भारताच्या उत्तर व पश्चिमेकडील भागांत यावर्षी फेब्रुवारी महिन्यातच उष्णतेत वाढ झाल्याचे दिसून आले. साधारणत: तापमानात ८ ते १३ अंशांनी वाढ झाली आहे. तापमानात अशा प्रकारची वाढ होणे दुर्मिळ मानले जाते. दरम्यान, अशीच परिस्थिती तीन वर्षांपूर्वी फेब्रुवारी महिन्यात दिसून आली होती. भारतीय हवामान विभागाने मार्च महिन्याबाबत हवामानाचा अंदाज व्यक्त केला आहे. पश्चिम हिमालय भाग व मध्य भारतात तापमान हे सामान्यत: जितके असायला हवे त्यापेक्षा अधिक असणार आहे. गुजरात व आंध्र प्रदेशात मार्च महिन्यातील पहिल्या आठवड्यात उष्णतेची लाट येणार असल्याची शक्यता देखील हवामान विभागाने व्यक्त केली होती.
हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीरमधील तापमानात वाढ?
हिमाचल प्रदेश सारख्या थंड हवामानाच्या राज्यात सध्या तापमान २५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक आहे. “शिमल्यात तापमान २५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक असणे सामान्य आहे. परंतु, ते मे किंवा जून महिन्यात असते. यंदा मार्च महिन्यातच तापमानाचा पारा २५ अंशांपेक्षा अधिक आहे. उष्णतेची लाट आल्याने हा परिणाम दिसून येत आहे”, अशी प्रतिक्रिया भारतीय हवामान विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
दरम्यान, हिमाचल प्रदेश प्रमाणेच जम्मू आणि काश्मीर व लडाखमध्येही तापमानात मागील आठवड्यात वाढ झाली आहे. “तापमानात वाढ झाली असून ती पुढील दोन ते तीन दिवस राहणार आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्सेसमुळे या तापमानात घट होईल”, असा अंदाज IMD चे संचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी व्यक्त केला.
वेस्टर्न डिस्टर्बन्सेस म्हणजे काय? (Western Disturbances)
वेस्टर्न डिस्टर्बन्सेस म्हणजे एक प्रकारचे वारे आहेत जे इराणमध्ये उगम पावतात व त्यानंतर भूमध्य समुद्र व इतर पाण्याच्या स्रोतांवरून आर्द्रतेसह वाहत पुर्वेकडे म्हणजेच भारताच्या दिशेने वाहत येतात. या वाऱ्यांमुळे ऐन हिवाळ्यात उत्तर भारतातील हिमालय भागात तसेच जम्मू काश्मीरमध्ये बर्फवृष्टी व पाऊस पडतो. यालाच वेस्टर्न डिस्टर्बन्सेस म्हणतात. वेस्टर्न डिस्टर्बन्सेसमुळे तापमानात घट होईल, अशी शक्यता मोहपात्रा यांनी व्यक्त केली आहे.

कोरड्या हिवाळ्याने तापमानात वाढ? (Dry Winter)
तापमानात झालेल्या वाढीमुळे यंदा कोरडा हिवाळा (Dry Winter) अनुभवायला मिळू शकतो. १९०१ नंतर तिसऱ्यांदा यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात कोरडा हिवाळा अनुभवायला मिळत आहे. हिवाळ्यात कमी पाऊस पडल्यास त्याला कोरडा हिवाळा (Dry Winter) म्हणतात. जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात संपूर्ण भारतात फक्त १६ मिमी पावसाची नोंद झाली. या कालावधीत जवळपास सामान्य परिस्थितीत पडतो त्यापेक्षा ६० टक्के कमी पाऊस पडला. पाऊस व बर्फवृष्टी दोन्हीतही घट झाली आहे.

उत्तर भारतातील हिमालय व इतर भागात यंदा वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे होणारा पाऊस समाधानकारक झाला नाही. त्यामुळे तापमानात वाढ तसेच उष्णतेची लाट आल्याचे दिसून येत आहे. पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहून येणारे वारे हिवाळ्यात उत्तर भारतातील काही भागांत पाऊस पडण्यास कारणीभूत ठरतात. दरम्यान, हवामान तज्ज्ञांनी आणखी एक निरीक्षण नोंदवले आहे. भारताच्या पश्चिमकडून व पूर्वेकडून येणारे वारे उत्तर व मध्य भारतात एकत्र येऊन मिळतात. त्या वाऱ्यांमध्ये समुद्रातून आलेल्या आर्द्रतेचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. यंदा मात्र तसे झाले नसल्याचे हवामान तज्ज्ञांनी नमूद केले आहे.
Dry Winter

कोरड्या हिवाळ्यामुळे तापमानात मोठी वाढ होते. परिणामी उन्हाळा लवकर सुरू होतो. हिवाळ्यात पाऊस न झाल्याने जमीन तापते. पाऊस न पडल्याने व जमीन तापल्याने एकंदरीत सगळीकडेच तापमानात वाढ होते. उष्णतेची लाट आल्याचे आढळून येते.
पिकांना सर्वाधिक नुकसान
तापमानात अचानक झालेल्या वाढीचा रब्बी पिकांवर परिणाम होतो. मोहरी, गहू, हरभरा, शेंगदाणे, तीळ, ज्वारी, करडई तसेच बटाटा, सफरचंद यांची अधिक देखभाल शेतकऱ्यांना करावी लागते. पिकांसाठी जमीनीत ओलावा कायम राहावा म्हणून सतत शेतात पाणी देण्याचा सल्ला अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिला जातो. दरम्यान, तापमानात अचानक झालेल्या वाढीने जलस्त्रोतांवर देखील ताण पडतो.
