Kidney damage early symptoms: आपल्या शरीरात किडनी काही विशिष्ट हार्मोन्स तयार करते, हे हार्मोन्स रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि लाल रक्तपेशी निर्माण करण्यात मदत करतात. मात्र, अनेक लोकांना वय झाल्याशिवाय आपली किडनी योग्यरीत्या काम करत नाहीये हे कळतच नाही.

किडनी हा आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाच्या अवयवांपैकी एक आहे. त्या आपले रक्त स्वच्छ करतात, शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकतात आणि द्रवाचे संतुलन राखतात. याशिवाय, किडनी काही विशिष्ट हार्मोन्स तयार करतात जे रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि लाल रक्तपेशी निर्माण करण्यात मदत करतात.

मात्र, अनेक लोकांना आपली किडनी योग्यरीत्या कार्य करत नाहीये, हे आजार गंभीर होईपर्यंत समजतच नाही. कारण सुरुवातीच्या टप्प्यात किडनीच्या आजारांची लक्षणं फारशी स्पष्ट दिसून येत नाहीत. म्हणूनच, सुमारे ९० टक्के जणांना त्यांना किडनी विकार आहे, हे माहितच नसतं.

म्हणून वेळेत चाचण्या करणे आणि आवश्यक खबरदारी घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे किडनी निकामी होण्याआधी तिची स्थिती कशी ओळखावी आणि कोणत्या चाचण्या सर्वाधिक उपयुक्त ठरतात हे जाणून घेण महत्त्वाचं आहे.

किडनी निकामी होण्याआधी तिची स्थिती कशी ओळखाल?

  1. मूत्रामधील बदल- मूत्राचे प्रमाण कमी होणे, वारंवार लघवी होणे (विशेषतः रात्रीच्या वेळी). मूत्रामध्ये फेस किंवा बुडबुडे दिसणे, हे प्रथिनांचे प्रमाण अधिक असण्याचे संकेत असू शकतात. मूत्रामध्ये रक्त येणे किंवा मूत्राचा रंग वेगळा वाटणे हेही किडनीच्या नुकसानीचे लक्षण असू शकते.
  2. शरीरावर सूज येणे- जेव्हा किडनी योग्यरित्या कार्य करत नाही, तेव्हा शरीरात विषारी पदार्थ साचू लागतात. याचा परिणाम डोळ्यांच्या भोवती, पायांमध्ये किंवा हातांमध्ये सूज येण्याच्या स्वरूपात दिसून येतो.
  3. थकवा आणि अशक्तपणा- किडनी एरिथ्रोपोइटिन (Erythropoietin) नावाचं हार्मोन तयार करते, ते लाल रक्तपेशी निर्माण करण्यासाठी आवश्यक असतं. किडनी निकामी झाल्यास या हार्मोनचा अभाव निर्माण होतो आणि शरीरात ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते, त्यामुळे व्यक्तीला नेहमी थकवा जाणवतो.
  4. श्वास घेण्यास अडचण येणे- किडनी नीट कार्य करत नसल्यामुळे शरीरात विषारी पदार्थ जमा होतात, हे पदार्थ फुफ्फुसांवर परिणाम करू शकतात. त्यामुळे श्वास घेताना त्रास होऊ शकतो.
  5. उलटी आणि मळमळ- किडनी निकामी झाल्यावर शरीरात साचलेल्या विषारी पदार्थांमुळे भूक न लागणे, सतत मळमळ वाटणे किंवा उलटी होणे यांसारखी लक्षणं दिसू शकतात.
  6. डोकेदुखी, गरगरणे आणि मानसिक अस्वस्थता- किडनीच्या समस्यांमुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइटचे संतुलन बिघडू शकते, त्यामुळे लक्ष केंद्रीत करण्यात अडचण येते. काही वेळा मानसिक अस्वस्थता किंवा चिडचिडेपणाही जाणवू शकतो.

जर, अशी कोणतीही लक्षणं जाणवत असतील, तर त्वरित चाचणी करून घ्या.

किडनीची स्थिती जाणून घेण्यासाठी कोणती चाचणी उपयुक्त आहे?

  1. रक्त चाचण्या- किडनीचं आरोग्य तपासण्यासाठी क्रिएटिनिन आणि BUN (Blood Urea Nitrogen) या चाचण्या महत्त्वाच्या असतात. या चाचण्या किडनी रक्तातून विषारी पदार्थ किती प्रभावीपणे बाहेर टाकते हे सांगतात. याशिवाय, eGFR (estimated Glomerular Filtration Rate) ही चाचणी किडनी रक्त किती चांगल्या प्रकारे फिल्टर करते हे दर्शवते. eGFR जर १५ पेक्षा कमी असेल, तर ती गंभीर किडनी निकामी होण्याची स्थिती मानली जाते.
  2. मूत्र चाचणी- या चाचणीत मूत्रामध्ये प्रथिने, रक्त किंवा इतर कोणतेही वेगळे घटक आहेत का, हे तपासलं जातं. तसेच मूत्राचे प्रमाण आणि रंग यावरही लक्ष ठेवले जाते.
  3. इमेजिंग चाचण्या- अल्ट्रासाऊंड किंवा CT स्कॅन याच्या मदतीने किडनीची रचना आणि आकार बघता येतो. यामधून किडनीत दगड, गाठ किंवा इतर विकार असल्याचे संकेत मिळू शकतात.
  4. इतर चाचण्या- काही विशेष प्रकरणांमध्ये डॉक्टर किडनी बायोप्सी सारख्या चाचण्या सुचवू शकतात. यामध्ये किडनीच्या ऊतींचा नमुना घेऊन त्याची तपासणी केली जाते, ज्यातून नुकसान किती टप्प्यावर आहे हे कळते.

किडनी निकामी होण्याआधीची काळजी आणि प्रतिबंधात्मक उपाय

किडनीच्या आजाराची लवकर ओळख झाल्यास त्याची तीव्रता आणि पुढचा प्रसार टाळता येतो. हे साध्य करण्यासाठी, जर तुमच्या कुटुंबात किडनी विकारांचा इतिहास असेल किंवा तुमचं वय ६० वर्षांपेक्षा जास्त असेल, तर नियमित वैद्यकीय तपासण्या करणे आवश्यक आहे.

  • रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवा– मधुमेह आणि उच्च रक्तदाब हे किडनीचे मोठे शत्रू आहेत. योग्य नियंत्रण नसेल तर हे दोन्ही किडनीचं नुकसान करू शकतात.
  • नियमित व्यायाम करून शारीरिक हालचाल केल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो आणि शरीरात विषारी घटक साचण्याची शक्यता कमी होते.
  • संतुलित आहार घ्या– जास्त मीठ, साखर, तेलकट आणि प्रक्रिया केलेले पदार्थ टाळा. ताजे फळ, भाज्या आणि फायबरयुक्त पदार्थ खा.
  • पाणी भरपूर प्या– शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी पाण्याचं सेवन आवश्यक आहे.
  • धूम्रपान टाळा–सिगारेट आणि तंबाखू किडनीच्या रक्तप्रवाहावर परिणाम करतात आणि किडनी निकामी होण्याचा धोका वाढवतात.
  • औषधांचं योग्य प्रमाणात सेवन करा–कोणतंही औषध किंवा सप्लिमेंट डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नका. काही औषधं दीर्घकाळ घेतल्यास किडनीवर दुष्परिणाम होऊ शकतो.

थोडक्यात, किडनी सुरक्षित ठेवण्यासाठी आरोग्यदायी जीवनशैली आणि नियमित तपासणी हीच खरी गुरुकिल्ली आहे.