Why Vijay Salgaonkar is considered a hero: “२ ऑक्टोबरच्या दिवशी आम्ही स्वामी चिन्मयानंद यांचं प्रवचन ऐकण्यासाठी पणजीला गेलो होतो; तिथे आम्ही पावभाजी खाल्ली, अशोक थिएटरमध्ये सिनेमा पाहिला आणि ३ ऑक्टोबरला परत आलो…” एका तरुणाच्या मृतदेहाचा नामोनिशाण मिटवणारा एक चौथी नापास केबल ऑपरेटर. २०१५ मध्ये निशिकांत कामत दिग्दर्शित ‘दृश्यम’ प्रदर्शित झाला आणि पाहता पाहता ‘दृश्यम’ भाग १ व २ या चित्रपटांनी केवळ बॉक्स ऑफिसवरच नाही, तर प्रेक्षकांच्या मनावरही कायमचं गारुड केलं आणि आता नुकताच प्रदर्शित झालेला दृश्यम ३ पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतो आहे. पण, एक मनाला हुरहुर लावणारा प्रश्न पडतो – मध्यमवर्गीय घरातला चौथी नापास केबल ऑपरेटर विजय साळगावकर प्रेक्षकांना गुन्हेगार का वाटत नाही? असं काय आहे या पात्रात की, ज्याच्याशी प्रत्येक मध्यमवर्गीय माणूस स्वतःला जोडून पाहतो?
आपल्यात दडलेला ‘हीरो’
चित्रपटकर्ते सहसा चित्रपटांतील ‘नायकाला’ देखणा, सिक्स पॅक ॲब्स असलेला व अफाट ताकदीचा दाखवतात; मात्र विजय साळगावकर यापैकी काहीच नाही. चौथी नापास अनाथ विजय साळगावकर गोव्यामध्ये मिराज केबल स्टेशन चालविणारा मध्यमवर्गीय सामान्य माणूस. नंदिनीशी त्यानं लग्न केलं आणि त्याला दोन मुली आहेत – त्याची मोठी दत्तक मुलगी अंजू आणि धाकटी पोटची मुलगी अनू. आपल्या कुटुंबावर जीवापाड प्रेम असलेला विजय साळगावकरचा एकच छंद – चित्रपट बघण्याचा! चित्रपटांचा नाद इतका की, रात्री उशिरापर्यंत सिनेमे पाहत बसतो. चित्रपटात दिसणारे ते ‘गुलाबी चष्म्यातील जग’ आपल्यासारख्या मध्यमवर्गीय माणसांना काही काळ न्यूनगंडापासून दूर ठेवते. जे आपल्याकडे नाही आणि आपण जे कधी बनू शकत नाही अशा काल्पनिक पात्रांना त्या ३२ इंची काळ्या पडद्याआड जगताना बघणं यातच त्याचा आनंद असतो.
हा विजय साळगावकर आपल्याला ओळखीचा वाटतो. आपल्या शेजारी, सोसायटीत, ऑफिसात, अनेकदा आपल्या अंतर्मनात हा विजय साळगावकर दडलेला आहे. रोज तीच उठायची वेळ, तो डेस्क, तेच काम, तीच रेल्वेची गर्दी तोच तोच अंगातून निथळणारा घाम आणि रात्री शरीर जमिनीला टेकले की, तेच अवांछित अस्वस्थ करणारे विचार. आपण पडद्यावर विजय साळगावकर पाहतो तेव्हा आपल्या नजरेत तो गुन्हेगार दिसत नाही, तर स्वतःचे प्रतिबिंब दिसते.
गुन्हा ‘ठरवून’ नाही, ‘अपघातानं’
‘दृश्यम’च्या कथानकाची सुरुवात एका अपघाताने होते. पोलीस आयुक्त मीरा देशमुखचा मुलगा – समीर देशमुख. एक सुखद आयुष्य जगणारा कुठल्याही गोष्टीची कमतरता न भासता, त्याच्या आई-वडिलांच्या श्रीमंत प्रेमात वाढलेला मुलगा. जे मागितलं ते हातात मिळालं, या सवयीमुळे कदाचित ज्या मुलीवर हात ठेवू तीसुद्धा आपलीच ही पुरुषी विषयासक्ती त्याच्यात निर्माण झाली असावी. कॉलेजच्या कॅम्पमध्ये लपून अंजूचा आक्षेपार्ह व्हिडीओ काढणे आणि नंतर त्याच व्हिडीओची भीती घालून स्वतःची वासना शमवण्याचा प्रयत्न करणे, ही सॅमची कृती त्या कुटुंबाला एका अनपेक्षित संकटात लोटते. ती घटना असहाय आणि अनपेक्षित असते. इथे प्रेक्षक स्वतःला विचारतो, “मी त्या जागी असतो / असते तर?” या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक आई-बापाला माहीत असतं; पण आपली ही भावनादेखील तो गुप्त ठेवतो. मात्र, अंजूने ती भावना आपल्या वतीने व्यक्त केली. जेव्हा अंजू त्याच्या डोक्यात त्या रॉडने मारते तेव्हा कुठेतरी आपल्यालाही सुरक्षिततेची भावना जाणवते. मुलांवर संकट आले, तर माणूस नियमांचा विचार करीत बसत नाही, तो आधी पिल्लांना कवेत घेतो. विजयचे पुढचे प्रत्येक पाऊल या आदिम पालकत्वाच्या भावनेतून पडते. म्हणूनच आपण त्याला गुन्हेगार म्हणायला कचरतो.
‘हीरो’ म्हणून जगण्याचा तो एक ‘चान्स’
विजय साळगावकरचे आयुष्य दुसऱ्यांना ‘हीरो’ बनताना बघण्यात गेले. तो रोज सिनेमे पाहतो. पडद्यावरचा हीरो जिंकतो आणि हा फक्त टाळ्या वाजवतो. खऱ्या आयुष्यात मात्र त्याची ओळख एक चौथी नापास मध्यमवर्गीय माणूस म्हणून आहे. आपल्या समाजात अशा मध्यमवर्गीय माणसाला लोक लगेच ‘अपयशी’ ठरवतात. त्याने काही चांगले करून दाखवले, तर ‘नशिबाचा खेळ’ मानतात. पण, विजय साळगावकरप्रमाणेच आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात स्वतःला सिद्ध करण्याची अशी एक ‘संधी’ चालून येते जेव्हा सगळे काही एका क्षणात आपण बदलून टाकू शकतो. एकदा तरी ‘हीरो’ म्हणून जगू शकतो. संकट येते आणि पहिल्यांदाच सगळे त्याच्या हातात असते. त्याची हुशारी, संयम आणि नियोजन यांची परीक्षा होते. समोर असते पोलिसांची आणि सत्तेची ताकद. जो माणूस आयुष्यभर कोणाच्या खिजगणतीत नव्हता, तो थेट पोलीस महानिरीक्षकाला हरवतो. ही संधी त्याने मागितली नव्हती, ती त्याच्यावर आली होती. तरी प्रेक्षकाला त्याचा विजय बघून एक वेगळे समाधान वाटते. कारण- एका सामान्य माणसाला क्षणभर का होईना ‘हीरो’ होता आले. पण मग प्रश्न उरतो : ही हिरोगिरी कोणत्या किमतीवर मिळाली?
मध्यमवर्गीय माणसाचा ‘जुगाड’
मर्यादित साधनांत मार्ग काढणं हा मध्यमवर्गाचा स्वभावच आहे. आपण सगळ्यांनी कधी ना कधी ‘जुगाड’ केलेला असतो. विजयचा जुगाड फक्त एका वेगळ्याच पातळीवर पोहोचतो. म्हणून त्याची हुशारी आपल्याला आक्रमक वाटत नाही, ती आपलीशी वाटते.
जगावं की मरावं, हा एकच सवाल आहे
मध्यमवर्गीय माणसाकडे ना पैसा ना प्रॉपर्टी; त्याच्याकडे गमावण्यासारखी फक्त एकच गोष्ट उरते – सन्मानाने जगणे. ‘दृश्यम’मधली ही लढाई दोन स्तरांमधली आहे – एका बाजूला सत्ता, पद व यंत्रणा आणि दुसरीकडे एक सामान्य केबलवाला. या असमान लढाईत प्रेक्षक आपोआप कमकुवत व्यक्तीच्या बाजूला उभा राहतो. कारण- ‘सामान्य माणसाला न्याय मिळेल का?’ ही शंका आपल्या मनात कुठेतरी असतेच आणि विजय त्या शंकेचा चेहरा बनतो.
कुटुंब हेच त्याचं जग
विजय कुठेही ऐषाराम, सत्ता किंवा बदल्याच्या भावनेने प्रेरित झालेला नाही. बायको नंदिनी, मुली अंजू व अनू यांना सुरक्षित ठेवणे हे त्याचे एकच ध्येय आहे. त्यासाठी तो रात्रभर जागतो, स्वतः सगळा भार उचलतो आणि मुलींना सांगतो, “घाबरू नका, मी आहे” आपल्यातील अनेक जण अशा आधाराच्या शोधात भटकत असतात. कितीही चुका केल्या तरी कुटुंबासाठी सगळं काही पणाला लावणारा विजय प्रेक्षकाला गुन्हेगार वाटू शकत नाही.
नाण्याची दुसरी बाजू – मीरा देशमुख
मीरा देशमुखचा मुलगा गेला आहे. तिचे दुःख खरे आहे आणि तिची न्यायाची मागणी रास्त आहे. मुलाचा मृतदेह कुठे आहे हे शेवटपर्यंत न कळणे ही एका आईसाठी किती मोठी यातना असेल…? चित्रपट आपल्याला विजयच्या बाजूने झुकवतो; पण तो मीराचे दुःख पुसून टाकत नाही. म्हणूनच ‘दृश्यम’ हा केवळ थ्रिलर न राहता, नैतिक पेचप्रसंगाचा आरसा बनतो. दोन्ही बाजूंनी पालकच तडफडत आहेत, आणि त्यापैकी एकाला कायद्याने शिक्षा करावी की दुसऱ्याच्या न्यायाची प्रतीक्षा संपवावी, हा प्रश्न प्रेक्षकाला अस्वस्थ करतो.
‘परफेक्ट मर्डर’
चित्रपटामधला ‘परफेक्ट मर्डर’चा क्षण आपल्याला आकर्षित करते. कारण- तो कल्पनेच्या पातळीवर हुशारीचा खेळ असतो; पण ‘दृश्यम’मधला खेळ वेगळा आहे. इथे विजय पुरावे लपवतो; पण त्याचबरोबर तो एक पर्यायी ‘सत्य’ तयार करतो आणि संपूर्ण कुटुंबाकडून ते पाठ करून घेतो. प्रेक्षक या प्रक्रियेचा साक्षीदार असतो. आपण त्याच्या प्रत्येक चालीसोबत श्वास रोखून बसतो. कारण- आपल्याला त्याचे यश हवेसे वाटू लागते. इथेच दिग्दर्शकाची खरी जादू आहे. कथा प्रेक्षकाला नैतिक न्यायाधीशाच्या खुर्चीतून उठवून सहप्रवाशाच्या जागी बसवते.
मराठी नावं का वापरली?
‘दृश्यम’मधली बहुतेक नावं मराठी वाटतात, याचं कारण म्हणजे चित्रपटाची गोष्ट गोव्यात घडते. विजय साळगावकर, गायतोंडे आणि देशमुख ही नावं गोवा आणि महाराष्ट्राच्या कोकण पट्ट्यात खूप सामान्य आहेत. गोव्यावर अनेक वर्षं मराठी भाषा आणि संस्कृतीचा प्रभाव राहिला आहे, त्यामुळे तिथली नावं आपल्याला ‘आपलीशी’ वाटतात. मूळ ‘दृश्यम’ मल्याळम भाषेत केरळमध्ये घडला होता. हिंदी आवृत्तीत ती गोष्ट गोव्यात नेली गेली, आणि त्याबरोबर पात्रांची नावंही तिथल्या वातावरणाला साजेशी झाली. यामुळे विजय साळगावकर हा आपल्यातलाच एक आहे असं वाटतं.
कायद्याच्या कोरड्या आणि तांत्रिक चौकटीतून पाहिले, तर पुराव्यांची विल्हेवाट लावून यंत्रणेची दिशाभूल करणारा विजय साळगावकर निःसंशयपणे एक ‘गुन्हेगार’च ठरतो. कारण – समाजात प्रत्येकाने स्वतःचा न्याय स्वतः करायला सुरुवात केली, तर व्यवस्थेचा पायाच कोसळेल, हे वास्तव नाकारता येत नाही. मात्र, मानवी मूल्यांच्या न्यायालयात जेव्हा हा खटला चालतो, तेव्हा त्याचा हा लढा कोणत्याही स्वार्थासाठी नसून, सत्ता आणि वासनेच्या विळख्यात अडकलेल्या आपल्या निष्पाप लेकीच्या सन्मान आणि कुटुंबाच्या अस्तित्वासाठी दिलेली ती एकाकी झुंज होती हे प्रकर्षाने जाणवते. या ‘परफेक्ट मर्डर’मुळे तो पोलिसांच्या तावडीतून सुटला असला तरी आयुष्यभराच्या मानसिक भयाचा एक न दिसणारा तुरुंग त्याने स्वतःच पदरात पाडून घेतला आहे. म्हणूनच विजय साळगावकर हा पडद्यावरचा कोणताही ग्लॅमरस ‘हीरो’ किंवा सराईत गुन्हेगार नसून, व्यवस्थेने हतबल केलेल्या एका सामान्य माणसाचा जिवंत आरसा आहे, जो कायद्याच्या पुस्तकात ‘आरोपी’ म्हणून नोंदवला गेला तरी मानवी सहानुभूतीच्या पानांवर आपल्या कुटुंबाची अभेद्य ढाल बनलेला एक ‘खरा रक्षक’ म्हणूनच कायम उभा राहतो.
