Ebola Virus Bundibugyo Outbreak 2026 Symptoms Transmission Criteria: आधी करोना, मग हंता आणि आता आफ्रिकेच्या दाट अरण्यांमधून पुन्हा एकदा जगाला सतर्क करणारी बातमी समोर आली आहे. मे २०२६ मध्ये लोकशाही प्रजासत्ताक काँगो आणि युगांडा येथे बुंडीबुग्यो विषाणूजन्य इबोला रोगाचा उद्रेक नोंदवला गेला असून जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या ‘बुंडीबुग्यो इबोला उद्रेक २०२६’ ला आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केले आहे. या पार्श्वभूमीवर ‘इबोला विषाणू’ नेमका काय आहे आणि भारतात याचा किती धोका आहे, हे समजून घेणे आवश्यक आहे.
उद्रेकाचे स्वरूप बदलत असते
WHOच्या अहवालानुसार २९ मे २०२६ पर्यंत काँगोमध्ये ९०६ संशयित रुग्ण आणि २२३ संशयित मृत्यू तपासणीखाली होते; दोन्ही देशांमध्ये मिळून १३४ खात्रीलायक रुग्ण नोंदवले होते, त्यांपैकी नऊ रुग्ण युगांडामधील होते. अशा आकडेवारीचे स्वरूप उद्रेकाच्या काळात दररोज बदलत असते; म्हणून या आकड्यांकडे त्या विशिष्ट तारखेपर्यंतच्या साथीचे चित्र म्हणूनच पाहणे आवश्यक आहे.
लक्षणे दिसल्यास विलगीकरण
भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयानेही मे २०२६ मध्ये प्रवास-सतर्कता जारी करून लोकशाही प्रजासत्ताक काँगो (DRC), युगांडा आणि दक्षिण सुदानचा अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिला. भारतात या उद्रेकाशी संबंधित इबोला रुग्ण नोंदवलेला नसला, तरी ताप, तीव्र अशक्तपणा, उलट्या, जुलाब, अंगदुखी किंवा अकारण रक्तस्राव अशी लक्षणे दिसल्यास प्रवासाचा इतिहास न लपवता, स्वतःला इतरांपासून वेगळे ठेवावे आणि तातडीने आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा. या पार्श्वभूमीवर इबोला विषाणू काय आहे, त्याचा इतिहास काय सांगतो, तो शरीरात काय करतो आणि त्यापासून बचाव कसा करावा, हे जाणून घेऊ.

इबोलाची ओळख: विषाणूशास्त्रातील एक थरारक अध्याय
इबोला रोग प्रथम १९७६ मध्ये दोन समांतर उद्रेकांमधून जगासमोर आला. एक उद्रेक आजच्या दक्षिण सुदानमधील न्झारा येथे झाला, तर दुसरा आजच्या लोकशाही प्रजासत्ताक काँगोमधील यांबुकू या गावाजवळ झाला. यांबुकूजवळ वाहणाऱ्या इबोला नदीच्या नावावरून या रोगाला ‘इबोला’ हे नाव मिळाले. हा इतिहास केवळ वैद्यकीय नाही; तर तो मानव, वन्यजीव, अरण्य, आरोग्यव्यवस्था आणि जागतिक प्रवास यांच्या परस्परसंबंधांची तीव्र आठवण करून देणारा आहे.
सहा प्रमुख प्रजाती
विज्ञानाच्या भाषेत इबोला रोग निर्माण करणारे विषाणू हा फिलोव्हिरिडी (Filoviridae) या विषाणू-कुळातील ऑर्थोइबोलाव्हायरस (Orthoebolavirus) या वंशाचा सदस्य आहे. आजपर्यंत या वंशातील सहा प्रमुख प्रजाती ओळखल्या गेल्या आहेत, त्या याप्रमाणे- झैरे, सुदान, ताई फॉरेस्ट, बुंडीबुग्यो, रेस्टन आणि बॉम्बाली. यापैकी झैरे, सुदान आणि बुंडीबुग्यो या प्रजातींनी मोठे मानवी उद्रेक घडवले आहेत. ताई फॉरेस्टमुळे मानवी आजारांबद्दल अत्यंत मर्यादित नोंद आहे, तर रेस्टन आणि बॉम्बाली यांचे मानवी रोगनिर्मितीतील स्थान तुलनेने वेगळे आणि मर्यादित आहे.
विषाणूची रचना
इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाखाली इबोला विषाणूचे रूप विलक्षण दिसते. तो धाग्यासारखा लांबट, कधी वाकडातिकडा, कधी यू -आकाराचा, कधी ६ आकड्यासारखा दिसू शकतो. त्याचा व्यास साधारण ८० नॅनोमीटरच्या आसपास असतो; लांबी साधारणतः सुमारे ८०० ते १००० नॅनोमीटर असते, परंतु काही कण अनेक मायक्रोमीटरपर्यंत लांब दिसू शकतात. हा एक आवरणयुक्त, सलग, एकसूत्री आरएनएयुक्त विषाणू आहे. त्याच्या जनुकसंचात सुमारे सात प्रमुख जनुके असून ती एनपी, व्हीपी-३५, व्हीपी-४०, जीपी, व्हीपी-३०, व्हीपी-२४ आणि एल अशा प्रथिनांच्या निर्मितीसाठी वापरली जातात. यांपैकी जीपी म्हणजेच ग्लायकोप्रथिन, पेशीवर चिकटून विषाणूला पेशीत प्रवेश करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते; तर व्हीपी-४० सारखी प्रथिने विषाणूची संरचना तयार करण्यात आणि बडिंग प्रक्रियेद्वारे विषाणू पेशीतून बाहेर पडण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.
बुंडीबुग्यो: तुलनेने दुर्मीळ, पण गंभीर आव्हान
सध्याचा २०२६ चा उद्रेक बुंडीबुग्यो विषाणूशी संबंधित आहे. बुंडीबुग्यो विषाणू प्रथम २००७ मध्ये युगांडातील बुंडीबुग्यो जिल्ह्यात ओळखला गेला. नंतर २०१२ मध्ये काँगो प्रदेशात त्याचा आणखी एक उद्रेक नोंदवला गेला. पूर्वीच्या नोंदींनुसार बुंडीबुग्यो विषाणू रोगाचा मृत्युदर साधारणतः ३० ते ५० टक्क्यांदरम्यान राहिला आहे. हा मृत्युदर झैरे इबोला उद्रेकांच्या काही ऐतिहासिक मृत्युदरांपेक्षा कमी असू शकतो, परंतु सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने तो अत्यंत गंभीर आहे. विशेष चिंता अशी की झैरे इबोला विषाणूसाठी लस आणि मोनोक्लोनल अँटीबॉडी उपचार उपलब्ध असले, तरी बुंडीबुग्यो विषाणू रोगासाठी अद्याप कोणतीही मान्यताप्राप्त लस किंवा उपचार उपलब्ध नाहीत.
शरीरात इबोला शिरल्यानंतर काय घडते?
इबोला विषाणू शरीरात शिरल्यावर तो प्रथम रोगप्रतिकारक यंत्रणेतील महत्त्वाच्या पेशींना लक्ष्य करतो -मोनोसाइट्स, मॅक्रोफेज आणि डेंड्रिटिक पेशी. या पेशी शरीराचे पहारेकरी असतात; परंतु इबोला त्यांचाच वापर स्वतःच्या वाढीसाठी आणि प्रसारासाठी करतो. संक्रमित पेशींमधून निर्माण होणारे दाहक संकेत प्रक्रियेमुळे सायटोकाईन नावाच्या दाहक संदेशवाहक रसायनांचे संतुलन बिघडते आणि रोगप्रतिकारक यंत्रणेचे नियंत्रण सुटते.
इबोला आणि रक्तस्राव
त्यानंतर हा विषाणू यकृत, अधिवृक्क ग्रंथी, प्लीहा, लिम्फ नोड्स आणि रक्तवाहिन्यांच्या आतील आवरणाशी संबंधित प्रक्रियांवर परिणाम करू शकतो. गंभीर रुग्णांमध्ये रक्त गोठवण्याच्या यंत्रणेचा ताळमेळ बिघडतो, सूक्ष्म रक्तवाहिन्यांची गळती वाढते, रक्तदाब घसरतो आणि शरीरातील द्रवसंतुलन कोलमडते. काही रुग्णांमध्ये सूक्ष्म रक्तवाहिन्यांमध्ये रक्त गोठू लागते, शरीरातील पाणी आणि क्षारांचा समतोल बिघडतो, आणि यकृत, मूत्रपिंड, फुफ्फुसे यांसारख्या अनेक अवयवांचे कार्य एकाच वेळी विस्कळीत होऊ शकते. त्यामुळे ‘इबोला म्हणजे केवळ रक्तस्राव’ ही लोकप्रिय समजूत अपुरी आणि काही प्रमाणात दिशाभूल करणारी आहे. रक्तस्राव होऊ शकतो, पण तो प्रत्येक रुग्णात दिसतोच असे नाही; दिसल्यास तो रोगाच्या गंभीर अवस्थेचे चिन्ह असू शकतो.
आरटी- पीसीआर महत्त्वाची
इबोलाचा उद्भवनकाल साधारणतः २ ते २१ दिवसांचा असतो. सुरुवातीची लक्षणे अतिशय सामान्य वाटू शकतात, त्यात ताप, थकवा, अशक्तपणा, डोकेदुखी, स्नायुदुखी आणि घशात खवखव. पुढे उलट्या, जुलाब, पोटदुखी, पुरळ, यकृत-मूत्रपिंड कार्यातील बिघाड, गोंधळलेपणा किंवा चिडचिड अशी लक्षणे वाढू शकतात. म्हणूनच सुरुवातीच्या लक्षणांवरून इबोला हा मलेरिया, टायफॉइड, डेंग्यू, शिगेलोसिस किंवा इतर रक्तस्रावी विषाणूजन्य तापांपासून वेगळा ओळखणे कठीण असते. खात्रीशीर निदानासाठी आरटी-पीसीआर आणि इतर प्रयोगशाळीय चाचण्या अत्यंत महत्त्वाच्या ठरतात.
इबोला पसरतो कसा?
इबोला हा प्राण्यांमधून माणसांमध्ये येणारा आजार आहे. फळे खाणारी काही वटवाघुळे या विषाणूचे नैसर्गिक घर असू शकतात. त्यांना स्वतःला आजार होत नाही; पण त्यांच्या संपर्कातून विषाणू इतर प्राणी किंवा माणसांपर्यंत पोहोचू शकतो. संक्रमित वन्यप्राणी जसे वटवाघुळे, चिम्पांझी, गोरिला, माकडे, वन-हरिण किंवा साळिंदर आदींच्या रक्त, स्राव, अवयव किंवा मांसाशी थेट संपर्क आल्यास हा विषाणू माणसात प्रवेश करू शकतो.
विलगीकरण आवश्यकच, अन्यथा प्रसार
माणसाकडून माणसाकडे प्रसार प्रामुख्याने संक्रमित रुग्णाच्या शरीरद्रव्यांशी थेट संपर्काने होतो. रक्त, उलटी, विष्ठा, मूत्र, लाळ, घाम, स्तनदूध, वीर्य किंवा योनीस्त्राव यांमध्ये धोका असू शकतो. हे द्रव उघड्या जखमेवर, डोळ्यांच्या, नाकाच्या किंवा तोंडाच्या श्लेष्मल त्वचेवर लागल्यास संसर्ग होऊ शकतो. मृतदेह हाताळताना, विशेषतः परंपरागत अंत्यसंस्कारांमध्ये थेट स्पर्श झाल्यास प्रसाराचा धोका वाढतो. आरोग्यसेवा केंद्रांमध्ये पीपीई, हस्तस्वच्छता, सुरक्षित सुई-वापर, निर्जंतुकीकरण आणि विलगीकरण यांची काटेकोर अंमलबजावणी झाली नाही, तर प्रसार वेगाने वाढू शकतो.
शरीरद्रव्यांच्या संपर्कातून संसर्ग
एक महत्त्वाचा मुद्दा स्पष्ट करणे आवश्यक आहे: इबोला हा COVID-19 किंवा influenza प्रमाणे हवेतून सहज पसरत नाही. रुग्ण लक्षणे दिसण्यापूर्वी साधारणपणे संसर्ग पसरवत नाही. परंतु लक्षणे सुरू झाल्यानंतर आणि शरीरात विषाणू असताना शरीरद्रव्यांच्या संपर्कातून संसर्गाचा धोका मोठा असतो. इबोलातून बरे झालेल्या काही पुरुषांच्या वीर्यात विषाणू किंवा त्याचे जनुकीय अंश बराच काळ राहू शकतात. त्यामुळे अशा व्यक्तींनी सुरक्षित लैंगिक संबंध ठेवणे, डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि गरज असल्यास वीर्याची तपासणी करणे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते.
इबोला, हंता आणि करोना: धोका वेगळा, रणनीति वेगळी
तिन्ही आरएनए-विषाणू असले तरी त्यांचा प्रसार होण्याचा मार्ग आणि आजाराची तीव्रता वेगवेगळी आहे. सार्स-कोव्ह-२ म्हणजे करोना विषाणू मुख्यतः बोलताना, खोकताना किंवा शिंकताना बाहेर पडणाऱ्या सूक्ष्म थेंबांमधून आणि हवेत तरंगणाऱ्या अतिसूक्ष्म कणांमधून पसरतो. त्याचा व्यक्तीनिहाय मृत्युदर इबोलापेक्षा खूप कमी असू शकतो, पण प्रसारक्षमता अतिशय जास्त असल्याने त्याने जागतिक महामारी निर्माण केली.
फुफ्फुसांवर गंभीर परिणाम
हंता विषाणू प्रामुख्याने उंदीर किंवा इतर मूषक प्राण्यांच्या मूत्र, विष्ठा किंवा लाळेमधील सूक्ष्म कण श्वासावाटे शरीरात गेल्याने पसरतो. अमेरिकन खंडात आढळणारे काही हंता विषाणू फुफ्फुसांवर गंभीर परिणाम करणारा आजार निर्माण करतात. अशा गंभीर अवस्थेत मृत्यूचा धोका मोठा असू शकतो. बहुतेक हंता विषाणू माणसाकडून माणसाकडे पसरत नाहीत. मात्र अँडीज विषाणू हा त्याला अपवाद आहे; या विषाणूमध्ये मर्यादित प्रमाणात माणसाकडून माणसाकडे संसर्ग झाल्याच्या नोंदी आहेत.
नियंत्रणाचा मार्ग शिस्तबद्ध आरोग्य व्यवस्थेतून
इबोला या दोन्हींपेक्षा वेगळा आहे. तो रोजच्या सामाजिक सहवासातून किंवा हवेतून सहज पसरत नाही; पण रुग्णाच्या शरीरद्रव्यांशी थेट संपर्क झाला, विशेषतः आरोग्यसेवा, घरगुती काळजी किंवा अंत्यसंस्काराच्या वेळी, तर धोका अत्यंत गंभीर असतो. इबोलावर नियंत्रण मिळवण्याचा मार्ग भीतीतून जात नाही; तो शिस्तबद्ध आरोग्यव्यवस्थेतून जातो. रुग्णांची लवकर ओळख, तात्काळ विलगीकरण, संपर्कात आलेल्या लोकांचा शोध, सुरक्षित अंत्यसंस्कार, संसर्गप्रतिबंधक उपाय आणि समाजाचा विश्वास हेच इबोला नियंत्रणाचे खरे आधारस्तंभ आहेत.
लस-उपचारांची आशा; पण बुंडीबुग्योचे आव्हान वेगळे
इबोलाविरुद्ध औषधे आणि लसींच्या बाबतीत विज्ञानाने चांगली प्रगती केली आहे. झैरे इबोला विषाणूसाठी काही मान्यताप्राप्त औषधे आणि लसी उपलब्ध आहेत. परंतु त्या बुंडीबुग्यो इबोला विषाणूवरही नक्कीच प्रभावी ठरतील, असे म्हणणे अजून वैज्ञानिकदृष्ट्या योग्य नाही. २०२६ च्या बुंडीबुग्यो उद्रेकाचे मोठे आव्हान हेच आहे की या विशिष्ट विषाणूविरुद्ध मंजूर लस किंवा विशिष्ट उपचार उपलब्ध नाहीत.
इबोलाविरोधातील लढा
तरीही उपचार शक्य आहेत. रुग्णाची लवकर ओळख, तत्काळ विलगीकरण, योग्य द्रवपुरवठा, शरीरातील क्षारांचा समतोल सुधारणे, रक्तदाब नियंत्रण, ताप-वेदना कमी करणे, इतर संसर्गांवर उपचार, पोषण आणि अवयवांच्या कार्यावर सतत लक्ष ठेवणे आदी आधारभूत उपचारांमुळे रुग्णाच्या जगण्याची शक्यता वाढू शकते. इबोलाविरुद्धच्या लढाईत अतिदक्षता विभाग, प्रयोगशाळा, प्रत्यक्ष क्षेत्रातील साथ-निरीक्षण, समाजजागृती आणि समुदायाचा विश्वास हे सर्व तितकेच महत्त्वाचे आहेत.
लक्षात ठेवण्यासारखा संदेश
इबोलाला घाबरून जाण्याची गरज नाही; पण त्याला कमी लेखणे धोकादायक आहे. तो हवेतून सहज पसरत नाही, पण शरीरद्रव्यांच्या थेट संपर्कातून अत्यंत गंभीर संसर्ग घडवू शकतो. आफ्रिकेतील बाधित प्रदेशातून प्रवास करून आलेल्या व्यक्तींनी २१ दिवस स्वतःच्या आरोग्यावर लक्ष ठेवावे. ताप, तीव्र थकवा, उलट्या, जुलाब, स्नायुदुखी किंवा अकारण रक्तस्राव दिसल्यास स्वतःला इतरांपासून दूर ठेवून तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी. सरकारी आरोग्य यंत्रणा किंवा १०७५ हेल्पलाइनशी संपर्क साधणे योग्य ठरेल.
विज्ञाननिष्ठेची परीक्षा
रुग्णाची काळजी घेताना हातमोजे, मुखपट्टी, चेहरा संरक्षक ढाल, संरक्षक गाऊन आणि इतर पीपीई वापरावे. वन्यप्राण्यांचे कच्चे किंवा नीट न शिजलेले मांस खाऊ नये. मृतदेह हाताळताना सुरक्षितता आणि सन्मान या दोन्ही गोष्टी जपून आरोग्य विभागाच्या सूचनांनुसार अंत्यसंस्कार करावेत. इबोला हा मानवजातीसमोरील फक्त एक विषाणूजन्य शत्रू नाही; तो आपल्या आरोग्यव्यवस्थेची, विज्ञाननिष्ठेची आणि समुदायविश्वासाची परीक्षा आहे. १९७६ च्या इबोला नदीकाठापासून २०२६ च्या बुंडीबुग्यो संकटापर्यंतचा इतिहास आपल्याला एकच गोष्ट शिकवतो ती म्हणजे योग्य माहिती, वेगवान प्रतिसाद, क्षमता असलेली प्रयोगशाळा, सुरक्षित आरोग्यसेवा आणि जागरूक समाज यांच्या बळावर अगदी भयावह विषाणूशीही शिस्तबद्ध लढा देता येतो.
