ऑफिसमधला ताण, आजूबाजूला ट्रॅफिकची कटकट, अपुरी झोप, तासन् तास स्क्रीनकडे पाहणे या गोष्टींमुळे रोजची डोकेदुखी आपल्या जगण्याचा भाग झाली आहे. डोकं दुखायला लागलं की, आपण काय करतो? सरळ एखादी पेनकिलर घेतो आणि आपल्या कामाला लागतो. पण कधी विचार केलाय का की, ज्या त्रासाकडे आपण रोजची डोकेदुखी समजून दुर्लक्ष करतो आहोत, ती मेंदूच्या एका मोठ्या आजाराची चाहूल असू शकते? 

हे वाचून घाबरून जाऊ नका; पण सावध मात्र नक्की व्हा! मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट हॉस्पिटल्सचे कन्सल्टंट ब्रेन अँड स्पाईन सर्जन, डॉ. केवल शुक्ला यांनी साधी डोकेदुखी आणि ‘ब्रेन ट्यूमर’ची डोकेदुखी यांतील फरक ओळखण्याच्या काही अत्यंत सोप्या पण महत्त्वाच्या ‘रेड फ्लॅग्स’ (धोक्याच्या घंटा) सांगितल्या आहेत. हे रेड फ्लॅग्स कोणते आहेत ते पुढे जाणून घेऊया…

सगळ्यात मोठा गैरसमज : डोकं दुखतंय म्हणजे मला ट्युमर तर नाही ना?

“९९% प्रकरणांमध्ये नेहमी जे डोकं दुखतं, ते आपल्या नेहमीच्या कारणांमुळे. चिंतेची बाब तेव्हा असते जेव्हा हा डोकेदुखी ‘पॅटर्न’ अचानक बदलतो” असे डॉ. केवल यांनी म्हटले आहे. 

त्यामुळे जर रोज कामावरून आल्यावर डोकं जड वाटत असेल, तर तो निव्वळ थकवा आहे; ट्युमर नाही! 

पण मग ट्युमरची डोकेदुखी ओळखायची कशी?

डोकेदुखीच्या या पाच लक्षणांकडे कधीही दुर्लक्ष करू नका:

  • तुम्ही नेहमी घेणाऱ्या डोकेदुखीच्या गोळ्यांनी किंवा बाम लावल्यानेही जर डोकेदुखी थांबत नसेल आणि तिची तीव्रता दिवसागणिक भयंकर वाढत असेल, तर तातडीने डॉक्टरांकडे जा.
  • रात्री अचानक डोक्यात कळा चालू होतात आणि झोपमोड होते का? साधी डोकेदुखी अवेळी सुरू होत नाही; मात्र जेव्हा अचानक डोकेदुखी सुरू होते तेव्हा मेंदू आपल्याला काहीतरी संकेत देत असतो. 
  • सकाळी उठल्यावर भयंकर तीव्रतेने डोकं दुखायला लागणं.
  • ऐकू न येणं, शरिराला बधिरपणा येणं, अचानक मेंदूला किंवा इतर अवयवांना मुंग्या आल्यासारखं वाटणं.
  • डोकेदुखीसोबत मळमळणं, उलट्या होणं, डोळ्यांपुढे सतत अंधारी येणं किंवा अंधुक दिसणं, हाता-पायांतला जोर जाणं, असा एकत्रित त्रास होतो जेव्हा मज्जासंस्थेवर ताण येतो. 

ब्रेन ट्यूमरचे सायलेंट किलर्स:

डोकेदुखी हे ब्रेन ट्यूमरचे सामान्य लक्षण असले तरी त्यापलीकडे असे काही संकेत आपल्याला मिळत असतात, ज्याचा दूर दूरपर्यंत संबंध आपण या आजाराशी लावणार नाही. ती कोणती लक्षणे हे आपण पुढे पाहूयात :

  • अंधुक दिसतंय म्हणून तुम्ही डोळे तपासायला गेलात; मात्र डोळ्यांना चष्मा नाही किंवा चष्मा असला तरी नंबर वाढलेला नसतो. दुहेरी प्रतिमा दिसत आहेत किंवा डोळ्यांसमोर अंधारी आल्यासारखं वाटतं; असं जर होत असेल, तर याचं एक कारण म्हणजे मेंदू आपल्या डोळ्यांच्या नसांवर परिणाम करायला लागला आहे. 
  • काल काय जेवलात आठवत नाही? प्रत्येक वेळी वाढत्या वयाला किंवा इतर व्यापांमुळे विसरायला होतं, अशी समजूत वारंवार स्वतःहून करून घेऊ नका. जर हा तुमचा विसराळूपणा सातत्याने वाढत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. मेंदूमधल्या गाठीचा आकार वाढत असतो तेव्हा इतर मेंदूतल्या अवयवांवर दाब पडतो ज्यामुळे मेंदूची कार्यक्षमता मंदावते. 
  • तुमच्या स्वभावात अनेक बदल होतात. संयमी व्यक्ती अचानक भडकते, छोट्या छोट्या गोष्टींवर चिडचिड होत राहते. अनेकदा हे बदल आपल्याला जाणवत नाहीत; पण हे बदल आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या लक्षात येत असतात.
  • कुठलीही शारीरिक हालचाल करताना तोल जाणे किंवा काही काम करीत असताना अचानक हातांतला जोर जातो, शरीराला बधिरपणा येतो, अचानक शरीराच्या कुठल्या तरी भागाला मुंग्या येणं. 
  • अनेकदा ऐकू येत नाही किंवा चेहरा सुन्न पडल्यासारखा वाटतो, शरीरात गुदगुल्या झाल्यासारख्या वाटतात. पण, अशी लक्षणे असतील, तर ब्रेन ट्युमर आहेच, असा समज करून घेऊ नका; पण जर वरील कोणतीही लक्षणे वारंवार जाणवत असतील, तर मात्र वैद्यकीय मार्गदर्शन जरूर घ्या.

इतकी सारी लक्षणे! पण मग डॉक्टरांना कधी गाठायचे?

डॉ. शुक्लांनी यावर एक सोपा मार्ग दिला आहे, ते म्हणतात ‘पॅटर्न ओळख’. त्यांच्या मते जर तुम्हाला सलग एक आठवडा डोकेदुखीचा त्रास होत असेल आणि काहीही उपाय करूनही तो थांबत नसेल, डोकेदुखी  थांबली आणि पुन्हा डोके ठणकायला लागले आणि नेहमीपेक्षा वेगळ्या प्रकारे दुखायला लागले, तर तातडीने न्यूरॉलॉजिस्टकडे जा. मात्र, या सगळ्यामध्ये इंटरनेटवर लक्षणं नोंदवून ‘डॉ. यंत्रा’ला विचारून डोकेदुखीवर निदान करायला जाऊ नका. त्याचे विपरीत परिणाम भोगावे लागू शकतात.

ब्रेन ट्यूमर का होतो याचे १००% उत्तर अद्याप विज्ञानाकडेही नाही आहे; पण आपल्या हातात असलेल्या  नक्कीच करता येतील अशा गोष्टी खालीलप्रमाणे : 

  • तंबाखू आणि सिगारेट कायमची बंद करा. 
  • रेडिएशनपासून लांब राहा.
  • शारीरिक हालचाल होणं फार गरजेचं असतं. त्यामुळे शरीराला व्यायाम किंवा चालण्याची सवय लावा.
  • सतत अरबटचरबट खाणे बरोबर नाही. शरीराला लागणारे पोषक घटक रोज जेवणाच्या माध्यमातून शरीरात जातील यासाठी दक्ष राहा. 
  • गरजेचे आहे त्यामुळे आहार चांगला करा. 
  • मेंदूला झेपेल तितकाच ताण द्या. जास्त ताण आला, तर त्याला शांत व्हायलाही तेवढाच वेळ द्या. त्यामुळे ताण आणि झोप यांचं संतुलन बिघडता कामा नये.

डोकेदुखी ही आपल्या धावपळीच्या जीवनातील एक सामान्य बाब असली तरी ती नेहमीच ‘साधी’ नसते. तुमचे शरीर तुम्हाला नेहमी काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते; फक्त आपण त्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे चुकीचे आहे. पेनकिलरच्या तात्पुरत्या आरामावर अवलंबून न राहता, डोकेदुखीच्या बदलत्या पॅटर्नकडे आणि इतर असामान्य लक्षणांकडे वेळीच लक्ष द्या. कोणताही त्रास अंगावर काढण्यापेक्षा किंवा गूगलवर आजारावरील उपाय शोधण्यापेक्षा तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे कधीही शहाणपणाचे ठरते. कारण- वेळेवर केलेले अचूक निदान आणि योग्य उपचार हेच कोणत्याही गंभीर आजारावर मात करण्यासाठी सर्वांत प्रभावी अस्त्र आहे. स्वतःच्या आरोग्याशी तडजोड करू नका, सतर्क राहा आणि स्वास्थ्यकर जीवन जगा!