DRDO TARA System IAF Guided Missile: संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) आणि भारतीय हवाई दलाकडून ७ मे (गुरूवारी) रोजी मार्गदर्शित नसलेल्या (अनगाइडेड) क्षेपणास्त्राचे रूपांतर मार्गदर्शित (गाइडेड) क्षेपणास्त्रात करू शकणार्या प्रणालीची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. ‘टॅक्टिकल ॲडव्हान्स्ड रेंज ऑगमेंटेशन’ (TARA-तारा) ही डीआरडीओने विकसित केलेली स्वदेशी बनावटीची एक महत्वपूर्ण प्रणाली आहे. ही प्रामुख्याने एक ‘किट’ (संच) आहे. पारंपरिक क्षेपणास्त्राला हे ‘किट’ जोडले जाऊ शकते. या ‘किट’च्या सहाय्याने क्षेपणास्त्र लांब अतरापर्यंत पुढे सरकत जाते व ठराविक लक्ष्यावर अचूक मारा करते. धोरणात्मकदृष्ट्या ही ‘तारा’ प्रणाली महत्वाची का आहे? याबाबत सविस्तर जाणून घेऊया.
‘तारा’ प्रणाली कशी कार्य करते?
‘टॅक्टिकल ॲडव्हान्स्ड रेंज ऑगमेंटेशन’ हे प्रामुख्याने एक मॉड्युलर किट आहे. हे किट विना मार्गदर्शित (अनगाइडेड) क्षेपणास्त्रावर सहजपणे बसवले जाऊ शकते. डीआरडीओ मधील शास्त्रज्ञांच्या मते, भारतीय हवाई दलातील विविध लढाऊ विमानांमध्ये या प्रणालीचा वापर करता येऊ शकतो व क्षेपणास्त्रे डागली जाऊ शकतात. विमानाने एका विशिष्ट उंचीवर आणि वेगाने क्षेपणास्त्र डागल्यानंतर त्याची दुमडलेली पंखे उघडतात आणि एरोडायनामिक पृष्ठभाग कार्यान्वित होतो. यामुळे क्षेपणास्त्र थेट लक्ष्यावर खाली न पडता हवेत तरंगत लांब अंतरापर्यंत प्रवास करू शकते. शस्त्रातील ऑन-बोर्ड नेव्हिगेशन आणि गायडन्स सिस्टिम सतत त्याच्या उड्डाण मार्गाची तपासणी करते आणि अचूकता वाढवण्यासाठी त्यात आवश्यक ते बदल करते.
वैमानिकाला शत्रूच्या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात न जाता सुरक्षित अंतर राखून क्षेपणास्त्र डागता येते. क्षेपणास्त्र डागताना असलेला विमानाचा वेग या प्रणालीच्या कार्यक्षमतेतील एक अत्यंत महत्वाचा घटक आहे. क्षेपणास्त्राने लक्ष्याचा अचूक भेद घेण्यासाठी या प्रणालीत ‘इनर्शियल नेव्हिगेशन’ आणि सॅटेलाईट आधारीत पोझिशनिंग या तंत्रज्ञानाचा एकत्रितपणे वापर केला जातो. तारा प्रणाली रॉकेट मोटरवर अवलंबून न राहता हवेवर तरंगत पुढे सरकते. त्यामुळे ही प्रणाली वजनाला हलकी आणि किफायतशीर ठरते, तसेच यामुळे क्षेपणास्त्राचा पल्ला वाढण्यासही मदत होते. गरजेनुसार तारा प्रणालीचे किट वेगवेगळ्या श्रेणीतील क्षेपणास्त्रांना (वॉरहेड्सना) जोडले जाऊ शकते.
धोरणात्मक आणि आर्थिक महत्व
भारतीय हवाई दलासाठी धोरणात्मकदृष्ट्या TARA प्रणाली अत्यंत महत्वाची आहे. या प्रणालीचा वापर करून भारतीय हवाई दलाची लढाऊ विमाने शत्रूच्या टप्प्यात न येता दूरवरून शत्रूवर क्षेपणास्त्र डागून अचूक मारा करू शकतात. त्यामुळे युद्धा दरम्यान लढाऊ विमानांचे होणारे नुकसान टाळता येऊ शकते. तसेच हवाई दलाला अधिक लवचिकता प्राप्त होते.
विना-मार्गदर्शित (अनगाइडेड) बॉम्बला ग्रॅव्हिटी बॉम्ब किंवा डम्ब बॉम्ब असेही म्हणतात. TARA प्रणालीचा वापर करून या बॉम्बना स्मार्ट बॉम्ब किंवा ‘प्रिसिजन गाइडेड म्युनिशन्स’मध्ये सहजपणे रूपांतरीत करता येते. त्यामुळे क्षेपणास्त्र किंवा बॉम्ब नव्याने बनवण्याची गरज कमी होते. तसेच खर्चात बचत व अचूक मारा करणारी शस्त्रे वाढवणे सोपे होते. डीआरडीओने विकसित केलेली तारा प्रणाली ही स्वदेशी बनावटीची आहे. त्यामुळे संरक्षण आयात खर्चही कमी होईल. दरम्यान, तारा प्रणालीचे वेगवेगळे व्हर्जन तयार करण्यात आले आहे. त्यांचा वापर २५० ते ५०० किलो वजनाच्या शस्त्रांसाठी (क्षेपणास्त्र अथवा बॉम्ब) केला जाणार आहे.
भारताचे स्वदेशी हवाई संरक्षण तंत्रज्ञानात मोठे पाऊल
हवाई दलाच्या एका लढाऊ विमानातून ओडिशाच्या किनारपट्टीवर तारा प्रणालीची यशस्वी चाचणी घेण्यात आली. हैदराबाद येथील डीआरडीओच्या ‘रिसर्च सेंटर इमारात’ (आरसीआय) या संस्थेने डीआरडीओच्या इतर प्रयोगशाळा आणि औद्योगिक भागीदार यांच्याबरोबर मिळून तारा प्रणालीची रचना तयार केली, तसेच ती विकसित केली आहे. या प्रणालीच्या अचुकतेचे, क्षमतेचे, पल्ल्याचे, विश्वासार्हतेचे मूल्यमापन चाचण्यांमार्फत केले जात आहे. या चाचणीमुळे भारताने स्वदेशी हवाई संरक्षण तंत्रज्ञानात मोठे पाऊल टाकले आहे. पुढील टप्प्यातील चाचण्या पूर्ण झाल्यावर ही प्रणाली प्रत्यक्ष युद्धभूमीवर वापरण्यासाठी हवाई दलाच्या ताफ्यात समाविष्ट केली जाईल.
“पहिलेच ग्लाईड वेपन”
“अत्याधुनिक आणि किफायतशीर प्रणालींचा वापर करून तयार करण्यात आलेले हे पहिलेच ग्लाईड वेपन (तरंगत पुढे जाणारे शस्त्र) आहे. या किटचा विकास ‘डेव्हलपमेंट कम प्रोडक्शन पार्टनर्स’ आणि इतर भारतीय उद्योगांच्या सहाय्याने करण्यात आला असून त्यांनी यापूर्वीच याचे उत्पादन सुरू केले आहे”, असे संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तारा प्रणालीच्या यशस्वी चाचणीबद्दल डीआरडीओ, भारतीय हवाई दल (IAF) आणि संबंधित उद्योगांचे अभिनंदन केले. स्वदेशी संरक्षण क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने हा एक महत्वाचा टप्पा असल्याचे त्यांनी सांगितले.
