Eating Alone Disadvatages : कुटुंबासोबत रात्रीचं जेवण असो, ऑफिसच्या सहकाऱ्यांसोबतचा लंच ब्रेक असो किंवा मित्रांसोबतचा वीकेंड बेत; सहभोजन म्हणजेच सोबत बसून खाणं ही आपल्याला एक सामूहिक सवय वाटते. पण संशोधकांनी याचा संबंध भावनिकतेशी आणि मानसिकतेशी जोडला आहे. संशोधकांच्या मते, एकत्र बसून जेवल्याने लोकांना बोलण्याची, एकमेकांशी जोडले जाण्याची, नातेसंबंध निर्माण करण्याची आणि एकटेपणाची भावना कमी करण्याची संधी मिळते.

अनेक अभ्यासांमधून समोर आले आहे की, रोज किंवा नियमितपणे इतरांसोबत जेवल्याने माणसाचे भावनिक आरोग्य (Emotional Wellbeing) उत्तम राहते. याउलट, सतत एकट्याने जेवणाऱ्या व्यक्तींमध्ये नैराश्य (Depression) आणि मेंदूच्या आरोग्यात नकारात्मक बदल दिसून आले आहेत.

एकत्र जेवल्याने मानसिक आरोग्य सकारात्मक परिणाम

अन्न आणि मानवी आनंद यांच्यातील या गहिऱ्या संबंधाचा अभ्यास जागतिक पातळीवर करण्यात आला आहे. अनेक अभ्यासांमधून हे स्पष्ट झाले आहे की, एकत्र बसून जेवण्याचा आणि मानवी भावनांचा खूप जवळचा संबंध आहे. विशेषतः वयोवृद्ध व्यक्तींमध्ये (Older Adults) ही सवय मानसिक स्वास्थ्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरत असल्याचे दिसून आले आहे.

६० आणि त्याहून अधिक वयाच्या सुमारे ९,३६१ महिलांवर केलेल्या एका अभ्यासात एक रंजक गोष्ट समोर आली. जेवणाच्या टेबलावर किती व्यक्ती बसल्या आहेत, याचा त्यांच्या मानसिकतेवर चांगला, वाईट परिणाम तपासण्यात आला. विशेष म्हणजे, सहभागी महिलांचे शारीरिक आरोग्य, आर्थिक स्थिती किंवा त्या एकट्या राहतात की नाही, या सर्व घटकांचा विचार केल्यानंतरही सोबतीला जितकी जास्त माणसे, तितका नैराश्याचा धोका कमी असल्याचे आढळून आले.

जपानमधील ६५ ते ७४ वयोगटातील ज्येष्ठांवरील अभ्यासात आणखी एक महत्त्वाचा पैलू उघडकीस आला. कुटुंबासोबत राहूनही जे नेहमी एकटं बसून जेवतात, अशा ज्येष्ठ नागरिकांमध्ये नैराश्याची लक्षणे आढळण्याची शक्यता इतरांपेक्षा (अनेकांसोबत जेवणाऱ्यांपेक्षा) खूप जास्त होती.

एकत्र जेवल्याने भावनिक आधार कसा मिळतो

‘वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट’ (World Happiness Report) मध्ये जगभरातील सुमारे १,५०,००० लोकांच्या माहितीचे विश्लेषण करण्यात आले. यामध्ये लोकांना एक प्रश्न विचारण्यात आला होता: तुम्ही तुमच्या ओळखीच्या किंवा जवळच्या व्यक्तींसोबत किती वेळा दुपारचे किंवा रात्रीचे जेवण जेवता?

या अभ्यासातून सकारात्मक निष्कर्ष समोर आले आहेत. जे लोक अनेकवेळा इतरांसोबत एकत्र बसून जेवतात, त्यांच्यामध्ये भावनिक समाधान आणि जीवनातील आनंदाची पातळी (Life Satisfaction) इतरांपेक्षा अधिक असल्याचे दिसून आले.

पण… या नाण्याला दुसरी बाजूही आहे!

संशोधकांनी या विश्लेषणात एक महत्त्वाची शंकाही उपस्थित केली आहे. जे लोक नियमितपणे इतरांसोबत जेवतात, त्यांचे सामाजिक जाळे (Social Network) आधीपासूनच अधिक मजबूत असण्याची शक्यता असते. त्यामुळे केवळ ‘एकत्र जेवल्यामुळे’ मानवी आनंद वाढतो, की ‘तुमचे सामाजिक जीवन अधिक सक्रीय असल्याचा’ हा एक परिणाम आहे?

या दोन घटकांपैकी नक्की कोणता घटक जास्त प्रभावी आहे, हे स्पष्टपणे नमूद करणे कठीण आहे. तरीही, सामाजिक संवाद आणि एकत्र जेवणे या दोन्ही गोष्टी माणसाला आतून समृद्ध करु शकतात, असेही संशोधक नमूद करतात.

एकट्याने जेवल्यास मेंदूवर काय परिणाम होतो?

शास्त्रज्ञ आता केवळ मानसिक आरोग्याचाच नाही, तर एकटं जेवल्याने मेंदूच्या आरोग्यावर (Long-term Brain Health) काय परिणाम होतो, याचाही सखोल अभ्यास करत आहेत. जपानमधील संशोधकांनी केलेल्या एका अभ्यासात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

जे लोक नियमितपणे एकटं बसून जेवतात, त्यांच्यात विचार करण्याची व स्मरणशक्तीची क्षमता नियंत्रित करणारे भाग जसे की ‘हिप्पोकॅम्पस’ (Hippocampus) आणि ‘मेडियल टेम्पोरल लोब’ (Medial Temporal lobe) यांचे आकारमान (Brain Volume) इतरांच्या तुलनेत कमी असल्याचे आढळले.

दुसरं म्हणजे यामागे आहाराच्या सवयी देखील दडलेल्या असतात, असे संशोधकांचे म्हणणे आहे. कारण एकटं बसून जेवणारे लोक बहुधा आहाराच्या पोषणाकडे दुर्लक्ष करतात. मात्र, केवळ ‘अयोग्य आहार’ हेच यामागचे एकमेव कारण असू शकत नाही, हेही या अभ्यासात स्पष्ट झाले.

सामूहिक संवादाचा अभाव आणि तणाव

संशोधकांच्या मते, जेवताना होणारा सामूहिक संवाद जर कमी झाला तर याच माणसाच्या मानसिकतेवर परिणाम होतो. जसं की, जेवताना होणाऱ्या गप्पांमुळे मेंदूला एक प्रकारचा व्यायाम मिळतो आणि विचारप्रक्रिया सक्रीय राहते, म्हणजेच मानसिक उत्तेजना (Mental Stimulation) मिळते.

  • प्रियजनांसोबत हसत-खेळत घालवलेला वेळ आणि मिळणारा भावनिक आधार मानसिक ताणतणाव (Stress) कमी करण्यास मदत करतो
  • मानसिक ताण आणि एकाकीपणा (Social Isolation) या दोन्ही गोष्टी मेंदूच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक मानल्या जातात.

यातच महत्वाचं म्हणजे, एकटं बसून जेवल्याने थेट डिमेंशिया (स्मृतीभ्रंश) होतो, याबाबत कोणताही पुरावा मिळालेला नाही. तपासणी आढळून आले की, मानसिक व बौद्धिक क्षमता पूर्णपणे सामान्य पातळीवर राहते. मात्र, मेंदूत दिसणारे हे बदल भविष्यात स्मरणशक्ती किंवा बौद्धिक क्षमता कमी होण्याच्या (Cognitive Decline) शक्यतेकडे इशारा करतात, असे संशोधकांनी स्पष्ट केले आहे.

एकत्र जेवणे अधिक आनंददायी का वाटते?

इतरांसोबत जेवताना पोट भरण्यासोबतच मन तृप्त होत असेल. तर यामागे केवळ भावनिक नाही, तर जैविक (Biological) कारण देखील आहे.

  • ‘एंडॉर्फिन’ सिस्टीम सक्रिय होणे : जेव्हा आपण अन्न वाटून खातो, तेव्हा आपल्या शरीरातील ‘एंडॉर्फिन’ (Endorphin) हे रसायन सक्रीय होते. हे रसायन आपल्याला आनंदाची भावना देते आणि मानवी नातेसंबंध अधिक घट्ट करण्यास मदत करते.
  • अन्नाची चव आणि आनंद वाढणे : संशोधकांच्या मते, जेवणाच्या टेबलावर दुसऱ्या व्यक्तीची उपस्थिती असणे, यामुळे आपला आनंद द्विगुणित होतो.

यामुळेच जेव्हा आपण एकटं बसून अन्न खातो त्यापेक्षा जेव्हा ते कुटुंब किंवा मित्रांसोबत खातो, तेव्हा ते अधिक चवदार, समाधानकारक आणि आनंददायी वाटतं.