Drinking Water Before Sleep Heart Attack and Stroke : रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास पाणी पिण्याचा सल्ला अनेकदा समाजमाध्यमांवर दिला जातो. शरीरातील पाण्याची पातळी रात्रभर व्यवस्थित राहण्यासाठी हे आवश्यक असल्याचा दावा काहीजण वारंवार करतात. त्यामुळे झोपण्यापूर्वी पाणी पिण्याच्या या सवयीमुळे खरंच हृदयाचे आरोग्य सुधारते किंवा स्ट्रोकचा धोका कमी होतो का? असा प्रश्न अनेकांकडून विचारला जात आहे. या दाव्यामागील सत्य जाणून घेण्यासाठी दी इंडियन एक्स्प्रेसने मुंबईतील परळ येथील ग्लेनेगल्स रुग्णालयातील हृदय व छातीच्या शस्त्रक्रिया विभागाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. स्वरुप स्वराज पाल यांच्याशी संवाद साधला. याबाबत ते नेमके काय म्हणाले? त्याविषयी जाणून घेऊ…
झोपण्यापूर्वी पाणी प्यायल्याने स्ट्रोकचा धोका टळतो का?
फक्त झोपण्यापूर्वी एक ग्लास पाणी प्यायल्याने हृदयविकाराचा झटका किंवा पक्षघात थेट टाळता येतो, या दाव्याला कोणताही भक्कम वैज्ञानिक आधार नसल्याचे डॉक्टर स्वरुप पाल यांनी स्पष्ट केले. हृदयाचे आरोग्य केवळ रात्री पाणी पिण्यावरच अवलंबून नसते; तर दिवसभर शरीरात पाण्याचे योग्य प्रमाण राखणे, रक्तदाब नियंत्रणात ठेवणे, कोलेस्ट्रॉल आणि मधुमेहाचे योग्य व्यवस्थापन करणे, नियमित शारीरिक हालचाल करणे आणि हृदयासाठी पोषक जीवनशैलीचा अवलंब करणे या बाबी अधिक महत्त्वाच्या ठरतात, असेही ते म्हणाले.
मग शरीरात पाण्याचे प्रमाण राखणे का महत्त्वाचे आहे?
डॉक्टर स्वरुप पाल यांच्या मते, रात्री झोपण्यापूर्वी पाणी प्यायल्याने हृदयविकाराचा धोका थेटपणे टळत नसला तरीही पाण्याचा हृदयाच्या आरोग्याशी असलेला संबंध जाणून घेणे तितकेच महत्वाचे ठरते. शरीरातील पाण्याचे योग्य प्रमाण रक्ताभिसरण सुरळीत ठेवण्यास मदत करते; पण दिवसातील एखाद्या विशिष्ट वेळी अधिक पाणी प्यायल्याने हृदयविकारापासून अतिरिक्त संरक्षण मिळते, असा याचा अर्थ मुळीच होत नाही. पाणी प्यायल्याने शरीरातील रक्ताचे प्रमाण आणि रक्ताभिसरण सामान्य राखण्यास मदत होते. रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास पाणी प्यायल्याने रक्त लक्षणीयरीत्या ‘पातळ’ होते किंवा हार्ट अटॅक व स्ट्रोकपासून काही विशेष संरक्षण मिळते, याला कोणताही वैद्यकीय पुरावा नाही. त्यामुळे एखाद्या ठरावीक वेळी पाणी पिण्यापेक्षा दिवसभरात शरीराला आवश्यक तेवढे पाणी मिळत राहणे अधिक महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
रात्री झोपेत शरीरात काय घडते?
झोपेत असताना सलग कित्येक तास आपण पाणी पीत नाही आणि ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. बहुतांश निरोगी व्यक्तींमध्ये रात्रीच्या वेळी निर्माण होणारी सौम्य स्वरूपाची पाण्याची कमतरता हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकला कारणीभूत ठरण्याची शक्यता खूपच कमी असते. मात्र, शरीरात पाण्याची तीव्र कमतरता निर्माण झाल्यास रक्ताचे प्रमाण कमी होऊ शकते. त्यामुळे रक्ताभिसरणावर परिणाम होण्याची शक्यता अधिक असते. विशेषतः आधीपासूनच आरोग्याच्या दृष्टीने जोखमीच्या गटात असलेल्या व्यक्तींमध्ये रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका वाढू शकतो, असे डॉक्टर स्वरुप पाल यांनी सांगितले. त्यांच्या मते, रात्री झोपण्यापूर्वी प्रत्येकाने एक ग्लास पाणी प्यायलाच हवे, अन्यथा रात्रीच्या वेळी रक्त धोकादायकरीत्या घट्ट होईल, अशी चिंता करण्याचे कोणतेही कारण नाही. मुळातच शरीरात पाण्याची कमतरता होणार नाही, याची काळजी घेणे अधिक महत्त्वाचे आहे.
झोपण्यापूर्वी जास्त पाणी प्यावे का?
डॉ. स्वरुप पाल यांच्या मते, बहुतांश लोकांनी झोपण्यापूर्वी मुद्दाम मोठ्या प्रमाणात पाणी पिण्याची गरज नसते. दिवसभर शरीरात पुरेसे पाणी राहील, याची काळजी घेणे अधिक महत्त्वाचे आहे. तहान, हवामान, शारीरिक हालचाली आणि व्यक्तीच्या गरजेनुसार नियमितपणे पाणी किंवा इतर द्रवपदार्थांचे सेवन करणे, झोपण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात पाणी पिण्यापेक्षा अधिक योग्य पद्धत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. रात्री जास्त पाणी न पिण्यामागे व्यावहारिक कारणही आहे. झोपण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात पाणी प्यायल्यास रात्री वारंवार लघवीसाठी उठावे लागू शकते. त्यामुळे झोपेत व्यत्यय येऊ शकतो. झोपेचा वारंवार होणारा हा व्यत्यय स्वतःच हृदय व रक्तवाहिन्यांच्या आरोग्यावर परिणाम करू शकतो, असा इशाराही डॉ. पाल यांनी दिला.
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय जास्त पाणी टाळावे
काही विशिष्ट व्यक्तींसाठी वैद्यकीय सल्ल्याशिवाय अतिरिक्त पाणी पिणे धोकादायक ठरू शकते. हृदयाची कार्यक्षमता कमी झालेल्या किंवा मूत्रपिंडाचा आजार असलेल्या व्यक्तींना द्रवपदार्थांच्या सेवनाबाबत काही विशिष्ट मर्यादा असू शकतात. त्यामुळे अशा व्यक्तींनी स्वतःहून पाण्याचे सेवन वाढवण्याऐवजी डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करावे, असा सल्ला डॉ. स्वरुप पाल यांनी दिला. झोपण्यापूर्वी तहान लागली असेल, तर पाणी पिण्यात काहीही गैर नाही. तसेच झोपण्यापूर्वी पाणी पिण्याची सवय लावल्याने हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकपासून विशेष संरक्षण मिळते, असे कोणतेही पुरावे नाहीत. हृदय व रक्तवाहिन्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी दिवसभर शरीरात पुरेसे पाणी राखणे आणि रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, मधुमेह यांसारख्या हृदयविकाराच्या जोखीम घटकांवर नियंत्रण ठेवणे हेच सर्वाधिक गरजेचे असल्याचे डॉ. पाल यांनी स्पष्ट केले.
तरुणांमध्ये का वाढतोय हृदयविकाराचा धोका?
मागील काही वर्षांत हृदयविकाराने मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. वयोवृद्ध नागरिकच नव्हे, तर तरुणांनाही या आजारामुळे जीव गमवावा लागत आहे. तरुणांची बदलती जीवनशैली या घटनांना मोठ्या प्रमाणात जबाबदार असल्याची चिंता हृदयरोग तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तंबाखूजन्य पदार्थ आणि धूम्रपान यांमुळे धमन्यांमध्ये चरबी साचते आणि तरुणांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढतो, असे हृदयरोग तज्ज्ञ सांगतात. त्याशिवाय अपूर्ण झोप, व्यायामाचा अभाव, मोठ्या प्रमाणात चरबीयुक्त पदार्थांचे सेवन, आरोग्याकडे दुर्लक्ष यांसारख्या गोष्टी अशा विकारांना आमंत्रण देतात, अशी चिंता आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, भारतात वायुप्रदूषण जागतिक सरासरीपेक्षा तिपटीने जास्त आहे. त्यामुळे उच्च रक्तदाब आणि रक्तवाहिन्यांच्या रोगांचा धोका आणखीनच वाढत असल्याचे समोर आले आहे. यादरम्यान जीवशैलीत बदल करून खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवल्यास हृदयविकाराचा धोका टाळता येऊ शकतो, असेही तज्ज्ञांनी सांगितले आहे.
