Eiffel Tower closed Controversy BAPS : स्वामीनारायण संप्रदायाशी संबंधित १०० जणांच्या शिष्टमंडळाने पॅरिसमधील जगप्रसिद्ध आयफेल टॉवरला भेट दिल्यानंतर सोमवारी फ्रान्समध्ये मोठा वादंग निर्माण झाला. तिथे कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांनी अचानक कामबंद आंदोलन पुकारल्यामुळे हे टॉवर पर्यटकांसाठी तात्पुरते बंद ठेवण्यात आले. त्यातच जागतिक माध्यमांनी या आंदोलाची दखल घेतल्यानंतर घडलेल्या प्रकाराची संपूर्ण जगभरात जोरदार चर्चा रंगली. या पार्श्वभूमीवर आयफेल टॉवरवर नेमके काय घडले? तेथील महिला कर्मचाऱ्यांना राग अनावर का झाला? त्याविषयी…
आयफेल टॉवर परिसरात नक्की काय घडले?
आयफेल टॉवरच्या कर्मचारी आणि व्यवस्थापनाने जागतिक माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, ‘बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेशी (BAPS) संबंधित सुमारे १०० जणांच्या गटाने शनिवारी पॅरिसमधील आयफेल टॉवरला भेट दिली. या भेटीदरम्यान तिथे कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या नेहमीच्या कामाच्या ठिकाणांवरून हटवून त्यांच्या जागी पुरुष सहकाऱ्यांना उभे करण्यात आले. या संपूर्ण प्रकारामुळे महिला कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप आणि अपमानाची भावना पसरली. शनिवारी घडलेल्या या घटनेनंतर शनिवार आणि रविवार असे दोन दिवस कर्मचाऱ्यांमधील नाराजी अधिक तीव्र झाली.
कर्मचाऱ्यांचा संताप आणि कामबंद आंदोलन
अखेर सोमवारी कर्मचाऱ्यांनी तातडीची बैठक बोलावून निषेध आंदोलन सुरू केले. अचानक करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे प्रशासनाला पर्यटकांसाठी आयफेल टॉवरचे दरवाजे बंद ठेवावे लागले. या घटनेमुळे संपूर्ण फ्रान्समध्ये एका नव्या वादाला तोंड फुटले. पॅरिसच्या स्थानिक प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली. आयफेल टॉवर व्यवस्थापनाने घडलेल्या प्रकाराबद्दल जाहीर माफी मागितली. तसेच स्वामीनारायण संस्थेनेही या प्रकरणी अधिकृतपणे दिलगिरी व्यक्त केल्याचे समजते.
बीएपीएस महिलांना बाजूला होण्यास सांगितले?
आयफेल टॉवरवरील महिला कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणावरून बाजूला केल्याच्या वादावर आता व्यवस्थापन आणि ‘बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था’ या दोन्ही बाजूंची अधिकृत विधाने समोर आली आहेत. टॉवरचे संचालन करणाऱ्या कंपनीने शिष्टमंडळाकडून आलेल्या अटी मान्य केल्याची कबुली दिली असली, तरी बीएपीएसने मात्र थेट महिला कर्मचाऱ्यांना हटवण्याचे निर्देश दिल्याचा कोणताही उल्लेख केलेला नाही. शिष्टमंडळाने या दौऱ्यादरम्यान ‘महिलांशी होणारा संवाद मर्यादित राहील अशा पद्धतीने भेट आयोजित करण्याची विनंती केली होती; पण आम्ही अशा प्रकारच्या अटी मान्य करायला नको होत्या, अशी जाहीर कबुली कंपनीने दिली. या घटनेतून योग्य तो धडा घेऊन आवश्यक ते कठोर निष्कर्ष काढले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बीएपीएसने आपल्या निवेदनात काय म्हटले?
दुसऱ्या बाजूला, बीएपीएसने आयफेल टॉवर प्रशासनाला महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या जागेवरून हटवण्याचे कोणतेही थेट निर्देश दिले असल्याचा दावा सार्वजनिकरीत्या केलेला नाही. आमचा दौरा आयफेल टॉवरच्या व्यवस्थापन टीमशी समन्वय साधूनच ठरवण्यात आला होता. शिष्टमंडळातील सदस्यांची मोठी संख्या पाहता आणि इतर पर्यटकांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून नियमित वेळेच्या सुरुवातीलाच ही भेट नियोजित करण्यात आली होती. आमच्या माहितीनुसार, या दौऱ्यादरम्यान कोणालाही आयफेल टॉवरवर येण्यापासून रोखण्यात आले नाही, असे त्यांनी आपल्या निवेदनात नमूद केले. तसेच, या घटनेमुळे कोणाचे मन दुखावले असल्यास किंवा कोणाची गैरसोय झाली असल्यास आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आमचा परस्पर आदर आणि सेवेच्या वैश्विक मूल्यांवर पूर्ण विश्वास आहे, असेही बीएपीएसच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
व्यवस्थापनाची चूक की गैरसमज? सत्य काय?
या प्रकारानंतर आतापर्यंत समोर आलेल्या तथ्यांनुसार दोन बाबी स्पष्ट झाल्या आहेत. त्यातील पहिली बाब म्हणजे- बीएपीएसच्या शिष्टमंडळाने महिलांशी कमीत कमी संवाद व्हावा अशा व्यवस्थेची विनंती केली होती, असे आयफेल टॉवर व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. दुसरी बाब- व्यवस्थापनाने त्या विनंतीच्या आधारे अशा उपाययोजना राबवल्या, ज्याच्या परिणामी प्रत्यक्ष ड्युटीवर असलेल्या महिला कर्मचाऱ्यांना बाजूला व्हावे लागले. त्यामुळे या प्रकरणात संवादात नेमकी कुठे तफावत राहिली आणि या सूचना प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी कशा प्रकारे लागू केल्या गेल्या, याचा सविस्तर तपशील प्रशासकीय चौकशीनंतरच अधिक स्पष्ट होणार आहे.
वादाला राजकीय वळण; फ्रान्समध्ये तीव्र संताप
आयफेल टॉवर परिसरातील हा वाद आता अधिकच चिघळला असून त्याला फ्रान्समध्ये मोठे राजकीय वळण लागले. फ्रान्सच्या संसदेतील अध्यक्षा याएल ब्राउन-पिव्हेट यांनी महिला कर्मचाऱ्यांशी झालेल्या गैरवर्तनाचा तीव्र शब्दांत निषेध केला. परदेशी पाहुण्यांच्या अवाजवी मागण्या पूर्ण करण्यासाठी महिला कर्मचाऱ्यांना कामावरून बाजूला होण्यास सांगणे मला अजिबात मान्य नाही. पाहुण्यांचे स्वागत करणे म्हणजे आमची स्वतःची मूलभूत मूल्ये पायदळी तुडवणे असा त्याचा अर्थ होत नाही. फ्रान्समध्ये महिलांना सार्वजनिक जीवनात समान अधिकार आणि पूर्ण स्थान आहे. त्यांना कोणीही अदृश्य राहण्यास सांगू शकत नाही, असे त्यांनी म्हटले. याशिवाय फ्रान्समधील अनेक महिला नेत्यांनीही या घटनेचा कडक शब्दांत निषेध केला. कोणत्याही धार्मिक किंवा सांस्कृतिक परंपरा फ्रान्सच्या स्त्री-पुरुष समानतेच्या घटनात्मक बांधिलकीपेक्षा मोठ्या असू शकत नाहीत, अशी ठाम भूमिका या नेत्यांनी मांडली.
