Drinking Cold Water in Summer Health Risk : सध्या देशभरात सूर्य आग ओकत असल्याने भारतीय हवामान विभागाने विविध भागांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. गेल्या महिनाभरात उष्माघाताने अनेकांना रुग्णालयात दाखल करावे लागले असून काहींचा मृत्यूही झाला आहे. उष्माघातापासून बचाव करण्यासाठी नागरिकांना जास्तीत जास्त पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, हे पाणी योग्य पद्धतीने पिणेही तितकेच महत्वाचे असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे. उकाड्यामुळे घसा कोरडा पडत असल्यामुळे अनेकजण तहान भागवण्यासाठी फ्रीजमधील थंड पाणी पितात, पण अतिथंड पाण्यामुळे शरीराचे मोठे नुकसान होऊ शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे, त्याविषयी…

अतिथंड पाणी पिल्याने नेमके काय होते?

कडक उन्हातून आल्यावर बर्फासारखे थंड पाणी पिणे अनेकांसाठी सुखद वाटू शकते. मात्र, ही सवय आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. अमेरिकेतील पेनिसिल्व्हेनिया येथील आपत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. हॅरी एमेरिच यांच्या मते, अतिथंड पाणी पचनसंस्थेसाठी त्रासदायक ठरू शकते. तसेच त्यामुळे अन्ननलिकेत आकडी निर्माण होऊन पोटदुखी आणि छातीत तीव्र वेदना होऊ शकतात. हा प्रकार अगदी बर्फाचे थंड पेय पिल्यावर डोके सुन्न होण्यासारखाच आहे. शरीराचे तापमान आणि ३२ अंश डिग्रीपर्यंत थंड असलेल्या बर्फासारख्या थंड पाण्याचे तापमान यात खूप मोठा फरक असतो. त्यामुळे शरीरात आकुंचन निर्माण होते, हृदयाचे ठोके मंदावतात आणि रक्ताचे तापमानही कमी होऊ शकते. बर्फासारखे थंड पाणी पिल्याने थेट स्ट्रोक येण्याची शक्यता खूपच कमी असली तरी काही प्रकरणांमध्ये मात्र माणूस तात्पुरता बेशुद्ध पडू शकतो, असा इशाराही डॉ. हॅरी यांनी दिला आहे.

अतिशय थंड पाणी प्रत्येकासाठी योग्य का नाही?

फॅमिली फिजिशियन डॉ. कार्ला रॉबिन्सन यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, काही दुर्मीळ घटनांमध्ये थंड पेय घेतल्यानंतर लोक बेशुद्ध पडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. याचा उष्णतेशी थेट संबंध नसतो. गरम किंवा थंड हवामानातही हे होऊ शकते. ही एक मज्जासंस्थेशी संबंधित प्रतिक्रिया आहे, जी उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात कधीही घडू शकते. दुसरे एक तज्ज्ञ- डॉ. डेव्हिड शुल्झ यांनी उष्माघात किंवा अतिउष्णतेचा त्रास होत असलेल्या व्यक्तींनी शरीराच्या तापमानाशी जुळणारे पाणी पिण्याचा सल्ला दिला आहे. अतिथंड पाणी अन्ननलिकेद्वारे पोटात गेल्यानंतर शरीरातील ‘वॅगस नर्व्ह’ नावाच्या नसा अचानक उत्तेजित होतात. या नसा मेंदूला एक तीव्र सिग्नल पाठवतात, ज्यामुळे व्यक्तीचे ब्लड प्रेशर अचानक कमी होऊन ती काही काळासाठी बेशुद्ध पडू शकते, असा इशारा त्यांनी दिला आहे.

अतिथंड पाणी पिण्याचे आरोग्याशी संबंधित धोके

  • अतिथंड पाण्यामुळे घशातील मऊ उतींना सूज येऊ शकते, ज्यामुळे घसा खवखवणे आणि अन्न किंवा पाणी गिळताना त्रास होऊ शकतो.
  • अतिथंड पिल्याने कपाळाच्या नसा आकुंचन पावतात, ज्यामुळे मायग्रेनचा त्रास असलेल्या लोकांना तीव्र डोकेदुखी सुरू होऊ शकते.
  • अतिथंड पाण्यामुळे आतडे आणि पोटातील स्नायू कडक होतात, ज्यामुळे अन्नाचे पचन नीट होत नाही आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होतो.
  • अतिथंड पाण्यामुळे शरीराचे तापमान अचानक कमी होऊन स्नायूंमधील कडकपणा वाढतो आणि जुनी अंगदुखी किंवा सांधेदुखी अधिक तीव्र होऊ शकते.
  • अचानक थंड पाणी शरीरात गेल्याने रक्तवाहिन्यांवर ताण येतो आणि रक्तदाब वाढू शकतो.
  • अतिशय थंड पाणी पिल्याने शरीरातील रक्तवाहिन्या अरुंद होऊ शकतात. त्यामुळे रक्ताभिसरणाची गती मंदावते आणि काही वेळा हृदयाचे ठोके वाढतात.
  • विशेषतः हृदयरोग किंवा उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींना अतिथंड पाण्यामुळे मोठा त्रास होऊ शकतो.
  • अतिथंड पाण्यामुळे शरीराच्या तापमानाचा समतोल बिघडतो, ज्यामुळे हृदयाला आपले कार्य कार्यक्षमतेने करणे कठीण जाते.

कोणत्या परिस्थितीत थंड पाणी टाळावे?

  • काही विशिष्ट परिस्थितींमध्ये अतिथंड किंवा फ्रीजमधील पाणी पिणे टाळणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
  • अतिशय थंड पाणी पिल्यानंतर लगेच जेवण करणे किंवा जेवल्यानंतर थंड पाणी पिणे पचनक्रियेसाठी अत्यंत घातक ठरू शकते.
  • व्यायामानंतर शरीराचे तापमान आधीच वाढलेले असते. अशा वेळी अचानक थंड पाणी पिल्याने शरीराचे मोठे नुकसान होऊ शकते.
  • जास्त वेळ कडक उन्हात राहिल्यानंतर लगेच फ्रीजचे थंडगार पाणी पिणे टाळावे. यामुळे शरीराचे तापमान अचानक बिघडून ताप किंवा चक्कर येऊ शकते.
  • घशात इन्फेक्शन किंवा खोकला असताना अतिथंड पाणी पिल्याने घशाचा दाह मोठ्या प्रमाणात वाढू शकतो.
  • जर तुम्हाला पोटाचे विकार, गॅस किंवा अपचनाचा त्रास असेल, तर थंड पाण्यामुळे हा त्रास आणखी वाढू शकतो.
  • हृदयरोगी किंवा हाय ब्लड प्रेशरचा त्रास असलेल्या व्यक्तींनी अतिथंड पाणी पिणे टाळले पाहिजे, कारण यामुळे हृदयाच्या नसांवर अतिरिक्त ताण पडतो.

पाणी पिण्यासाठी योग्य तापमान कोणते?

तज्ज्ञांच्या मते, कडक उन्हातून घरी परतल्यानंतर नागरिकांनी काही काळ विश्रांती घेणे आवश्यक आहे. त्यानंतर शरीर थंड झाल्यावरच जास्त पाणी न पिता थोडे थोडे पाणी प्यायला हवे. सुरुवातीला कोमट पाणी घेतल्यास शरीराचे तापमान नियंत्रणात राहते व पचनक्रियाही चांगली राहते. साधारणपणे २० ते २५ अंश सेल्सिअस तापमानाचे पाणी शरीरासाठी उत्तम मानले जाते. हे तापमान शरीराच्या नैसर्गिक तापमानाच्या जवळ असल्याने शरीराला ते सहज शोषून घेता येते. त्यामुळे शरीर थंड राहण्यास मदत होते आणि योग्य प्रमाणात हायड्रेशनही टिकून राहते. उन्हाळ्यात बऱ्याच जणांना डिहायड्रेशनच्या समस्येला बहुतेकदा सामोरे जावे लागू शकते. शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याने शरीरावर गंभीर परिणाम उद्भवू शकतात. या काळात शरीराला पुरेसे पाणी मिळणे खूप गरजेचे असते. उन्हाळ्यात घामाद्वारे शरीरातील पाणी, क्षार व मिनरल्स शरीराबाहेर फेकले जातात; ज्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी सतत कमी-जास्त होत असते. शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी उन्हाळ्याच्या दिवसांत मुबलक पाणी पिणे आवश्यक असते.