Rainwater Harvesting System Eco Bloc Chennai Solution: दर वर्षी त्याच अडचणी! कधी अति दुष्काळ, तर कधी अति वृष्टी, कधी हवामान हायसं करणारा पाऊस, तर कधी पाण्यात बुडालेले रस्ते… काय सुरू आहे हे? आधी पाऊस नव्हता म्हणून आपला जीव कासावीस झाला होता आणि आता पावसाने असा धुमाकूळ घातलाय की, पाणी सरता सरत नाही. वसई-विरारसारख्या ठिकाणी गाड्यांऐवजी बोटींचा ‘ट्रॅफिक’ दिसायला लागला होता. या सगळ्या गोंधळाला निसर्गापेक्षा आपला निष्काळजीपणाच जास्त कारणीभूत आहे. कारण- लाखो लिटर पावसाचे पाणी कोणत्याही उपयोगात येण्यापूर्वीच वाहून गटारात जातं. पण, जर का मी तुम्हाला सांगितलं की, आपल्या रोजच्या जगात आपण जे रस्ते वापरतो, तोच या समस्येमागचा उपाय आहे?
तुम्हाला २०१५ मध्ये चेन्नईत आलेला भीषण पूर आणि २०१९ मध्ये पडलेला तीव्र दुष्काळ आठवतोय का? या दोन्ही परिस्थितींच्या प्रेरणेतून उद्योजक आर. आर. शिवराम यांनी ‘इको ब्लॉक’ (Eco Bloc) या संकल्पनेचा शोध लावला. त्यांनी एका अत्यंत आधुनिक आणि स्मार्ट ड्रेनेज यंत्रणेची कल्पना मांडली; जी पावसाचे पाणी केवळ वाहून नेत नाही, तर ते भविष्यातील वापरासाठी साठवून ठेवते.
असं ड्रेन, जे पाणी साठवतं…
पारंपरिक काँक्रीटच्या गटारांसारखं हे अजिबात नाही. ‘इको ब्लॉक’ हे पुनर्वापर केलेल्या प्लास्टिकपासून बनवलेलं असून, त्यात दर १५ मीटरवर पावसाचे पाणी साठवणारी इन-बिल्ट यंत्रणा बसवण्यात आली आहे. त्याच्या रचनेचे वैशिष्ट्य म्हणजे याचे ‘हनीकोंब’ (मधाच्या पोळ्यासारखे) डिझाईन, ज्यामुळे हे तब्बल ९६ टक्क्यांपर्यंत पावसाचे पाणी शोषून घेऊ शकतं. परिणामी, शहरात पाणी तुंबण्याची समस्या तर कमी होतेच; त्याशिवाय पाण्याचा प्रत्येक थेंब वाचतो.
रस्त्यावरून वाहून आलेलं हे पावसाचं पाणी एका चार टप्प्यांच्या फिल्टरेशन सिस्टीममधून जातं, जी पाण्यातून गाळ आणि कचरा पूर्णपणे वेगळी करते. एकदा का पाणी स्वच्छ झालं की, ते रस्ते आणि उद्यानांच्या खाली लपवलेल्या भूमिगत टाक्यांमध्ये (underground tanks) सुरक्षित साठवलं जातं.
शहरी भागातील गर्दी आणि जागा यांचा विचार करूनच या मॉड्युलर टाक्यांची रचना करण्यात आली आहे. तब्बल ६० टनांपर्यंतचे वजन पेलण्याची क्षमता असलेल्या या टाक्यांचे आयुष्य ५० वर्षांपेक्षा जास्त आहे. विशेष म्हणजे गरज पडल्यास या टाक्यांचा पुनर्वापर करता येतो आणि त्या एका जागेवरून दुसऱ्या जागी सहज हलवताही येतात.
पाण्यात बुडणारे रस्ते आता बनणार ‘वॉटर बँक’!
केवळ पाणी वाचवणं एवढाच या यंत्रणेचा फायदा नाही, तर शहरांना पुरासारख्या संकटाचा सामना करण्यासाठी हा एक अतिशय किफायतशीर पर्याय आहे. पारंपरिक गटार प्रणालीच्या तुलनेत ‘इको ब्लॉक’ १५ ते २० टक्क्यांनी स्वस्त आहे आणि शहरात पाणी साठण्याचं प्रमाण लक्षणीयरीत्या कमी करतं.
या तंत्रज्ञानाची ताकद २०२० मध्ये चेन्नईत झालेल्या पहिल्याच प्रयोगातून जगासमोर आली. जिथे एका मंदिराचा तलाव १२ वर्षांपासून कोरडा पडला होता. तिथे ही यंत्रणा बसवल्यानंतर अवघ्या एका वर्षात तो तलाव पाण्यानं तुडुंब भरला.
आजच्या घडीला भारतभरात ५,००० हून अधिक ठिकाणी ही यंत्रणा यशस्वीरीत्या बसवण्यात आली असून, या माध्यमातून पाच कोटी (५० दशलक्ष) लिटरपेक्षा जास्त पावसाचे पाणी साठवण्यात आले आहे.
भविष्यासाठी एक आशेचा किरण…
निसर्ग आपल्याला भरभरून देतोय; पण आपण ते साठवून ठेवण्यात पूर्णपणे अपयशी ठरतोय. एका बाजूला पावसाच्या पाण्यानं रस्ते तुंबतात. तर दुसऱ्या बाजूला उन्हाळा सुरू होताच पाण्यासाठी टाहो फोडावा लागतो. पाण्याचं योग्य नियोजन आणि जलसंधारण केलं नाही, तर हे दुष्टचक्र दरवर्षी असंच सुरू राहील.
