आपल्यावर खाण्याच्या सवयी इतक्या हावी होतात की, आपले हात आपसुकच खाण्याकडे वळतात. दिवसभरातील ताणतणावामुळे कधी गोड खाण्याचे क्रेविंग्स होतात, तर कधी पोट भरलेलं असतानाही स्नॅक्स खात राहतो, तर कधी चिंतेत असल्याने जेवण्याची इच्छाच होत नाही. आपण उद्या पौष्टिक खाऊ असे आपण ठरवतो, पण नंतर पुन्हा तुम्ही त्याच सततच्या खाण्याच्या चक्रात अडकता. कधी मनावरचा ताण आपल्याला गरजेपेक्षा जास्त खायला लावतो, तर कधी त्याच ताणामुळे अन्नाचा घासही घशाखाली उतरत नाही.
मानसिक ताणाचा केवळ मनःस्थितीवर नाही, तर खाण्याच्या सवयींवरही परिणाम होतो. काही जणांना भूक नसतानाही सतत काहीतरी खावंसं वाटतं. खाल्ल्यानंतर मात्र आपण इतकं का खाल्लं म्हणून अपराधी वाटू लागतं. याउलट, काही जणांचं मन तणावामुळे इतकं अस्वस्थ होतं की त्यांना जेवण्याची इच्छाच होत नाही. जेवणाच्या वेळा चुकतात, भूक मंदावते आणि दिवसभर शरीरात थकवा जाणवत राहतो. तणावामुळे खाण्यावर नियंत्रण राहत नसेल किंवा भूकच लागत नसेल, तर स्वतःला दोष देऊ नका. मनावरचा ताण, झोपेची कमतरता किंवा रोजच्या अडचणींमुळे खाण्याच्या सवयींवर परिणाम होऊ शकतो.
दीर्घकाळच्या ताणाचा खाण्याच्या सवयींवर कसा परिणाम होतो?
शरीरावर ताण आला की, शरीर त्याचा सामना करण्यासाठी सज्ज होतं. या काळात ॲड्रेनालिन आणि कॉर्टिसोलसारख्या संप्रेरक स्रवण्यास सुरुवात होते. थोड्या वेळासाठी ताण आल्यास भूक मंदावू शकते. पण ताण दीर्घकाळ टिकला, तर भूक, क्रेविंग्स आणि आवडणाऱ्या पदार्थांमध्येही बदल होऊ शकतो. शरीरावर अतिरिक्त प्रमाणात ताण येत असेल तर गोड, तेलकट किंवा प्रक्रिया केलेले पदार्थ जास्त खावेसे वाटतात. तसेच ताणामुळे झोपेचं वेळापत्रक आणि जेवणाच्या वेळाही बिघडू शकतात, असे हार्वर्डच्या ‘न्यूट्रिशन सोर्स’च्या संशोधनात नमूद करण्यात आलं आहे.
संतुष्टी होलिस्टिक हेल्थच्या संस्थापक आणि मुख्य आहारतज्ज्ञ लवलीन कौर सांगतात की, सततच्या ताणामुळे माणसाच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलू शकतात. ताण कायम राहिला, तर कॉर्टिसोलसारख्या संप्रेरकांचा भुकेवर परिणाम होतो. त्यामुळे गोड, तेलकट आणि मैद्यापासून बनवलेले पदार्थ खाण्याची तीव्र इच्छा होऊ शकते.
असे पदार्थ खाल्ल्यावर आपल्याला संतुष्टी मिळते; पण ती फार काळ टिकत नाही. त्यानंतर थकवा, अपराधीपणाची भावना किंवा पुन्हा काहीतरी खाण्याची इच्छा होऊ शकते. ताणामुळे झोप आणि पचनक्रियेवरही परिणाम होतो. त्यामुळे नेमकी भूक कधी लागतेय आणि पोट कधी भरलेलं आहे, हे ओळखणंही कठीण होऊ शकतं.
तणावाच्या स्थितीत खाल्ल्यानंतर अपराधी का वाटतं?
कामाचा वाढलेला ताण, घरातला वाद, जबाबदाऱ्यांचं ओझं किंवा एकटेपणा… अशा वेळी मन शांत करण्यासाठी अनेक जण खाण्याचा आधार घेतात. आवडता पदार्थ खाल्ल्यावर काही काळ बरं वाटतं. पण पुन्हा अस्वस्थ वाटू लागलं की, परत खाण्याची इच्छा होते. फंक्शनल मेडिसिन तज्ज्ञ आणि प्रमाणित ब्रीदवर्क प्रशिक्षक मुग्धा प्रधान सांगतात की, तणावाच्या स्थितीत खात राहण्यामागे केवळ इच्छाशक्तीची कमतरता कारणीभूत नसते. त्यामागे विशिष्ट पद्धत असू शकते. एखादी गोष्ट मनाला त्रास देते, भावनिक थकवा जाणवतो आणि त्यातून थोडा आराम मिळावा म्हणून व्यक्ती खाण्याकडे वळते. अशा वेळी खाल्ल्याने बरं वाटतं, हा अनुभव मेंदूच्या लक्षात राहतो, त्यामुळे हीच कृती पुन्हा पुन्हा घडत असते.
पण खाल्ल्यानंतर आपण किती किंवा काय खाल्लं, याबद्दल स्वतःलाच दोष दिला जातो. या अपराधीपणामुळे मनावरचा ताण आणखी वाढू शकतो आणि पुन्हा खाण्याची इच्छा होऊ शकते आणि चक्र पुढे सुरुच राहतं. यातून बाहेर पडण्यासाठी आवडते पदार्थ पूर्णपणे बंद करणं किंवा खाण्यावर आणखी कडक बंधनं घालणं हा एकमेव मार्ग नाही. ताण आल्यावर खाण्याची इच्छा नेमकी कशामुळे होते, हे समजून घेणं अधिक महत्त्वाचं आहे.
तणावामुळे काही जणांची भूक का मंदावते?
याच्याच विरुद्ध काही जण तणाव आला की, अन्नाचा एक घासही खात नाही. डोक्यात विचारांचा गोंधळ सुरू असतो, कामाचा वाढलेला ताण किंवा एखाद्या गोष्टीची चिंता सतावत असते. अशा वेळी जेवणाची वेळ कधी निघून जाते, हेही त्यांच्या लक्षात येत नाही. काहींना मळमळ किंवा पोटात अस्वस्थता जाणवते, त्यामुळे खाण्याची इच्छाच होत नाही.
पारस हेल्थ, गुरुग्राम येथील वरिष्ठ क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ डॉ. प्रीती सिंग यांच्या मते, तणावाचा परिणाम प्रत्येक व्यक्तीवर सारखा होत नाही. व्यक्तीची शारीरिक रचना, तणावाला सामोरं जाण्याची पद्धत, झोप आणि भावनिक अनुभव यांनुसार भुकेत बदल होऊ शकतात. तणावात असलेल्या व्यक्तीला काही वेळा आपल्याला भूक लागली आहे की नाही, हे ओळखणंही कठीण होतं.
सल्लागार रेडिओलॉजिस्ट डॉ. आकार कपूर यांनी ताणाचा संबंध संप्रेरकांचे संतुलन आणि मेंदूच्या संकेतांशी जोडला आहे. संप्रेरकांचे संतुलन बिघडले की काही जणांना जास्त कॅलरी असलेले पदार्थ खावेसे वाटतात, तर काहींची भूक मंदावते. व्यक्तीची शारीरिक स्थिती आणि ताणाचा सामना करण्याच्या पद्धतीनुसार खाण्याच्या सवयी बदलतात.
तणावामुळे खाण्याच्या सवयी बदलल्यास काळजी कधी करावी?
ताणतणावाच्या काळात भूक कमी होणं किंवा नेहमीपेक्षा जास्त खाल्लं जाणं यात चिंता करण्याचं कारण नाही. पण हे वारंवार घडत असेल आणि त्याचा रोजच्या आयुष्यावर परिणाम होऊ लागला, तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. सतत चिंता वाटणं, चिडचिड होणं, उदास वाटणं, मन थकल्यासारखं वाटणं किंवा लक्ष केंद्रित करण्यात अडचण येणं ही धोक्याची चिन्ह असू शकतात. खाल्ल्यानंतर अतिशय अपराधी वाटणं, खाण्यावर नियंत्रण राहत नसल्याची भावना येणं किंवा खाण्यापिण्याशी संबंधित सामाजिक कार्यक्रम टाळणं, ही लक्षणं देखील गंभीर असू शकतात, याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते, असेही डॉ, प्रीती सिंग सांगतात.
याही पुढे वजनात लक्षणीय बदल होणं, सतत थकवा जाणवणं किंवा इतर शारीरिक त्रास सुरू होणं, अशी लक्षणं जाणवत असतील तरी तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. भुकेतील बदल बराच काळ टिकत असतील किंवा त्याचा कामावर, नातेसंबंधांवर आणि दैनंदिन जीवनावर परिणाम होत असेल, तर डॉक्टर किंवा मानसिक आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. यामुळे या बदलांमागील मूळ कारण समजून घेता येऊ शकतं.
खाण्याच्या सवयी सुधारण्यासाठी काय कराल?
तणावामुळे खाण्याच्या सवयी बदलल्या असतील, तर आवडते पदार्थ पूर्णपणे बंद करणं किंवा स्वतःवर आणखी बंधनं घालणं गरजेचं नाही. त्याऐवजी पुढील काही उपाय करता येऊ शकतात,
स्वत:ला दोष न देता पॅटर्न ओळखा : काहीतरी खावंसं वाटत असेल, तर स्वतःला विचारा की खरंच भूक लागली आहे की तणावामुळे खाण्याची इच्छा होतेय. जेवणाची वेळ चुकली आहे का, याचाही विचार करा. स्वतःला दोष न देता त्यावेळी कोणत्या आधाराची गरज आहे ते ओळखा
जेवणाच्या वेळा पाळा : संतुलित आहार घ्या. जेवणात प्रथिने आणि फायबर असलेल्या पदार्थांचा समावेश करा. यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळण्यास मदत होते
झोपेवर लक्ष द्या : पुरेशी झोप घ्या. झोपेच्या अनियमित वेळांचा भूक आणि खाण्याच्या सवयींवर परिणाम होऊ शकतो
तणाव कमी करण्यासाठी वेळ काढा : नियमित शारीरिक हालचाल करा. तणाव कमी करण्यासाठी श्वसनाचे सोपे व्यायाम किंवा इतर आरामदायी पद्धतींचा वापर करा
खाण्याच्या सवयींमागचं कारण शोधा : आयथ्राइव्हच्या संस्थापक मुग्धा प्रधान यांच्या मते, केवळ शिस्त पाळण्यापेक्षा आहार, झोपेची गुणवत्ता आणि तणाव वाढवणाऱ्या कारणांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यामुळे खाण्याच्या सवयी सुधारण्यासाठी नेमका कुठे बदल करायला हवा, हे समजू शकतं
तज्ज्ञांचा सल्ला घ्या : तणावामुळे खाणं कठीण होत असेल, तर जेवणाच्या ठरावीक वेळा पाळा. खाण्याबद्दल सतत भीती किंवा अपराधीपणा वाटत असेल, तर मानसिक आरोग्यतज्ज्ञ आणि आहारतज्ज्ञांची मदत घ्या
