वजन कमी करण्यासाठी काहीजण दिवसातून फक्त एकदाच जेवतात आणि उर्वरित वेळ उपाशी राहतात. गेल्या काही वर्षांत देशभरात ‘Intermittent Fasting’ म्हणजेच ठराविक तास उपाशी राहण्याची पद्धत मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाली आहे. यामध्ये दिवसभरातील सर्व कॅलरीज एकाच जेवणातून घेतल्या जातात आणि उर्वरित वेळ उपवास केला जातो. अनेकजण वजन नियंत्रित ठेवण्यासाठी याच पद्धतीचा अवलंब करताना दिसून येतात; पण दिवसातून एकदाच आहार घेण्याची ही पद्धत खरंच फायदेशीर आहे का? त्यामुळे वजन कमी होते की उलट वाढते? याबाबत तज्ज्ञ काय सांगतात? त्याविषयीचा हा आढावा…

दिवसातून एकदाच जेवल्याने चयापचयाची गती मंदावते का?

हॅपीएस्ट हेल्थ क्लिनिक्सच्या पोषण आणि चयापचय आरोग्य विभागाच्या कार्यक्रम प्रमुख सोनाली कुलकर्णी यांच्या मते, आपण दिवसातून किती वेळा जेवतो याचा शरीरातील चयापचयाच्या गतीवर फारसा परिणाम होत नाही. त्याऐवजी दिवसभरात एकूण किती कॅलरी घेतल्या जातात, आहारातून किती पोषक घटक मिळतात, शारीरिक हालचाली किती होतात, पुरेशी झोप मिळते का आणि आहाराचे नियोजन दीर्घकाळ पाळता येते का? या गोष्टी अधिक महत्त्वाच्या ठरतात. दुसरीकडे बंगळुरू येथील फोर्टिस रुग्णालयातील अंतर्गत औषधोपचार विभागाचे सल्लागार डॉ. नसीरुद्दीन यांनीही जेवण टाळण्याबाबतचा एक गैरसमज दूर केला आहे. दिवसातून एकदाच जेवल्याने शरीर उपासमारीच्या स्थितीत जाते आणि त्यामुळे पोटावरील चरबी कमी होते असे मानणे चुकीचे आहे. वजन कमी होण्यासाठी दिवसभरात किती कॅलरी घेतल्या जातात आणि शरीर किती ऊर्जा खर्च करते हे अधिक महत्त्वाचे ठरते असे त्यांनी नमूद केले आहे.

दिवसातून फक्त एकदाच जेवल्याने वजन घटते की वाढते?

दिवसातून एकदाच जेवल्याने शरीरातील चयापचयाची गती आपोआप मंदावत नाही. त्यातच या आहारपद्धतीमुळे कालांतराने वजन वाढण्याची शक्यताही नाकारता येत नाही. जेवणामध्ये बराच वेळ अंतर ठेवल्याने तीव्र भूक लागणे आणि थकवा जाणवणे अशा समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे एकाच वेळी जास्त आहार घेण्याची शक्यताही वाढते. दिवसभरात एकदाच घेतलेल्या जेवणातून शरीराच्या गरजेपेक्षा जास्त कॅलरी मिळाल्यास दिवसभर उपाशी राहूनही वजन कमी होण्यात अडचण येऊ शकते, असे सोनाली कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे दिवसातून एकदाच जेवण केल्याने वजन कमी होण्याची सहसा खात्री मिळत नाही. आपण दिवसभरात किती वेळा जेवतो यापेक्षा किती कॅलरी घेतो आणि शरीर किती ऊर्जा खर्च करतो हे वजन कमी करण्यासाठी अधिकच महत्वाचे ठरते. त्यामुळे वजन कमी करण्याची धडपड करणाऱ्या व्यक्तींनी स्वतःला कडक उपाशी ठेवण्याच्या मागे न लागता जेवणाच्या वेळा ठरवून घ्याव्यात. तसेच शरीराला आवश्यक असलेल्या ऊर्जेपेक्षा थोड्या कमी प्रमाणात कॅलरी घेण्यावर भर द्यावा, असे डॉ. नसीरुद्दीन यांनी स्पष्ट केले. त्यांच्या मते, अशी संतुलित आहारपद्धती ठेवल्यास वजन नियंत्रणात राहण्यास मदत होऊ शकते. एखाद्या आहारपद्धतीमुळे जर अचानक खूप भूक लागत असेल आणि ती दीर्घकाळ पाळणे कठीण जात असेल, तर अशी आहारपद्धती वजन नियंत्रित ठेवण्यासाठी प्रभावी ठरत नाही.

दिवसातून एकदाच जेवल्याने शरीराला आवश्यक पोषण मिळणे कठीण?

दिवसातून एकदाच जेवण्याच्या पद्धतीतील सर्वात मोठी चिंता म्हणजे एकाच जेवणातून शरीराला दिवसभरासाठी आवश्यक असलेले सर्व पोषक घटक मिळत नाहीत, असेही सोनाली कुलकर्णी यांनी सांगितले. त्यांच्या मते, दिवसातून एकदाच जेवल्यामुळे शरीराला आवश्यक असलेले प्रथिने, तंतुमय पदार्थ (फायबर) जीवनसत्त्वे आणि खनिजे पुरेशा प्रमाणात मिळवणे कठीण होऊ शकते. आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी आहारात प्रथिने, कर्बोदके, आरोग्यदायी चरबी, तंतुमय पदार्थ, जीवनसत्त्वे आणि खनिजे योग्य प्रमाणात असणे आवश्यक आहे. हे सर्व पोषक घटक एकाच वेळी घेतलेल्या जेवणातून पुरेशा प्रमाणात मिळवणे अनेकांना कठीण जाऊ शकते. विशेषतः ज्या व्यक्तींना अधिक ऊर्जा किंवा विशिष्ट पोषक घटकांची गरज असते, त्यांच्यासाठी ही समस्या अधिक जाणवते. डॉ. नसीरुद्दीन यांच्या मते, जेवणामध्ये बराच वेळ अंतर ठेवल्यामुळे शरीराला पुरेशा प्रमाणात प्रथिने मिळण्यात अडचण येऊ शकते. परिणामी, स्नायूंचे प्रमाण टिकवून ठेवणेही कठीण होऊ शकते. विशेषतः वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींसाठी स्नायूंचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे. कारण स्नायू शरीराची हालचाल, शारीरिक क्षमता आणि एकूण आरोग्य चांगले राखण्यास मदत करतात, असे त्यांनी स्पष्ट केले.

दिवसातून एकदाच जेवण्याची पद्धत कोणी टाळावी?

सोनाली कुलकर्णी यांच्या मते, दिवसातून एकदाच जेवण्याची पद्धत प्रत्येकासाठी योग्य असेलच असे नाही. बराच वेळ उपाशी राहण्याच्या या पद्धतीमुळे काही व्यक्तींना आरोग्यविषयक त्रास होण्याची शक्यता असते. विशेषत: वृद्ध व्यक्ती, गर्भवती महिला, रक्तातील साखर कमी करण्यासाठी औषधे घेणाऱ्या व्यक्ती आणि पूर्वी खाण्याच्या सवयींशी संबंधित विकारांचा त्रास झालेल्या व्यक्तींनी या आहारपद्धतीचा अवलंब करताना विशेष काळजी घ्यावी. त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने दीर्घकाळ उपाशी राहणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय अशा मर्यादित आहारपद्धतीचा अवलंब करू नये. मधुमेह असलेल्या व्यक्तींनी जेवणाच्या वेळांमध्ये मोठे बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. याशिवाय, दिवसभर धावपळीचे काम करणाऱ्या, जास्त शारीरिक श्रम घेणाऱ्या व्यक्तींनाही या आहारपद्धतीपासून दूर राहावे, असे आवाहन सोनाली कुलकर्णी यांनी केले आहे. उपवास करताना सतत थकवा जाणवणे, चक्कर येणे, खूप भूक लागणे किंवा लक्ष केंद्रित करण्यात अडचण येणे अशी लक्षणे दिसत असल्यास, या आहारपद्धतीचा पुन्हा विचार करावा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

वजन कमी करण्यासाठी योग्य आहारपद्धती कोणती?

वजन दीर्घकाळ नियंत्रणात ठेवण्यासाठी आपण दिवसभरातून किती वेळा जेवतो तसेच किती तास उपाशी राहतो यापेक्षा संतुलित आहार घेणे आणि आरोग्यदायी सवयी पाळणे महत्वाचे असल्याचे दोन्ही तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. डॉ. नसीरुद्दीन यांच्या मते, दिवसातून कमी वेळा जेवल्याने वजन अधिक वेगाने कमी होते, असे समजणे चुकीचे आहे. त्याऐवजी शरीराला आवश्यक असलेल्या ऊर्जेपेक्षा योग्य प्रमाणात कमी कॅलरी देणे, पुरेशी प्रथिने खाणे, संतुलित आहार घेणे, नियमित व्यायाम करणे आणि पुरेशी झोप घेणे यावर भर द्यायला हवा. सोनाली कुलकर्णी यांनीही याच गोष्टींना महत्त्व दिले आहे. त्यांच्या मते, आहारातून पुरेसे पोषक घटक मिळणे, पौष्टिक पदार्थांची निवड करणे, योग्य प्रमाणात जेवणे आणि आरोग्यदायी सवयी सातत्याने पाळणे या गोष्टी केवळ जेवणाच्या वेळा मर्यादित ठेवण्यापेक्षा अधिक महत्त्वाच्या आहेत. त्या पुढे सांगतात की, पोषणतज्ज्ञ म्हणून मी शॉर्टकटपेक्षा वैज्ञानिक दृष्टिकोनावर विश्वास ठेवते. केवळ जेवणाची वेळ मर्यादित ठेवण्याऐवजी शरीराच्या चयापचयाचे आरोग्य चांगले राखण्यास मदत करणारी आहारपद्धती निवडायला हवी. एकंदरीत दिवसातून एकदाच जेवल्याने चयापचयाची गती आपोआप मंदावत नाही, तसेच वजन कमी होते आणि वाढते असेही नाही. मात्र, काही व्यक्तींना या पद्धतीमुळे भूक नियंत्रित करणे, शरीराला आवश्यक पोषक घटक मिळवणे आणि स्नायूंचे प्रमाण टिकवून ठेवणे कठीण जाऊ शकते.