अल्ट्रा प्रोसेस्ड फूड हे सिगारेट इतकेच घातक असल्याचे अमेरिकेतील एका संशोधनातून समोर आले आहे. सिगारेट, तंबाखूचे सेवन करणाऱ्या व्यक्तीला व्यसन लागावे म्हणून ते बनवताना एक विशिष्ट पद्धत वापरली जाते. तशीच पद्धत अल्ट्रा प्रोसेस्ड फूड बनवताना वापरली जाते, असे संशोधकांनी म्हटले आहे. त्यामुळे अल्ट्रा प्रोसेस्ड फूड खाणाऱ्या व्यक्तीला ते एकदा खाल्ल्यानंतर पुन्हा पुन्हा खावे वाटते. विविध प्रकारच्या घटकांचा, तसेच गरज पडल्यास रसायनांचा वापर करून, औद्योगिक प्रक्रियेतून तयार केलेल्या अन्नपदार्थांना अल्ट्रा प्रोसेस्ड फूड म्हणता येते. हे अन्नपदार्थ घरातील किचनमध्ये सहसा तयार करणे अवघड असते.
अल्ट्रा प्रोसेस्ड फूड कोणते आहेत ?
सिगारेट व अल्ट्रा प्रोसेस्ड फूड एकसारखेच आरोग्यासाठी घातक आहेत. त्या दोन्हींमध्ये काहीच फरक नाही. सिगारेट आरोग्यासाठी घातक असल्याने तिच्याबाबत जे कठोर नियम आहेत, तेच नियम अल्ट्रा प्रोसेस्ड फूडवर लावावे, अशी मागणी अमेरिकेतील संशोधकांनी केली आहे. बिस्किट, सॉफ्ट ड्रिंक्स, फॉर्म्युला दूध, लहान बाळ किंवा मुलांसाठी बनवलेले पाकिटबंद अन्नपदार्थ, गोड पदार्थ, फास्ट फूड, स्नॅक केक्स, ब्रेड, डेझर्ट या अन्नपदार्थांना अल्ट्रा प्रोसेस्ड फूड म्हणून ओळखले जाते. हे पदार्थ आरोग्यासाठी सिगारेट इतकेच घातक असल्याचे संशोधनातून समोर आले आहे.
तंबाखूसाठी वापरला जाणारा फॉर्म्युला अल्ट्रा प्रोसेस्ड फूडसाठी ?
अल्ट्रा प्रोसेस्ड फूड वरील संशोधनात हार्वर्ड विद्यापीठ, मिशिगन विद्यापीठ व ड्यूक विद्यापीठातील शास्त्रज्ञांचा समावेश होता. आरोग्याशी संबंधित ‘मिलबँक क्वार्टरली’ या मासिकात या संशोधनावरील लेख प्रकाशित झाला आहे. त्यातून ही माहिती समोर आली. DW या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, “अल्ट्रा प्रोसेस्ड फूडचे सेवन अधिक वाढावे यासाठी तंबाखू उत्पादन क्षेत्रात जो फॉर्म्युला तंबाखूचे व्यसन लागण्यासाठी वापरला जातो, तोच फॉर्म्युला अल्ट्रा प्रोसेस्ड फूड बनवणाऱ्या कंपन्या वापरतात, असे संशोधनातून समोर आले आहे.”
सिगारेटचे व्यसन लागावे म्हणून सिगारेट बनवणाऱ्या कंपन्या निकोटीन वापरतात. त्याच प्रकारे अल्ट्रा प्रोसेस्ड फूड उत्पादन करणाऱ्या कंपन्या व्यसन लागेल असे घटक वापरतात. अल्ट्रा प्रोसेस्ड फूड सारखे खावे वाटावे म्हणून त्यात रिफाइन्ड कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स वापरले जातात, असे संशोधन अहवालात म्हटले आहे.
‘लो फॅट’ किंवा ‘सुगर फ्री’ असल्याचा दावा फोल?
अल्ट्रा प्रोसेस्ड फूडचा न्यूट्रियंट्सशी काही संबंध नाही, त्याचे सेवन करताना खाणाऱ्याला आनंद मिळावा म्हणून ते तयार केले जातात. त्यात वापरल्या जाणाऱ्या घटकांमध्ये खूप छेडछाड केली जाते, असे संशोधनात म्हटले आहे. तसेच ‘गार्डियन’ने संशोधकांच्या हवाल्यातून दिलेल्या माहितीनुसार, अल्ट्रा प्रोसेस्ड फूड तयार करणाऱ्या कंपन्या सरकारी नियमांपासून बचाव करण्यासाठी फूड ‘लो फॅट’ किंवा ‘सुगर फ्री’ असल्याचा दावा करतात. परंतु, वास्तवात मात्र ते ग्राहकांची दिशाभूल करतात. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळतात, असे संशोधनात म्हटले आहे.
सिगारेटवरील नियम अल्ट्रा प्रोसेस फूडवर लावण्याची मागणी
अल्ट्रा प्रोसेस्ड फूड मधील गुणधर्म हे सिगारेटसारखेच असतात. त्यामुळे सिगारेटसाठी जसे कठोर नियम आहेत, तसेच नियम यावरही लावले पाहीजे, अशी मागणी संशोधकांनी अहवालातून केली आहे. सिगारेट घातक असल्याचे लेबल जसे स्पष्टपणे त्यावर लावले जाते, त्यावर उच्च दराने टॅक्स आकारला जातो, शाळा व रूग्णालय परिसरात सिगारेट विक्रीस बंदी घातली जाते त्याचप्रमाणे अल्ट्रा प्रोसेस्ड फूडवरही हे सगळे नियम लागू केले पाहिजे, असे अहवालात म्हटले आहे.
अल्ट्रा प्रोसेस्ड फूड खाल्ल्यानंतर ६० टक्के लहान मुले रूग्णालयात
‘युनिसेफ’ने डिसेंबर महिन्यात अल्ट्रा प्रोसेस्ड फूड संदर्भात एक अहवाल ‘द लँसेट’ या मासिकात प्रकाशित केला होता. त्यात काही देशांमध्ये लहान मुलांचे अल्ट्रा प्रोसेस्ड फूड खाण्याचे प्रमाण खूप वाढल्याचे म्हटले होते. पाच वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वय असणाऱ्या एकूण मुलांपैकी १० ते ३५ टक्के मुले नियमितपणे सॉफ्ट ड्रिंकचे सेवन करत असल्याचे समोर आले आहे. आदल्या दिवशी अल्ट्रा प्रोसेस्ड फूड खाल्ल्यानंतर ६० टक्के लहान मुले रूग्णालयात उपचारांसाठी दाखल होतात, असे युनिसेफच्या अहवालात नमूद करण्यात आले होते.
संशोधनात सहभागी मिशिगन विद्यापीठातील प्राध्यापक अॅशले गिअरहार्ड्ट म्हणाले, “अल्ट्रा प्रोसेस्ड फूड खाणारे लोक म्हणतात, आम्हाला याचे व्यसन लागल्यासारखे वाटते. हे पदार्थ खाताना सिगारेटचे जसे व्यसन आहे, तसेच वाटते. हे पदार्थ खाणे आरोग्यासाठी घातक आहे, त्यामुळे ते खाणे बंद करायचे आहे. परंतु, ते बंद होत नाही.” सरकारने याबाबत ठोस नियम करण्याची मागणी संशोधकांनी केली आहे.

