Microplastics in bottled water अनेकांना प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिण्याची सवय असते. फिल्टर्ड पाणी प्यायचे म्हणून आपल्यापैकी अनेकजण छान पॅक केलेल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बॉटल्स विकत घेत असतील. परंतु, फार कमी लोक याविषयी जागरूक आहेत की, या पाण्यात हजारोंच्या संख्येत सूक्ष्म प्लास्टिकचे कण असतात. “अगदी अडचणीच्या वेळी प्लास्टिकच्या बाटल्यांमधील पाणी पिणे ठीक आहे, परंतु दैनंदिन जीवनात त्याचा वापर करू नये,” असा इशारा एका पर्यावरणीय सॉफ्टवेअर कंपनीच्या सह-संस्थापक आणि ‘जर्नल ऑफ हॅझर्डस मटेरिअल्स’मध्ये प्रकाशित झालेल्या पुनरावलोकन अहवालाच्या मुख्य लेखिका सारा साजेदी यांनी दिला आहे. त्यांनी केलेल्या अभ्यासातून नक्की काय समोर आले? सूक्ष्म प्लास्टिकचा शरीरावर काय परिणाम होतो? हे सविस्तर जाणून घेऊयात…

‘जर्नल ऑफ हॅझर्डस मटेरिअल्स’मधून काय समोर आले?

सारा साजेदी यांनी ‘सिंगल-युज’ (एकदाच वापरल्या जाणाऱ्या) प्लास्टिकच्या बाटल्यांविरुद्ध मोहीम सुरू केली. ‘वायर्ड’मधील एका वृत्तानुसार, अरबी समुद्राचे सौंदर्य पाहून त्या मंत्रमुग्ध झाल्या होत्या, मात्र त्या पांढऱ्या शुभ्र किनाऱ्यांवर पडलेला प्लास्टिकचा कचरा (प्रामुख्याने बाटल्या) पाहून त्या अस्वस्थ झाल्या. पर्यावरणाशी संबंधित क्षेत्रात काम करत असल्यामुळे साजेदी यांनी या विषयाचा सखोल अभ्यास करण्याचा निर्णय घेतला.

कॅनडातील कॉनकोर्डिया युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थिनी असताना साजेदी आणि त्यांच्या संशोधकांच्या टीमने प्लास्टिकच्या बाटल्यांचा मानवी शरीरावर होणारा परिणाम तपासण्यासाठी १४० हून अधिक वैज्ञानिक शोधनिबंधांचा आढावा घेतला. त्याचे निष्कर्ष धक्कादायक होते. नळाचे पाणी पिणाऱ्यांच्या तुलनेत, प्लास्टिकच्या बाटल्यांमधून दररोज पाणी पिणाऱ्यांच्या शरीरात ९०,००० हून अधिक सूक्ष्म प्लास्टिकचे कण (मायक्रोप्लास्टिक्स) जातात. या अभ्यासाने सिंगल युज प्लास्टिकच्या बाटल्यांचे वर्णन गंभीर आणि ज्याचा पुरेसा अभ्यास झालेला नाही, असे केले आहे.

बाटलीबंद पाणी पिल्याने वर्षाला ९० हजार मायक्रोप्लास्टिक्सचा शरीरात शिरकाव

या अभ्यासानुसार, लोक अन्न आणि पिण्याच्या पाण्यातून वर्षाला अंदाजे ३९ हजार ते ५२ हजार मायक्रोप्लास्टिक कणांचे सेवन करतात. मात्र, जे लोक बाटलीबंद पाण्यावर जास्त अवलंबून असतात, त्यांच्या शरीरात वर्षाला ९० हजार मायक्रोप्लास्टिक्स जातात. त्या तुलनेत नळाचे पाणी पिणाऱ्यांच्या शरीरात केवळ ४ हजार कण जातात. प्लास्टिकच्या बाटल्यांमधील पाण्यात डोळ्यांना न दिसणारे असंख्य कण असतात.

कॉनकोर्डिया युनिव्हर्सिटीच्या संशोधकांच्या विश्लेषणानुसार, या मायक्रोप्लास्टिक्सचा आकार एक मायक्रॉन ते पाच मिलिमीटरपर्यंत असू शकतो. ‘नॅनोप्लास्टिक्स’ तर त्याहूनही लहान असतात, त्यांचा आकार एक मायक्रॉनपेक्षा कमी असते. संशोधनात असे दिसून आले आहे की, बाटलीच्या निर्मितीपासून ते साठवणूक आणि वाहतुकीपर्यंतच्या विविध टप्प्यांवर हे मायक्रोप्लास्टिक्स पाण्यात मिसळतात. अनेक बाटल्या कमी दर्जाच्या प्लास्टिकपासून तयार केला जात असल्याने, सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यावर त्यातून हे कण बाहेर पडतात. तापमानातील बदलामुळे ही प्रक्रिया अधिक वेगवान होते.

मायक्रोप्लास्टिक्स किती हानिकारक?

संशोधकांच्या मते, मायक्रोप्लास्टिक्स शरीरात गेल्यामुळे आरोग्यावर होणारे परिणाम गंभीर असू शकतात. मायक्रोप्लास्टिक्स रक्ताभिसरणात मिसळून महत्त्वाच्या अवयवांपर्यंत पोहोचतात. या प्लास्टिकच्या उपस्थितीमुळे हार्मोन्सचे संतुलन बिघडू शकते. तसेच, यामुळे क्रॉनिक इन्फ्लेमेशन), पेशींवरील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस, मज्जासंस्थेचे नुकसान, पुनरुत्पादनाशी संबंधित समस्या आणि काही प्रकारचे कर्करोगदेखील होऊ शकतात.

संशोधकांनी लिहिले आहे की, “हा अहवाल नॅनो आणि मायक्रोप्लास्टिक्सच्या संपर्कात आल्यामुळे होणाऱ्या श्वसनाचे आजार, पुनरुत्पादन समस्या, न्यूरोटॉक्सिसिटी (मज्जासंस्थेवर होणारे विषारी परिणाम) आणि कर्करोगजन्य आजारांसारख्या आरोग्य समस्यांवर प्रकाश टाकतो.” परंतु, मर्यादित चाचण्या आणि या कणांचा शोध घेण्यासाठी मानक पद्धतींचा अभाव असल्यामुळे, त्यांचे दीर्घकालीन परिणाम अजूनही पूर्णपणे स्पष्ट झालेले नाहीत.

मायक्रोप्लास्टिक्स मोजता येतात का?

या विश्लेषणामध्ये नॅनो आणि मायक्रोप्लास्टिक्स शोधण्याच्या अनेक पद्धती नमूद केल्या आहेत, परंतु त्या प्रत्येकाच्या काही मर्यादा आहेत. साजेदी यांच्या मते, काही पद्धती लहान कण शोधू शकतात; मात्र, त्यांची रासायनिक रचना सांगू शकत नाहीत. इतर काही पद्धती पदार्थाची रचना ओळखू शकतात, पण अतिसूक्ष्म कण शोधण्यात अपयशी ठरतात. योग्य आणि विश्वासार्ह उपकरणे अनेकदा महाग असतात आणि ती सर्वत्र उपलब्ध नसतात.

प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर थांबवायला हवा का?

संशोधकांनी प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्यांच्या वापराविरुद्ध इशारा दिला आहे. सिंगल-युज प्लास्टिककडून अधिक शाश्वत आणि सुलभ पर्यायांकडे वळण्याची गरज अधोरेखित केली आहे. ‘द इंडिपेंडंट’मधील एका वृत्तानुसार, या पुनरावलोकनात असे नमूद केले आहे की, पाणीपुरवठ्याशी संबंधित पायाभूत सुविधा सुधारणे हे सिंगल-युज प्लास्टिकवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.”

साजेदी यांच्या मते, शिक्षण हा सर्वात प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय आहे. ‘सायटेक डेली’शी बोलताना त्यांनी सांगितले की, “शिक्षण ही सर्वात महत्त्वाची बाब आहे जी आपण करू शकतो.” त्यांनी पुढे असेही म्हटले की, दैनंदिन जीवनात प्लास्टिकच्या बाटल्यांमधून पाणी पिणे टाळले पाहिजे. त्यांनी असेही नमूद केले की, जगभरातील सरकारे प्लास्टिक कचरा मर्यादित करण्यासाठी कायदे तयार करत आहेत, परंतु हे नियम प्रामुख्याने प्लास्टिक पिशव्या, स्ट्रॉ आणि पॅकेजिंग साहित्यापुरतेच मर्यादित आहेत. त्यामुळे आता हे स्पष्ट आहे की प्लास्टिकच्या बाटल्या सार्वजनिक आरोग्यासाठी धोकादायक आहेत. आता त्यांचा वापर कायमस्वरूपी थांबवण्याची वेळ आली आहे.