4,500-Year-Old Sun Temple Discovered in Egypt: अंधार, काळोख म्हणजेच भीती. म्हणूनच रात्रीचा गडद काळोख संपून प्रकाशाचा पहिला किरण माणसाने पूजनीय मानला. या प्रकाश किरणाचा उद्गाता म्हणजे सूर्य. उत्क्रांतीच्या प्राथमिक टप्प्यातच माणसाने आकाशात दिसणाऱ्या या तेजःपुंज गोळ्याचे महत्त्व जाणले आणि म्हणूनच त्याला देवत्व दिले. भारतीय संस्कृतीत सूर्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. परंतु, भारताप्रमाणेच आपल्या कुशीत प्राचीन संस्कृतीच्या खुणा सांभाळणाऱ्या इजिप्शियन संस्कृतीतही सूर्यउपासनेला तेवढेच महत्त्व आहे. काळाच्या ओघात इजिप्तमधील प्राचीन संस्कृती नामशेष झालेली असली तरी तिच्या पाऊलखुणा आजही तिथल्या मातीत विखुरलेल्या आहेत. त्याच गत खुणांचा मागोवा घेत अभ्यासकांनी ४५०० वर्षे प्राचीन सूर्यमंदिराचा शोध लावला आहे.
मंदिर ४५०० वर्षे प्राचीन, तरी का महत्त्वाचे?
भारतीय इतिहासाप्रमाणे इतर संस्कृतीतही अनेक राजे-राजवाडे होऊन गेले. सध्या इजिप्तमध्ये पुरातत्त्व अभ्यासकांनी शोधून काढलेले सूर्यमंदिराचे अवशेष हे इजिप्तच्या इतिहासातील पाचव्या राजवंशातील राजा न्यूसरे (Nyuserre-इ.स.पू. २४४५) याच्या कालखंडातील आहेत. यांच्याच कालखंडात सूर्य उपासनेला अधिक प्राधान्य देण्यात आले. त्यामुळेच, पुरातत्त्वीय सर्वेक्षणात उघडकीस आलेल्या या मंदिर संकुलाचे अवशेष प्राचीन इजिप्तच्या ‘ओल्ड किंग्डम’ कालखंडातील राजसत्ता, धर्म आणि निसर्ग यांच्यातील परस्परसंबंध समजून घेण्यास मदत करतात. इजिप्तमध्ये सूर्यउपासनेचा इतिहास जुना असला तरी अद्याप फारशी सूर्य मंदिरे आढळलेली नाहीत. त्यामुळे, हे नव्याने उघडकीस आलेले मंदिर संकुल प्राचीन इजिप्तच्या राजकीय इतिहासात सूर्य उपासनेतील विधी परंपरांना कसे स्थान दिले गेले, याबाबत नवे दृष्टिकोन प्रदान करते.
जुन्या शोधला, नवी बळकटी
सूर्य मंदिर संकुलाचे अवशेष अबुसिर या पुरातत्त्वीय क्षेत्रात सापडले. हे स्थळ इजिप्तच्या इतिहासातील पाचव्या राजवंशातील राजांच्या पुरातत्त्वीय अवशेषांसाठी पूर्वीपासूनच प्रसिद्ध होते. इटालियन पुरातत्त्वीय पथकाने केलेल्या उत्खननात न्यूसरे याच्या कालखंडातील सूर्य मंदिर संकुलातील ‘व्हॅली टेम्पल’चा निम्म्याहून अधिक भाग उजेडात आला आहे. त्यामुळे या इमारतीचे क्षेत्रफळ १,००० चौरस मीटरपेक्षा अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही वास्तू केवळ आकाराने मोठी नसून तिची रचना काळजीपूर्वक आखलेली आहे. या वास्तूची स्थापत्य शैली पारंपरिक पिरॅमिडशी संलग्न व्हॅली मंदिरांपेक्षा वेगळी आहे. कालौघात नाईल नदीच्या गाळाच्या जाड थरांनी मंदिराच्या प्रवेशद्वाराचा काही भाग झाकला गेला. त्यामुळे मंदिराच्या अनेक भागांचे जतन होण्यास मदत झाली. १९०१ साली जर्मन Egyptologist लुडविग बोर्खार्ट (Ludwig Borchardt) यांनी या स्थळाचा शोध लावला होता. मात्र भूगर्भातील पाण्याची पातळी खूप जास्त असल्याने त्यावेळेस उत्खनन करता आले नव्हते. परंतु, आता उघडकीस आलेल्या या मंदिराच्या अवशेषांमुळे त्यांच्या तत्कालीन पुरातत्त्वीय निरीक्षणांना बळकटी मिळाली आहे.
पाचव्या राजवंशातील धार्मिक सुधारणांमध्ये हे सूर्य मंदिर कसे बसते?
इजिप्तच्या पर्यटन आणि पुरावस्तू मंत्रालयाच्या फेसबुक पोस्टमध्ये या मंदिराच्या संरचनेविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे. शिवाय, पाचव्या राजवंशाच्या कालखंडात सूर्य उपासनेला राजधर्मात आलेल्या महत्त्वावरही प्रकाश टाकण्यात आलेला आहे.
याशिवाय, एका भव्य दगडी लिंटलवरील शिलालेखामध्ये राजा न्यूसरे याचे चित्र कोरण्यात आले आहे. त्यात सूर्य पूजेशी संबंधित विधींच्या दिनदर्शिकेचा उल्लेख आहे. त्यामुळे हे मंदिर राज्याच्या सूर्यउपासनेच्या पंथाशी जोडलेले असल्याचे उघड होते. मंदिराच्या रचनेत मिरवणुकीसाठी दिलेले खास दालनमार्ग, प्रवेशद्वारांवर मजबूत ग्रॅनाइटचे लिंटल्स आणि अतिरिक्त जिन्याची सोय करण्यात आली होती. यामुळे लोकांची होणारी ये-जा नियंत्रित ठेवता येत होती आणि धार्मिक विधी ठरावीक क्रमाने व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडता येत होते. त्यामुळे हे मंदिर केवळ पाहण्यासाठी उभारलेले प्रतिकात्मक स्मारक नव्हते, तर येथे विधी प्रत्यक्षात करता यावेत यासाठीच ही रचना आखण्यात आली होती, हे स्पष्ट होते.
सूर्य मंदिरातून सापडलेल्या वस्तूंमधून काय माहिती मिळते?
या ठिकाणी केवळ इमारतींचे अवशेषच सापडले नाहीत, तर उत्खननादरम्यान अनेक लहान-मोठ्या पुरावस्तूही सापडल्या आहेत. मंदिर परिसरात ठिकठिकाणी पांढऱ्या चुनखडीचे छोटे तुकडे आढळले असून, त्यावर चित्रलिपी (हायरोग्लिफ्स) कोरलेली आहे. हे तुकडे कदाचित मंदिराच्या आतील भिंतींवरील सजावटीचा भाग किंवा शिलालेख असलेल्या दगडी पट्ट्यांमधून कालांतराने तुटून पडलेले असावेत, असे अभ्यासक सांगतात.
याशिवाय, मृदभांड्यांचे अनेक अवशेष मिळाले आहेत. या अवशेषांचा कालखंड उत्तर ओल्ड किंग्डमपासून प्रारंभिक मिडल किंग्डमपर्यंतचा आहे. विशेषतः ‘फर्स्ट इंटरमिजिएट पीरियड’मधील वापर ठळकपणे दिसतो. आणखी एक महत्त्वाचा शोध म्हणजे ‘सेनेट’ या प्राचीन फलक-खेळाचे दोन लाकडी तुकडे सापडले आहेत. प्राचीन इजिप्तमध्ये सेनेट हा केवळ साधा खेळ नव्हता तर त्याला धार्मिक अर्थही होता. त्यामुळेच हे मंदिर फक्त धार्मिक विधींसाठीच नव्हे, तर येथे दीर्घकाळ राहणाऱ्या पुजारी किंवा सेवकांच्या दैनंदिन जीवनाचाही भाग होते, हे सूचित होते.
एक पवित्र सूर्य मंदिर कालांतराने निवासी परिसरात कसे रूपांतरित झाले?
प्राथमिक अभ्यासातून असे लक्षात येते की, कालांतराने या सूर्य मंदिराचा मूळ धार्मिक हेतू बाजूला राहिला. ‘फर्स्ट इंटरमिजिएट पीरियड’च्या काळात मंदिराच्या काही भागांचा वापर लिपिक आणि आसपास राहणाऱ्या स्थानिक लोकांनी छोट्या वस्तीप्रमाणे केला असावा. घरगुती वापरातील मातीची भांडी, फरशीच्या उंचीतील बदल आणि पूर्वी धार्मिक विधींसाठी वापरल्या जाणाऱ्या जागांवर दिसणाऱ्या दैनंदिन कामकाजाच्या खुणा, हे या पुनर्वापराचे ठोस पुरावे मानले जातात. त्यामुळे इजिप्तमधील राजकीय अस्थिरतेच्या कालखंडात धार्मिक स्थळे सामान्य लोकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग कशी ठरली याविषयी समजण्यास मदत होते. सध्या सुरू असलेल्या उत्खननातून मंदिराचा नाईल नदीशी जोडला गेलेला मार्ग कसा होता, तसेच मंदिराच्या उत्तरेकडील भागांचा अबुसिर येथील पाचव्या राजवंशातील इतर स्मारकांशी कसा संबंध होता, याबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. यामुळे इजिप्तच्या पवित्र धार्मिक परिसरात सूर्य मंदिरांचा विकास कसा होत गेला, याविषयी अधिक माहिती मिळण्यास मदत होणार आहे.
