E Coli Found in Raiway Station Water : ट्रेनची वाट पाहताना प्लॅटफॉर्मवरील वॉटर कूलरमधून पाणी पिणं ही अनेक प्रवाशांची रोजची सवय आहे. प्रवासात तहान लागली की स्थानकावरचं पाणी सहज उपलब्ध होतं आणि त्यावर फारसा विचारही केला जात नाही. मात्र, याच पाण्याच्या सुरक्षिततेबाबत आता प्रश्न निर्माण झाला आहे.

रेल्वेस्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्याच्या नमुन्यांमध्ये ई. कोलाय (E. coli) आढळल्याचे कॅगच्या CAG अहवालातून समोर आले आहे. देशभरातील आठ रेल्वेस्थानकांवरील नमुन्यांमध्ये हा जीवाणू आढळला. प्रवाशांच्या सुविधा आणि स्थानकांवरील स्वच्छतेबाबत कॅगने केलेल्या ताज्या पाहणीत ही बाब समोर आली आहे.

कॅगने वेगवेगळ्या वर्षांत केलेल्या तपासणीत काही रेल्वेस्थानकांवरील पाण्याच्या नमुन्यांमध्ये ई. कोलायसह एकूण कोलिफॉर्म बॅक्टेरिया आढळल्याचेही नमूद केले आहे. मात्र, याचा अर्थ स्थानकावरील पाणी पिणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला आजार होईल असा नाही. पाण्यात ई. कोलाय आढळणं हा मात्र धोक्याचा इशारा मानला जातो. पाण्यात ई. कोलाय आढळल्याने ते मलमूत्रामुळे दूषित होण्याचे संकेत मिळू शकतात, त्यामुळे आजार निर्माण करणारे जीवाणू पाण्याच्या माध्यमातून शरीरात जाण्याचा धोका असतो. फोर्टिस हॉस्पिटल, ओखला येथील इंटरनल मेडिसिन विभागाचे अतिरिक्त संचालक डॉ. संजय वर्मा सांगतात की, पाण्यातून होणारे बहुतांश संसर्ग योग्य उपचार आणि काळजी घेतल्यास बरे होतात. मात्र, शौचातून रक्त जाणे, पोटात तीव्र दुखणे, सतत उलट्या होणे, शरीरात पाणी कमी होणे किंवा लघवीचे प्रमाण कमी होणे यांसारखी लक्षणे दिसली तर त्याकडे दुर्लक्ष करू नये, असा इशारा डॉ. वर्मा यांनी दिला आहे.

ई. कोलाय म्हणजे काय? पिण्याच्या पाण्यात आढळल्यास चिंतेची बाब?

ई. कोलाय हा जीवाणू सामान्यतः माणसांच्या आणि प्राण्यांच्या आतड्यांमध्ये आढळतो. त्याचे अनेक प्रकार आतड्यांमध्ये नैसर्गिकरीत्या अस्तित्वात असतात, ते शरीरासाठी हानिकारक असतातच असे नाही. मात्र, ई. कोलायच्या काही प्रकारांमुळे आजार होऊ शकतात. आजार निर्माण करणारे प्रकार अन्न किंवा पिण्याच्या पाण्यात आढळले तर ते चिंतेचे कारण ठरते. विष्ठेच्या कणांमुळे दूषित झालेल्या पाण्यात ई कोलाय प्रवेश करतात, त्यामुळे असं पाणी पिण्यासाठी सुरक्षित आहे का याबाबत प्रश्न निर्माण होतो. अशावेळी पाणी नेमकं कसं दूषित झालं आणि तो स्रोत कसा थांबवता येईल हे शोधणं महत्त्वाचं ठरतं.

ई. कोलायचा संसर्ग झालाय हे कसं ओळखाल?

ई. कोलायचा संसर्ग झालाय हे ओळखण्याचे एक ठराविक लक्षण नाही. सुरुवातीला हा त्रास इतर पोटाच्या संसर्गासारखाच वाटू शकतो. जुलाब, पोटात कळा येणे, मळमळ आणि कधी कधी उलट्या अशी लक्षणं दिसू शकतात. काही वेळा जुलाब पाण्यासारखे होतात, तर काही प्रकारच्या ई. कोलाय संसर्गात रक्तमिश्रित जुलाब आणि तीव्र पोटदुखी होऊ शकते.

विशेषतः शौचातून रक्त जाणं हे गंभीर लक्षण आहे. ई. कोलायच्या काही प्रकारांमुळे शरीरातील लहान रक्तवाहिन्यांचं नुकसान होऊ शकतं. परिणामी लाल रक्तपेशी आणि किडनीच्या कार्यात अडथळा निर्माण होऊ शकतो, म्हणून ई. कोलायचा संसर्ग म्हणजे केवळ नेहमीचे जुलाब समजून दुर्लक्ष करू नये. रक्तमिश्रित जुलाबानंतर अशक्तपणा वाढणे, चेहरा फिकट पडणे, शरीरावर सूज येणे किंवा लघवीचे प्रमाण कमी होणे अशी लक्षणं दिसली तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.

ई. कोलायचा संसर्ग आतड्यांमधून किडनीपर्यंत कसा पोहोचतो?

ई. कोलायचा आजार निर्माण करणारा प्रकार सर्वप्रथम आतड्यांवर परिणाम करतो. हा जीवाणू आतड्यांच्या पेशींना चिकटतो, विषारी घटक तयार करतो आणि आतड्यांमध्ये सूज निर्माण करतो; त्यामुळे जुलाब, पोटदुखी आणि इतर त्रास सुरू होतात.

यानंतर काही प्रकारच्या ई. कोलायमधून तयार होणारे शिगा टॉक्सिन रक्तात मिसळू शकते. हे विष शरीरातील वेगवेगळ्या अवयवांमधील छोट्या रक्तवाहिन्यांवर परिणाम करू शकते आणि किडनीला त्याचा विशेष धोका असतो.

या रक्तवाहिन्यांना नुकसान झाल्याने लाल रक्तपेशींचा नाश होऊ शकतो आणि किडनीची रक्त गाळण्याची क्षमता कमी होऊ शकते, त्यामुळे जुलाबानंतर विशेषतः रक्तमिश्रित जुलाब झाल्यानंतर लघवीचे प्रमाण कमी होणे हे धोक्याचं लक्षण मानलं जातं.

स्थानकावरचं पाणी प्यायल्यानंतर जुलाब झाले म्हणजे संसर्ग झाला का?

नाही, लगेच असा निष्कर्ष काढता येत नाही. पाणी प्यायल्यानंतर जुलाब सुरू झाले म्हणजे त्याचं कारण ई. कोलाय आहे असं ठामपणे सांगता येत नाही. जुलाब होण्यामागे अनेक प्रकारचे जीवाणू, विषाणू आणि परजीवी कारणीभूत असू शकतात, त्यांची लक्षणेही अनेकदा सारखीच असतात.

ज्या पाण्यात ई. कोलाय आढळला आहे, ते पाणी प्यायलं असेल तरी आजारी पडण्याचं कारण तेच पाणी आहे असं सिद्ध होत नाही. मात्र, जुलाब खूप तीव्र असतील, बराच काळ सुरू राहिले किंवा शौचातून रक्त जात असेल तर आवश्यक असल्यास डॉक्टर लॅब टेस्ट करण्याचा सल्ला देऊ शकतात.

ई कोलायचे निदान कसे होते?

सर्वप्रथम डॉक्टर लक्षणं आणि रुग्णाची स्थिती तपासतात. जुलाब तीव्र असतील, बराच काळ सुरू असतील किंवा शौचातून रक्त जात असेल तर डॉक्टर शौचाची तपासणी (स्टूल टेस्ट) करण्याचा सल्ला देऊ शकतात. या तपासणीत ई. कोलायचा संसर्ग आहे की नाही हे शोधण्यासाठी स्टूल कल्चर किंवा आण्विक चाचण्या केल्या जाऊ शकतात. ई. कोलायमधून तयार होणारे शिगा टॉक्सिन किंवा ते तयार करणारी जनुके तपासणंही महत्त्वाचं असतं.

गरजेनुसार डॉक्टर रक्ताचीही तपासणी करू शकतात. यात हिमोग्लोबिन आणि रक्तपेशींची संख्या, शरीरातील क्षारांचं प्रमाण, शरीरात पाणी किती आहे आणि किडनीचं कार्य कसं सुरू आहे, याची तपासणी केली जाते. या चाचण्यांमुळे रक्ताची कमतरता किंवा किडनीला झालेली अचानक इजा यांसारख्या गुंतागुंती ओळखण्यास मदत होते.

ई. कोलायचा संसर्ग झाल्यास प्रत्येकाला अँटीबायोटिक्स घ्यावी लागतात?

नाही. ई. कोलायचा कोणता प्रकार आहे आणि रुग्णाची प्रकृती कशी आहे, यावर उपचाराची दिशा ठरते. विशेषतः शिगा टॉक्सिन तयार करणाऱ्या ई. कोलायचा संशय असल्यास अँटीबायोटिक्स देणं सामान्यतः टाळलं जातं. काही परिस्थितींमध्ये अँटीबायोटिक्समुळे किडनीला नुकसान होण्याचा धोका वाढू शकतो.

मात्र, याचा अर्थ ई. कोलायच्या कोणत्याही संसर्गात अँटीबायोटिक्स वापरली जात नाहीत असा नाही. ई. कोलायच्या वेगवेगळ्या प्रकारच्या संसर्गांमध्ये उपचारही वेगवेगळे असू शकतात, त्यामुळे जुलाब किंवा इतर लक्षणं दिसली म्हणून स्वतःहून अँटीबायोटिक्स घेऊ नयेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषध घेणं फायदेशीर ठरतं.

जुलाब थांबवणारी औषधं घेणं योग्य आहे का?

जुलाब थांबवणारी औषधं डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नयेत. ई. कोलायचा संसर्ग असल्यास जुलाब लगेच थांबवणं हाच उपचाराचा उद्देश नसतो. अशावेळी शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये याकडे सर्वात आधी लक्ष देणं महत्त्वाचं आहे.

गोळ्यांऐवजी सलाईन किंवा इंजेक्शन कधी लागते?

एखाद्या व्यक्तीला इंजेक्शन किंवा शिरेवाटे औषध देण्याची गरज आहे की नाही हे ठरवण्यासाठी कोणतीही एकच ई. कोलाय चाचणी नाही. रुग्णाची प्रकृती आणि शरीरात पाण्याची कमतरता किती आहे यावर उपचार ठरतात. पाणी किंवा इतर द्रवपदार्थ पुरेशा प्रमाणात घेता येत नसतील किंवा शरीरात मोठ्या प्रमाणात पाणी कमी झालं असेल तर सलाईनद्वारे द्रव द्यावा लागू शकतो. प्रकृती गंभीर असल्यास रुग्णाला रुग्णालयात दाखल करून निरीक्षणाखाली ठेवण्याची आणि त्यानुसार पुढील उपचार करण्याची गरज भासू शकते.

संसर्ग कमी होत असतानाही जुलाब का सुरू राहू शकतात?

ई. कोलायचा संसर्ग कमी होण्याची प्रक्रिया आणि आतड्यांची पूर्णपणे पूर्ववत होण्याची प्रक्रिया एकाच वेळी होत नाही. साधारणपणे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती काही दिवसांत जीवाणूंचा सामना करते आणि संसर्ग कमी होऊ लागतो.

मात्र, संसर्ग कमी झाल्यानंतरही आतड्यांच्या आतील आवरणाला आलेली सूज काही काळ राहू शकते, त्यामुळे जुलाब, पोटदुखी किंवा शौचाच्या सवयींमधील बदल काही दिवस सुरू राहू शकतात.