-सागर नरेकर

ठाणे जिल्ह्यातील जवळपास सर्वच शहरांचा कचराप्रश्न गुंतागुंतीचा झालेला दिसतो आहे. कोणताही कचरा प्रक्रिया प्रकल्प यशस्वीपणे कार्यान्वित झालेला दिसत नाही. परिणामी शहरातील कचराभूमी डोंगराप्रमाणे वाढत आहे. त्याविरुद्ध नागरिक न्यायालयात धाव घेत आहेत. एकंदरीत कचरा भूमी किंवा डम्पिंग ग्रांउड प्रश्न उग्र बनलेला आहे.

sushma andhare
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून ठाणे जिल्ह्यात गुन्हेगारी वाढली; सुषमा अंधारे
Unseasonal rain in some parts of Nashik district
नाशिक जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही पाऊस, गारपीट
Farmers aggressive
गडचिरोली : ‘एमआयडीसी’ भूसंपादनप्रकरणी शेतकरी आक्रमक; जमीन मोजणीसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना परत पाठवले
Unseasonal rain Washim
वाशिममध्ये अवकाळी पाऊस, गारपीट; हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने बळीराजा हवालदिल

जिल्ह्यात कुठे-कुठे कचराप्रश्न गंभीर बनला आहे?

ठाणे महापालिकेने भंडार्ली येथे कचरा टाकण्यासाठी नव्याने हालचाली सुरू केल्या आहेत. येथील स्थानिकांचा या गोष्टीला विरोध आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेतही अशीच काहीशी परिस्थिती आहे. उंबर्डेची कचराभूमी पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास वारंवार विरोध होतो आहे. बारावे येथेही कचरा  प्रक्रिया प्रकल्पाला स्थानिक नागरिक विरोध करतात. उल्हासनगर महापालिकेचा कचराभूमीचा प्रश्नही गंभीर झाला आहे. ज्या जागा कचराभूमीसाठी मिळाल्या त्या जागेवर जाऊन फक्त कचरा टाकणे एवढेच काम उल्हासनगर महापालिकेने केले आहे. त्यामुळे आधी खेमाणी आणि आता गायकवाड पाडा येथील कचराभूमी कचऱ्याने भरून वाहते आहे. अंबरनाथ या अ वर्ग नगरपालिकेचाही कचरा प्रश्न गंभीर बनला आहे. अंबरनाथ आणि बदलापूर दोन्ही शहरांचा संयुक्त घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प करण्याचे सूतोवाच स्थानिक लोकप्रतिनिधींनी केले खरे. मात्र त्याला अजूनही यश येताना दिसत नाही. त्यामुळे चिखलोली भागातील घरांना खेटून असलेली नियमबाह्य कचराभूमी नागरिकांना त्रासदायक ठरते आहे. आता बदलापुरातील नागरिकांनी विनाप्रक्रिया अंबरनाथ शहराचा कचरा कचराभूमीवर टाकण्यास विरोध केला आहे.

कचरा प्रश्न गंभीर होण्याची कारणे काय आहेत?

पालिकांची कचरा व्यवस्थापनाची आतापर्यंतची अकार्यक्षमता, सातत्याचा अभाव आणि ढिसाळ नियोजन ही प्रमुख कारणे कचरा प्रश्न गंभीर होण्यामागे आहेत. कोणत्याही पालिकेने आतापर्यंत एकही कचरा प्रक्रिया प्रकल्प यशस्वीपणे चालवला नाही. कचरा उचलणे आणि कचराभूमीवर नेऊन टाकणे हा एवढाच नित्यक्रम पालिकांचा असतो. पालिकांच्या या कचऱ्याबाबतच्या बेजबाबदारपणामुळे दुर्गंधी, डास आणि अनेक समस्या वाढल्या आहेत. परिणामी स्थानिक नागरिक कचरा प्रक्रियेसाठी जागा देण्यास नकार देतात. पालिका अनेकदा वेळकाढूपणा करते. 

कचराभूमीमुळे आता काय परिणाम होत आहेत?

अंबरनाथ नगरपालिकेच्या कचराभूमीतून निघणाऱ्या सांडपाण्यामुळे पावसाळ्यात या कचराभूमीतून निघणारे दुर्गंधीयुक्त पाणी, हिवाळ्यात पसरणारी दुर्गंधी आणि उन्हाळ्यात कचराभूमीला लागणारी आग यामुळे आसपासच्या नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. उल्हासनगर शहराच्या कचराभूमीचा असाच प्रश्न निर्माण झाला आहे. पालिकेने बेकायदा पद्धतीने ही कचराभूमी सुरू केल्याचा आरोप करत नागरिक राष्ट्रीय हरित लवादात गेले आहेत. उसाटणे येथील जागा पालिकेला मिळाली असली तरी तिचा वापर करण्यास पालिकेकडून दिरंगाई होते आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या कचराभूमीमुळे आसपासच्या भागातील शेती नापीक झाली आहे. दिवा येथील कचराभूमी अनेकदा धुमसत असते.

भविष्यात ठाणे जिल्हा ‘कचराभूमी जिल्हा’ का बनl आहे?

ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक शहर कचराभूमीच्या प्रश्नांनी त्रस्त आहे. त्यात आता ठाणे जिल्ह्यातील विविध तालुक्यात इतर शहरांच्या कचराभूमी सुरू केल्या जाणार आहेत. येथील अंबरनाथ तालुक्यातील करवले येथे मुंबई महापालिका सुमारे १०० एकरवर आपली नवी कचराभूमी सुरू करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी त्यांना शासकीय जागा उपलब्ध झाली असून खासगी जागा संपादित केली जाते आहे. कचरा प्रक्रिया प्रकल्प येथे उभारला जाईल. ठाण्याचा कचरा भंडार्ली येथे आणला जाणार आहे. उसाटने येथील जागा उल्हासनगर पालिकेच्या कचराभूमीसाठी देण्याचा निर्णय यापूर्वीच झाला आहे.

मग पर्याय काय?

कचराभूमी बंद करण्याची मागणी होत असतानाच ही मागणी पूर्णपणे मान्य होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे कचराभूमी बंद करण्याऐवजी कचऱ्यावर प्रक्रिया करणे गरजेचे आहे. सर्वच शहरांत कचराभूमी फक्त कचरा टाकण्यासाठी वापरता कामा नये. कचऱ्यावर जागच्या जागी विल्हेवाट लावण्याची आवश्यकता असताना तसे होताना दिसत नाही. त्यावर लक्ष देण्याची गरज आहे. संयुक्त कचरा प्रक्रिया प्रकल्प वेळेत मार्गी लावण्याची गरज आहे.