BAPS Controversy : पॅरिसमधील प्रसिद्ध आयफेल टॉवरभोवती निर्माण झालेला वाद सध्या चर्चेत आहे. गुजरातस्थित बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था (BAPS) च्या प्रतिनिधी मंडळाच्या भेटीदरम्यान काही महिला कर्मचाऱ्यांना काही विशिष्ट ठिकाणी न जाण्यास आणि प्रतिनिधी मंडळाशी मर्यादित संवाद ठेवण्यास सांगितले, असा ‘बीएपीएस’वर आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर आयफेल टॉवरच्या कर्मचाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त करीत आंदोलनसुद्धा केले. परिणामी सोमवार, ७ सप्टेंबर रोजी आयफेल टॉवर पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला.

‘बीएपीएस’च्या पॅरिसमधील पहिल्या मंदिराचे ६ सप्टेंबरला उद्घाटन पार पडले. या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थितांना संबोधित केले. त्यांनी हे मंदिर भारत आणि फ्रान्समधील सांस्कृतिक संबंधांमधील ‘मैलाचा दगड’ असल्याचे म्हटले होते.

मंदिराच्या उद्घाटनापूर्वी शनिवारी पॅरिसच्या मध्यवर्ती भागात भव्य नगर यात्रा काढण्यात आली होती. आयफेल टॉवरच्या परिसरात सुमारे तीन तास चाललेल्या या सांस्कृतिक मिरवणुकीत ४२ देशांमधून जवळपास सहा हजार जण सहभागी झाल्याचं ‘बीएपीएस’नं सांगितलं.

बीएपीएस प्रतिनिधी मंडळांनी आयफेल टॉवर येथे उपस्थित महिला कर्मचाऱ्यांना त्यांचं काम करण्यास मनाई केल्याच्या आरोप करण्यात आला. आयफेल टॉवरच्या कर्मचारी संघटनेनं सांगितलं, “संबंधित महिला कर्मचाऱ्यांना अपमानित वाटलं,” त्यानंतर पॅरिसमधील बीएपीएसनं या घटनेबद्दल माफी मागितली आहे.

ब्रह्मचर्याच्या प्रथेची मुळं कुठे आहेत?

स्वामीनारायण हिंदुइझम या पुस्तकानुसार, मंदिरातील धार्मिक विधींच्या वेळी पुरुष आणि महिलांना काटेकोरपणे वेगळं ठेवण्याची पद्धत ही स्वामीनारायण हिंदू धर्माची एक वैशिष्ट्यपूर्ण बाब मानली जाते. या पुस्तकाचं संपादन अभ्यासक रेमंड ब्रॅडी विल्यम्स व योगी त्रिवेदी यांनी केलं आहे.

न्यूयॉर्कस्थित धर्म अभ्यासक योगी त्रिवेदी यांच्या मते, वेगवेगळ्या स्वामीनारायण संप्रदायांमध्ये ही प्रथा वेगवेगळ्या पद्धतीनं पाळली जाते. ती साधूंच्या वैयक्तिक आध्यात्मिक साधनेचा भाग आहे. मात्र, समाजाची गैरसोय होईल किंवा समाजावर ही प्रथा लादली जाईल, असा तिचा उद्देश नाही. त्रिवेदी पुढे सांगतात की, स्वामीनारायण संप्रदायात केवळ स्वामी ब्रह्मचर्य पाळतात. संप्रदायातील इतर सदस्य मात्र बदलत्या सामाजिक नियम आणि प्रथांनुसार सामान्य जीवन जगतात.

योगी त्रिवेदी म्हणाले, “या समुदायाची ओळख ऐतिहासिकदृष्ट्या भक्ती, सेवा आणि समानता या सार्वत्रिक हिंदू मूल्यांच्या आचरणासाठी राहिली आहे. विशेष म्हणजे, स्वामीनारायण आणि त्यांच्या अनुयायांनी गुजरातसह संपूर्ण भारतात महिलांच्या समानतेचा आणि त्यांच्या अधिकारांचा पुरस्कार केला होता.” संशोधनानुसार, स्वामीनारायण संप्रदायातील ५० टक्क्यांहून अधिक अनुयायी महिला आहेत.

त्रिवेदी म्हणाले, “या प्रथा पाळताना काही प्रसंगी एखाद्या व्यक्तीला नकळत वाईट वाटू शकतं किंवा तिच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. समाजात साधूंचा वावर असताना अशा परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. मात्र, त्यांच्या वैयक्तिक व्रतांचा किंवा नियमांचा कोणाला त्रास देण्याचा हेतू नक्कीच नसतो, असाही माझा अनुभव आहे.”

आयफेल टॉवरवरील आंदोलनाचा संदर्भ देत त्रिवेदी म्हणाले, “स्वामीनारायण संप्रदायांवर असे आरोप होत आहेत, हे माझ्यासाठी खरंच आश्चर्यकारक आहे. कारण- मानवतावादी आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून या समुदायानं जात, लिंग आणि वर्ग यांच्यातील समानतेला सातत्यानं प्रोत्साहन दिलं आहे.”

जगभरात प्रभाव

बीएपीएसनं जगभरात १,३०० हून अधिक मंदिरं उभारली आहेत. त्यापैकी १४ प्रमुख मंदिरं भारताबाहेर आहेत. गांधीनगर आणि दिल्लीतील अक्षरधाम मंदिर संकुलं ही त्यातील प्रमुख मंदिरं मानली जातात. १४ फेब्रुवारी २०२४ रोजी अबुधाबीतील बीएपीएस हिंदू मंदिराचं महंत स्वामी महाराज, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि यूएईचे मंत्री शेख नहयान मुबारक अल नहयान यांच्या उपस्थितीत उद्घाटन झालं.

एकट्या गुजराती समाजात बीएपीएसचे सुमारे ५० लाख अनुयायी असल्याचं मानलं जातं. पूर्व आफ्रिका, ब्रिटन आणि अमेरिकेतही या संप्रदायाचा मोठा प्रभाव आहे. २०२२ मध्ये प्रमुख स्वामी महाराज यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यासाठी अहमदाबादबाहेर ६०० एकर परिसरात एक स्वतंत्र ‘शहर’ उभारण्यात आलं होतं. या सोहळ्याला जगभरातील नेते आणि राजनयिकांनी भेट दिली.

पॅरिसमधील बीएपीएस मंदिराच्या उभारणीत फ्रान्समधील वास्तुविशारद आणि इंजिनियरिंग कंपन्यांनीही सहकार्य केलं. नोट्र-डाम कॅथेड्रलच्या पुनर्बांधणीत काम केलेल्या एच शेव्हालिए या कंपनीचाही त्यात समावेश होता. गुजरातमधून पूर्व आफ्रिकेत झालेल्या स्थलांतरासोबत ‘बीएपीएस’चा विस्तार परदेशातही झाला. त्यामुळे पाटीदार समाजासह गुजराती प्रवासी समुदायात या संप्रदायाचा मोठा आधार तयार झाला.

बीएपीएस स्वयंसेवक आपत्तीच्या काळात मदतकार्यदेखील करतात. २००१ च्या कच्छ भूकंपात संस्थेनं मदतकार्य केलं होतं. मात्र, सप्टेंबर २००२ मध्ये गांधीनगरच्या अक्षरधाम मंदिरावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ३३ जणांचा मृत्यू झाला.

स्वामीनारायण संप्रदायात वेगवेगळे गट कसे तयार झाले?

आज बीएपीएस जगभरातील मोठी धार्मिक संस्था म्हणून ओळखली जाते. मात्र, स्वामीनारायण संप्रदायाच्या काळानुसार अनेक शाखा आणि गट तयार झाले. या संप्रदायाचे संस्थापक सहजानंद स्वामी यांचा १७८१ मध्ये अयोध्येजवळील छपैया गावात जन्म झाला, त्यांचं मूळ नाव घनश्याम पांडे आहे. १८०२ मध्ये स्वामी रामानंद यांच्याकडून दीक्षा घेतल्यानंतर ते सहजानंद स्वामी आणि पुढे भगवान स्वामीनारायण म्हणून ओळखले जाऊ लागले. गुजरातमध्ये त्यांनी स्वामीनारायण संप्रदायाची स्थापना केली.

पुढे त्यांच्या दोन पुतण्यांनी वडताल (नडियाद) आणि अहमदाबाद गादी अशा दोन प्रमुख शाखा सुरू केल्या. सहजानंद स्वामी ब्रह्मचारी होते आणि त्यांना वारस नव्हता. मात्र, अहमदाबाद गादीचे आचार्य विवाह करतात आणि नेतृत्वाची परंपरा कुटुंबातून पुढे चालवतात; या गादीतील साधू ब्रह्मचर्य पाळतात, असे विलियम्स यांनी स्वामीनारायण हिंदुइझम या पुस्तकात नमूद केलं आहे.

बीएपीएसची स्थापना १९०७ मध्ये शास्त्री महाराजांनी केली. त्यांनी १९०५ मध्ये वडताल गादीपासून वेगळं होत स्वतंत्र वाटचाल सुरू केली. आनंद जिल्ह्यातील बोचासन गावावरून संस्थेला हे नाव मिळालं. आज अक्षरधाम मंदिरामुळे बीएपीएस हा स्वामीनारायण संप्रदायातील सर्वांत मोठ्या गटांपैकी एक मानला जातो.

वडताल गादी स्वतःला स्वामीनारायण संप्रदायाची मूळ संस्था मानते. तिच्यापासून पुढे किमान सहा गट निर्माण झाल्याचं सांगितलं जातं. त्यातील बहुतांश गट सहजानंद स्वामींनाच संप्रदायाचे सर्वोच्च आध्यात्मिक व्यक्तिमत्त्व मानतात. सध्या ९२ वर्षीय महंत स्वामी महाराज हे बीएपीएसचे सहावे आध्यात्मिक उत्तराधिकारी व विद्यमान गुरू आहेत. पॅरिसमधील बीएपीएस मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात ते उपस्थित होते.

अभ्यासक रेमंड ब्रॅडी विल्यम्स यांनी १९८४ मध्ये प्रकाशित केलेल्या ‘हिंदू धर्माचा नवा चेहरा : स्वामीनारायण धर्म’ या पुस्तकात सहजानंद स्वामींना ‘सुधारक’, असं संबोधलं आहे. त्यांच्या मते, सहजानंद स्वामींनी आधुनिक काळाला साजेसं हिंदू धर्माचं एक नवं रूप घडवलं आहे.

आज स्वामीनारायण संप्रदायातील प्रमुख गटांमध्ये श्री स्वामीनारायण वडताल, बीएपीएस, मणिनगर श्री स्वामीनारायण गादी संस्था आणि स्वामीनारायण गुरुकुल यांचा समावेश होतो. मणिनगर गादीची स्थापना मुक्तजीवनदास यांनी केली. त्यांनी १९४० मध्ये अहमदाबाद मंदिरापासून वेगळं होत स्वतंत्र संस्था सुरू केली. या स्कॉटिश पाईप बँडसाठी या संस्थेची विशेष ओळख आहे. तर धर्मजीवनदास यांनी १९४७ मध्ये वडतालपासून वेगळं होत स्वामीनारायण गुरुकुलाची स्थापना केली.

मात्र, संप्रदायातील फूट पुढेही वाढली. १९६० च्या दशकाच्या अखेरीस पुन्हा एक मतभेद निर्माण झाला. हरिप्रसाद स्वामी यांच्या नेतृत्वाखालील काही शिष्यांना महिला शिष्यांनाही दीक्षा देण्याची इच्छा होती. ही भूमिका पारंपरिक स्वामीनारायण पद्धतीच्या विरोधात होती. तत्कालीन बीएपीएस गुरु योगीजी महाराज यांनी या प्रस्तावाला नकार दिला. त्यानंतर १९६६ मध्ये बीएपीएसपासून वेगळे होत हरिप्रसाद स्वामी यांनी सोकडा संप्रदायाची स्थापना केली.

म्हणजेच, आज जगभरात मोठा प्रभाव असलेल्या बीएपीएसचा इतिहास केवळ मंदिरं उभारण्यापुरता मर्यादित नाही. स्वामीनारायण संप्रदायाच्या विस्तारासोबतच परंपरा, बदलत्या सामाजिक विचारांवरचे मतभेद आणि त्यातून तयार झालेल्या वेगवेगळ्या शाखांनीही या प्रवासाला आकार दिला आहे.