाऱ्याजवळ हेलिकॉप्टरमधून कमी पल्ल्याच्या जहाजविरोधी क्षेपणास्त्रांच्या एका तुकडीची यशस्वी चाचणी घेतली. ‘नेव्हल अँटी-शिप मिसाईल शॉर्ट रेंज’ (एनएएसएम-एसआर) नावाची ही स्वदेशी क्षेपणास्त्र प्रणाली आहे. नौदलाच्या जहाजांवरून उडणाऱ्या हेलिकॉप्टरमध्ये ती तैनात केली जाते. या चाचणीवेळी निश्चित केलेली सर्व उद्दिष्टे पूर्ण झाली. रडार, ‘इलेक्ट्रो-ऑप्टिकल प्रणाली’ आणि ‘टेलिमेट्री’ अशा उपकरणांमधून, त्याची माहिती जमा करण्यात आली. पहिल्याच यशस्वी चाचणीतून या क्षेपणास्त्रांनी पाण्यात अचूक प्रहार करण्याची क्षमताही सिद्ध केल्याचे डीआरडीओने म्हटले आहे.

विकास कसा?

या क्षेपणास्त्राच्या विकास प्रक्रियेत हैदराबाद येथील संशोधन केंद्र इमारत आणि संरक्षण संशोधन व विकास प्रयोगशाळा, पुण्यातील उच्च ऊर्जा सामग्री संशोधन प्रयोगशाळा आणि चंडीगड येथील टर्मिनल बॅलिस्टिक्स रिसर्च लॅबोरेटरी यांसारख्या डीआरडीओच्या प्रमुख प्रयोगशाळांचाही समावेश होता. या क्षेपणास्त्रावरील सर्व उपप्रणाली, अर्थात सीकर, ‘इंटिग्रेटेड एव्हिऑनिक्स मॉड्यूल’, उच्च-बँडविड्थ टू-वे डेटा लिंक आणि जेट-व्हेन नियंत्रण यांचा विकास डीआरडीओच्या विविध प्रयोगशाळा आणि भारतीय उद्योगांनी स्वदेशी तंत्रज्ञानाच्या आधारे केला आहे.

या क्षेपणास्त्राच्या विकासामुळे, संरक्षण दलांची क्षमता लक्षणीयरित्या वाढेल, असा विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला. या क्षेपणास्त्राचे उत्पादन सध्या खासगी भागीदारांकडून लघू व मध्यम उद्योग, नवउद्यमी व इतरांच्या मदतीने केले जात आहे.

प्रणालीची रचना कशी?

यात घन इंधनावर चालणारे बूस्टर रॉकेट वापरले जाते, जे क्षेपणास्त्राला प्रारंभी जोर देते. दीर्घकाळ जळणारे ‘सस्टेनर’ इंजिन त्याला जास्त काळ हवेत टिकवून ठेवते. ‘सीकर’ ही त्याची प्रमुख उपप्रणाली असून जी संवेदक अर्थात सेंसरद्वारे लक्ष्याचा मागोवा घेते. यात जमिनीपासून समुद्राची उंची मोजणारे एक रेडिओ अल्टिमीटर उपकरण देखील आहे. या प्रणालीतील आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे उच्च बँडविड्थची द्विदिशा डेटा लिंक प्रणाली, तिचा कारवाईत क्षेपणास्त्र आणि हेलिकॉप्टरमध्ये बसलेला वैमानिक यांत तत्क्षणी संपर्क साधण्यास उपयोग होतो.

वैशिष्ट्ये काय?

भारतीय नौदलाकडे हेलिकॉप्टरमधून डागता येणारी क्षेपणास्त्रे आधीपासून आहेत. त्यांच्यापेक्षा ’एनएएसएम-एसआर‘ हे प्रगत मानले जाते. यात ‘मॅन-इन-लूप’ आणि ‘वॉटरलाइन हिट’ ही अनोखी वैशिष्ट्ये सामावलेली आहेत. ‘मॅन-इन-लूप’ म्हणजे गरज पडल्यास, क्षेपणास्त्र हवेत असतानाही चालक त्याचा मार्ग बदलू शकतो. या वैशिष्ट्यामुळे समुद्रातील गर्दीच्या स्थितीत लढाईत सहभागी नसलेल्या नागरिकांना लक्ष्य करण्याचा धोका कमी करता येतो.

द्विदिशीय डेटा लिंकद्वारे प्राप्त रिअल टाईम माहितीच्या आधारे चालक लक्ष्य अद्ययावत करू शकतो. यामुळे हे क्षेपणास्त्र चकमा देणाऱ्या किंवा हलत्या लक्ष्यांविरोधात जुळवून घेण्यास अधिक सक्षम होते. ‘वॉटरलाइन हिट’ म्हणजे क्षेपणास्त्र जहाजाचा सांगाडा पाण्याला जिथे मिळतो, त्या रेषेवर किंवा त्याच्या किंचित वर आदळते. जहाजाचा हा सर्वात असुरक्षित भाग मानला जातो. येथील नुकसान जहाजाच्या रचनेला गंभीर हानी पोहोचू शकते. यामुळे जहाजात वेगाने पाणी शिरून ते निकामी होईल किंवा बुडू शकते.

महत्त्व काय?

नौदलासाठी ‘एनएएसएम-एसआर’ सारखी हेलिकॉप्टरमधून प्रक्षेपित होणारी क्षेपणास्त्रे महत्त्वाची ठरतात. कारण, या माध्यमातून नौदलाला शत्रूची जहाजे व युद्धनौकांवर सुरक्षित अंतरावरून हल्ला करण्याची संधी उपलब्ध होते. स्वतःची जहाजे थेट धोक्यात न घालता कामगिरी करता येते.

जहाजांवर तैनात असलेले हेलिकॉप्टर उड्डाण करून तुलनेने जवळून लक्ष्यावर मारा करून, नंतर जहाजावर परत येऊ शकतात. त्यामुळे ही क्षमता संघर्षमय सागरी वातावरणात उपयुक्त ठरते. चाचणीप्रसंगी भारतीय नौदल आणि भारतीय हवाई दलाचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावरून केवळ भारतीय नौदलच नव्हे तर, हवाई दलाच्या हेलिकॉप्टरमध्येही या क्षेपणास्त्राचा समावेश होऊ शकतो, अशी शक्यता वर्तविली जाते.

सद्यःस्थितीतील गरज

भारतीय नौदलाकडे ब्रिटिश बनावटीचे ‘सी ईगल’ हे जहाजविरोधी क्षेपणास्त्र असून ते ‘सी किंग – ४२बी’ हेलिकॉप्टर्सवर आधीपासून बसवलेले आहे. हे १९८० च्या दशकातील क्षेपणास्त्र आहे. त्यात अनेक आधुनिक क्षमतांचा अभाव असल्याचे तज्ज्ञ सांगतात. सी ईगल क्षेपणास्त्राचे वजन ५८० किलो आहे. हेलिकॉप्टरमधून वाहून नेण्यास मर्यादा येतात. हे लक्षात घेऊन डीआरडीओने दीड दशकांपूर्वी हेलिकॉप्टरमधून अधिक संख्येने वाहून नेता येईल अशा हलक्या, आधुनिक व स्वदेशी क्षेपणास्त्र विकासाचे हाती घेतलेले काम ‘एनएएसएम-एसआर’ मूर्त स्वरूपात आले आहे.

या प्रणालीची पहिली यशस्वी चाचणी २०२२ मध्ये झाली होती. अलीकडेच एका पाठोपाठ एक अनेक क्षेपणास्त्र डागण्याची चाचणी पार पडली. या क्षेपणास्त्राचे वजन ३८० किलो इतके असून ते सी ईगलच्या तुलनेत २०० किलोने कमी आहे. त्याचा पल्ला मात्र सी ईगलच्या ११० किलोमीटरच्या पल्ल्यापेक्षा कमी म्हणजे ५५ किलोमीटरचा आहे. सी ईगल्स हे ‘मारा आणि विसरा’ प्रकारचे क्षेपणास्त्र आहे तर ‘एनएएसएम-एसआर‘ हे ‘मॅन-इन-लूप’ वैशिष्ट्यामुळे चालक हवेतही त्याचा मार्ग बदलू शकतो. लक्ष्याच्या समीप आल्यानंतर ते एका विशिष्ट उपकरणाने स्फोट घडवून आणते.