Ebola Virus Alert India Health Ministry Guidelines : सहा वर्षांपूर्वी आलेल्या करोना महामारीने संपूर्ण जगभरात धुमाकूळ घातला होता. त्यावेळी या विषाणूमुळे लाखो लोकांना आपले प्राण गमावावे लागले होते. करोनाचा सामना करण्यासाठी अनेक देशांनी टाळेबंदीची घोषणाही केली होती. त्यामुळे कित्येकांना बेरोजगारीचे संकट ओढवले होते. यादरम्यान करोनानंतर आता आणखी एका नव्या महामारीचे संकट जगावर घोंगावत आहे. डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ काँगो आणि युगांडा या देशांमध्ये इबोला व्हायरसचा उद्रेक झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दोन्ही देशांमध्ये सार्वजनिक आरोग्याला गंभीर धोका असल्याचा इशारा दिला आहे. हीच बाब लक्षात घेता केंद्र सरकारने खबरदारी म्हणून कठोर उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे, त्याविषयी…

केंद्र सरकारच्या नेमक्या उपाययोजना काय?

आफ्रिकन देशांमध्ये पसरत असलेल्या ‘इबोला’ व्हायरसच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशातील सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळे, बंदरे आणि सीमा सुरक्षा चौक्यांवर विशेष मार्गदर्शक सूचना लागू केल्या आहेत. ‘उच्च जोखीम’ असलेल्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांवर विशेष पाळत ठेवली जात आहे. ताप, अशक्तपणा, थकवा, डोकेदुखी, स्नायूंमध्ये वेदना, उलट्या, जुलाब, अनाकलनीय रक्तस्राव आणि घसा दुखणे अशी लक्षणे आढळल्यास प्रवाशांनी इमिग्रेशन तपासणीपूर्वी विमानतळावरील आरोग्य अधिकारी हेल्प डेस्कला माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे. केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय देशात इबोलाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घेतलेला हा निर्णय अत्यंत महत्वाचा मानला जात असून परदेशातून येणाऱ्या प्रवाशांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या उपाययोजनांमुळे अनेक भारतीयांना करोना महामारीची आठवण झाली आहे. काँगो आणि शेजारील युगांडातील इबोलाचा उद्रेक हा आंतरराष्ट्रीय चिंतेचा विषय असल्याचे नमूद करत जागतिक आरोग्य संघटनेने गेल्याच आठवड्यात जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेकडून आणीबाणी घोषित

इबोलाचा तीव्र प्रसार होत असल्याने जागतिक आरोग्य संघटनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर भारताच्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दोन महत्त्वाच्या बैठका घेतल्या असून, त्यापैकी एक बैठक मंत्रालयातील अधिकाऱ्यांसोबत तर दुसरी विविध राज्यांबरोबर घेण्यात आली आहे. संभाव्य परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी ही बैठक घेण्यात आल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले आहे. या उपाययोजना केवळ खबरदारीचा उपाय म्हणून करण्यात येत असून, सध्या भारतात इबोलाचा एकही रुग्ण आढळलेला नसल्याचे सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. बुधवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत केंद्रीय आरोग्य सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सर्व आघाड्यांवर पूर्णपणे सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. या बैठकीत प्रवाशांच्या आगमनापूर्वीची आणि आगमनानंतरची तपासणी, क्वारंटाईन नियम, रुग्णांचे व्यवस्थापन, रुग्णांना संदर्भित करण्याची व्यवस्था आणि प्रयोगशाळांमधील चाचण्या यांसारख्या महत्त्वाच्या बाबींवर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. देशात इबोलाचा प्रसार होऊ नये म्हणून आरोग्य सचिवांकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.

इबोला म्हणजे काय? तो नेमका कसा पसरतो?

पूर्व काँगोमध्ये इबोला विषाणूचा प्रसार झपाट्याने होत असून आतापर्यंत १३१ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. देशात ५०० हून अधिक संशयित रुग्णांची नोंद झाल्याची माहिती काँगोच्या आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी दिली आहे. मात्र, इबोलाचा हा उद्रेक करोना महासाथीसारखा नाही आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय सीमा बंद करण्याची गरज नाही, असे सार्वजनिक आरोग्य मंत्री सॅम्युअल रॉजर कांबा यांनी सांगितले आहे. इबोला हा संसर्गजन्य रोग असून तो रक्त, उलटीद्वारे पसरतो. हा आजार अनेकदा जीवघेणा ठरू शकतो. सध्या सुरू असलेला उद्रेक ‘बुंडिबुग्यो’ या दुर्मिळ प्रकारच्या विषाणूमुळे होत असून यासाठी अद्याप मान्यताप्राप्त औषध किंवा लस उपलब्ध नाही. या प्रकारचा इबोला यापूर्वी २००७-०८ मध्ये युगांडामध्ये आढळला. त्यावेळी १४९ जणांना संसर्ग होऊन ३७ जणांचा मृत्यू झाला होता. २०१२ मध्ये काँगोच्या इसिरो येथील साथीत २९ मृत्यूंची नोंद झाली होती.

भारतात इबोलाचा रुग्ण कधी आढळला होता?

भारतामध्ये इबोलाचा पहिला आणि एकमेव रुग्ण नोव्हेंबर २०१४ मध्ये नवी दिल्ली येथे आढळून आला होता. त्यावेळी एका २६ वर्षीय भारतीय तरुणाला या आजाराची लागण झाल्याचे समोर आले होता. संबधित तरुण हा आफ्रिकेतील ‘लायबेरिया’ या इबोलाग्रस्त देशातून भारतात परतला होता. विशेष बाब म्हणजे, या तरुणाला आफ्रिकेतच इबोलाची लागण झाली होती आणि तिथेच त्याच्यावर उपचार होऊन तो बराही झाला होता. लायबेरिया सरकारने त्याला ‘इबोलामुक्त’ झाल्याचे प्रमाणपत्र दिले होते. मात्र, तो जेव्हा दिल्ली विमानतळावर पोहोचला, तेव्हा खबरदारी म्हणून त्याची पुन्हा तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्याच्या रक्ताची चाचणी ‘नेगेटिव्ह’ आली (म्हणजे त्याच्या रक्तातील विषाणू नष्ट झाला होता), परंतु त्याच्या शरीरातील इतर द्रव पदार्थांची चाचणी केली असता ती ‘पॉझिटिव्ह’ आली. इबोलामुक्त झाल्यानंतरही हा विषाणू रुग्णाच्या शरीरातील द्रवांमध्ये काही दिवस जिवंत राहू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. भारतात या विषाणूचा प्रादुर्भाव पसरू नये म्हणून त्या तरुणाला दिल्ली विमानतळावरील विशेष विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. जवळपास तीन महिने त्याला पूर्णपणे बरे होईपर्यंत डॉक्टरांच्या देखरेखीखाली विलगकरणात ठेवण्यात आले होते. दिलासादायक बाब म्हणजे, या रुग्णामुळे भारतात इतर कोणालाही इबोलाची लागण झाली नाही. २०१४ मधील या एकाच प्रकरणाचा अपवाद वगळता भारतात आजतागायत स्थानिक पातळीवर इबोलाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. तरीदेखील आफ्रिकन देशांमध्ये या विषाणूचा उद्रेक झाल्यामुळे केंद्र सरकारकडून खबरदारी घेतली जात आहे.