Expert guide on avoiding Back and Neck Pain during long distance travel and driving: दैनंदिन जीवनात ऑफिसला जाण्यासाठी किंवा फिरायला जाण्यासाठी आपण तासनतास दुचाकी किंवा चारचाकीने प्रवास करतो. मात्र, हा प्रवास संपल्यावर अनेकांना मान आखडणे किंवा कंबर दुखण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. शरीर जरी स्थिर दिसत असले, तरी ड्रायव्हिंग करताना स्नायूंवर सतत ताण येत असतो.

गाडीतून उतरल्यावर वेदना

दुचाकीवर किंवा चारचाकी मोटारीतून बराच वेळ प्रवास केल्यानंतर अनेकांना सांध्यांमध्ये स्टिफनेस जाणवतो, मान आखडल्यासारखी वाटते, किंवा वरची पाठ आणि कंबर दुखते. बहुतेकवेळा मानदुखी, कंबरदुखीचे रुग्ण आम्हाला सांगतात की, गाडी चालवताना त्रास झाला नाही, पण उतरल्यावर मान आणि कंबर जड झाली आहे, किंवा वेदना वाढल्या आहेत. हे अनुभव दुचाकी आणि चारचाकी चालवणाऱ्या व्यक्तींमध्ये सारख्याच प्रमाणात दिसतात. प्रत्येकवेळी हा त्रास फक्त ड्राइविंग सिटवर बसल्यानंतरच होईल असंही नाही, जे लोक प्रवासी म्हणून चारचाकी मोटारीमधे बसलेले आहेत किंवा दुचाकीवर मागच्या सिटवर बसले आहेत, त्यांनाही हा त्रास होऊ शकतो. यामागे काही विशिष्ट कारणे असतात.

स्थिर बसण्याचा ताण

गाडी चालवताना किंवा प्रवास करताना आपण खूप वेळ एका ठराविक स्थितीत बसलेले असतो. यावेळी शरीर जरी स्थिर दिसत असलं तरीही विशिष्ट स्नायू सतत काम करत असतात. जसं की, मानेचे स्नायू डोकं स्थिर ठेवतात, कंबरेचे स्नायू शरीराचा तोल सांभाळतात . खांदे आणि हात स्टिअरिंग किंवा हँडलवर स्थिर असतात. ही सततची कमी तीव्रतेची (low-level) अ‍ॅक्टिव्हिटी स्नायूंना थकवते. त्यामुळे प्रवासानंतर वेदना जाणवते.

How to sit properly while driving to avoid back pain | Driving health tips for long travel in Marathi | प्रवासात मान आणि कंबर दुखी टाळण्याचे उपाय | गाडी चालवताना घ्यायची काळजी आणि व्यायाम
लांबच्या प्रवासात मान-कंबर दुखी टाळण्यासाठी योग्य पोश्चर आवश्यक.

चुकीचं पोश्चर

गाडी चालवताना नकळत काही सवयी लागतात, जसं की डोकं पुढे करुन कार चालवणे (ज्याला फॉरवर्ड हेड पोश्चर असे म्हणतात). पाठ पूर्णपणे टेकलेली नसणे, कंबर वाकलेली असणे, एकाच बाजूला जास्त वजन देऊन बसणे. या सवयींमुळे मानेवर आणि कंबरेवर अतिरिक्त ताण पडतो. विशेषतः फॉरवर्ड हेड पोश्चरमुळे मानेवरचा भार वाढतो.

दोन-चाकी आणि चार-चाकी: फरक काय?

ही खूप महत्त्वाची बाब आहे. कारण दोन-चाकी (bike/scooter) आणि चार-चाकी मोटार (car) चालवताना शरीरावर पडणारा ताण वेगळा असतो. चार-चाकीमध्ये (Car) शरीराला सीटचा सपोर्ट मिळतो , कंबर आणि पाठ टेकवता येते, हालचाल कमी असते (static posture), कंपनं कमी जाणवतात (relatively) दीर्घकाळ बसून राहणं, चुकीचं सीट सेटिंग, कंबरेला सपोर्ट नसणे, मान पुढे करून ड्राइविंग करणे या प्रमुख समस्या असतात.

डायनॅमिक लोड

दुचाकी चालवताना शरीराला पूर्ण सपोर्ट मिळत नाही, कंबरेच्या आणि पोटाच्या स्नायूंना सतत काम करावं लागतं, रस्त्यावरील धक्के (jerks) थेट शरीरावर येतात, शरीर किंचित पुढे झुकलेल्या स्थितीत असते. यामध्ये तोल सांभाळून धरण्यासाठी शरीरावर येणारा सततचा ताण, रस्त्यामुळे येणारे सततची व्हायब्रेशन्स आणि शॉक्स शोषून घेणे, मान, कंबर आणि खांद्यावर येणारा सततचा भार या प्रमुख समस्या असतात.
थोडक्यात सांगायचं तर, चारचाकीमध्ये स्टॅटिक लोड जास्त असतो तर दुचाकी वर डायनॅमिक लोड जास्त असतो.

सूक्ष्म हालचालींचा अभाव

दैनंदिन क्रिया करत असताना शरीर सतत सूक्ष्म हालचाली करत असतं. पण गाडी चालवताना आणि गाडीवर किंवा गाडीत बसून प्रवास करताना हालचाली मर्यादित होतात, सांध्यांमध्ये स्टिफनेस वाढतो, विशेषतः पायांच्या स्नायूंकडे रक्तपुरवठा कमी होतो. यामुळे गाडी थांबल्यावर हालचाल करताना वेदना जाणवते. दुचाकीवर कंपन आणि धक्के जास्त जाणवतात, रस्त्यावरील प्रत्येक धक्का पाठीच्या कण्यापर्यंत पोहोचतो, कंबरेवर सतत सूक्ष्म ताण येतो , स्नायू थकतात. चार-चाकीतही कंपनं आणि धक्के जाणवतात. पण सीटमुळे त्यांचा प्रभाव काही प्रमाणात कमी होतो.

प्रवासानंतर किंवा गाडीतून उतरल्यावर वेदना का वाढते?

गाडी चालवताना शरीर एका पोश्चरला सरावतं. त्यामुळे वेदना जाणवत नाही. पण उतरल्यावर, अचानक हालचाल वाढते, स्टीफ स्नायूंवर ताण येतो त्यामुळे वेदना जाणवते.
म्हणूनच प्रवासानंतर किंवा दुसऱ्या दिवशी वेदना जास्त जाणवते.

कोणाला जास्त त्रास होतो?

  • रोज तासाभरापेक्षा जास्त वेळ ड्रायव्हिंग करणारे
  • गाडी चालवताना चुकीच्या पोश्चरमध्ये बसणारे
  • आधीपासून मानदुखी, कंबरदुखी किंवा गुढगेदुखी असणारे
  • व्यायाम कमी करणाऱ्या, किंवा स्थूल व्यक्ती
  • वेरिकोज व्हेन्सचा त्रास असणारे

काय काळजी घ्यावी?

१. सीट/ रायडिंग पोझिशन सुधारणा

•कार चालवताना किंवा कारमध्ये प्रवास करताना मानेसाठी आणि कंबरेसाठी योग्य सपोर्ट घ्या

  • बाईकवर खूप पुढे झुकू नका
  • हँडल/ स्टिअरिंग आणि खांदे यात आरामदायक अंतर ठेवा

२. ब्रेक घ्या

प्रत्येक ३० ते ४० मिनिटांनी थोडा ब्रेक घ्या,

  • सीट वरच मान, खांदे, पाय यांच्या हालचाली करा
  • शक्य असल्यास गाडीतून किंवा गाडीवरून उतरून थोडं चालून या
  • महत्त्वाच्या स्नायूंचे स्ट्रेचेस फिजिओथेरेपिस्ट कडून शिकून घ्या

३. हालचाल आवश्यक
लांब ड्राइव्हपूर्वी आणि नंतर हलकी हालचाल करा.

फिजिओथेरेपीची भूमिका

फिजिओथेरेपीमध्ये:

  • तुमचं पोश्चर आणि हालचाल यांचा अभ्यास केला जातो
  • कंबरेच्या, पोटाच्या आणि मानेच्या स्नायूंची कार्यक्षमता आणि लवचिकपणा वाढवणारे व्यायाम सांगितले जातात.
  • प्रवासातील योग्य सवयी शिकवल्या जातात
    यामुळे प्रवास सुखकर होतो, प्रवासानंतर होणाऱ्या वेदना, सांध्यांचा स्टिफनेस, पायांना सूज येणे या समस्या कमी होतात.

काळजी घ्या आणि सुखकर प्रवास करा

खूप वेळ दुचाकी किंवा चारचाकी चालवल्यानंतर सांधे आणि स्नायू आखडणं, वेदना होणे या समस्या टाळता येण्यासारख्या आहेत. प्रवासात योग्य सपोर्ट वापरणे, थोड्या थोड्या वेळाने ब्रेक घेणे, हालचाली करणे, प्रवासाव्यतिरिक्त रोजच्या आयुष्यात नियमित व्यायाम करणे आणि वजन नियंत्रणात ठेवणे हे त्यावरचे शाश्वत उपाय आहेत. प्रवास टाळणे हा त्यावरचा उपाय नाही आणि प्रत्येक व्यक्तीला लांबचा प्रवास पूर्णपणे टाळणे नेहमीच शक्य होईल असेही नाही. प्रवास कितीही लांबचा असला, तरी शरीराची काळजी घेतली, तर तो निश्चितच सुखकर होऊ शकतो.