चीनचे कर्जविषयक अ‍ॅप्स सध्या सक्तवसुली संचालनालयाच्या(ED) रडारवर आहेत. या अ‍ॅप्सची ईडीकडून कसून चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणांशी संबंधित अनेक ठिकाणांवर ईडीकडून छापेमारी देखील करण्यात आली आहे. कर्नाटकातील बंगळुरूमध्ये ‘रॅझॉरपे’, ‘पेटीएम’ आणि ‘कॅशफ्री’ या अ‍ॅप्सशी संबंधित ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली आहे. या अ‍ॅप्सचा ईडीकडून तपास का करण्यात येत आहे? या माध्यमातून काही आर्थिक गैरव्यवहार झाले आहेत का? याचा आढावा घेणारे हे विश्लेषण.

विश्लेषण: महापारेषणच्या क्षेत्रात खासगी प्रकल्पांचा मार्ग मोकळा… ग्राहकांसाठी फायदा की तोटा?

चिनी लोकांचे नियंत्रण असलेल्या या अ‍ॅप्सद्वारे घेतलेल्या कर्जामध्ये गैरव्यवहार झाल्याचा संशय ईडीला आहे. याप्रकरणी विविध ठिकाणांवर ईडीकडून शोधमोहिम राबवली जात आहे. काही चिनी व्यक्तींकडून या प्रकरणात ईडीने तब्बल १७ कोटी जप्त केले आहेत.

चिनी अ‍ॅप कर्ज प्रकरण काय आहे?

देशात करोना साथ सुरू झाल्यापासून काही अ‍ॅप्स ईडीच्या निशाण्यावर आहेत. या काळात अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. यातून मार्ग काढण्यासाठी अनेकांनी या अ‍ॅप्सद्वारे कर्ज घेतले. कर्ज फेडण्याच्या विवंचनेतून अनेकांनी आत्महत्या केल्याचे प्रकार समोर आल्यानंतर यंत्रणांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. हे अ‍ॅप्स डाऊनलोड करताना या अ‍ॅप्सने कर्जदारांची वैयक्तिक माहिती चोरल्याचा आरोप होत आहे. या अ‍ॅप्सद्वारे कर्ज घेतलेल्यांना व्याजासाठी मोठी रक्कम आकारण्यात येत होती. वैयक्तिक माहिती वापरून या कर्जदारांना या अ‍ॅप्सकडून धमकावण्याचा प्रकार होत असल्याचेही समोर आले आहे.  याप्रकरणी मनी लॉड्रिंग कायद्याअंतर्गत ईडीकडून तपास करण्यात येत आहे.  भारतीयांची बनावट कागदपत्रे वापरून त्या व्यक्तींना एका खोट्या कंपनीवर संचालक म्हणून दाखवायचे आणि गुन्हा करायचा, अशी या फसवणूकदारांची पद्धत असल्याचे एका ईडीच्या सूत्राने सांगितले आहे. हा सर्व प्रकार चिनी व्यक्तींकडून नियंत्रित करण्यात येत असल्याचे उघडकीस आले आहे.

विश्लेषण : शारजाह स्टेडियमचा इतिहास काय, पाकिस्तानमधून आणली होती माती, जाणून घ्या सविस्तर

‘रॅझॉरपे’, ‘पेटीएम’ ईडीच्या रडारवर का आहेत?

अ‍ॅप्सद्वारे आर्थिक फसवणूक झाल्याच्या १८ एफआयआर देशभरातील पोलीस ठाण्यांमध्ये दाखल आहेत. ‘रॅझॉरपे’, ‘पेटीएम’ आणि ‘कॅशफ्री’या अ‍ॅप्सच्या कार्यालयीन परिसरात चिनी व्यक्तींचा वावर असल्याचे आढळून आल्यानंतर या ठिकाणांवर पोलिसांनी छापेमारी केली.

याप्रकरणी काही जणांची ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. व्यापारी ओळखपत्र आणि काही बँक खात्यांद्वारे लोकांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याचे समोर आले आहे. या अ‍ॅप्सची संकेतस्थळे आणि कार्यालयीन पत्त्यासंदर्भातही काही गैरप्रकार होत असल्याचे ईडीच्या निदर्शनास आले आहे. पेटीएमने या छापेमारीसंदर्भात अद्याप अधिकृत निवेदन जारी केलेले नाही. आम्ही तपास यंत्रणांना सहकार्य करत आहोत असे ‘रॅझॉरपे’ आणि ‘कॅशफ्री’ या अ‍ॅप्सच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.