Dry Eye Syndrome During Monsoon: हल्ली वातावरणात किती बदल झालाय ना? त्या मे महिन्याच्या रणरणत्या उन्हाने सगळ्यांचे प्रचंड हाल केले. त्या काहिलीमुळे अंगाचा दाह व्हायचा, शरीराला घाम फुटायचा आणि डोळ्यांची जळजळ व्हायची. आपल्याला वाटलं, एकदा का पावसाळा सुरू झाला की, आपोआप निसर्गात गारवा पसरेल आणि हिरव्यागार वातावरणामुळे शरीरासोबत डोळ्यांची आगही निवारली जाईल.

पण तुम्हाला पावसाळ्यातही डोळ्यांमध्ये कोरडेपणा जाणवतो आहे का? किंवा पावसाचे पाणी डोळ्यांत गेल्यावर डोळे चुरचुरतात का?

तथापि, नेत्रतज्ज्ञांच्या मते, हा एक निव्वळ गैरसमज आहे जरी दमट वातावरणामुळे काही वेळा अश्रूंचे बाष्पीभवन (tear evaporation) कमी होऊ शकत असले तरी पावसाळ्यात असे अनेक छुपे घटक असतात, जे कोरड्या डोळ्यांची (dry eye) लक्षणे अधिक गंभीर करू शकतात. हवामानातील वारंवार होणारे बदल, हवेतील ॲलर्जन्सचे (allergy निर्माण करणारे घटक) उच्च प्रमाण, घरातील एसी, प्रदूषण, धूळ आणि स्क्रीन पाहण्याच्या वेळेत झालेली वाढ, या सर्व गोष्टी डोळ्यांना निरोगी ठेवणाऱ्या नैसर्गिक अश्रूंच्या थरावर (tear film) परिणाम करू शकतात.

‘आय ड्रायनेस’ (डोळ्यांमध्ये कोरडेपणा) म्हणजे काय?

जेव्हा डोळ्यांमध्ये पुरेशा प्रमाणात अश्रू तयार होत नाहीत किंवा अश्रूंचे खूप लवकर बाष्पीभवन होते, तेव्हा ‘ड्राय आय’ हा आजार उद्भवतो. डोळ्यांमधील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी, दृष्टी स्पष्ट ठेवण्यासाठी आणि डोळ्यांचे संसर्गापासून रक्षण करण्यासाठी अश्रू अत्यंत आवश्यक असतात.
जेव्हा अश्रूंचा हा थर (tear film) अस्थिर होतो, तेव्हा लोकांना खालील लक्षणे जाणवू शकतात:

  • डोळ्यांची जळजळ किंवा ठणक लागणे
  • डोळे लाल होणे
  • खाज सुटणे
  • डोळ्यांत कचरा किंवा वाळू गेल्यासारखे वाटणे
  • डोळ्यांतून पाणी येणे
  • अंधुक दिसणे
  • डोळे थकणे
  • प्रकाशाचा त्रास होणे (Sensitivity to light)

विरोधाभास म्हणजे डोळ्यांतून अति प्रमाणात पाणी येणे हेदेखील डोळे कोरडे पडण्याचे लक्षण असू शकते, कारण- डोळ्यांची जळजळ किंवा त्रास कमी करण्यासाठी डोळे प्रतिक्षिप्त (reflex) अश्रू तयार करतात.

डॉ. अग्रवाल आय हॉस्पिटल, हुबळी येथील कन्सल्टंट ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट डॉ. श्वेता कुडतरकर यांच्या मते, ‘ड्राय आय’ (डोळे कोरडे पडणे) ही केवळ हिवाळ्यातील समस्या नाही. पावसाळ्यासह हा त्रास वर्षभरात कधीही कोणालाही होऊ शकतो. हा त्रास का होतो हे समजून घेणे आणि साधे प्रतिबंधात्मक उपाय करणे, यांमुळे तुमच्या डोळ्यांचे रक्षण होण्यास आणि डोळ्यांचा त्रास कमी होण्यास मदत होऊ शकते.

‘ड्राय आय’चा त्रास पावसात अधिक वाढतो का?

जरी पावसाळ्यात हवेतला दमटपणा वाढला असला तरी निसर्गातल्या काही घटकांमुळे डोळ्यांवर परिणाम होऊ शकतात. हे घटक कोणते ते समजून घेऊया:

हवेत दमटपणा वाढणे:

पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यादरम्यान हवामानात झपाट्याने बदल होऊ शकतात. एखादा दिवस उष्ण आणि कोरडा असू शकतो; तर दुसरा दिवस थंड आणि दमट असू शकतो. हवामानातील हे अचानक होणारे बदल अश्रूंच्या थरावर परिणाम करू शकतात, विशेषतः अशा लोकांमध्ये जे आधीच ‘ड्राय आय’ या समस्येने त्रस्त आहेत.

हवेतील ॲलर्जन्सचे वाढते प्रमाण:

पावसाळा हा बुरशी आणि धुळीतील जंतू वाढण्यासाठी पूरक वातावरण तयार करतो. हे ॲलर्जन्स डोळ्यांच्या पृष्ठभागावर जळजळ निर्माण करू शकतात आणि ‘ड्राय आय’ची लक्षणे अधिक गंभीर करू शकतात. अनेक लोक या त्रासाला केवळ हंगामी ॲलर्जी (seasonal allergy) समजण्याची चूक करतात. या त्रासामागे ‘ड्राय आय’ हा आजारदेखील कारणीभूत असू शकतो, हे त्यांच्या लक्षात येत नाही.

घरात किंवा बंद खोलीमध्ये जास्त वेळ घालवणे:

पावसाळा सुरू होण्यापूर्वी तापमान जास्त असल्याने किंवा पावसाळ्यातील दमट दिवसांमुळे अनेक जण जास्त वेळ घरात किंवा ऑफिसमध्ये एसी लावून राहतात. एसी हवेतील ओलावा कमी करतो, ज्यामुळे डोळ्यांतील अश्रूंचे वेगाने बाष्पीभवन होते. त्यामुळे बाहेरचे हवामान दमट असले तरीही डोळे कोरडे पडल्यासारखे वाटू शकतात.

प्रदूषण आणि धूळ:

मुसळधार पाऊस सुरू होण्यापूर्वी अनेक शहरांमध्ये धुळीची वादळे, बांधकामे व प्रदूषण यांचे प्रमाण जास्त असते. धुळीचे कण आणि प्रदूषक डोळ्यांमध्ये जळजळ निर्माण करू शकतात, ज्यामुळे कोरडेपणा आणि सूज अधिक वाढते.

स्क्रीन टाईम:

डॉक्टरांच्या मते, कॉम्प्युटर, स्मार्टफोन किंवा टीव्ही स्क्रीनकडे तासन् तास पाहिल्याने ‘ड्राय आय’ची लक्षणे वाढू शकतात. कारण- स्क्रीनवर लक्ष केंद्रित करताना लोक डोळ्यांची उघडझाप (blink) कमी प्रमाणात करतात.

डोळ्यांवरील ताण कमी करण्यासाठी उपाय काय?

  • जाणीवपूर्वक आणि वारंवार डोळ्यांची उघडझाप करा.
  • स्क्रीनपासून योग्य आणि सुरक्षित अंतर ठेवा.
  • डोळ्यांवर प्रकाश पडू नये (glare) यांसाठी स्क्रीनचा ब्राईटनेस योग्य ठेवा.
  • काम करताना मधे-मधे विश्रांती (breaks) घ्या.

२०-२०-२० नियम:

‘२०-२०-२० नियम’ म्हणून ओळखली जाणारी एक साधी सवयदेखील खूप फायदेशीर ठरू शकते. दर २० मिनिटांनी, किमान २० सेकंदांसाठी, सुमारे २० फूट अंतरावर असलेल्या एखाद्या गोष्टीकडे पाहा. त्यामुळे तुमच्या डोळ्यांना आराम मिळतो आणि डोळ्यांची उघडझाप होण्यास मदत होते.

या पावसाळ्यात डोळ्यांचे रक्षण करण्याचे सोपे उपाय:

डॉक्टर्स दैनंदिन जीवनातील काही साध्या सवयी सुचवतात, ज्या पावसाळ्यात ‘ड्राय आय’चा त्रास कमी करण्यास मदत करू शकतात:

  • हवामान थंड वाटत असले तरीही दिवसभरात पुरेसे पाणी प्या.
  • तुमच्या नेत्रतज्ज्ञांनी सल्ला दिला असल्यास, प्रिझर्व्हेटिव्हमुक्त ल्युब्रिकेटिंग आय ड्रॉप्स वापरा.
  • पंखा किंवा एसीची हवा थेट तुमच्या चेहऱ्यावर येणार नाही याची काळजी घ्या.
  • घरातील हवा जास्त कोरडी वाटल्यास ‘ह्युमिडिफायर’ (humidifier) वापरण्याचा विचार करा.
  • स्वच्छ पाण्याने डोळे हलकेच धुवा आणि डोळे चोळणे टाळा.
  • कॉन्टॅक्ट लेन्स व्यवस्थित स्वच्छ ठेवा आणि सुचवलेल्या वेळेपेक्षा जास्त काळ त्या घालणे टाळा.
  • डोळ्यांना त्रास होत असल्यास अनावश्यक आय-मेकअप (डोळ्यांचे सौंदर्यप्रसाधने) टाळा.
  • विशेषतः जास्त वेळ स्क्रीन वापरताना वारंवार डोळ्यांची उघडझाप करा.

काही लोकांना अतिरिक्त काळजी घेण्याची गरज असते:

काही ठरावीक गटांमध्ये ‘ड्राय आय’ आजार होण्याची शक्यता जास्त असू शकते. वृद्ध व्यक्ती, विशेषतः रजोनिवृत्तीनंतरच्या (menopause) महिलांना संप्रेरकांमधील बदल (hormonal changes) आणि वयानुसार अश्रूंची निर्मिती कमी झाल्यामुळे डोळे कोरडे पडण्याचा त्रास होऊ शकतो.
जर घरगुती काळजी घेऊनही लक्षणे कायम राहिली, तर मूळ कारण शोधण्यासाठी आणि योग्य उपचार सुरू करण्यासाठी डोळ्यांची तपासणी करून घेणे महत्त्वाचे आहे.

डोळ्यांच्या सतत होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष करू नका!

अनेक लोकांना असे वाटते की, पावसाळ्यात डोळ्यांना खाज सुटणे किंवा पाणी येणे हे केवळ ॲलर्जी किंवा बदलत्या हवामानामुळे होते. मात्र, सतत जाणवणारा कोरडेपणा, जळजळ, डोळे लाल होणे किंवा अंधुक दिसणे हे ‘ड्राय आय’ आजाराचे संकेत असू शकतात.
तज्ज्ञांच्या मते, वेळेवर निदान आणि जीवनशैलीत केलेले साधे बदल लक्षणे गंभीर होण्यापासून रोखू शकतात आणि दीर्घकालीन डोळ्यांचे आरोग्य राखण्यास मदत करतात. पावसाळा उकाड्यापासून दिलासा देत असला तरी तो तुमच्या डोळ्यांना नेहमीच दिलासा देईल, असे नाही. या संपूर्ण ऋतूत डोळ्यांच्या काळजीकडे थोडे लक्ष दिल्यास तुमची दृष्टी आरामदायी आणि उत्तम राहण्यास मोठी मदत होऊ शकते.