प्रशांत महासागरात निर्माण झालेल्या सुपर एल निनोमुळे जगभरातील हवामानावर मोठा परिणाम होत आहे. या प्रणालीमुळे सध्या कुठे मुसळधार पाऊस, कुठे दुष्काळ तर कुठे उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. त्यातच समुद्रातील पाण्याच्या तापमानात सातत्याने वाढ होत असल्यामुळे सुपर एल निनोचा धोकाही वाढला आहे. हा बदल इतिहासातील सर्वात शक्तिशाली एल निनोसाठी कारणीभूत ठरू शकतो, अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. तसेच या प्रणालीचा प्रभाव मार्च २०२७ पर्यंत राहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. यादरम्यान सुपर एल निनोच्या प्रभावामुळे जागतिक हवामानाला नेमका किती मोठा फटका बसणार? त्याविषयीचा हा आढावा…

सुपर एल निनो म्हणजे नेमके काय?

जागतिक हवामान संघटनेच्या माहितीनुसार, ‘एल निनो’ ही प्रशांत महासागराशी संबंधित नैसर्गिक हवामान प्रक्रिया असून ती साधारणपणे दर दोन ते सात वर्षांनी निर्माण होते. एल निनोमुळे समुद्रातील पाण्याच्या तापमानात मोठी वाढ होऊन वाऱ्यांचे प्रवाह, ढगांची निर्मिती आणि पावसाचे चक्र बदलते. ही प्रणाली दिसायला लहान असली तरी त्याचा परिणाम संपूर्ण जगाच्या हवामानावर होतो. एल निनोमुळे काही ठिकाणी दुष्काळ, तर काही ठिकाणी अतिवृष्टी आणि पूरस्थिती निर्माण होते. सर्वसाधारणपणे या प्रणालीची सुरुवात मार्च ते जून या कालावधीत होते, तर नोव्हेंबर ते फेब्रुवारीदरम्यान त्याचा प्रभाव सर्वाधिक तीव्र असतो. ही नैसर्गिक स्थिती तब्बल १८ महिन्यांपर्यंत टिकून राहू शकते.

सुपर एल निनोमुळे कुठे कोसळणार पाऊस?

जागतिक हवामान संस्थांच्या मते, सुपर एल निनोचा प्रभाव वाढल्यास ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान पूर्व आफ्रिका, दक्षिण अमेरिका आणि अमेरिकेच्या दक्षिण भागात नेहमीपेक्षा अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच दक्षिण इथिओपिया, मध्य आणि दक्षिण सोमालिया तसेच ईशान्य केनियामध्ये सामान्यपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यताही ९० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. या भागातील वार्षिक सरासरीपेक्षी तब्बल ७० टक्के पाऊस याच कालावधीत पडण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पावसाचे प्रमाण वाढल्यास पूरस्थितीचा धोका वाढण्याचा इशाराही देण्यात आला आहे. यादरम्यान एल निनोमुळे सप्टेंबर २०२६ ते जानेवारी २०२७ या कालावधीत दक्षिण ब्राझील, उरुग्वे आणि ईशान्य अर्जेंटिनामध्येही पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून तेथील प्रशासनाने आतापासूनच उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे.

सुपर एल निनोमुळे कुठे दुष्काळाचे संकट?

सुपर एल निनोमुळे सामान्यतः दक्षिण आशिया, आग्नेय आशिया, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेत कोरडे हवामान राहते. त्यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील मान्सूनवरही त्याचा मोठा परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, १ जून ते ९ सप्टेंबरदरम्यान भारतात सरासरीपेक्षा १५ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे अनेक भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दुसरीकडे- इंडोनेशियामध्ये यंदा अधिक कोरड्या हवामानाचा आणि जंगलातील वणव्यांचा धोका वाढला आहे. या देशात जुलैच्या अखेरीपर्यंत तब्बल पाच हजार ठिकाणी आगी प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. त्यामध्ये सुमात्रा आणि कालिमंतान या भागांतील ठिकाणांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसून येत आहे. ऑस्ट्रेलियाच्या हवामान विभागानेही दक्षिण आणि पूर्व भागांत सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. वाढत्या उष्णतेमुळे येथेही वणवे पेटण्याचा धोका वाढला आहे. त्याशिवाय दक्षिण आफ्रिकेच्या हवामान संस्थेने आपल्या बहुतांश भागांत सरासरीपेक्षा कमी पाऊस आणि नेहमीपेक्षा जास्त तापमानाचा अंदाज वर्तवला आहे.

सुपर एल निनोमुळे जागतिक अन्नसुरक्षा धोक्यात

प्रशांत महासागरात अधिक तीव्र होत चाललेल्या एल निनोचा थेट फटका जागतिक अन्नपुरवठ्याला बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न विभागाने (WFP) दिलेल्या इशाऱ्यानुसार, अल निनोच्या संकटामुळे २०२७ च्या अखेरीस जगभरातील आणखी किमान चार कोटी ९० लाख लोक तीव्र उपासमारीच्या गर्तेत ढकलले जाण्याची शक्यता आहे. संस्थेने अभ्यास केलेल्या ४५ देशांमध्ये अन्नधान्य संकटाचा सामना करणाऱ्या लोकांची संख्या २२.५ कोटींवरून थेट २७.४ कोटींवर पोहोचण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याचा सर्वाधिक तडाखा पूर्व व दक्षिण आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेनुसार, एल निनोचा सर्वाधिक धोका मका, भात आणि पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या इतर पिकांना आहे. कोरड्या हवामानामुळे दक्षिण आफ्रिका आणि साहेल प्रदेशापासून दक्षिण आशिया व आग्नेय आशियापर्यंतच्या भागांमध्ये पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची भीती आहे.

एल निनोमुळे २०२७ ठरणार सर्वात उष्ण वर्ष?

सुपर एल निनोच्या प्रभावामुळे जागतिक तापमानात मोठी वाढ होते. याचा सर्वाधिक तीव्र परिणाम एल निनो सक्रिय झाल्याच्या दुसऱ्या वर्षी दिसून येतो. जागतिक हवामान संघटनेच्या माहितीनुसार, सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान बहुतांश भागांत नेहमीपेक्षा जास्त तापमान नोंदवले जाईल. तसेच, आतापासून ते २०३० दरम्यानचे किमान एक वर्ष २०२४ चा विक्रम मोडून इतिहासातील सर्वात उष्ण वर्ष ठरण्याची शक्यता ८६ टक्क्यांपेक्षाही जास्त आहे. उत्तर अमेरिकेतील हिवाळ्यावर एल निनोचा मोठा प्रभाव वादळांची दिशा ठरवणाऱ्या ‘जेट स्ट्रीम’ वाऱ्यांच्या माध्यमातून पडतो. ‘नोआ’च्या वैज्ञानिकांनी एल निनोला उत्तर अमेरिकेतील बर्फवृष्टी रोखणारा घटक असे संबोधले आहे. यापूर्वीच्या एल निनोच्या हिवाळ्यात ग्रेट लेक्स परिसर, न्यू इंग्लंडचा अंतर्गत भाग, उत्तरी रॉकी पर्वतरांग, पॅसिफिक नॉर्थवेस्ट, पश्चिम कॅनडा आणि अलास्का येथे सरासरीपेक्षा कमी हिमवृष्टी झाली होती. त्याउलट अमेरिकेच्या दक्षिण भागात, विशेषतः अधिक उंचीच्या प्रदेशांमध्ये सरासरीपेक्षा जास्त हिमवृष्टी झाल्याचे दिसून आले होते. मात्र, हे निष्कर्ष हे मागील वर्षांतील हवामानाच्या नमुन्यांवर आधारित असून दरवर्षी परिस्थितीत मोठा फरक पडू शकतो, असे नोआ संस्थेने म्हटले आहे.

एल निनोमुळे आणखी कोणते परिणाम?

शक्तिशाली अल निनोमुळे अटलांटिक महासागरातील चक्रीवादळांची तीव्रता सामान्यतः कमी होते. ‘नोआ’च्या अंदाजानुसार यंदा चक्रीवादळांचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची ७५ टक्के शक्यता आहे. अलीकडील इतिहासातील प्रत्येक शक्तिशाली एल निनोचा संबंध सरासरीपेक्षा कमी चक्रीवादळांच्या हालचालीशी राहिला आहे. मात्र, हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे की- कोणत्याही दोन एल निनोच्या घटना एकसारख्या नसतात. तसेच एल निनोची तीव्रता किती आहे, यावरून एखाद्या विशिष्ट प्रदेशावर होणाऱ्या परिणामांची तीव्रता थेट ठरवता येत नाही. कारण हिंदी महासागर आणि अटलांटिक महासागरातील परिस्थितीचाही हवामानावर परिणाम होतो, असे जागतिक हवामान संस्थेने नमूद स्पष्ट केले आहे. यादरम्यान संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनीही या स्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. एल निनोची तीव्रता आपल्या डोळ्यांसमोर वाढत आहे. विज्ञान याबाबत कोणतीही शंका ठेवत नाही. पृथ्वी आता एका अनपेक्षित संकटाच्या उंबरठ्यावर आहे आणि समुद्राचे पाणी सातत्याने तापत चालले आहे, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे.

संदर्भ :

United States National Oceanic and Atmospheric Administration (NOAA) – Data released on September 14, 2026

World Meteorological Organization (WMO) — El Niño set to become very strong, raising risks of extreme weather into 2027, 3 September 2026.

World Food Programme (WFP) El Nino least Report.

South African Weather Service (SAWS) Data.

IGAD Climate Prediction and Applications Centre (ICPAC) Report.

FAO — Food and Agriculture Organization of the United Nations Data.