मोहन अटाळकर

जून महिन्‍यात आणि ऑगस्‍टच्‍या दुसऱ्या आठवड्यात झालेल्‍या अतिवृष्‍टीमुळे संपूर्ण विदर्भात खरीप हंगामाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जुलैतच सुमारे १० लाख हेक्‍टरमधील शेतपिकांची हानी झाल्‍याची सरकारी आकडेवारी समोर आली. आता नव्‍याने झालेल्‍या नुकसानीचे पंचनामे सुरू करण्‍यात आले आहेत. नुकसानीचे क्षेत्र वाढणार आहे. लागवडीचा वाढलेला खर्च, मशागतीसाठी मनुष्‍यबळाचा अभाव, बाजारात शेतमालांच्‍या दराची अस्थिरता अशा विचित्र चक्रात सापडलेले शेतकरी या अतिवृष्‍टीच्‍या संकटाचा सामना करताना हतबल झाले आहेत. नुकसान झालेल्‍या क्षेत्रात आता दुबार पेरणी करणेही शक्‍य नाही, कारण बहुतांश पिकांचा पेरणीचा कालावधी निघून गेला आहे.

विदर्भात अतिवृष्‍टीमुळे नेमके किती नुकसान झाले आहे?

संपूर्ण विदर्भात जुलै महिन्‍यात झालेल्‍या अतिवृष्‍टी, पुरामुळे ९ लाख ९५ हजार हेक्‍टर क्षेत्रातील शेतपिकांचे नुकसान झाले आहे. त्‍यात अमरावती विभागातील ५ लाख १८ हजार तर नागपूर विभागातील ४ लाख ७७ हजार हेक्‍टर क्षेत्राचा समावेश आहे. नुकसान झालेली बहुतांश शेतजमीन कोरडवाहू आहे. कापूस आणि सोयाबीन पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. नागपूर विभागात सरासरी लागवडीखालील १९.२६ लाख हेक्‍टर क्षेत्रापैकी १६.५० लाख हेक्‍टर (८५ टक्‍के) तर अमरावती विभागात सरासरी ३२.२४ लाख हेक्‍टरपैकी ३१ लाख हेक्‍टरमध्‍ये (९६ टक्‍के) पेरणी आटोपली होती. त्‍यापैकी १५ लाख हेक्‍टरहून अधिक क्षेत्र बाधित झाल्‍याचा अंदाज आहे.

नुकसानभरपाई कशी आणि केव्‍हा मिळणार ?

अतिवृष्‍टीसारख्या नैसर्गिक आपत्तींच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारच्या नियमांनुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून मदत पुरवण्याची उपाययोजना केली जाते. गंभीर स्वरूपाच्या आपत्तीच्या वेळी निर्धारित प्रक्रियेनुसार, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीमधून अतिरिक्त आर्थिक सहाय्य प्रदान केले जाते, ज्याचे मूल्यांकन आंतर-मंत्रालयीन केंद्रीय पथकाच्या भेटीच्या आधारे केले जाते. शेतपिकांचे ३३ टक्‍क्‍यांहून अधिक नुकसान झाल्‍यास ‘एसडीआरएफ’च्‍या निकषावर कोरडवाहून शेतीसाठी केवळ ८ हजार ८०० रुपये प्रतिहेक्‍टर, बागायती शेतीसाठी १३ हजार २०० रुपये, तर फळबागांसाठी १८ हजार रुपये हेक्‍टरी मदत मिळू शकते. ही मदत अत्‍यंत तोकडी असल्‍याचा आक्षेप घेतला जातो. नुकसान भरपाई केव्‍हा मिळणार, हे अजूनही स्‍पष्‍ट झालेले नाही. कारण अजून नुकसानीचे पंचनामेच पूर्ण झालेले नाहीत.

विदर्भातील खरीप हंगाम कसा आहे?

यंदा पाऊस उशिरा सुरू झाल्‍याचा परिणाम म्‍हणून विदर्भात कडधान्‍याचा पेरा कमी झाला आहे. पश्चिम विदर्भात पावसाची सुरुवातीला तूट असल्‍याने ६० दिवसांचे पीक असणाऱ्या मूग व उडिदाच्‍या पेरणी क्षेत्रात घट झाली. सोयाबीनला चांगला दर असल्‍याचा परिणाम म्‍हणून पेरणीचा टक्‍का वाढला. सोयाबीनपाठोपाठ सर्वाधिक लागवडीचे क्षेत्र हे कपाशीचे आहे. या दोन पिकांचे त्‍यामुळे सर्वाधिक नुकसान झाले आहे. संततधार पावसामुळे पूर्व विदर्भात भाताची लावणीदेखील लांबली. अतिपावसामुळे सोयाबीन पिवळे पडण्‍याचा तर कपाशीची रोपे सडण्‍याचा धोका आहे. तूर पिकालाही या पावसाचा फटका बसणार आहे.

अतिपावसाचे काय दुष्‍परिणाम दिसून आले आहेत?

जून महिन्‍यात लांबलेल्‍या पावसाने जुलै महिन्‍याच्‍या पहिल्‍या आठवड्यात हजेरी लावली. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यानंतरही पाऊस चालूच आहे. नद्या, नाल्‍यांना पूर, शेतांमध्‍ये जागोजाग साचलेले पाणी दिसून येत आहे. शेती, मृदा, पिके, पशुधन यांचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. विदर्भात आलेल्‍या पूर परिस्थितीला निसर्गाचे कारण आहे, असे दिसत असले, तरी स्‍थानिक पातळीवर जलसंधारण, मृद्संधारणाची कामे न होणे, कामांमध्‍ये शास्‍त्रीय पद्धतीचा अभाव, हितसंबंध, शासकीय योजनांची अंमलबजावणी करताना झालेल्‍या चुका अशा इतरही बाबी कारणीभूत असल्‍याचे शेती-पाणी अभ्‍यासकांचे मत आहे. अनेक भागांमध्‍ये नालाबांध, सीसीटी, बांधबंदिस्‍तीची सहज शक्‍य होणारी कामेही झाली नाहीत, त्‍याचे दुष्‍परिणाम आता जाणवू लागले आहेत.

विदर्भातील शेतकऱ्यांसमोर कोणती संकटे आहेत?

शेतीसाठी लागणारा उत्पादन खर्च व त्यातून मिळणारे उत्पन्न याचा सर्वसामान्य शेतकऱ्यांना अद्यापही ताळमेळ लागत नाही. त्यातच वाढती महागाई, शेतमजुरांची कमतरता, कुटुंबांचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण व मुलींच्या लग्नासाठी करावा लागणारा खर्च आदी कारणांमुळे शेतकरी आयुष्यभर कर्जाच्या विळख्यात सापडलेला असतो. तरीही आज ना उद्या आपल्या डोक्यावरील कर्जाचा बोजा कमी होईल, या आशेवर शेतात रात्रंदिवस राबत असतो. आता अतिवृष्‍टीने पिके वाहून गेली आहेत. उदरनिर्वाहाची सोय करण्‍यासाठी शेतकऱ्यांसमोर सावकारांकडे जाण्‍यावाचून पर्याय नसल्‍याचे शेतीतज्‍ज्ञांचे म्‍हणणे आहे. जानेवारी ते जून या सहा महिन्‍यांमध्‍ये सर्वाधिक ५४८ आत्‍महत्‍या या अमरावती विभागात झाल्‍या आहेत. नागपूर विभागात २५६ शेतकरी आत्‍महत्‍यांची नोंद आहे. शेतकरी आत्‍महत्‍यांमध्‍ये वाढ होण्‍याचा धोका आहे.

mohan.atalkar@expressindia.com